शहराची सार्वजनिक स्वच्छता ही जबाबदारी प्रथम नागरिकांची आणि  त्यानंतर शहर व्यवस्थापनाची आहे. पण आज तथाकथित शिकलेले, प्रथितयश आणि नवश्रीमंत नागरिकसुद्धा आपापली घरं स्वच्छ ठेवतात, पण कचरा-घाण बाहेरील रस्त्यावर, मोकळ्या जागेत टाकतात. त्यात त्यांना काही चुकतं आहे असंही जाणवताना दिसत नाही. शहर व्यवस्थापनही या वृत्तीवर काटेकोर इलाज करत नाही, उलट दुर्लक्षच करतं. मग घाणीचं साम्राज्य जागोजागी वाढू लागतं आणि त्याबरोबर उपद्रवी प्राणीही. या प्रवृत्तीचं आणखी एक कारण आहे. शहरातील बहुसंख्य नागरिक हे स्थलांतरित असतात, आपापल्या गावाकडू्न रोजगाराच्या शोधात आलेले असतात. गाव मातृभूमी असते, तिची काळजी आपुलकीने घेतली जाते. शहर कामापुरतं असतं, ते चालवायला नगरपालिका असते, बहुसंख्य नागरिकांमध्ये शहराबद्दलच्या आपुलकीचा अभावच असतो. कोणालाही शहराच्या सुव्यवस्थेबद्दल, आरोग्याबद्दल मनापासून आच नसते. म्हणूनच शहरात ही जबाबदारी व्यवस्थापनावर येते आणि त्याने नागरी नियमनाची काटेकोर अंमलबजावणी केली नाही तर शहरातील व्यवस्था ढासळते, बघता बघता शहर कोलमडतं. कार्यक्षम व्यवस्थापन आणि लोकशिक्षण या दोन मार्गानीच शहरातील या समस्या सोडवता येतील.

हताश मन:स्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत वास्तुपुरुष बेंगळुरू शहरातील समस्यांचा आढावा घेत होता. एक गोष्ट स्पष्ट होत होती, बेंगळुरू शहर हे भरमसाट वेगाने वाढणाऱ्या भारतातील शहरांचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. बहुतेक प्रत्येक शहर अशाच विदारक अवस्थेतून जात आहे आणि नागरिक अधिकाधिक हतबल होताहेत, शहरी समस्यांच्या षड्यंत्राचा एक भाग बनत आहेत. गेल्या पंधरवडय़ातील एका घटनेने वास्तुपुरुषाच्या मनाला काहीशी उभारी आली. काही जागरूक नागरिक लोखंडी उड्डाणपुलाविरुद्धचं आंदोलन अधिक प्रखर करत आहेत आणि त्यात लोकांचा सहभागही वाढत आहे. आधीच्या रस्त्यावरील मूकआंदोलनापाठोपाठ झालेल्या उपोषण सत्याग्रहात वास्तुपुरुषही सामील झाला होता. शहराच्या मध्यावरील ‘स्वातंत्र्य उद्याना’त जमलेल्या समुदायाच्या विचारासरणीचा अंदाज तो घेत होता. आशेचा किरण दिसत होता. त्रिपुरी पौर्णिमेच्या आणि देवदिवाळीच्या दीपोत्सवाने मन अधिकच प्रफुल्लित केलं. चांदण्या रात्रीतून, हेमंत-शिशिराची शीतलता अनुभवताना त्याच्या विचारांना ठोस दिशा दिसायला लागली होती. आता काíतक अवसेच्या वाटेवरील कृष्ण पक्षातील उत्तररात्रीच्या चांदण्यात लालबाग उद्यानातील चमचमणाऱ्या शिलाथरावर बसून तो नभांगणातील उल्कापात न्याहाळत होता. पश्चिमेकडे कललेल्या मघा नक्षत्रातून एक उल्का वेगाने क्षितिजाचा वेध घेत वटवृक्षाच्या मागे लुप्त झाली. शृंगी घुबडाचा धीरगंभीर घूत्कार वातावरणात घुमला आणि पानसळसळीतून उपराळकर देवचार हलकेच उगवला, ‘‘शुभम् भवतु, वास्तुपुरुषा! चेहरा प्रकाशलेला दिसतोय आणि मनही सावरलेलं दिसतंय? दीपोत्सव मानवलेला दिसतोय. आमच्या गावाकडे तर अजून ढोल – लेझीमांच्या तालावर शेतकरी आनंदोत्सव करताहेत, सुगीच्या दिवसांचं स्वागत करताहेत. या वर्षीच्या पावसाने पिकाला चांगलाच हात दिला आहे. काय म्हणते आहे तुझी ‘अंधेर नगरी’? दिसताहेत का काही उपाय?’’

उपराळकर देवचाराच्या प्रवेशाने वास्तुपुरुष आनंदला. ‘‘ अनेक दंडवत, देवा महाराजा! होय, पूर्व क्षितिजावर आता भासणाऱ्या आभेचे प्रकाशकिरण माझ्या विचारांनाही दिशा देत आहेत. मला वाटतं की, शहरीकरणाच्या मोठय़ा समस्यांचं आव्हान, लहान लहान सर्वसामान्य अडचणी सोडवून सहज स्वीकारता येईल. तेव्हा आज आपण नागरिकांना सतत भेडसावणाऱ्या शहरी छोटय़ा अडचणींचा विचार प्रथम करूया. आणि या अडचणी सर्वच भारतीय शहरांच्या प्रातिनिधिक आणि रोजच्याच कटकटी आहेत हेही ध्यानात ठेवूया.’’

‘‘कल्पना छान आहे वास्तुपुरुषा, कर सुरुवात माझ्याच अडचणीपासून. इथे या उद्यानात कशी नीरव शांतता आहे. पण आताच बाहेरून येताना पाहिलं की एका लहान वसाहतीत एवढय़ा रात्रीही काही गोंधळ चालला होता. लोक ओरडत होते, बाया रडत होत्या, कुत्रे सर्वत्र केकाटत होते. सर्व वस्ती जागी झाली होती, अस्वस्थ होती. परिसरातल्या अनेक भटक्या कुत्र्यांपकी एका कळपाने उशिरा घराकडे परतणाऱ्या एका वृद्धावर अचानक हल्ला करून त्याला चांगलंच जायबंदी केलं होतं. शेजारपाजाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेलं, पण लोक चिडले आहेत आणि सर्व कुत्र्यांचा कायमचा काटा काढायचा सोपा मार्ग शोधताहेत. नुकतीच केरळमध्ये तर नागरिकांनी अशीच भटक्या कुत्र्यांच्या निर्दालनाची मोहीम सुरू केली आहे. तुझ्याकडे काय उत्तर आहे या रोजच्याच शहरी अडचणीवर?’’ उपराळकर देवचाराने कोडं टाकलं वास्तुपुरुषाला.

वास्तुपुरुषाने केंपेगौडा मनोऱ्याकडे मान झुकवली आणि सुरुवात केली, ‘‘देवचारा, अगदी सर्वाना जाचणारा, पण कोडय़ात टाकणारा प्रश्न विचारलास. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सर्वच शहरांत धगधगत आहे. खोटय़ा भूतदयेचे विचार या धगीत तेल ओतताहेत. ज्या नागरिकांना अशा प्राण्यांविषयी अनुकंपा आहे त्यांनी त्यांचा स्वीकार करून त्यांना आपल्या घरी नेऊन त्यांचा सांभाळ केला पहिजे. मोकाट कुत्र्यांना शहरात स्थान असता कामा नये, कारण त्यांचा त्रास नागरिकांना आणि शहर व्यवस्थेलाही होतो. खरं तर प्राणीप्रेमी नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागायला हवं. आपण पाळलेल्या कुत्र्यांना फिरायला घेऊन जाताना ते पदपथावर, रस्त्यांवर घाण करत नाहीत ही काळजी त्यांनी घ्यायला हवी. बहुतेक सर्व पुढारलेल्या शहरांतून प्राणीप्रेमी आपापल्या कुत्र्यांना फिरायला नेताना त्यांची विष्ठा रस्त्यावर पडू देत नाहीत, तर गोळा करून घरी नेऊन त्याचं खतात रूपांतर करतात, बागकामात वापरतात आणि शहरातील रस्ते स्वच्छ राखतात. त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतात आणि सर्वानाच सुरक्षित ठेवतात. नसíगक जैवविविधता शहरात जरूर असली पहिजे, परंतु त्रासदायक, आरोग्याला धोकादायक, मोकाट कुत्रे, मांजरं, कबुतरं, उंदीर-घुशी, झुरळं, डास इत्यादींवर नियंत्रण असलंच पहिजे. खरं तर या प्रश्नाची व्याप्ती दूरवर आहे. ही सर्व मोकाट जनावरं शहरातील घाणीवर, कचऱ्यावर उपजीविका करतात आणि प्रजावाढ करतात. शहराची सार्वजनिक स्वच्छता ही जबाबदारी प्रथम नागरिकांची आणि  त्यानंतर शहर व्यवस्थापनाची आहे. पण आज तथाकथित शिकलेले, प्रथितयश आणि नवश्रीमंत नागरिकसुद्धा आपापली घरं स्वच्छ ठेवतात, पण कचरा-घाण बाहेरील रस्त्यावर, मोकळ्या जागेत टाकतात. त्यात त्यांना काही चुकतं आहे असंही जाणवताना दिसत नाही. शहर व्यवस्थापनही या वृत्तीवर काटेकोर इलाज करत नाही, उलट दुर्लक्षच करतं. मग घाणीचं साम्राज्य जागोजागी वाढू लागतं आणि त्याबरोबर उपद्रवी प्राणीही. या प्रवृत्तीचं आणखी एक कारण आहे. शहरातील बहुसंख्य नागरिक हे स्थलांतरित असतात, आपापल्या गावाकडू्न रोजगाराच्या शोधात आलेले असतात. गाव मातृभूमी असते, तिची काळजी आपुलकीने घेतली जाते. शहर कामापुरतं असतं, ते चालवायला नगरपालिका असते, बहुसंख्य नागरिकांमध्ये शहराबद्दलच्या आपुलकीचा अभावच असतो. कोणालाही शहराच्या सुव्यवस्थेबद्दल, आरोग्याबद्दल मनापासून आच नसते. म्हणूनच शहरात ही जबाबदारी व्यवस्थापनावर येते आणि त्याने नागरी नियमनाची काटेकोर अंमलबजावणी केली नाही तर शहरातील व्यवस्था ढासळते, बघता बघता शहर कोलमडतं. कार्यक्षम व्यवस्थापन आणि लोकशिक्षण या दोन मार्गानीच शहरातील या समस्या सोडवता येतील.’’

‘‘वास्तुपुरुषा, अगदी खरं आहे तू म्हणालास ते. पण हा शहरातील स्थलांतरितांचा प्रश्न कसा सोडवायचा? त्यांना तर घरदारही घेणं परवडत नाही. मग रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी किंवा झोपडपट्टीत संसार उभारावा लागतो. शौचालयांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ओसाड जागांचा, रेल्वे मार्गाचा आसरा घ्यावा लागतो. हलाखीचं जीवन जगायला लागतं. या सर्व अव्यवस्थेचे दुष्परिणाम शहरांना भोगावे लागतात.’’

वास्तुपुरुषाने एक उसासा सोडला, ‘‘देवा महाराजा, मी मगाशीच सांगितलं ना की त्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येची व्याप्ती दूरवर पसरलेली आहे. खरं तर सर्वागीण नियोजनाचा विचार करून विकास योजना आखल्या तर अशा समस्या टाळता येतील, पण त्यासाठी ‘विकासा’ची व्याख्याच तपासून पाहायला हवी. ‘संतुलित विकासा’च्या मार्गाने गेल्यास हे नियोजन सर्वसमावेशक होतं. शिवाय समस्या सोडवण्यासाठी प्रथम तिच्या उगमावरच लक्ष केंद्रित करायला हवं. शहरातील स्थलांतरितांचा किंवा झोपडपट्टय़ांच्या प्रश्नाचं उत्तर शहरात नसून जिथून हे स्थलांतरित रोजगारासाठी येतात तिथल्या खेडय़ात किंवा छोटय़ा नगरांत आहे. खेडय़ांचा आणि छोटय़ा शहरांचा सर्वागीण विकास केल्यास स्थानिक जनतेला तिथेच रोजगार, शिक्षणाच्या सुविधा मिळतील आणि शहराची वाट शोधायला लागणार नाही. मोठय़ा शहरांवरचा, महानगरांवरचा ताण आपोआपच कमी होईल, सर्वच शहरं त्यांच्या क्षमतेच्या प्रमाणात सुयोग्य पद्धतीने विकसित होतील. शहरात होणारं स्थलांतर नियंत्रित राहिल्यास शहरांतील समस्याही आवाक्यात राहतील. आदर्श खेडीच शहरांना आणि महानगरांना सुनियोजित विकासाचा मार्ग दाखवू शकतील. आज बहुतेक मोठय़ा शहरांतील सुमारे ७०% जनता झोपडपट्टय़ांत किंवा विस्कळीत वसाहतींत राहते. याचं मुख्य कारण म्हणजे शहरातील जागांच्या अवास्तव, न परवडणाऱ्या किमती. आणि विरोधाभास म्हणजे या शहरांतील अनेक इमारतींमधील सदनिका रिकाम्या दिसतील, कारण त्या रहिवासासाठी नाहीत तर आर्थिक गुंतवणुकीसाठी अतिश्रीमंतांनी घेतलेल्या असतात. बेंगळुरू, मुंबईसारख्या अनेक झगमगत्या शहरांमध्ये जागांच्या किमती अवाढव्य असतानाही अनेकांच्या मालकीच्या अनेक सदनिका असतात आणि बऱ्याचदा त्या रिकाम्याच पडलेल्या असतात. खरं म्हटलं तर हा दुर्मिळ जागेचा व बांधकाम साहित्याचा अपव्यय आहे आणि याला सरकारने कायद्याने आळा घालायला हवा. ‘रोटी,  कपडा, मकान’ या मानवाच्या मूलभूत गरजा समजल्या जातात. यातल्या ‘मकान’ किंवा घर या महत्त्वाच्या मूलभूत गरजेचं आर्थिक गुंतवणुकीसाठी बाजारीकरण झालं तर तो गंभीर गुन्हा समजला पहिजे. एका शहरात ‘एक कुटुंब – एकच घर’ असा कायदा करून तो काटेकोरपणे राबवला तर आज अशा शहरांत अनेक सदनिका गरजूंना उपलब्ध होऊ शकतील. सहज उपलब्धतेमुळे त्यांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. अतिगरीबांसाठी परवडणाऱ्या छोटय़ा सदनिकांच्या किंवा भाडेपट्टीवरील घरांच्या निर्मितीला उत्तेजन मिळेल. यातूनच झोपडपट्टय़ा किंवा विस्कळीत विकास अगदी नाहीसा नाही झाला तरी खूप कमी होईल. शहरांवरील सर्व प्रकारचा ताण कमी होईल, नागरिकांचं जीवन सुस आणि सुरक्षित होईल.’’

उपराळकर देवचाराने वास्तुपुरुषाचा उत्साही ओघ रोखला, ‘‘वास्तुपुरुषा, भटक्या कुत्र्यांवरून विचारलेल्या माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर तू अगदी समर्पक आणि विस्तृततेने दिलंस. पण तरीही अगदी तू म्हणतोस त्या पद्धतीने विकसीत झालेल्या शहरातील मूलभूत सुविधा आणि त्यांच्या अभावातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर काय तोडगा आहे? जगभरच्या शहरांतून कचऱ्याची आणि सांडपाण्याची विल्हेवाट ही प्रचंड समस्या आहे. प्रदूषण, रोगराई, पर्यावरणाचा नाश हा तर शापच आहे. आणि या सर्वाना उत्तर दिसत नसताना केवळ तंत्रज्ञानाच्या आधारावर ‘स्मार्ट’ शहराकडील वाटचाल तर माझ्या अंगावर शहारे आणते. मला माझं कोकणातलं गाव खूप बरं वाटतं.’’

वास्तुपुरुषाची नजर लालबागच्या हिरवाईवरून उजळणाऱ्या पूर्व क्षितिजाच्या दिशेने वळली, ‘‘होय, देवा महाराजा, शहरांच्या समस्या गंभीर आहेतच आणि अविचारी मानव, नियोजनकार, राजकारणी त्यात भर टाकताहेत. पण आपण या उजळत्या पूर्व क्षितिजाकडून प्रेरणा घेऊ. त्या क्षितिजावर उभारणारे सोनेरी किरण आशेचा संदेश देत आहेत. लोकशिक्षण, जनजागृती, यथार्थ नियोजन या मार्गानेच वाटचाल करू पर्यावरणस्नेही विकासाची.. शहरी जीवनाचेही अनेक फायदे आहेत. पुढच्या भेटीत, मार्गशिर्षांच्या तसंच हेमंताच्या स्वागतात सुचवतो काही मार्ग, आदर्श शहरासाठी.’’ उगवत्या सूर्याने नभांगणात आशेचे किरण उधळले, पक्षीगणांच्या भूपाळ्या सुरू झाल्या आणि उपराळकर देवचाराने समाधानाने हुंकार दिला.

उल्हास राणे – ulhasrane@gmail.com