अहो मी चक्क पन्नाशीची झालेय. मी काही मोठी व्यक्ती नाही की माझ्या पन्नाशीचे फलक लागतील. पण या शहराच्या विस्तारामध्ये माझा महत्त्वाचा वाटा आहे आणि सांस्कृतिक-सामाजिक जडणघडणीमध्ये माझेही योगदान आहेच की! म्हणूनच माझ्या अंगाखांद्यावर लहानाचे मोठे झालेल्यांनी त्याची आवर्जून दखल घेतली आणि माझ्या सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम थाटामाटात केला. कार्यक्रम सुरू होता आणि मी मात्र त्या पन्नाशीच्या वाटचालीचा आढावा घेत कधी भूतकाळात रमून गेले कळलंच नाही.
मुंबई शहरामध्ये म्हाडा प्राधिकरणाने जवळपास ५६ वसाहती उभारल्या. त्यातलीच मी एक. मोठय़ा वसाहतींची कल्पना त्यावेळी कशी आली माहीत नाही, पण मी मात्र या ५६ जणींमधली मोठीच म्हणायला हरकत नाही. पूर्व उपनगरात कुल्र्याची खाडी आणि खाजण जमिनीवर भर घालून वसाहत उभी करण्यास सुरुवात केली. खाडी बुजवून तेथे इमारती उभ्या राहण्यास सुरूवात झाली. माझ्या एका बाजूला ऐतिहासिक कुर्ला जंक्शन (कुर्ला स्थानकाचे मूळ नाव) नावाचे रेल्वे स्थानक होते. तेथून साधारण दीड किलोमीटर अंतरावर बठी घरे आणि बंगले होते. तेथपर्यंत जाण्यासाठी अवघी एक पाऊलवाट होती. रात्रीच कशाला, दिवसाही रेल्वे स्थानकावरून तेथे एकटय़ाने जायला कोणी धजावत नसे. या मार्गाच्या दोन्ही ठिकाणी म्हाडाने वसाहत उभी करायला सुरुवात केली आणि अवघ्या काही दिवसांमध्ये कुल्र्याचे स्वरूप पालटू लागले. त्याच दरम्यान मुंबई शहरात काँग्रेसचे अधिवेशन होते. त्यासाठी येणाऱ्या प्रतिनिधींची सोय करण्यासाठी माझ्या इमारतींमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. येथे इमारती उभ्या करताना खाडीमधील भरणीवर इमारतींचा पाया भक्कम राहिलंच याची खात्री दिली जात नव्हती. पण म्हाडाच्या अभियंत्यांनी ते आव्हान पेललं. त्यातच एकदा एक इमारत उभी राहताना अचानक तिचा एक भाग कोसळला आणि सर्वानाच धडकी भरली. पण पुढच्या इमारती उभ्या करताना अधिक काळजी घेण्यात आली आणि १५५ इमारतींची वसाहत व्यवस्थित उभी झाली. तरीही पहिल्या २० वर्षांतच येथील काही इमारतींच्या पुनर्वकिासाचा प्रश्न उभा राहिला आणि एका इमारतीमधील ३५ कुटुंबे संक्रमण शिबिरामध्ये राहण्यास गेली. त्यातील अनेकांना पुन्हा नेहरुनगरमध्ये आपल्या हक्काच्या घरात रहाण्याचे भाग्य मिळालेच नाही. असा कलंक मी अनेकांच्या बाबतीत सहन केला आहे. कारणं काही असोत, पण मला हा कलंक कायमचा मिरवावा लागणार हे नक्की!
तब्बल १५५ इमारतींची असलेली मी पहिल्यापासूनच वेगवेगळ्या अर्थाने गाजत राहिली. माझी भरभराट वेगवेगळ्या क्षेत्रात झाली. खेळ, साहित्य, शिक्षण, राजकारण, समाजकारण आणि अगदी गुन्हेगारीसुद्धा. अजूनही मला त्या कुप्रसिद्ध नावाने ओळखले जाते, हे माझे दुर्दैव आहे. गिरणी कामगार, औद्योगिक कामगार आणि मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार यांची वसाहत म्हणून मी ओळखले जात होते. खेळ, अभिनय, साहित्यात माझी मुशाफिरी चांगलीच झाली पण राजकारणातही मी फार मोठे चढउतार होताना या वसाहतीमध्ये पाहिले आहेत. माझ्या वसाहतीमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर तर राजकारणाचे अनेक किस्से घडले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८४ मध्ये भाजपचा ‘कमळाबाई’ म्हणून प्रथम उल्लेख केला तो याच मदानावर. आणि त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी याच मदानावर भरलेल्या मालवणी जत्रौत्सवात केलेली त्यांची नक्कल अनेकांच्या अजून स्मरणात आहे. ‘हर संघर्ष में आपका साथी‘ म्हणणारे समाजवादी पक्षाचे धडाडीचे आमदार नवाब मालिक याच मदानावर शरद पवारांच्या पक्षात डेरेदाखल झाले आणि त्यांचा संघर्ष उतरणीला लागला. नेहरुनगरकरांना हेलिकॉप्टर पहायला मिळावे म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले मलबार हिल ते नेहरुनगर खास हेलिकॉप्टरने आले होते. पण हा झाला १९८० नंतरचा इतिहास. त्यापूर्वी याच मदानावर झालेल्या साने गुरुजी व्याख्यानमाला, नाथ प व्याख्यानमाला आणि जाहीर सभांनी माझ्या वसाहतीतल्या रहिवाशांच्या बौद्धीक शिक्षणाचा पाया रचला आणि त्यांना राजकारणाचे बाळकडू पाजले आहे. या मदानावर साथी जॉर्ज फर्नाडिस, निळू फुले, मधू दंडवते, अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या आणीबाणीच्या विरोधातील झालेल्या सभा आजही स्मरणात राहिल्या आहेत. अरे हो, पूर्वी येथे काळू-बाळूंचा तमाशाही मुक्काम करून असायचा. आता मात्र हे मदान कधी आक्रसले हे कोणालाच कळले नाही आणि कधीतरी महाराष्ट्र दिनानिमित्त शाहिरी जलसा होतो. एकदा सिंधूताई सपकाळ आल्या आणि नेहरुनगरकरांच्या औदार्याची प्रचीती आली. त्यांना अवघ्या तासाभरात चार लाख रुपये मिळवून दिले. २००८ मध्ये इथल्या सर्वसामान्यांनी शीव इथल्या महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयास तब्बल १८ खाटा दिल्या आहेत. ही मोठी मदत नसेलही, पण सर्वसामान्य गिरणी कामगार आणि औद्योगिक कामगारांनी त्याच्या रोजीरोटीतला घास काढून ही मदत दिली होती. माझ्याच वसाहतीत राहणाऱ्या मोनिका मोरेला अपघात झाला तेव्हाही पतंगोत्सव करत तिच्यासाठी दोन तासात दोन लाख रुपये जमा करण्यात आले आणि त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे कार्यकत्रे एकत्र झाले होते. प्रीमिअरचे आंदोलन असो वा गिरणी कामगारांचा संप.. शेजाऱ्यांची काळजी माझ्या वसाहतीतल्या प्रत्येकाने मनापासून घेतली याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
माझ्या पन्नाशीच्या जडणघडणीमध्ये अनेक चढउतार आले. अनेक चळवळींचे केंद्र ही वसाहत राहिली आहे आणि अनेक कुप्रसिद्ध घटनांनी या वसाहतीच्या नावाला काळे फासले. लहान मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करणारे सत्र याच वसाहतीमध्ये घडले आणि याच वसाहतीच्या रक्षणासाठी असलेल्या पोलीस ठाण्यातील तब्बल ३७ कर्मचारी खंडणी मागितल्याच्या आरोपावरून निलंबित झाले होते. गिरणी कामगारांचा संप, प्रीमीअर ऑटोमोबाइल्समधला संप, कामगार नेत्यांवर झालेले हल्ले, १९८४ मध्ये झालेली जातीय दंगल, शिवसेना-रिपाइं यांच्यात कथित बुद्धविहाराच्या तोडफोडीवरून झालेली १९८९ मधील दंगल किंवा १९९२-९३ मधील जातीय दंगल या प्रत्येक वेळी नेहरुनगरला चटके बसले. १९८४ मध्ये इंदिरा गांधीच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीनंतर या वसाहतीमध्ये राहणारी अनेक शीख कुटुंबे नव्या मुंबईत स्थलांतरित झाली. २००५ मध्ये मुंबईतल्या महाप्रलंयकारी पूरस्थितीचा फटका सर्वाधिक मला बसला. अनेकांना वाचविताना माझ्या वसाहतीतले दोघे तरूण त्यात वाहून गेले, हे मी विसरू शकत नाही. कित्येक दिवस अनेक इमारतींमधले रहिवासी आपल्या घरातला गाळ उपसत होते. पण तेव्हाच माणुसकीचा गहिवरही मी अनुभवला. म्हणूनच अगोदरच्या जखमा भरून येण्यास मला मदत झाली.
वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरभराट करत माझे नाव उंचावणारे अनेकजण माझ्या वसाहतीमध्ये होते. या वसाहतीच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीमध्ये त्यांनी नक्कीच मोलाची कामगिरी केली आहे. मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. १९९३ मध्ये मुंबईत घातपात घडवून आणण्यासाठी आणण्यात आलेले डिटोनेटर्स शोधून काढून मुंबईला वाचविणारे, राष्ट्रपती पुरस्कार मिळविलेले शूर बहाद्दर अधिकारी अभय पोयरेकर, सरकारी वकील डी. जी परांजपे, १९८३ मध्ये पहिला विश्वचषक भारताला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा मध्यमगती गोलंदाज बलिवदरसिंग संधू, शरीरसौष्ठवपटू असलेला मधुकर थोरात, ‘एक होती वादी’ या चित्रपटाद्वारे राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी अभिनेत्री शीतल क्षीरसागर, नृत्यांगना दीपाली सय्यद, दिग्दर्शक आशीष देव, राजीव पाटकर, नृत्यांगना सुनंदा केकाणे (शेट्टी), सुमीत राघवन हेही माझ्याच परिसरात लहानाचे मोठे झाले, नावारुपाला आले. इथल्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची कोवळी पावले उमटलेली मी पाहिली आहेत. नंतर अर्चना पांढरे (पाटकर), उमेश कामत यांच्यासारखे कलावंतही माझ्याकडे मुक्कामी आले. चित्रपट कथा लेखक राजा पारगावकर, िहदी लेखक जावेद सिद्दीकी हेही याच माझ्या वसाहतीमध्ये नावाजले गेले आहेत. पत्रकार प्रतिमा जोशी, मंथन मेहता, व्यंगचित्रकार संजय मिस्त्री, बळी लवंगारे हेही माझ्याच इथे रहातात, याचा मला आनंद वाटतो. शिक्षण क्षेत्रातली केवळ मराठीच नव्हे तर प्रि. एन. एम. ए. कुक्षीवाला, उर्दू अभ्यासक सय्यद, उर्दू पत्रकार बेकस अशी अन्य भाषिक तज्ज्ञ मंडळीही येथे रहात आहेत.
साहित्य वर्तुळावरून आठवलं. वसाहतीच्या सुरुवातीच्या काळात येथील एका भागात पत्रकार-साहित्यिक मोठय़ा प्रमाणात रहात होते. अरुण साधू, सुधीर नांदगावकर, वसंत सोपारकर, प्रफुल्लकुमार मोकाशी, ग्रंथालीची चळवळ याच वसाहतीमधून सुरू करणारे दिनकर गांगल, अरिवद कुलकर्णी, माधव कुलकर्णी, जे.जे. कांड उघडकीस आणणारे जगन फडणीस, बाळ देशपांडे, दिवाकर गंधे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे बाळाराव सावरकर, अ‍ॅड. भालचंद्र आकलेकर, मनोहर कदम यांच्यासारखी अनेक दिग्गज मंडळी येथे रहात होती. अनेकांचा उदयकाल येथूनच सुरू झाला असे म्हटले तर वावगे ठरू नये. आता यातील अनेकजण निवर्तले तर अनेकजण वसाहतीच्या बाहेर गेले. माझी ही एक ओळख असतानाच माझी कष्टकऱ्यांचे संघर्षमय जीवनाची साक्षीदार असलेली ओळख कायम राहिली आहे. त्यांचे लढे मी जवळून पाहिले. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर एकत्र आलेले सर्वाना पाहिले आहे. गिरणी कामगारांचा संप असू दे की प्रीमिअर कंपनीमधील डॉ. सामंतांची िहसक संपाची आंदोलने असो, की मफतलाल इंजिनिअरींगचा संप असो, माझ्याकडे त्याचे पडसाद उमटले. डॉ. सामंत यांची शाळा म्हणून ओळखली जाणारी त्यांच्या चुलत बंधूंनी उभारलेली न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा तेव्हा केवळ कुर्लाच नव्हे तर चेंबूर, लालडोंगर, चुनाभट्टी, विद्याविहार आदी आजूबाजूच्या परिसरातील मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांच्या मुलांसाठी एकमेव शिक्षण केंद्र होते. राज्य सरकारने उभी केलेली मातृदुग्धशाळाही माझ्या एका बाजूला उभी राहिली. तिच्या उभारणीच्या वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या मालमोटारींचा त्रास दूर करण्यासाठी सर्वसामान्यांनी भल्या पहाटे केलेले आंदोलन मला आजही अंधुकसे आठवते.
मी राजकारणातही आपले नाव कोरले आहे. समाजवादी नेते मोहन वालावलकर, दामोदर पाटकर, माजी आमदार दीनानाथ कामत, काँग्रेसचे मनोहर पाटकर, साम्यवादी पक्षाच्या कॉ. लिला आवटे, विजय गणाचार्य, अनिल गणाचार्य, प्रीमीअर कंपनीतील बहुसंख्य कामगार या वसाहतीत राहत होतेच पण त्यांचे नेते असलेले दादा सामंतही माझेच रहिवासी आहेत. माथाडी कामगारांचे पुढारी असलेल्या काकासाहेब थोरात यांना आपले लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारले. या वसाहतीने या शहराला एक महापौर (रा. ता. कदम) दिला. माजी काँग्रेस नेते प्रभाकर कुंटे यांनीही विधिमंडळात प्रवेश केला तो याच वसाहतीचे प्रतिनिधीत्व करत आणि याच वसाहतीने राज्यालाही एक मुख्यमंत्री दिला बॅ. बाबासाहेब भोसले यांच्या रुपाने. आता मंगेश कुडाळकर, अमित शेलार, चंदन पाटेकर, कमलाकर नाईक, सदानंद थोरात ही पुढची पिढी राजकारणात आली आहे. दलित चळवळीचे, कामगार चळवळीचे, भाडेकरूंच्या चळवळीचे केंद्र राहिलेल्या, साक्षीदार राहिलेल्या माझे स्वरूप मधल्या काळात पालटत गेले. पुनर्वकिासाचा प्रश्न या वसाहतीमध्ये जितका गाजला तितका अन्य कोणत्या वसाहतींमध्ये गाजला नसेल. येथे कालौघामध्ये येथे आणखीही इमारती उभ्या राहिल्या आणि जुन्या इमारती पुनर्वकिासाचे धोरण नक्की कधी होईल आणि मोठ्या जागेचे स्वप्न कधी पूर्ण होईल, याची वाट पहात जमीनदोस्त झाल्या आहेत.
अनेक कलावंतही माझ्याकडे होते. नेपथ्यकार राम सावंत, चित्रकार मधुराज उपळेकर, मूर्तीकार नारायण मिस्त्री, सदानंद चव्हाण, दूरदर्शनचे याकूब सईद गी मंडळीही माझ्या वसाहतीमध्ये केवळ रहात नव्हती तर त्यांनी माझ्या जडणघडणीमध्ये सहभाग दिला आहे. सदानंद चव्हाण तर अनेक वष्रे सार्वजनिक गणेशमूर्ती बनवित असत. त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्येने आणि मुलानेही ती जबाबदारी काही काळ पेलली. त्यांच्या मुलानेच तर माझ्या पन्नाशीनिमित्त एक शानदार शिल्प बनवून माझी आठवण कायमस्वरूपी बंदिस्त केली आहे. पण माझ्या निर्मितीच्यावेळी मदानात बसविलेला संगमरवरी दगड आता कुठे आहे, हे कोणालाही माहीत नाही. मातृदुग्धशाळा उभारताना लहान मुलांच्या काळजीपोटी रस्त्यावर उतरलेला सर्वसामान्य रहिवासी आता सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्यामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीला वैतागून माझ्यापासून दूर गेला आहे. मदान आक्रसलंय आणि जातीय दंगलीमुळे मन दुखावलेला माझा मूळ रहिवासी आता मदानाकडे फिरकतही नाही. बाहेरून आलेले मला ‘बकाल, गलिच्छ’ म्हणून संबोधतात तेव्हा माझ्या बाजूने बोलण्यासाठी कोणीच राहिलं नाही. जी आहेत ती केवळ हतबलतेने माना डोलावतात, तेव्हा मी निराश होते. मोठय़ा उमेदीने या वसाहतीतल्या नव्या पिढीकडे पाहते आहे. पन्नाशी म्हणजे आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात होते ना. भलेही जमिनीखालच्या पाण्याच्या बदलत्या प्रवाहाने अनेक इमारतींच्या समोरची जमीन वरखाली झाली असेल पण म्हणून माझ्या खांद्यावरच्या इमारतींचा पाया ढासळणार नाही. काही वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या एका इमारतीच्या पायामध्ये तर या वसाहतीच्या नकाशासहित तत्कालिन माहितीची कालकुपी ठेवण्यात आली आहे. ती आठवण काही वर्षांनी बाहेर पडेलही, पण मी आणखी वाढणार आहे. नावारूपाला येणार आहे. बदलत्या काळानुसार मी जरी बदलले तरी माझी जुनी ओळख ‘कष्टकऱ्यांची. कामगारांची वसाहत असलेले मुंबईचे पूर्व उपनगराकडे जाणारे प्रवेशद्वार’, कायम राहणार आहे.
अचानक कानठळ्या बसविणारा आवाज आला. मी भूतकाळातून बाहेर पडले आणि वर्तमानात आले. वर्तमान तर सर्वानाच माहीत आहे. भविष्याचे सांगता येणार नाही. पण पंकजने माझ्या पन्नाशीनिमित्त उभारलेल्या सुरेख शिल्पाकडे मी पहातच राहिले. माझ्याच परिचयाचे सगळे अवतीभवती होते. कोणी सेल्फी काढत होते तर कोणी जुन्या आठवणींना उजाळा देत माझ्या नव्या रूपाकडे पहात होते..
सर्वसामान्य गिरणी कामगार आणि औद्योगिक कामगारांनी त्याच्या रोजीरोटीतला घास काढून ही मदत दिली होती. माझ्याच वसाहतीत राहणाऱ्या मोनिका मोरेला अपघात झाला तेव्हाही पतंगोत्सव करत तिच्यासाठी दोन तासात दोन लाख रुपये जमा करण्यात आले आणि त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे कार्यकत्रे एकत्र झाले होते. प्रीमिअरचे आंदोलन असो वा गिरणी कामगारांचा संप.. शेजाऱ्यांची काळजी माझ्या वसाहतीतल्या प्रत्येकाने मनापासून घेतली याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
prasad.mokashi@expressindia.com