८० साली मुलींची लग्न करून देऊन निवृत्त झालेल्या सासऱ्यांनी सासूबाईंसह, मुंबई सोडून त्यांच्या गावच्या घरी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर विश्वास ठेवून दिलेलं हे भाडय़ाचं घर रिकामं करायची सूचना आम्हाला घर मालकांकडून मिळाली. ही वेळ कधी तरी येणारच होती. त्यांच्याकडून वर्षभराची वेळ मागून घेतली आणि सुरू झालं घर संशोधन.

अंधेरी पूर्वेच्या स्टेशनपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेलं हे घर अत्यंत सुसंस्कृत १००% मराठी वसाहतीत होतं. इथल्या स्त्रिया खरेदीला पाल्र्याला जात पण अंधेरी वेस्टचं फार आकर्षण म्हणून वेस्टला जागा घेऊ या का, असं मी यांना विचारलं. कारण आर्थिक बाबींमध्ये गती शून्य. पण आपल्याकडे काही शिल्लक नसताना, नोकरी नवी असताना हे किती अशक्य आहे हे यांनी मला पटवून दिलं.

पेपरमध्ये घरांच्या जाहिराती बघायला सुरुवात झाली. असंच हे घर १ बीएचके होतं. मुलगा चार वर्षांचा होता. पुढे-मागे त्याला वेगळी खोली हवी, त्यामुळे २ बीएचके हवं ही माझी कमालीची अव्यावहारिक दृष्टी. वर्सोव्याला २ बीएचके एक लाख चौदा हजाराला होता. पण ते कसं आवाक्याबाहेरचं आहे आणि आपण उत्तरेकडे १ बीएचकेच बघायला हवं हा यांचा प्रॅक्टिकल म्हणतात तसा अ‍ॅप्रोच. मग मला गोरेगावमधल्या पिरामल नगरमधील साठ हजारांच्या घराची जाहिरात दिसली. पण अंधेरी सोडल्यावर सरळ बोरिवलीला जायचं असं यांचं म्हणणं. कारण गाडय़ा तिथून सुटतात. मी गृहिणी होते, मुलगा लहान होता, पण यांचा नित्याचाच लोकलशी संबंध होता.

मग आम्हाला बोरिवलीच्या पश्चिमेला साईबाबानगर म्हणून मोठं गृहसंकुल होत असल्याची माहिती मिळाली. बघायला गेलो आणि मी नाराजच झाले. कांदिवली आणि बोरिवलीच्या मध्ये एस. व्ही. रोडपासून १०-१५ मिनिटं आत चालत जाऊन या इमारती होत्या. बस त्या रस्त्यावर जात नव्हती.

म्हणजे रोज एस.व्ही. रोडला येऊन बस पकडून स्टेशनला जायचं आणि येतानाही तेच. मी नाखुशीनी म्हणाले. पण यांची काही तक्रार नव्हती आणि तक्रार परवडणारही नव्हती. त्या संकुलातील शेवटच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरचं घर नक्की केलं. किंमत ऐकून आज हसायलाच येतं, ६६,००० रु. फक्त. पण आमच्याकडे तर काहीच नव्हतं. मग माझ्या वडिलांकडून पन्नास हजार घेऊन माझ्या बांगडय़ा आणि यांची अंगठी विकून ती रक्कम उभी केली.

‘‘कुठल्या कुठे आहे हो.’’ मी शेजारच्या काकूंकडे तक्रार केली.

‘‘अगं, हळूहळू सगळं होईल बघ तिथे आणि मुख्य म्हणजे तुला तुझ्या वयाच्या मैत्रिणी मिळतील. याच वयात जागा घेतात लोक.’’

आणि ८१ साली तिथे राहायला गेल्यावर हे लक्षात आलं. हळूहळू जागा भरत होत्या. पुरुष पस्तिशीतले आणि स्त्रिया नवविवाहितेपासून ते तिशीपर्यंतच्या. आतापर्यंत १००% मराठी शेजाऱ्यांमध्ये राहणारे आम्ही एकदम कॉस्मोपॉलिटन वातावरणात पोहोचलो. लग्नाआधी अशाच परिवेशात राहिलेली मी एकदम खूश झाले. आणि बघता बघता इंदिरा दुआ, आशा जग्गी, कांता साहनी, उर्वशी मेहता, तारापंत, वसुधा खाडिलकर आम्ही घट्ट मैत्रिणी झालो. सगळ्याच गृहिणी. मुलांचा वगोगट एक ते सात.

संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यावर त्याचं खाणं-पिणं उरकून रात्रीच्या स्वयंपाकाची थोडी तयारी करून त्यांच्याबरोबर आयाही खाली यायच्या. मुलं खेळत असताना आयांनी तिथल्या कट्टय़ावर बसून गप्पा मारायच्या. इमारतींकडे येणारा तो एकच रस्ता, त्यामुळे जिचा नवरा येईल तिने उठून घरी जायचं हा शिरस्ता. कामावरून इतक्या लांब घरी यायला साधारण सात वाजतच, मग मूल आणि नवरा दोघांना काखोटीला मारून बाई घरी रवाना होई. कधी एखादा नवरा फारच लवकर आला तर ‘आज इतनी जल्दी कैसे आ गये’ असं जरा नाराजीनंच पुटपुटत बाई घरी जाई. मूल खाली खेळत राही. मग बाकीच्या ‘जाओ, अच्छा चान्स है, हनिमून करो’ अशी त्या वयाला साजेशी थट्टा करीत. क्वचित एखादा समजूतदार नवरा ‘तुम बैठो, मैं चाय बना लूंगा’ असं आश्वासन देई.

मधून मधून मुलांचे वाढदिवस येत आणि आया आणि मुलं यांना या हॅप्पी बर्थडेचं आमंत्रण असे. मुलांना संध्याकाळी सहाला बोलावून केक कापून, खायला घालून खाली पिटाळलं जाई आणि मग त्यांच्या आया येत. गप्पांची मैफल जमे. मुलं खाली खेळत रहात. वातावरण सुरक्षित होतं. वाढदिवसाचा मेनू थोडय़ाफार फरकाने ठरलेला असे. केक, वेफर्स, समोसा आणि एखादी मिठाई, त्याकाळी प्लास्टिकच्या पिशव्यांतून मिळणारा पेप्सी- कोला म्हणून मिळणारा काला खट्टा किंवा ऑरेंज मुलांना मिळे आणि आयांसाठी चहा असे. कधी क्वचित कोणाचे सासू-सासरे येत काही दिवसांसाठी. मग त्या सास्वा-सुनांना एकमेकींकडे चहाला बोलावलं जाई. चहाबरोबर मराठी घरात पोहे, पंजाबी घरात मठरी, गुजराती घरात ढोकळा मिळे.

बघता बघता पाच वर्षे गेली. नवऱ्यांची प्रगती होत गेली. तशी प्रत्येकाने कुठे कुठे २ बीएचकेची जागा बघितली आणि अचानक एक योग येऊन आम्हालाही माझ्या आवडत्या अंधेरी वेस्टमध्ये २ बीएचकेची जागा मिळाली. फोन कोणाकडेच नसल्यामुळे हळूहळू संपर्क कमी होत गेला.

नव्या सोसायटीत जवळजवळ सर्वच स्त्रिया नोकरी करणाऱ्या, त्यामुळे इथे मला मैत्रिणी अशा कधी मिळाल्याच नाहीत. घर लाभलं, नवऱ्याचा उत्तरोत्तर उत्कर्ष झाला. खूप प्रवास केला. आता पुनर्विकास पूर्ण झाल्यावर नव्या ३ बीएचकेमध्ये राहायला जाईन. पण बोरिवलीतली ती पाच र्वष काही मनातून जात नाहीत. क्वचित त्या मैत्रिणींपैकी वाशीला राहणारी तारा भेटते. ती म्हणते, ‘‘कितने अच्छे दिन थे न? फोन नहीं था, गाडी नहीं थी, पैसे भी कम थे, फिर भी कितने खूश थे हम लोग.’

खरंच अनेकदा फक्त मनाचं समाधान पुरतं, नाही का?

संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यावर त्याचं खाणं-पिणं उरकून रात्रीच्या स्वयंपाकाची थोडी तयारी करून त्यांच्याबरोबर आयाही खाली यायच्या. मुलं खेळत असताना आयांनी तिथल्या कट्टय़ावर बसून गप्पा मारायच्या. इमारतींकडे येणारा तो एकच रस्ता, त्यामुळे जिचा नवरा येईल तिने उठून घरी जायचं हा शिरस्ता. कामावरून इतक्या लांब घरी यायला साधारण सात वाजतच, मग मूल आणि नवरा दोघांना काखोटीला मारून बाई घरी रवाना होई.

नंदिनी बसोले  vasturang@expressindia.com