पावसाळा सुरू झाला आहे. तुम्ही कदाचित थंडगार शिडकाव्याचा आनंद घ्याल, पण तुमचं फर्निचर ते नाही घेऊ  शकणार. पाणी आणि ओलावा यांचा लाकडावर आणि फॅब्रिकवर आधारित असलेल्या फर्निचरवर फारच वाईट परिणाम होतो. तुमच्या फर्निचरचं आयुष्य वाढेल, ते खूप चांगलं दिसेल; इतकंच नाही तर त्याचा दर्जाही उत्तम राहील अशा काही टीप्स इथे देत आहोत!

ओलसर जागांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज.

  • पावसाच्या पाण्याचा शिडकावा होऊ नये आणि गळतीपासून संरक्षण मिळावे, यासाठी तुमचे फर्निचर दरवाजे आणि खिडक्यांपासून दूर ठेवा. अगदी थोडेसे थेंब जरी फर्निचरवर उडाले तरी लाकूड आणि फॅब्रिक खराब होऊ शकते.
  • तुमचे वॉर्डरोब भिंतीपासून किमान ६ इंच अंतरावर ठेवा. भिंत आणि वॉर्डरोब यांत पुरेसं अंतर राहिल्याने वॉर्डरोबची मागची बाजू खराब होणार नाही.
  • नायलॉन, वेब किंवा रंगवलेलं मेटर यांसारखं, अगदी गार्डनमधलं फर्निचरसुद्धा पावसाळ्यात ओलं होण्यापासून वाचवलं पाहिजे, त्यासाठी ते घरात आणून ठेवा. यामुळे फर्निचरला भेगा पडणं किंवा रंग उडणं असे प्रकार होणार नाहीत.

खेळत्या हवेचे फायदे

  • हवा खेळती राहणं हे माणसांच्या आणि फर्निचरच्या आरोग्यासाठीसुद्धा हितकारक आहे. हवा खेळती राहिल्यामुळे खोलीतील ओलाव्याचं प्रमाण कमी होतं. हे वातावरण तुमच्या फर्निचरवर थर किंवा बुरशिलासुद्धा प्रतिबंध करतं. ओलावा शोषकांचा वापर करा.
  • कॅम्फोर किंवा नॅप्थलिन बॉल्स हे उत्तम ओलावा शोषके आहेत. कपडे तसेच वॉर्डरोबचे वाळवी आणि इतर कीटकांपासून रक्षण करण्यास यांची मदत होते.
  • जर तुम्हाला काही नैसर्गिक उपाय हवा असेल तर कडूनिंबाचा पाला घ्या किंवा लवंगासुद्धा वॉर्डरोबमध्ये ठेवू शकता.
  • प्लासिंग, कॅम्फोर, नॅप्थलिन बॉल्स आणि कडूनिंबाचा पाला यांमुळे ओलाव्यापासून संरक्षण तर होईलच, पण तुमच्या वॉर्डरोबमध्ये सुगंध दरवळत राहील.
  • तुमचं लाकडी फर्निचर पुसायला ओला कपडा अजिबात वापरू नका. त्यासाठी एक कोरडं आणि स्वच्छ कापड वापरा.
  • धुळीपासून फर्निचरचं संरक्षण करा. धुळीमुळे फर्निचरमध्ये ओलावा जिरण्यास मदत होते आणि काही काळानंतर फर्निचर भुसभुशीत होतं.
  • पावसाळ्यापूर्वी फर्निचरचे ऑइलिंग किंवा वॅक्सिंग करून घ्या. यामुळे फर्निचरमध्येओलावा आत मुरणार नाही. लाकूड जर ओलं राहिलं किंवा अस्वच्छ राहिलं तर त्याला कुबट वास येतो. थोडीशी काळजी घेतल्याने किमती सामान दीर्घकाळ टिकू शकतं.

(लेखक गोदरेज इंटिरिओचे मुख्य व्यवस्थापक आहेत.)