गेल्या पंधरवडय़ात वास्तुपुरुषाने उत्सवी वातावरणातून पितृपक्षात प्रवेश केला. या पंधरवडय़ाला लोक अशुभ का समजतात हे कोडं वास्तुपुरुषाला पडलेलं होतं. खरं तर आपापल्या पितरांच्या स्मृती जागवायचा हा आनंदी काळ. हाच ऋतुबदलाचाही काळ- वर्षां ऋतूतून शरदाकडे वाटचाल करणारा काळ. निसर्गातले बदल तर दिसायला लागलेच, पक्ष्यांच्या दक्षिणेकडील स्थलांतराच्या प्रवासातून सूर्यदेवही २२ सप्टेंबरला विषुववृत्तावर क्षणभर स्थिरावला, दिवस-रात्र समसमान करून निघाला दक्षिण सीमोल्लंघनाला.  गेल्याच आठवडय़ात ‘ओणम्’च्या मुहूर्तावर सूर्यदेवाने उत्तरा नक्षत्रात प्रवेश केला, घोडय़ावर स्वार होऊन.. आणि याच ‘ओणम्’च्या मुहूर्तावर वास्तुपुरुषाला आठवण झाली उपराळकर देवचाराने सांगितलेल्या त्याच्या जन्मकहाणीची, अगदी ‘महाबली’ राजाच्या कहाणीशी सुसंगत!

पावसाची एक जोरदार सर आली आणि त्या सरीतून ओघळलेला घनगंभीर आवाज वास्तुपुरुषाच्या कानात घुमला. ‘‘वास्तुपुरुषा, बळीराजाच्या आठवणीने विमनस्क होऊ नकोस. तुला तर मुक्ततेचा मार्ग मी दाखवला आहे. तुझी वाटचालही अगदी योग्य दिशेने चालली आहे, संतुलित विकासाची जाणीव लोकांना करून देत, त्यांना संवेदनाक्षम करत..  हा प्रवास आहे तेजोमयी, उत्साहवर्धक आणि आशादायक. चल सुरू कर तुझी या डोंगराळ परिसरासाठी समर्पक विकासाची मांडणी. मी खूप उत्सुक आहे इथला अवघड गुंता कसा सोडवतोस ते ऐकायला.’’

Construction of 121 artificial reefs on Konkan coast for fish conservation
मत्स्यसंवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर १२१ कृत्रिम भित्तिकांची उभारणी
Halve the price of high priced garlic
लसूण स्वस्त; ग्राहकांना दिलासा, परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू
seeds worth 9 lakhs seized from farmers in Andhra Pradesh
आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांकडून ९ लाखांचे चोरबिटी बियाणे जप्त
unearth Harappan site near Dholavira
सोन्याच्या शोधार्थ निघालेल्या ग्रामस्थांना मिळाला तब्बल ४५०० हजार वर्ष जुना सांस्कृतिक खजिना; काय नेमके आहे प्रकरण?

वास्तुपुरुषाचं मन मुक्ततेच्या विचाराने शहारलं, उत्साहाने भिरभिरलं. ‘‘साष्टांग दंडवत देवा महाराजा! मी काही विमनस्क नव्हतो, पण ती बळीराजाची कहाणी अस्वस्थ करते, विशेषत: इथल्या शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती पाहून. तोही गाडला जात आहे कर्जाच्या खोल गत्रेत. संतुलित आणि सम्यक विकास हाच आहे त्याच्या मुक्ततेचा दीपस्तंभ.’’

‘‘वास्तुपुरुषा, या डोंगराळ परिसरातील खोल दऱ्यांतून घोंघावत वाहणाऱ्या आणि वर्षांतून दोनदा- पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात, पुरांनी दुथडी भरून ओसंडणाऱ्या महानद्यांच्या किनाऱ्यांवरील मानवी विकास सुरक्षित कसा होणार ही काळजी माझ्यासमोर आहे.’’ उपराळकराने कोडं उभं केलं.

‘‘अगदी योग्य बोललास, देवा महाराजा!  इथल्या भटकंतीत निसर्ग सतत स्फूर्ती देत असतो आणि संवेदनाक्षम निरीक्षणातून अशा अवघड प्रश्नांची उत्तरंही देत असतो. इथल्या मातीतून आणि खडकांतून, भूगर्भाच्या अभ्यासातून, भूरचनेच्या निरीक्षणातून खूप शिकण्यासारखं आहे. मी इथल्याच अतिउंचीवरील आणि नंदादेवी पर्वताच्या कुशीतील ‘लाफ्ताल’ परिसरात, भारत आणि चीनच्या सीमेवरील प्रदेशात भटकंती करून नुकताच आलो. तुला गंमत वाटेल, ही अतिउंचीवरील भटकंती खरं तर समुद्रतळावरची होती. माझ्या पायदळी सातत्याने होते सागरी जीवाश्म, या हिमालयाच्या उत्पत्तीचे दाखले देत. ही कहाणी आहे पृथ्वीच्या भूगर्भातील आंदोलनांची, भूगर्भ थरांच्या धक्क्याबुक्क्यांची! सुमारे ७ कोटी वर्षांपूर्वी ‘भारत-ऑस्ट्रेलिया’ एकत्रित थर वर्षांला १५ सें. मी. वेगाने उत्तरेकडे सरकत होता आणि सुमारे ५ कोटी वर्षांपूर्वी तो तिथल्या ‘टेथिस’ महासागराला भिडला. या प्रचंड नसíगक समुद्रमंथनाने या महासागराचा तळच उखडला आणि निर्माण झाला प्रचंड हिमालय पर्वत. याच सुमारास या महाकाय थराचं विभाजन झालं- भारतीय थर आणि ऑस्ट्रेलिया थर असं. भारतीय थर आजही उत्तरेकडे सरकत आहे युरेशियन थराला धडका देत आणि हिमालयाला, तिबेटच्या पठाराला उंचावत-दर वर्षी ५ मि. मी. वेगाने! त्यातूनच सुरू झाले हिमालय परिसरातले भूकंप आणि या ‘वाळू-खडक’मय ‘तरुण’ पर्वतातील भूस्खलनं. या ‘टेथिस’ महासागराचा पुरावा आहे ‘लाफ्ताल’च्या सागरी जीवाश्मांत आणि अत्युच्च ‘एव्हरेस्ट’ शिखराच्या चुनखडीच्या भूगर्भात. हा पुरातन भूगर्भशास्त्रीय इतिहास अभ्यासला की मग या ‘ठिसूळ’ पर्वताकडे आपण वेगळ्या नजरेने पाहायला शिकतो. आता इथला कोणताही विकास हा या ‘नाजूक’ परिसराला सयुक्तिक असलाच पाहिजे हेही आपल्याला कळतं.’’ वास्तुपुरुषाने प्रस्तावना केली.

‘‘हा पुरातन भूगर्भ इतिहास फारच रंजक आहे. काही वर्षांपूर्वी या उत्तराखंडातील भूकंपात बरीच जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. पण लोकांनी काही धडा घेतलेला दिसत नाही. या उत्तुंग हिमालयात उगम पावणाऱ्या नद्याही खोल दऱ्यांतून सुसाट वेगाने वाहत असतात, भोवतालच्या ठिसूळ किनाऱ्यातील मातीची धूप करत. या पवित्र नद्यांची काय वैशिष्टय़ं आहेत वास्तुपुरुषा?’’ उपराळकराने चर्चा नद्यांच्या वळणावर नेली.

‘‘देवा महाराजा, अनेक वर्षांपूर्वी हा प्रदेश घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. या वनस्पतींच्या मुळांनी इथल्या मातीला, जमिनीला आपल्या कवेत घेऊन तिचा प्रेमाने सांभाळ केला होता. जगभरच्या आदिम जमातींची एक सामायिक समजूत आहे, ‘जंगलं ही नद्यांची माता आहे.’  जिथे जिथे या वन माऊलीवर हल्ला झाला तिथे तिच्या लेकीचीही प्रकृती ढासळली. मानवाने प्रथम जंगलं नष्ट केली, मग तीर्थक्षेत्र असलेल्या नद्यांवर अत्याचार करून त्यांना रुग्ण बनवलं आणि शेवटी स्वत:ही रोगराईचा बळी झाला. हिमालयातील नद्यांची अनेक वैशिष्टय़ं आहेत. कर्कवृत्ताच्या काहीसा जवळ असूनही उत्तुंग उंचीमुळे या पर्वतरांगेची शिखरं कायम हिमाच्छादित असतात. उत्तर आणि दक्षिण ध्रुव परिसरांच्या मागोमाग हिमालयातील बर्फाचा साठा जगात सर्वोच्च आहे. या परिसरात सुमारे १५ हजार हिमनद्या आहेत. गंगोत्री, यमुनोत्री, खुंबू आणि झेमू या त्यातल्या प्रमुख. इथूनच उगम पावणाऱ्या सिंधू, गंगा, यमुना, तिस्ता, ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्यांच्या सुपीक खोऱ्यांतच अनेक मानवी संस्कृती विकसित झाल्या. परंतु असंतुलित मानवी विकासाच्या बदलामुळे होणाऱ्या जागतिक ऋतुबदलाचे दुष्परिणाम इथेही होत आहेत. अनेक हिमनद्या माघार घेत आहेत, त्यामुळे एका बाजूला नद्यांना अकस्मात पूर येताहेत, तर दुसऱ्या बाजूला त्या आटतही चालल्या आहेत.  या परिसरात डोंगरांनी वेढलेल्या सखल भागांत अतिउंचीवरील तलावही आहेत. सभोवतालच्या हिमनद्यांच्या अति-वितळण्यामुळे हे तलाव ओसंडून जायच्या स्थितीत येऊन धोकादायक बनत चालले आहेत. त्यात भर पडत आहे नदीकिनारी वाढणाऱ्या मानवी वसाहती आणि त्यांच्या कचरा आणि सांडपाणी यांमुळे होणारं हानीकारक प्रदूषण, प्रचंड प्रमाणातील पर्यावरण विध्वंस. हे सगळं आता हिमालयाला असह्य़ होत आहे.’’

‘‘मार्ग दाखव वास्तुपुरुषा, मार्ग दाखव यातून बाहेर पडण्याचा.’’ देवचाराने हाक दिली.

वास्तुपुरुषाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सुरुवात केली. ‘‘देवचारा, प्रथम थांबला पहिजे जंगलांचा व्यापारी विध्वंस आणि त्याला जोड दिली पहिजे वनीकरणाची.  दोन पद्धतीने-नसíगक वनं आणि सामजिक वनं.  नसíगक वनांमुळे इथल्या जैवविविधतेला आसरा मिळेल तर सामाजिक वनीकरणामुळे स्थानिक जनतेला. शिवाय दोघांचाही एकत्रित फायदा मिळेल इथल्या मातीला, भूगर्भ-जलाला आणि नद्या-तलावांना. पुढचा बदल आहे शेती पद्धतीतला. डोंगर उतारांवरची पारंपरिक पद्धतीची शेती कष्टदायक असते, बऱ्याचदा नुकसानीची ठरते. त्यात भर पडते रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे. जैविक शेती आणि जोडीला वनशेती हा संतुलित आणि लाभदायक पर्याय आहे इथल्या जनतेसाठी. डोंगर उतारांवरील पायऱ्या-पायऱ्यांची शेती, जर भूरचनेशी आणि उतारांशी संवेदनाक्षम राहून केली तर ती मृद्संधारणाला मदत करू शकते. शिवाय हा बदल इथल्या पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल. तिसरा प्रश्न आहे इथल्या मानवी वसाहतींचा. उभट उतारांवरील वसाहती या जमिनीला आणि मानवलाही घातक ठरू शकतात. विशेषत: या भूकंपप्रवण क्षेत्रात तर हा धोका अधिक तीव्र असू शकतो हे इथल्या अनुभवातूनही सिद्ध झालं आहे. तेव्हा सर्वसाधारणपणे २०० पेक्षा जास्त उतारांवर वसाहती करू नयेत. तसा कायदाही आता सरकारने केला आहे. फक्त तो गंभीरतेने राबवायला पहिजे. सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे नदीकिनारीच्या वसाहतींमधला. प्रथम म्हणजे नद्यांकडे आदरपूर्वक पाहून, त्यांच्यापासून काही पावलं मागे सरकलं पहिजे. सर्वसाधारणपणे नदीच्या पात्राच्या रुंदी एवढंच अंतर नदीच्या दोन्ही किनाऱ्यांच्या उच्च पूर-पातळी रेषेपासून सोडलं पाहिजे. कोणताही विकास या ‘लक्ष्मणरेखे’पलीकडेच रोखला पहिजे. या मानवी वसाहतींनी पर्यावरणाचे नियम काटेकोरपणे पाळले पहिजेत. विशेषत: सांडपाणी आणि कचरा यांवर प्रक्रिया करून त्यांचा योग्य पुनर्वापर. यामुळे प्रदूषण तर थांबेलच पण जमीन सुपीक होईल, शेतीला भरभराट येईल, नदीकिनारे सुरक्षित राहतील. नद्या निरोगी आणि आनंदित होतील. मला खात्री आहे की हा संतुलित विकासाचा मार्ग इथल्या जनतेला सुख-समृद्धीच्या ध्येयाकडे नेईल.’’

उपराळकर देवचाराने समाधानाने वास्तुपुरुषाचं कौतुक केलं. ‘‘वास्तुपुरुषा, ‘दार उघडलंस तू या देवभूमीच्या सम्यक विकासाचं. आता भेटू या महालया अमावास्येनंतर, दुर्गा-सरस्वतीचं स्वागत करत.  इथल्या घरांच्या, इमारतींच्या रचनांचं मार्गदर्शन कर आम्हाला त्यावेळी.’’

‘‘होय देवा महाराजा, मीही आतुर आहे सरस्वतीच्या स्वागतासाठी आणि संतुलित विकासाचे ‘घट’ बसवण्यासाठी. भेटू या लवकरच.’’  दोघंही अलकनंदा-मंदाकिनीच्या खळखळात मग्न होऊन गेले. पुन्हा सुरू झालेल्या ऊन-पावसाच्या खेळाने हिमशिखरांवरून इंदधनूचं तोरण बांधलं. दूरवरून मोनाल पक्ष्यांच्या शीळांनी वातावरण प्रफुल्लित करून टाकलं.

उल्हास राणे – Ulhasrane@gmail.com