बाजारातून कंदील घरी येताक्षणी ‘तो’ पाडव्याच्या गुढीसारखा दिसण्याजोगा लटकवता आला की घराच्या नितळ ‘चेहऱ्यावर’ चमकणारी ‘बिंदी’ रेखल्याचं समाधान मिळतं. मिनी आकाशकंदील घराच्या खिडक्यांमध्ये कर्णभूषणांसारखे हलकेच डुलू लागतात. विजेच्या दिव्यांच्या ‘गळेसरांनी’ घराला चमकवताना बालहट्टापुढे नमतं घ्यावं लागतं.

‘आज मला इतका आनंद झाला आहे,’ असं आपण म्हणतो तेव्हा ‘इतका’ म्हणजे किती ते आपण शब्दात सांगू शकत नाही, मोजपट्टीने मोजू शकत नाही. त्यामुळे आपण तो कुठल्याना कुठल्या स्वरूपात व्यक्त करतो. कधी एखादी गिरकी घेतो तर कधी लकेर छेडतो तर कधी खुदकन् गालात हसतो. हे झालं स्वत:पुरतं, पण आपल्याला तेवढंच पुरेसं नसतं. आनंदाचा गुणाकार करायचा असतो. मग स्वत:ही सजतो, ‘आपल्या’ माणसांना सजवतो आणि आपल्या घरालाही सजवतो. घरात लग्नकार्य ठरायचा अवकाश, कितीही कमी दिवस मधे असू देत लगेच रंगरंगोटी करतो. लग्न काय ठरेल तेव्हा घाई नको, आधीच रंगकाम उरकून घेऊ, हे तत्त्वात बसत नाही, कारण आनंद व्यक्त करण्याचं ते दृश्य माध्यम असतं.

16th April Panchang rashi bhavishya these zodiac signs Wishes will be fulfilled Aries to Min signs Daily marathi horoscope
१६ एप्रिल पंचांग: इच्छा होतील पूर्ण, हातात येतील नवीन अधिकार; वाचा मेष ते मीन राशींचा कसा असेल मंगळवार ?
When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
Chaitra Navratri 2024 From Gudhi Padwa Lakshmi Blessing These Four Zodiac Signs
चैत्र नवरात्रीपासून ‘या’ ४ राशींच्या कुंडलीत राहील माता लक्ष्मी; १ वर्ष चहूबाजूंनी कमावतील धन, आरोग्यही सुधारणार

आषाढघन मनसोक्त बरसून गेले की कसं मोकळं वाटू लागतं. गौरीगणपती, नवरात्र ‘सजू मी कशी, नटू मी कशी’ या विचारांत पटापट उडय़ा मारत पुढे सरकतात आणि सणांच्या राजाचे- दिवाळीचे पडघम वाजू लागतात. फार पूर्वी सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची रात्र होती. भीषण काळोख संपल्याचा आनंद दिवे लावून साजरा केला गेला आणि दिवाळी सुरू झाली.

परीक्षा आटोपल्या की खरेदीचे वेध लागतात. स्वत:च्या खरेदीला समांतरच घराला सजवण्याचा, अलंकृत करण्याचा प्रवास चालू होतो. साफसफाईने आधीच ते झुळझुळीत दिसू लागते. आकाशकंदिलाचा विचार डोक्यात डोकावू लागतो. माळ्याच्या आवराआवरीत खाली उतरून आलेला, जपून ठेवलेला, पारंपरिक आकाशकदिलाचा सांगाडा खुणावत असतो. हातांना सुरसुरी येते. रंगीत कागद बाजारातून येतात. डिंक चिकटायला सारखा जवळ येतच असतो. मधली मोठी शंकरपाळी, त्यांना जोडणारे त्रिकोण, खालीवर चौकोनी कडांना एका रेषेत चिकटलेल्या करंज्या, सांध्याचा खडबडीतपणा, लपवणारी कागदी फुलं आणि अल्लडपणे हलणाऱ्या झिरमिळ्या सगळ्यात ‘मी’ असल्यामुळे आकाशकंदील डोळ्यात भरण्याजोगा होतो. वेळेचं गणित सुटत नसेल तेव्हा रस्त्यावर यावंच लागतं. रंगीबेरंगी चमचमणाऱ्या चांदण्या, पर्यावरणाचा तोल संभाळण्याचा वसा घेतलेले, कागदाचे वैविध्यपूर्ण नक्षीदार, गोल सिलिंडरसारखे आकाशकंदील नजरेखालून घालताना ‘थोडा हटके हवे’ या विचारातून खरेदी होते. आणि तो मिरवत आणताना आपली नजर, भेटणाऱ्याच्या नजरेत ‘कौतुक’ शोधत असते. ‘छान दिसतोय हं’ असा अभिप्राय सुखावून जातो. त्याच आनंदात मिनी आकाशकंदिलांचीही वर्णी लागते. घरी येताक्षणी ‘तो’ पाडव्याच्या गुढीसारखा दिसण्याजोगा लटकवता आला की घराच्या नितळ ‘चेहऱ्यावर’ चमकणारी ‘बिंदी’ रेखल्याचं समाधान मिळतं. मिनी आकाशकंदील घराच्या खिडक्यांमध्ये कर्णभूषणांसारखे हलकेच डुलू लागतात. विजेच्या दिव्यांच्या ‘गळेसरांनी’ घराला चमकवताना बालहट्टापुढे नमतं घ्यावं लागतं. बाजारांत रंगीत प्रकाशाचा खेळ करणाऱ्या दिव्यांच्या माळांचं केवढं तरी विश्व आकर्षित करत असतं. काही पेटत्या उदबत्तीसारखे केशरी टोपी घातलेले, चिमुकले, तर काही फुलांच्या कळ्यांसारखे तर काही द्राक्षाच्या घोसांसारखे. काही माळांमधे एकाच रंगाचे दिवे असतात तर काहींमधे रंगाचा  खो-खो असतो. काही स्थिर तर काही डोळे मिचकावणारे, काही एकाच दिशेने धावणारे तर काही ठरावीक वेळानंतर एकशेऐंशी अंशातून  दिशा बदलत लक्ष वेधून घेणारे. छोटय़ांच्या नजरेत ते लुकलुकत राहतात आणि कोणती माळ घ्यावी, हा निर्णय घेणे अवघड करून टाकतात. घराच्या गळ्यात हे नवरंगी चमचमते हार घातले की छोटे कंपनीचा ‘त्या’ बटणांशी चाळा करण्याच्या, त्यासाठी उडय़ा मारण्याच्या खेळाला सुरुवात होते.

दिव्यांच्या माळा केव्हाही झगमगतात, पण पणतीची ऐट फक्त दिवाळीतच. लाल मातीची, सोनेरी वर्खाची, आकर्षक वेलबुट्टीने सजणारी, चिनी मातीची, तांब्याची पणती, कधी ‘सोलो परफॉर्मन्स’ तर कधी ‘मिळून साऱ्याजणी’ पंचारती किंवा दीपमाळेच्या रूपात मंद डुलणाऱ्या ज्योतींचे दीपनृत्य साजरे करून प्रकाशाच्या उत्सवात मानाचं पान मिरवतात. इथे विजेच्या दिव्यांसारखी रोषणाई नाही तर फक्त सोनपिवळ्या रंगाचे साम्राज्य. अशा ‘पुष्कराजांचे’ पैंजण घराच्या रूपात चैतन्य, मांगल्य निर्माण करतात. बालगोपाळांना धसमुसळेपणा सहन करत त्यांची फुलबाजी तडतडावी म्हणून आपलं ‘अस्तित्व’तग धरून ठेवतात.

वाऱ्याच्या किंवा उमलत्या पिढीच्या मस्तीने मिटण्याची शक्यता असली तरी दिवाळीत रांगोळी रेखाटली नाही असं होत नाही. दोन बोटांच्या, अंगठा आणि तर्जनीच्या चिमटीत रांगोळी पकडून बारीक रेषेने जोडलेल्या ठिपक्यांच्या माध्यमातून किंवा पाची बोटांच्या एकत्रित सहयोगाने जाड, ठळक रेषांनी काढलेली असो, अभिव्यक्तिस्वातंत्र्याने झालेली तिची निर्मिती शुभकारकच असते. बघणाऱ्याला मंत्रमुग्ध करताना रोजच्या जीवनातील कलेचे स्थान नकळत दाखवत राहते. दिवाळीनिमित्त केलेल्या घराच्या मेकओव्हरमध्ये लालिमा चढवते.

लहानथोर मुलांच्या मातीत मनसोक्त खेळण्याच्या आनंदाचे प्रतीक म्हणून किल्ल्याच्या रूपाने ‘इतिहास’ साकारतो. घराला वाटणारा पूर्वजांचा अभिमान, ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ हे लपलेलं मनोगत घराच्या देखणेपणात भर घालतं. ‘काय भूललासि वरलिया रंगा’ असं गुणगुणत घराच्या अंतरंगाकडेही जातीने लक्ष पुरवलं जातं. घरातल्या, बाहेरच्या  सगळ्यांची पोटपूजा करण्यासाठी ‘द्रौपदीची थाळी’ सजते. गोड, चमचमीत सुवासांनी घर भरून जातं.

घराचं अंत:करणही आनंदी असावं असं आपल्याला वाटत असतं. किंबहुना आजूबाजूच्या पर्यावरणात सजावटीशिवाय फारसा फरक नसतो, पण मनानं आपण तसं ठरवलेलं असतं. म्हणून सणाच्या दिवशी आपण आनंदी असतो. घरातील ज्येष्ठांना ‘पापड मोडेल’ या कारणास्तव सांगता येत नाही, पण छोटय़ांना आवर्जून सांगतो की आज सणाचा दिवस आहे, रागवायचं नाही, भांडायचं नाही. या आनंदाला उकळ्या फुटाव्यात म्हणून सगळ्या नात्यांचा सन्मान ठेवत एकमेकांना खाऊपिऊ घालतो. माणसांशिवाय घराला शोभा नाही. ही शोभा परस्परांतील स्नेहाच्या धाग्यांचा गोफ विणून वाढवली जाते. घराच्या बाह्य़रूपात, अंतरंगातील हास्य- विनोदाच्या तुषारांनी, बालगोपाळांच्या लीलांनी भरच पडते.

सूर्ये अधिष्ठिली प्राची।

जगा राणीव दे प्रकाशाची ।।

तैशी वाचा, श्रोतया ज्ञानाची।

दिवाळी करी।।

हा ज्ञानदेवांचा संदेश मनात रुणझुणत असतो. दिवाळीसाठी अंतर्बाह्य़ सजलेल्या आपल्या घराचं रूपडं बघताना गुणगुणावंसं वाटतं.

‘रूप पाहता घराचे,

सुख झाले हो मनाचे’.

दिवाळीत रांगोळी रेखाटली नाही असं होत नाही. दोन बोटांच्या, अंगठा आणि तर्जनीच्या चिमटीत रांगोळी पकडून बारीक रेषेने जोडलेल्या ठिपक्यांच्या माध्यमातून किंवा पाची बोटांच्या एकत्रित सहयोगाने जाड, ठळक रेषांनी काढलेली असो, अभिव्यक्तिस्वातंत्र्याने झालेली तिची निर्मिती शुभकारकच असते. बघणाऱ्याला मंत्रमुग्ध करताना रोजच्या जीवनातील कलेचे स्थान नकळत दाखवत राहते. दिवाळीनिमित्त केलेल्या घराच्या मेकओव्हरमध्ये लालिमा चढवते.