वास्तुपुरुषाने गुरुपौर्णिमेला मराठवाडय़ाच्या शुष्क परिसरातून सीमोल्लंघन केलं आणि उत्तरेच्या मेळघाट, सातपुडा, विंध्य पर्वतरांगांतील घनदाट वनं आणि सृष्टीसौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेत मध्य प्रदेशात, भारताच्या ‘अंत:करणा’त प्रवेश केला. पुष्य नक्षत्र इथे चांगलंच बरसत होतं. मधूनच उघडीप मिळून ‘व्योमराज’ तळपायला सुरुवात करायचे. वास्तुपुरुषाला जाणीव झाली की, आपण आता कर्कवृत्ताच्या प्रदेशात पोचलो आहोत. सूर्याच्या उत्तरायणाची सीमा आली भोपाळजवळ आणि वास्तुपुरुषाने निश्चय केला की यावेळी या राजधानीच्या शहराच्या नियोजनाचा लेखाजोगा घ्यायचा. भोपाळ शहरात शिरता शिरता वास्तुपुरुषाचं मन पोचलं भूतकाळात. २-३ डिसेंबर १९८४ च्या काळरात्रीच्या आठवणीने त्याच्या मन:पटलावर काजळी अंधारू लागली. त्या रात्री युनियन कार्बाइड कारखान्यातून झालेल्या विषारी वायूगळतीने विषबाधा होऊन भोपाळमध्ये हाहा:कार उडाला. सुमारे ४००० माणसं लगेचच मृत्युमुखी पडली, सुमारे ६ लाख माणसं गंभीररीत्या जखमी व आजारी पडली आणि त्यातील सुमारे १५ ते २० हजार माणसं पुढील काही महिन्यांत मरण पावली. दुर्दैव तिथेच थांबलं नाही. आज तीन दशकांनंतरही या निष्पाप जिवांना न्याय मिळालेला नाही आणि या उद्योगाचं गुन्हेगार व्यवस्थापन मात्र मोकाटच रहिलं. वास्तुपुरुषाला उपराळकर देवचाराला भेटायची तीव्र इच्छा झाली आणि त्या विचारातच तो भोपाळच्या मध्यवर्ती भोजताल तलावाकिनारी आला. मावळता सूर्य आणि त्याला लडीवाळपणे झाकाळणारे, गोंजारणारे कृष्णमेघ तलावाच्या निळाईत उतरले होते. वास्तुपुरुष त्या निसर्गरासात गुंतला आणि अचानक सूर्यिबब जलतरंगांसह नर्तन करत असल्याचा भास त्याला झाला. उपराळकर देवचारच त्या निळाईतून प्रतििबबीत होत होता. ‘‘वास्तुपुरुषा, तुझी निराश आणि हताश मन:स्थिती मी समजू शकतो. ती घटनाच भयाण होती आणि त्यापेक्षा तिरस्करणीय माणुसकीला काळिमा लावणारं वर्तन होतं उद्योजकांचं आणि राजकारण्यांचं. तरीही मला असं वाटतं की नगररचनेतील आणि व्यवस्थापनातील त्रुटीही अशा घटनांना जबाबदार असतात. मुळात असा धोकादायक, विषारी प्रदूषणकारक उद्योग घनदाट लोकवस्तीच्या परिसरात का असावा, त्याच्यावर नियमित आणि योग्य नियंत्रण का नसावं, दुर्घटना व्यवस्थापन का नसावं? त्याहुनही पुढे जाऊन इतक्या मोठय़ा दुर्घटनेची योग्य चौकशी आणि अपराध्यांना शिक्षा का होऊ नये? जनता अशा दुर्घटनांतून काही शिकली आहे का? निराशा बाजूला ठेवून तू या परिस्थितीतून कोणती शिकवण लोकांना देशील?’
वास्तुपुरुष आता भानावर आला. उपराळकर देवचाराने विचारांना चालना देऊन मनावरचं मळभ काही प्रमाणात तरी हटवलं होतं. ‘‘नमस्कार देवा महाराजा, किती मनकवडा आहेस तू. तुझी नुसती आठवण काढली आणि तू केवढी प्रश्नावलीच समोर मांडलीस. खरं आहे तू म्हणतोस ते. खरं म्हटलं तर भोपाळ हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निर्गरम्य शहर, इथल्या गिरीजनांनी, अदिवासींनी वसवलेलं, मुसलमान बेगम राण्यांनी विकसित केलेलं. नबाबाने सुरक्षित ठेवलेलं संस्थान. स्वातंत्र्यानंतर ते झालं मध्य प्रदेश राज्यात विलीन; पकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना आसरा देत. या शहराला प्राचीन पाश्र्वभूमी आहे बौद्ध धर्माच्या शिकवणुकीची, सांचीच्या जगप्रसिद्ध पुरातन स्तुपातून दिली जाणारी. पण आधुनिक नगररचनाकार आणि राजकारणी ही सांस्कृतिक पाश्र्वभूमीच विसरले आणि औद्योगिक विकासाच्या नावाखाली या निसर्गरम्य परिसरात कोणतेही, कसेही उद्योगधंदे उभे केले गेले. शहर प्रदूषित व्हायला लागलं, बकालपणा पसरला, लोकसंख्या विस्कळीत वाढली. पुरातन वास्तू ढासळायला लागल्या, निसर्ग परिसरांचा ऱ्हास सुरू झाला, संपूर्ण समाजव्यवस्थेलाच कीड लागली. भोपाळ दुर्घटनेपासून सर्वच छोटय़ा, झपाटय़ाने विकसित होऊ पाहाणाऱ्या शहरांनी धडा घ्यायला हवा. प्रत्येक मानव परिसरांची वैशिष्टय़पूर्ण संस्कृती उत्क्रांतीत होत असते. प्रत्येक शहर हे मुळातच एक सांकृतिक प्रदर्शन असतं. त्याचा विकास, वाढ ही त्या त्या संस्कृतीच्या ढाच्यातूनच होत असते आणि तशीच ती स्थानिक रहिवाशांच्या विचारांतून, सहभागातून व्हायला हवी. स्वार्थी हेतू आणि इथून तिथून आयात केलेल्या विकास कल्पनांमुळे शहरांच्या या मूलभूत गाभ्यालाच धोका पोचतो. त्यातच अवैज्ञानिक, असहिष्णू आणि अविचारी आयोजनामुळे नुसता विस्कळीतपणा नाही तर धोकादायक, गंभीर परिस्थिती शहरांतून उभी रहात असते. नसíगक पर्यावरणाचा विनाश सर्वाच्या डोळ्यांदेखत होत असतो. हे न होण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे परिसराचा सर्वागीण, संतुलित, सर्वसमावेशक, पर्यावरणाच्या व निसर्गाच्या दृष्टिकोनातून विचार आणि त्यातून उमलणारं नियोजन. स्थानिक जनतेने, स्वविचारांनी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, स्वत:साठी केलेलं नियोजन. याची सुरुवात शहराचा नसíगक परिसर, पर्यावरण, समाजव्यवस्था, संस्कृती, अर्थव्यवस्था, वाढीचा वेग, परिसराची क्षमता, पर्यावरणीय आघाताचा अंदाज इत्यादी बाबींच्या र्सवकष अभ्यासातून व्हायला हवी. सर्वात मुख्य म्हणजे प्रत्येक शहरासाठी त्याचं स्वत:चं असं वैशिष्टय़पूर्ण मूलभूत धोरण ठरायला हवं. अगदी या भोपाळचंच उदाहरण घेतलं तर या शहराची स्वयंभू शक्ती आहे इथला निसर्ग आणि इथली सर्वसमावेशक संस्कृती. या शहराची ओळख ‘तलाव शहर’ अशीही आहे. त्यामुळे या शक्तिस्थळांना धोका होईल असा कोणताही उपक्रम शहराच्या नियोजनात असता कामा नये. शहराची अर्थव्यवस्था बलवान होण्यासाठी उद्योगधंद्यांची गरज असते. पण त्यांची निवड डोळसपणे आणि सजगतेने करायला हवी. औद्योगिक आणि व्यापारी व्यवस्था अनेक वेळा रहिवासी, सांस्कृतिक परिसरांना, पर्यावरणाला त्रासदायक व घातक ठरू शकतात. तेव्हा त्यांचं क्षेत्र-नियोजन समर्पकपणे करायला हवं. भोपाळसारख्या शहरात प्रदूषण प्रवर्तक उद्योगांना स्थानच असता कामा नये. इतरत्रही असे उद्योग आवश्यक असल्यास ते शहर परिसराच्या बाह्य़ भागात असावेत आणि त्यांवर काटेकोर पर्यावरण नियंत्रण ठेवायला हवं. वेळ पडल्यास त्यांना टाळं ठोकण्याची तयारी असायला हवी आणि या अंमलबजावणीत कोणतीही तडजोड होता कामा नये. भोपाळ दुर्घटनेतून एक महत्त्वाचा धडा प्रत्येकाने घ्यायला हवा. तो म्हणजे, अपघात होण्याआधीच तो होण्याच्या संभवतेचा विचार करून दुर्घटना टाळण्यासाठी किंवा तिचा आघात कमी होण्यासाठी उपाययोजना करायला हवी. शिवाय अपघात झाल्यानंतर त्याचं कारण शोधून काढून जबाबदार व्यक्तीवर किंवा व्यवस्थापनावर कडक कारवाई ताबडतोबीने व्हायला हवी आणि त्यांच्याकडून अपघातग्रस्तांना पुरेपूर नुकसानभरपाई तातडीने मिळायला हवी. हे व्यवस्थापन हा शहर नियोजनाचाच एक भाग असला पहिजे. केवळ भोपाळच्याच नव्हे तर सर्वच शहरांतील नागरिकांना ही अंमलबजावणी जागरूकतेने करण्याचा आग्रह मी धरीन. माझे विचार योग्य आहेत ना देवा महाराजा?’’
‘‘वास्तुपुरुषा, तुझे विचार नुसते योग्यच नाहीत तर त्यामागची तुझी कळकळ मला स्पष्ट दिसत आहे. तरीही एक लक्षात घ्यायला हवं की, यातला प्रमुख भाग हा व्यवस्थापनाचा आणि अंमलबजावणीचा आहे. मला एक सांग, की भोपाळसारख्या परिसरातल्या शहरांच्या नियोजनात कोणते प्रमुख घटक आहेत की ज्यांकडे जराही दुर्लक्ष करून चालणार नाही?’’ उपराळकराने विचारमंथनाची दिशा बदलली.
‘‘कुठच्याही शहराच्या नियोजानातला सर्वप्रमुख घटक म्हणजे तिथला निसर्ग आणि पर्यावरण. जमीन, पाणी आणि हवा. त्यासाठी प्रथम भूरचना, भूगर्भ, हवामान, सौरमार्ग, वाऱ्याची दिशा, पाणवठे, भूगर्भ जलसाठे इत्यादींचं सर्वेक्षण आणि सखोल अभ्यास व्हायला हवा. आपण भोपाळपासून सुरुवात करू. हा आहे कर्कवृत्तालगतचा प्रदेश. इथे सूर्य हा नेहमी दक्षिण बाजूनेच पूर्व-पश्चिम प्रवास करत असतो. इथलं हवामान हे समशितोष्ण आणि मिश्र असतं. काहीसं गुंतागुंतीचं असतं. इथे पाऊस व्यवस्थित असतो, आद्र्रता मध्यम असते, उन्हाळा थोडा काळ तीव्र असतो, तसाच हिवाळाही थोडा काळ तीव्र असतो. वर्षांतला काही काळ दिवस आणि रात्रीच्या तापमानात खूपच फरक पडतो. काही काळ दवाचा मारा जोरदार असतो. तेव्हा इथल्या नगररचनेला तसंच वास्तुरचनेला सर्वागीण आणि सारासार विचाराचा आधार द्यायला लागेल. हवामानाचा मानवाच्या सुखकारक राहाणीमानासाठीचा विचार करताना वर्षांतल्या सम आणि विषम हवामानाच्या कालावधीचा एक निर्देशांक काही वर्षांच्या निरीक्षणातून काढावा लागेल आणि त्याचा वापर करून नगररचनेचा किंवा इमारतींचा समर्पक आराखडा बनवावा लागेल. भूरचनेचा विचार केला तर भोपाळ हे तसं उंचावरचं शहर आहे, समुद्रसपाटीपासून सुमारे पाचशे मीटर उंचीवरील. शिवाय हा विंध्य पर्वतरांगेलगतचाच परिसर आहे. इथले भूजलसाठे समृद्ध आहेत. निसर्गाचीही या परिसरावर कृपादृष्टी आहे. जैवविविधतेने परिपूर्ण असे निसर्गपरिसर इथून जवळपास आहेत. इथे वारे अगदी ‘मनमोकळे’ वाहातात. कधी संथ तर मधूनच वावळटी उधळत. या सर्व घटकांचा विचार मूलभूत नियोजनात करायला हवा.’’
वास्तुपुरुषाची वेगवान विचारधारा उपराळकर देवचाराने रोखली, ‘‘तू सुचवत असलेलं धोरण मला तर पर्यावरणदृष्टय़ा अगदी समर्पक दिसत आहे. पण ते समजायला थोडंसं कठीण आहे. आपण एक करू- आता दीप अमावास्या येत आहे आणि लगेचच निसर्गसुंदर श्रावणमासही सुरू होईल. आश्लेषा नक्षत्राचा ऊनपावसाचा आणि इंद्रधनूंचा खेळ सुरू होईल. माणसंही खुशीत असतील. तेव्हा या सणासुदीच्या श्रावणाच्या मुहूर्तावर आम्हाला आमची या कर्कवृत्त प्रदेशातील घरं आणि इमारती आनंददायक कशा होतील हे मार्गदर्शन कर.’’
वास्तुपुरुषानेही एक सुस्कारा सोडला, ‘‘होय देवा महाराजा, भेटू नारळीपौर्णिमेच्या जवळपास. तोपर्यंत करतो भटकंती इथल्या निसर्गसमृद्ध परिसराची आणि भेटतो इथल्या पुरातन वास्तूंना, सांस्कृतिक वारशाची शिकवण घ्यायला.’’
पुन्हा एकदा जलतरंग लहरले, टिटवीच्या निर्गुणी संगीताच्या पाश्र्वभूमीवर!

भोपाळ दुर्घटनेपासून सर्वच छोटय़ा, झपाटय़ाने विकसित होऊ पाहाणाऱ्या शहरांनी धडा घ्यायला हवा. प्रत्येक मानव परिसरांची वैशिष्टय़पूर्ण संस्कृती उत्क्रांतीत होत असते. प्रत्येक शहर हे मुळातच एक सांकृतिक प्रदर्शन असतं. त्याचा विकास, वाढ ही त्या त्या संस्कृतीच्या ढाच्यातूनच होत असते आणि तशीच ती स्थानिक रहिवाशांच्या विचारांतून, सहभागातून व्हायला हवी. स्वार्थी हेतू आणि इथून तिथून आयात केलेल्या विकास कल्पनांमुळे शहरांच्या या मूलभूत गाभ्यालाच धोका पोचतो. त्यातच अवैज्ञानिक, असहिष्णू आणि अविचारी आयोजनामुळे नुसता विस्कळीतपणा नाही तर धोकादायक, गंभीर परिस्थिती शहरांतून उभी रहात असते.

उल्हास राणे – ulhasrane@gmail.com