मंडळी, नारळी पौर्णिमा झाली की सर्वाना वेध लागतात ते गणपतीच्या आगमनाचे. चाकरमान्यांनी एव्हाना गावी जायचे बेत आखले असतील, तर काहींनी खरेदी करायला सुरुवात केली असेल. लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला, त्या गोष्टीला आता शतकापेक्षा अधिक काळ लोटला आहे. गणपतीचे समाजातील सर्वमान्य स्थान हेरून त्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देता येणे सहज शक्य आहे व त्यातूनच राष्ट्रीय एकता साधता येईल, या विचारामागे त्यांची मोठी दूरदृष्टी होती, यात शंका नाही. मात्र, स्वातंत्र्यानंतर हळूहळू या सार्वजनिक उत्सवात त्याच्या मूळ हेतूला हरताळ फासणाऱ्या अनेक रूढी कधी शिरल्या व त्याला विकृत स्वरूप कधी प्राप्त झाले, हे लक्षात येण्यापूर्वी खूप उशीर झाला होता.

या बदलांमुळे सामाजिक वातावरण आणि पर्यावरण यांचे प्रदूषण प्रचंड वाढले. सुरक्षेवर ताण पडला, पर्यायाने समाजव्यवस्थेवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही वर्षांपासून निरनिराळ्या ठिकाणी होणारे गणेशोत्सव हे एका इव्हेंटप्रमाणे साजरे होत असतात. काही ठिकाणी दीड दिवसानंतर तर काही ठिकाणी ३, ५, ७ व १० दिवसांनंतर गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी २१ दिवसांनंतरदेखील विसर्जन करण्याची प्रथा आहे. त्या त्या ठिकाणी होणाऱ्या विद्युत रोषणाईमध्ये सुरक्षा कशी प्राप्त करून घ्यावी व त्याबाबतीत कायदेशीर प्रक्रिया काय आहेत, याबाबत सर्व गणेशभक्तांना शॉर्टसर्किट आणि आग या धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हा लेखप्रपंच.

air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
Perfect 7 Times To Drink Water In 24 Hours
दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे
MHADA e-auction shops Mumbai
म्हाडाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव लांबणीवर; नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ

मित्रहो, निरनिराळ्या गणेश मंडळांतील कार्यकर्ते येणाऱ्या गणेशोत्सवासाठी कामाला लागले असतील, त्यांच्या उत्साहास सीमा नसते, पण त्याचबरोबर दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना शिस्तीत दर्शन मिळून सुरक्षितताही लाभेल यासाठी काही बंधने/ नियम पाळणे हे प्रत्येक मंडळावर बंधनकारक आहे; जसे- पोलीस, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खाते, वीजपुरवठा कंपनी, विद्युत निरीक्षक, इत्यादी खात्यांकडून मिळणाऱ्या परवानग्या. गणेश मंडळाला त्यांना उत्सवाच्या कालावधीसाठी रोषणाई, इ.साठी लागणारा वीजपुरवठा हा तात्पुरत्या स्वरूपात घ्यावा लागतो. ज्याचा दर नियमित विजेपेक्षा वेगळा असतो. मंडळाचा गणपती दीड, ३, ५, ७ किंवा १० दिवसांचा असेल, त्याप्रमाणे वीज कंपनीकडून तात्पुरता वीजपुरवठा एका मीटरमधून केला जातो. एन.ई.सी.च्या (नॅशनल इलेक्ट्रिक कोड) कलम क्र. ५९० प्रमाणे प्रत्येक तात्पुरत्या वायरिंगला वेळेचे बंधन (Time constraint) असते. समजा दहा दिवसांच्या लालबागसारख्या प्रतिष्ठेच्या मंडळाला थोडे जास्त दिवस लागत असतील तेव्हा पुढेमागे काही दिवस राहील असे (म्हणजे साधारण) २० दिवसांच्या कालावधीसाठी वीजपुरवठा घ्यावा. कारण नियमाप्रमाणे मागितलेल्या वीजपुरवठय़ाचा कालावधी संपल्यानंतर तात्पुरती वायरिंग काढून टाकणे हे सर्वावर बंधनकारक आहे. अन्यथा त्या संस्थेला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. गणेश मंडळांचा सर्वसाधारणपणे कारभार विचारात घेता बहुतांश ठिकाणी गणेशमूर्तीची जागा ही ठरावीक अर्थात फिक्स्ड असते. त्या जागेजवळच गणेश मंडपाचा तात्पुरता वीजपुरवठय़ाचा मेन पॅनेल एका आठ फूट उंच अशा लाकडी फळीवर किंवा भिंतीवर बसविला पाहिजे. वीज वितरण कंपनीचा मीटर त्याच बोर्डवर/ भिंतीवर बसवून त्यानंतर रिवायरेबल फ्युजेसऐवजी एम.सी.बी. (Miniature circuit breaker) च्या द्वारे निरनिराळ्या सर्किट्सना सप्लाय द्यावा.

ह्य बोर्डजवळच अर्थिगचा खड्डा करून त्यात धातूच्या प्लेटबरोबर मीठ व कोळसा यांचे योग्य मिश्रण करून त्यात नियमितपणे पाणी घालून देखभाल करणे आवश्यक आहे. रोज शेकडो लोक गणेश दर्शनास गर्दी करीत असल्यामुळे रोषणाई, स्टेज लायटिंग, इ.ला इजा पोहोचून शॉर्ट सर्किटची शक्यता असते. म्हणून अर्थिग ही परफेक्ट असण्याची नितांत गरज आहे. अर्थ टेस्टरने पाहिल्यानंतर तिचा रिझल्ट एक ओहमपेक्षा जास्त नसावा. स्टेज लायटिंग, स्टेज डेकोरेशन आणि मंडप डेकोरेशन, इ.साठी स्वतंत्र सर्किट ठेवून त्याला एम.सी.बी. कंट्रोल असावा. गणेशोत्सवाच्या कालावधीत ओव्हरलोडमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून त्या त्या मंडपातील असलेल्या लोडला योग्य असा जनित्र संच ठेवणे आवश्यक आहे, जो एका फोर पोल चेंज ओव्हर स्विचमार्फत मेन सप्लायशी जोडावा. या जनित्र संचाच्या नियमानुसार दोन अर्थिग वेगळ्या असाव्यात.

मित्रांनो, वरील सेफ्टी टिप्स प्रत्येक गणेश मंडळ व संबंधितांनी पाळल्या तर सर्व गणेशभक्तांना व्यवस्थित आणि सुरक्षितपणे आपल्या प्रिय बाप्पाचे दर्शन घेऊन त्या दिव्य समाधानात घरी परत येता येईल. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून साकारलेला ‘मेक इन इंडिया’च्या गिरगावच्या कार्यक्रमात तेथील भव्य मंडपास आग लागल्याची घटना ताजी आहे. त्याची कारणमीमांसा मी करणार नाही, पण अशा तात्पुरत्या वीज संचमांडणीबाबत एक महत्त्वाचे कायदेशीर कलम वाचकांसाठी खालीलप्रमाणे –

वीज कायदा (Electricity Act 2003) कलम ५४

या कलमात अंतर्भूत असलेली बाब म्हणजे ‘कुठल्याही ठिकाणी १०० लोकांपेक्षा जास्त माणसे आणि २५० व्ॉटपेक्षा जास्त विद्युतभार उपयोगात आणला जात असेल, तर त्याला विद्युत निरीक्षक आणि त्या जिल्ह्य़ाच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला कमीतकमी सात दिवसांची पूर्वसूचना व संपूर्ण वीजसंच मांडणीची माहिती देणे बंधनकारक आहे.’ विद्युत निरीक्षकांनी ही माहिती आल्यानंतर त्वरित कारवाई करून स्वत: जाऊन किंवा अनुभवी आणि सक्षम अभियंत्यास पाठवून वीज कंपनीचे काम, तसेच त्या मंडळातील विद्युत ठेकेदाराचे काम नियमाप्रमाणे झाले आहे की नाही, हे पाहून मगच वर उल्लेख केल्याप्रमाणे एन.ओ.सी. दिली तरच सर्व गणेश मंडळांत विद्युत सुरक्षा प्राप्त होईल.’

या निमित्ताने मी शासनाच्या मुख्य विद्युत निरीक्षकांना नम्रपणे आवाहन करतो की, त्यांनी सर्व विद्युत निरीक्षकांना आणि संबंधितांना वरील मुद्दे आणि त्याबद्दलचा वीज कायदा याबद्दलची माहिती आणि तद्नुषंगाने घेण्यात येणारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्यास या गणेशोत्सवात विद्युत सुरक्षा मिळेल, हे नि:संशय.

तात्पुरती वायरिंग आणि डेकोरेशनसाठी काही टिप्स

* विद्युत संच मांडणीचे सामान हे आयएसआय मार्कचेच वापरावे, जे कायद्याने बंधनकारक आहे.

* संपूर्ण वायरिंगचे काम महाराष्ट्र शासनाच्या परवानाधारक विद्युत ठेकेदाराकडूनच करून घेणे हे सीईए रेग्युलेशन २०१०च्या कलम क्र. २९प्रमाणे बंधनकारक आहे.

* सदर ठेकेदाराने तात्पुरत्या वायरिंगचे काम झाल्यानंतर गणेश मंडळाच्या सेक्रेटरीकडे टेस्ट रिपोर्ट सादर करावा, ज्यामध्ये मेगर टेस्ट आणि अर्थ टेस्ट रिपोर्टचा समावेश असावा.

* गणेश मंडळाने सदर टेस्ट रिपोर्ट वीज वितरण कंपनीला त्यांच्या अर्जाबरोबर दिल्यानंतर त्या गणेश मंडळास वीजपुरवठा करण्याबाबत प्रक्रिया सुरू होते.

* गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याने त्या टेस्ट रिपोर्टची प्रत व अर्जासहित त्या जिल्ह्य़ाच्या विद्युत निरीक्षकांकडे ‘ना हरकत दाखला’साठी (NOC) सादर करावे लागते.

* विद्युत निरीक्षकाने अर्ज व इतर कागदपत्रांची छाननी केल्यानंतर साइटवर निरीक्षण करून वायरिंग, अर्थिग इत्यादी बाबी विद्युत ठेकेदाराच्या टेस्ट रिपोर्टप्रमाणे आहे का, हे पडताळूनच नियमानुसार NOC देणे. निरीक्षण न करता विद्युत सुरक्षेला बाधा येईल अशा रीतीने NOC देणे हा दंडनीय गुन्हा आहे, हे विद्युत निरीक्षण कार्यालयातील सर्वानी ध्यानात ठेवावे.

* विद्युत निरीक्षकांच्या NOC  नंतरच वीज कंपनीने (महावितरण, बेस्ट, रिलायन्स एनर्जी, टाट पॉवर, इ.) तात्पुरता वीजपुरवठा योग्य आणि सुरक्षित पद्धतीने सुरू करावा.

* संबंधित वीज कंपनीने गणेश मंडपाजवळील सर्वात जवळच्या फीडर पिल्लर किंवा डीपीवरून कमीतकमी तीन फूट जमिनीमधून भूमिगत केबलद्वारे (रेती आणि विटांच्या संरक्षणासहित) सप्लाय पॉइंटला जोडून वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा.

* तात्पुरती संचमांडणी असल्यामुळे जमावाच्या हालचालींमुळे अर्थ फॉल्ट होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच मेन बोर्डवर एक ई.एल.सी.बी. (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) लावणे आवश्यक आहे. सी.ई.ए. २०१० च्या कलम क्र. ४२ प्रमाणे ते लावणे बंधनकारक आहे.

* गणेश मंडपातील तात्पुरत्या वायरिंगमध्ये हाउस कीपिंगलाही बरेच महत्त्व आहे. उत्तम हाउस कीपिंग असेल तर शॉक आणि आगव्यतिरिक्त इतर अनेक धोके टळू शकतात.

* तात्पुरती वायरिंग म्हणून नेहमीच्या प्लास्टिकची लवचीक (Flexible) वायर वापरू नये, ते धोकादायक आहे. पीव्हीसी इन्सुलेटेड योग्य रेटिंगच्या वायरचा उपयोग करावा. जी योग्य आकाराच्या पीव्हीसी पाइपमधून नेण्यात यावी.

* मंडपातील डेकोरेशनच्या माळा गणेशमूर्तीच्या उंचीपेक्षा जास्त उंचीवरून न्याव्यात अन्यथा मूर्तीची ने-आण करताना त्यांना व हॅलोजन अथवा एलईडी लाइट्सना धक्का लागून धोका संभवतो.

* मंडपातील वायरिंग करीत असताना लाकडी खांब (बल्ली) व भिंतीवर लाइट फिटिंग चिकटून न लावता लाकूड किंवा प्लास्टिकचा एक इंच जाडीचा तुकडा लावावा.

* तात्पुरत्या वायरिंगमधील सर्व जोड (Joints) चांगल्या प्रकारे इन्सुलेशन टेपने सुरक्षित राहतील याची काळजी आयोजकाने/वीज कंत्राटदाराने घेणे आवश्यक आहे.

* मंडपातील तात्पुरत्या वायिरगच्या वीजवाहक तारा या कधीही भिंतीला, कंपाउंडला अथवा लोखंडी वस्तू, पत्रा, इ.ला चिकटून नेऊ नयेत.

* संपूर्ण लाइटिंग आणि रोषणाईमध्ये एलईडी बल्बचा वापर करावा. जेणेकरून गणेश मंडळाच्या वीजबिलात लक्षणीय बचत होईल. एलईडी बल्ब हे पर्यावरणपूरकसुद्धा आहेत.

* वीजवाहक तारा तसेच अर्थिगच्या जी.आय. वायरचा कपडे व तत्सम सामान वगैरे टांगण्यासाठी उपयोग करू नये.

* रस्त्यावरील उपरी तार मार्गाचा गणेशामूृर्तीच्या मिरवणुकीत अडथळा होणार नाही याची काळजी संबंधित वीज कंपनीने व गणेश मंडळाने घेणे आवश्यक आहे. अन्यथा अपघात संभवतो.

* संपूर्ण मंडपाच्या क्षेत्रात, स्टेज, इ.वर प्लग सॉकेटमधून थ्रीपिनद्वारेच वीजपुरवठा घ्यावा. तिसरी पिन ही कार्यक्षम अर्थ (earth)ला जोडलेली असावी.

* एकाच प्लगवर बहुमार्गी पिन (Multiplug) लावून वायरिंगचा विस्तार करू नये. ओव्हरलोड होऊन शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते.

सदस्य, राष्ट्रीय सुरक्षा परिषद

प्रकाश कुलकर्णी plkul@rediffmail.com