प्रकाश कुलकर्णी
प्रकाश कुलकर्णी

मित्रांनो उद्याचा नागरिक ज्या शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेत असतो त्या शाळा, कॉलेज आणि तत्सम संघटनांमध्ये विद्युत सुरक्षा पाळणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल उद्बोधक चर्चा आपण आता करणार आहोत.
सध्या जागतिक सुधारणेचा सगळा ओघ आशिया खंडाकडे वळला असल्याने चीन, भारत, कोरिया, जपान इत्यादी देशांमध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणावर, नवनवी बांधकामे पुनर्रचना, अंतर्गत व बा स्वरूपाची सजावट व या साऱ्यांची तंत्रशुद्ध आखणी-बांधणी हे सारे नवनवे विषय झपाटय़ाने पुढे येत आहेत. या आधुनिकतेचा व सुधारणेचा वेग प्रचंड असल्याने तंत्रज्ञांना, वास्तुरचनाकारांना आणि अर्थात अभियंत्यांना नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून, या साऱ्या यांत्रिक व तांत्रिक सुधारणेला सामोरे जाण्याचे आव्हान स्वीकारावे लागत आहे. पारंपरिक साऱ्याच गोष्टी आता झपाटय़ाने बदलत आहेत. शहरीकरण सर्वत्र वाढत आहे. मध्य आखाती देश, थायलंड, इंडोनेशियासारख्या देशांनी गेल्या दशकामध्ये झपाटय़ाने प्रगती केली आहे. आता असाच वेग श्रीलंका, बांगलादेश व ब्रह्मदेश हे आपले शेजारीही घेत आहेत. या सर्वच देशांना भारतीय तंत्रज्ञ, अभियंते, कंत्राटदार यांची गरज आहे आणि म्हणूनच आपल्या देशातील बांधकाम आणि विद्युत क्षेत्रातील साऱ्याच तंत्रज्ञांनी आता कंबर कसणे आवश्यक आहे. या Innovative technology च्या युगात डिझायनर्स कन्सल्टंट्स (सल्लागार) व कंत्राटदार या सर्वानीच अनुभवाची शिदोरी सोबत ठेवून आधुनिकतेचे आव्हान स्वीकारणे आवश्यक आहे.
विद्युत शाखेचा ह्य साऱ्या जडणघडणीत प्रचंड मोठा वाटा राहणार आहे. याची सुरुवात शाळा-कॉलेजातूनच झाली पाहिजे, असे मला ठामपणे वाटते. शाळांमध्ये प्रायमरी, मिडल आणि हायस्कूल असे प्रकार असतात. प्रायमरीची मुले लिहिलेले ळी७३ समजण्याइतकी मोठी नसल्यामुळे विद्युत सुरक्षेचे महत्त्व त्यांना चित्रांमधून दाखविणे आवश्यक आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने वर्गामधील वायरिंग ही लायसेन्सड इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टरकडून करून घ्यावी. विशेषत: प्लग पॉइंट्स मुलांच्या हाताला लागतील इतके खाली ठेवू नयेत, अन्यथा त्यांच्या नैसर्गिक देहबोलीनुसार ते प्लगच्या छिद्रांमध्ये बोट घातल्यावर अपघात घडण्याची शक्यता आहे. अशीच काळजी अशा मुलांच्या पालकांनी त्यांच्या घरीसुद्धा घेणे आवश्यक आहे. जर यापूर्वीच वायरिंगमध्ये असे खाली प्लग्स दिले असतील तर ते कमीतकमी पाच फूट उंचीवर शिफ्ट करावेत. तेही शक्य नसल्यास आहे त्या ठिकाणी शटर टाइप प्लग सॉकेट बसवावे, म्हणजे मुले सुरक्षित राहतील.
त्यावरील वर्गासाठी म्हणजेच मिड्ल आणि हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षेचे धडे त्यांच्या सायन्समधील फिजिक्स या विषयांतर्गत ‘विद्युत सुरक्षा’ या शीर्षकामार्फत देता येतील. मला नुकतीच शासनातर्फे याबाबतीत विचारणा करण्यात आली आहे. त्याप्रमाणे आठवी आणि दहावीतील विद्यार्थ्यांच्या ‘सायन्स आणि टेक्नॉलॉजी’ या पुस्तकात ‘विद्युत सुरक्षा’ हा विषय समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सर्व महाविद्यालयांनी आपल्या कॉलेजात विद्युत सुरक्षा प्राप्त करून घेण्यासाठी वरील नियमावली पाळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या विद्युत संचमांडणीची देखभाल तज्ज्ञ विद्युत अभियंत्यांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे, अन्यथा खालीलप्रमाणे धोका होऊ शकतो.
मी ठाणे येथे विद्युत निरीक्षक म्हणून कार्यरत असताना टायर्सचे उत्पादन करणाऱ्या एका नामांकित कंपनीत निरीक्षणासाठी गेलो असताना आम्ही पाहिले की, रोहित्रांमधून तेलाची गळती सतत चालू होती. ज्यामुळे कुठल्याही क्षणी आग लागण्याची शक्यता होती. तेथे अर्थिगही बरोबर मिळत नसल्यामुळे कंपनीच्या सी.इ.ओं.ना कारणे दाखवा नोटीस दिली. त्यावर त्यांचे उत्तर समाधानकारक न आल्याने मी विद्युत अधिनियमात मला दिलेल्या अधिकारानुसार कंपनीचा वीजपुरवठा त्वरित खंडीत करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे कर्मचारी अनुपालनासाठी गेले असताना कंपनी व्यवस्थापनाने त्यांना मज्जाव केला आणि मंत्रालयात ऊर्जा खात्यात माझी तक्रार केली. निरीक्षण अहवाल आणि टेस्ट रिपोर्ट्स ऊर्जा सचिवांना दाखविल्यावर त्यांनी माझ्या कारवाईला पाठिंबा दर्शवून कंपनीला त्याप्रमाणे अनुपालन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोनच दिवसांत त्या कंपनीच्या व्यवस्थापनाने रोहित्रे बदलून अर्थिगमध्ये सुधारणा करून विद्युत सुरक्षा प्राप्त केली.
मंडळी, वरील सर्व उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की, या देशाचे जबाबदार नागरिक होणाऱ्या आजच्या विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षेला बहुमोलाचे स्थान आहे. फक्त त्याबद्दलची जाणीव निर्माण करून अनास्था दूर सारणे हे महत्त्वाचे ठरते. यासाठीच सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अ‍ॅथॉरिटी (उएअ) यांनी सर्व देशात १ मे ते ७ मे या दरम्यान ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ पाळण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार अग्निसुरक्षा, रस्ते सुरक्षा यांच्याप्रमाणेच सर्व राज्यांमधून मे महिन्यातील पहिला आठवडा ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. यामध्ये शाळा-कॉलेजांमधून व्याख्यान, फिल्म शो, परिसंवाद, पथनाटय़ इत्यादी माध्यमांतून जनतेमध्ये विद्युत सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. महाराष्ट्रातसुद्धा गेल्या काही वर्षांपासून हा सप्ताह विद्यार्थ्यांमध्ये सेफ्टी रॅलीच्या आयोजनातून मोठय़ा प्रमाणात साजरा होत असतो. परंतु मित्रहो, विद्युत सुरक्षा ही फक्त त्या सप्ताहापुरती नाही तर आपल्या रोजच्या जीवनात क्षणोक्षणी वाटणारी निकड आहे, त्यामुळे शालेय जीवनापासूनच या विषयाचा पाया भक्कम झाला पाहिजे.
शासनातील ऊर्जा आणि शिक्षण खात्याने मिळून शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या सिलॅबसमध्ये लवकरात लवकर ‘विद्युत सुरक्षा’ हा विषय अंतर्भूत करणे उचित ठरेल, त्यायोगे विजेविषयीची जागरूकता विद्यार्थीदशेतच मुलांच्या मनात निर्माण होणे हितावहच, नाही का?
शाळेच्या व्यवस्थापनाने विद्युत सुरक्षा प्रस्थापित होऊन, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी या कुणालाही इलेक्ट्रिकल शॉक लागू नये म्हणून खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.
१) शाळेच्या मुख्य इमारती व सर्व वर्गामधील विद्युत संच मांडणीचे निरीक्षण किंवा ऑडिट नियमितपणे करून घ्यावे.
२) कुठलेही विद्युत काम हे शासन मान्यताप्राप्त वायरमन अथवा विद्युत कंत्राटदारांकडून करून घ्यावे. सीईए रेग्युलेशन २०१० च्या कलम क्र. २९ प्रमाणे ते बंधनकारक आहे.
३) ज्या विद्युत कंत्राटदाराला काम दिले असेल त्याचा टेस्ट रिपोर्ट घेतल्यावरच पेमेंट करणे.
४) विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या विद्युत कामावर नियमितपणे शाळेचे ट्रस्टी, मुख्याध्यापक यांनी व सेफ्टी ऑडिटर अथवा विद्युत निरीक्षक यांनी संपूर्ण विद्युत संच मांडणीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
५) वरीलप्रमाणे अमलात आल्यास वायरिंगची स्थिती, वर्गामध्ये लोंबणाऱ्या वायर्स, त्यापासून निर्माण होणारे hazards, अर्थिग योग्य नसेल तर निर्माण होणारे धोके हे कमी होऊन वर्गात विद्यार्थ्यांना सुरक्षा मिळेल.
६) शाळेच्या मॅनेजमेंटने प्रत्येक वर्गाच्या डीबीवर अर्थ लिकेज सर्किटब्रेकर (ई.एल.सी.बी.) लावणे हे कलम क्र. ४२ प्रमाणे बंधनकारक आहे, अन्यथा अर्थिग योग्य नसेल तर वर्गातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक शॉक बसू शकतो. कॉलेज मॅनेजमेंटनेसुद्धा वरीलप्रमाणे काळजी घेणे जरुरी आहे. जास्त एरिया आणि पॉवर लोडमुळे उच्च दाबांची सबस्टेसशन्स असतील तर पुढील बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

विद्युत संचमांडणीचा आत्मा म्हणजे रोहित्रे बसविलेली विद्युत उपकेंद्र अर्थात सबस्टेशन्स सी. ई.ए. रेग्युलेशन २०१० च्या कलम ४४ प्रमाणे याची उभारणी होणे आवश्यक आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
* प्रत्येक ट्रान्स्फॉर्मरला (रोहित्र) नियमाप्रमाणे चार अर्थिग देणे आवश्यक आहे. (दोन बॉडी + दोन न्यूट्रल)
* सिमेंट काँक्रिट फाऊंडेशनवर रोहित्रांची उभारणी करावी.
* दोन किंवा त्यापेक्षा जास्त रोहित्रे सब स्टेशनमध्ये असतील तर दोन रोहित्रांमध्ये एक सिमेंटची भिंत ठेवणे आवश्यक आहे.
* जर रोहित्रातील तेल ९००० लिटरच्या वर असेल तर सब स्टेशन्समध्ये एक सोक पिट करणे आवश्यक आहे. म्हणजे आणीबाणी जसे-आग, भूकंप, पूर अशा परिस्थितीत रोहित्रातील तेल या सोक पिटमध्ये जमा करता येईल.
* आगप्रतिबंधक साधने (Fire Extinguishers) आणि फायर बकेट्स सबस्टेशन्स परिसरात लावणे आवश्यक आहे.
* विद्युत शॉक लागल्यास प्रथमोपचार पेटी आवश्यक.
* शॉक ट्रीटमेंट चार्ट आवश्यक.
* डेंजर बोर्ड किंवा कॉशन बोर्ड हा प्रत्येक रोहित्र, कंट्रोल पॅनेल, इले. मोटर इ. ठिकाणी आवश्यक.
* सब स्टेशन्समधील केबलही भूमिगत चर अथवा खंदकातून न्यावी ज्यात आग लागू नये म्हणून वाळू आणि गारगोटीचा समावेश असावा.
* सबस्टेशनमधील मेन कंट्रोल पॅनेल व अन्य स्विचेससमोर एक मीटर मोकळी जागा आवश्यक.
* सर्व मेन स्विचेससमोर रबर मॅट टाकणे बंधनकारक.

master of human capital management and employee relations affiliated to mumbai and nagpur university
शिक्षणाची संधी : एचआर’मधील संधी
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
without btech or engineering diploma degree you can do these technical jobs see list an salary
BTech इंजिनिअरिंग पदवी न घेता करू शकता टेक्निकल क्षेत्रातील ‘या’ नोकऱ्या, कोर्स अन् पगाराबाबत घ्या जाणून

plkul@rediffmail.com
सदस्य, राष्ट्रीय सुरक्षा परिषद