गणेशाच्या मूर्ती व मंदिरनिर्मितीसाठी कारागिरांनी आपलं कसब, कला ज्ञान व राज्यकर्त्यांनी धनदौलत व अधिकाराचा अधिकाधिक वापर केल्याचं देशभरात विखुरलेल्या २१पेक्षा अधिक प्रसिद्ध गणेश मंदिरांना भेट देताना जाणवतं.

अपरिमित यश, मानसन्मान, ऐश्वर्य व सौख्यप्राप्तीसाठी, अत्यंत शुभकारक, तारक व विघ्ननाशकर्ता म्हणून सर्वात लोकप्रिय अशा श्रीगणेशाच्या आगमानाची निसर्गही पूर्ण तयारीनिशी जणू वाट पाहू लागतो! गणेशकृपेमुळे इच्छापूर्तीच्या वैयक्तिक पातळीवरील अनुभवांखेरीज महत्त्वाचं म्हणजे- मार्केटमधल्या मंदीच्या मगरमिठीतून मुक्ती देणारा व वर्षभरासाठी व्यापार उदिमाला सुरुवात करून देणारा गणपती, त्याची स्थानं व त्याचा उत्सव म्हणून विशेष ख्याती आहे. अगदी कडेकपारीत उगवणाऱ्या दुर्लक्षित कांगणी कवंडाळांपासून ते अत्याधुनिक उपकरणं, कलागुण, कारागिरी, ज्ञान व नैपुण्य, इ.ना सन्मान व राजमान्यता मिळवून देणारा हा देव होय! म्हणूनच कदाचित गणेशाच्या मूर्ती व मंदिरनिर्मितीसाठी कारागिरांनी आपलं कसब, कला ज्ञान व राज्यकर्त्यांनी धनदौलत व अधिकाराचा अधिकाधिक वापर केल्याचं देशभरात विखुरलेल्या २१पेक्षा अधिक प्रसिद्ध गणेश मंदिरांना भेट देताना जाणवतं.

अशा जागृत स्थानांचा विचार करताना आपल्याला सहज आठवतात ती जवळपासची विनायक मंदिरं! पहिलंच नाव येतं ते प्रभादेवीचं. नैसर्गिक आपत्ती, गरजूंना आरोग्यसेवा व समाजकार्यासाठी सढळ हस्तानं दान देणारं, लोकप्रियतेच्या शिखरावरचं श्रीमंत सिद्धिविनायक मंदिर, गजबजलेल्या भागात मोठय़ा गर्दीला सामावणारं आटोपशीर मंदिराचं राजवैभव जाणवतं ते रात्रीच्या वेळी असंख्य दिवे व फुलांच्या आरासीनं सजल्यावरच. नंतर नाव येतं लोकप्रियतेत दुसऱ्या नंबरावरच्या पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिराचं. १०० र्वष जुन्या जागृत व नवसाला पावणाऱ्या इथल्या साडेसात फूट उंच गणेशाची राजबिंडी सुवर्णमूर्ती सदासर्वदा प्रसन्न हिरेमाणकांनी सजवलेली असते. हेही गजबजाटातल्या मुख्य वाहत्या रस्त्यावरचं छोटेखानी मंदिर, नक्षीकाम प्रमाणबद्ध व आकर्षक बांधकाम व उत्तम नियोजन याचं उदाहरण होय! विवाहकर्त्यां, नवसाला पावणाऱ्या पेशवेकालीन टिटवाळ्याचं विनायक मंदिर अत्यंत साध्या बांधकामाचं व सोयीसुविधांनी सुसज्ज असं आडवाटेवरचं, पण हमखास प्रचीती देणारं असं आहे. याशिवाय अप्रतिम समुद्रकिनारा लाभलेल्या अशा गणेश स्थानात फेब्रुवारी व नोव्हेंबरमध्ये किरणोत्सव साजरं करणारं स्वयंभू गणेशाचं सिद्ध स्थान होय. याशिवाय जवळच गणेश गुळ्याचं छोटंसं प्राचीन मंदिर व वेंगुल्र्यातील रेडीचं पर्यटकांना भुरळ घालणारं ही महत्त्वाची स्थानं होत. यानंतर अष्टविनायकांची स्थानं न आठवणारा विरळाच!

अष्टविनायकांची महाराष्ट्रातील ही मंदिरं भव्य-दिव्य नसली तरी बांधकामातला नेटकेपणा व साधेपणा असला तरी सुमार म्हणणं अयोग्य ठरेल. या आठही छोटेखानी मंदिरात उपयोजितता व वास्तुशास्त्राची तत्त्वं मात्र काटेकोरपणे पाळलेली दिसतात. मुख्य मूर्तीचं स्वतंत्र स्थान, गर्भगृह, मंडप, सभामंडप हे कातीव, कोरीव व चित्ताकर्ष शैलीत बनविलेले आढळतात. मूर्तीमध्ये कोणतंही  सादृश्य नसलं तरी ही आठही मंदिरं एक समानतेच्या एका अदृश्य धाग्यानं पक्की बांधली गेलीत. इथल्या उत्पत्तीच्या कथा, प्रत्येक स्थानाचा इतिहास व पौराणिक संदर्भही पूर्णपणे भिन्न आहेत. यातलं मोरगावचं मयूरेश्वर व सिद्धटेकचं सिद्धिविनायक मंदिर ही विशेष उल्लेखनीय होत. यातील मयूरेश्वर मंदिराच्या महाद्वारासमोर महानंदी चारी दिशांना गोपुरं व सर्व बाजूंनी ५० फूट उंचीची भक्कम दगडी तटबंदी आहे. इथली नागफण्याखालील मयूरेश्वराची मुख्य मूर्तीही प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने संस्कारित केली असून वाळू, लोखंड व हिऱ्याच्या कणांची लहानशी मूळ मूर्ती पांडवांनी लपविली होती असल्याचे सांगतात. बहामनी काळात बांधल्या गेलेल्या काळ्या पाषाणातील या मंदिराला चारही बाजूंनी दारं आहेत. उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाचं एका लहानशा पहाडावर बांधलेलं छोटेखानी पेशवेकालीन पूर्वाभिमुख मंदिर असून, यातील गर्भगृह १५ फूट उंच व १० फूट रुंद असं पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेलं आहे. बदामी किल्ल्याचे दगड नवसानुसार वापरून बाहेरील पदपथ बनविला आहे. पालीतलं बल्लाळेश्वराचं मुळातलं लाकडी मंदिर नाना फडणवीसांनी दगडांनी बांधून काढलं. बाहेर बांधलेल्या दोन तलावांपैकी एका तलावाचं पाणी मूर्तीच्या स्नानासाठी वापरलं जातं. आतील मंडप पूर्णपणे अष्टस्तंभावर आधारित असून खांबावरचं व छताचं कोरीव काम अप्रतिम आहे. दोन गर्भगृहांपैकी बाहेरील १५ फूट उंच व आतील १२ फूट उंचीचं आहे व ते बांधताना दक्षिणायनात सूर्यकिरणं सकाळी मूर्तीवर थेट पडतील याची दक्षता घेतली गेली आहे. महाड थेऊर इथल्या मंदिरापेक्षा लेण्याद्रीचं गिरिजात्मजाचं मंदिर आगळंवेगळं आहे. हे १८ फूट बौद्ध गुंफांच्या गराडय़ातलं आठ नंबरच्या गुंफेत आहे. एकाच दगडात कोरलेलं असून इथे जायला ३०७ दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. नैसर्गिकरीत्या उंचीवर असलेल्या या अत्यंत साध्या मंदिरात वायुविजन, शुद्ध हवा, नैसर्गिक प्रकाश यामुळे वेगळेपणा जाणवतो.

ओझरचं पूर्वाभिमुख मंदिर दगडी संरक्षक तटबंदी असलेलं, २० फूट उंचीचा मुख्य मंडप व १० फूट उंचीचं आतील सभागृह असलेलं व जवळपास एवढंच रांजणगावचं (मूळचं मणिपूर) पूर्वाभिमुख गणेश मंदिर स्वत: महादेवानं बांधल्याचं मानतात. याचं मुख्य द्वार भव्यदिव्य व भारदस्त असून इथंही सूर्याच्या दक्षिणायनात किरणोत्सव होतो.

महाराष्ट्राबाहेरची विशेषत: आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू व तुरळकपणे केरळ, राजस्थान व मध्य प्रदेश, इ. राज्यांत विखुरलेली गणेश मंदिरं मात्र चित्तवेधक, वैविध्यपूर्ण शैलीतली, अप्रतिम कलाकुसर असलेली वा उत्तम कारागिरी असलेली अशी आहेत. कर्नाटकातील मुख्य गणेश मंदिरं हंपी व गोकर्ण इथली होत. विजयनगरच्या हिंदू साम्राज्यातलं आक्रमकांच्या तावडीतून सुटलेलं व अवशेषरूपी उरलेलं जगभरच्या गणेश भक्तांनाच नव्हे, तर शिल्पकलाप्रेमींना खुणावणारं १४व्या शतकातलं पार्वतीगणेश मंदिर होय. १६ अजस्र दगडी खांबाच्या मंडपात १६ फूट उंचीचा विजयनगरीच्या खास शैलीतला महाकाय गणेश प्रत्यक्षात समोरून मंडपात बसलेला वाटत असला तरी प्रदक्षिणा करताना तो माता पार्वतीच्या मांडीवर बसल्याचं कळतं. या अद्भुत मूर्तीच्या शिल्पकाराचं कौतुक करावं तेवढं कमी वाटेल. सस्सीव कालू व कदाली कालूची गणेश मंदिरंही पर्यटकांची आकर्षण स्थळंच बनलीत, एवढी सुंदर आहेत. गोकर्ण महागणपती मंदिर रामायणकालापूर्वीचं असून इथल्या गणेशमूर्तीच्या शिरावर सखल भाग असून तो रावणाच्या रागामुळे झाल्याचं मानतात. कारण गणेशानं क्लृप्तीनं त्याच्याकडून इथलं महाबळेश्वरचं आत्मलिंग मिळवलंय! नैसर्गिक सौंदर्य, संपन्नता व सुबत्ता लाभलेल्या केरळमधील मंदिराची शैली काहीशी औरच! कासार गोड जिल्ह्य़ातलं मधुरवाहिनी नदीच्या काठचं मायपदी राजांनी बांधलेलं वास्तुकलेचं उत्तम उदाहरण असलेलं हे गणेश मंदिर असून, इथली मधुर महागणपतीची मूर्ती वनस्पती रस इतर कोणत्या तरी गूढ रसायनाची बनवलेली आहे. कारण यामुळे टिपूसारख्याचं मन बदलण्याचं सामथ्र्य यात असल्याचं सिद्ध झालंय. इथली पुष्करिणीही औषधीगुणयुक्त  पाण्याची असून व्याधी निवारणासाठी व गणेश दर्शनासाठी इथे श्रद्धाळूंची रीघ लागते. हे स्थान त्वचा व शरीराचे दुर्धर होणाऱ्या उपायाचे अंतिम स्थान मानतात.

वैशिष्टय़पूर्ण मंदिराचं आगरच असलेल्या तामिळनाडूतलं कर्पग विनायकाचं चेट्टिनाड इथलं गणेश मंदिर १६०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन व पुष्करिणीसहित चार कलात्मक भव्य गोपूर, आजूबाजूला निसर्गरम्य परिसरानं वेढलेलं आहे. इथला कृष्णपाषाणातला अवर्णनीय गणेश एक्कातूर कून या कारागिराने घडविलेला असून, सोंड उजवीकडे वळलेली आहे.

असाच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा आणखी एक विनायक श्रीरंगमजवळ त्रिची इथे आहे. उच्चिपिलयार विनायक हा ६५ मीटर उंचीच्या भव्य अतिप्राचीन खडकावर स्थित आहे. या पहाडात कोरलेली तीन शिव-पार्वती व गणेश मंदिर शिल्पशास्त्रातलं मोठं आश्चर्यच मानली जातात. इथे बांधकाम नसून अजस्र खडकात ही मंदिरे दक्षिणी शैलीत कोरली वा खोदली गेली आहेत. याच राज्यात कांचीपूरम इथे गणेशाची दोन स्थानं संगीताशी संबंधित असून त्यातली एक कुचेरी विनायक चेय्यूर इथं आहे. मूर्ती संगीताचा आस्वाद घेत एका बाजूला कललेली आहे. उज्ज्वल भविष्यासाठी संगीतकार, गायक व वादक प्राचीन काळापासून इथे आपली कला सादर करीत आले आहेत. जवळच अनूरचा संगीत गणपती हा अस्रपुरीश्वर मंदिर समूहात ५व्या शतकातील असून एका हाताने मांडीवर ताल धरताना दिसत असून हे दोन्ही संगीत गणेश संगीत क्षेत्रातील प्रगतीसाठी मदत करतात, असा विश्वास आहे. आयुमुरी गणेश मंदिर हे पुदुचेरी (मूळचे पाँडिचेरी) या राज्यातलं अत्यंत आकर्षक व कल्पकतेनं बांधलेलं असून अजून असंच इथे मनाकुलाचा गणेश असलेलं विस्मयकारक स्थान जवळच आहे. या मूर्तीचं वैशिष्टय़ म्हणजे इथल्या फ्रेंच राज्यकर्त्यांनी ही मूर्ती अनेकवेळा जवळच्या समुद्रात दूरवर फेकली तरी दुसऱ्या दिवशी ती गणेशमूर्ती मूळ जागी येऊन स्थानापन्न होत असे. जवळच्या अरविंद आश्रमाला भरपूर उत्पन्न मिळवून देणारं हे छोटेखानी, सुबक अत्यंत जागृत मंदिर आहे.

आंध्र प्रदेशात चित्तूर जिल्ह्य़ातलं कनिपरू विनायक हे वरसिद्ध गणेशाचं जिवंत, जागृत मंदिर असून, इथली मूर्ती इंचाइंचाने दरवर्षी वाढत आहे. दक्षिणी शैलीतलं अत्यंत देखणं व भव्य बांधकामाचं हे अतिप्राचीन मंदिर घरगुती वादविवाद नष्ट करणारं आहे. इथे ही मोठी पुष्करिणी व जवळच शिवमंदिर आहे. गर्दीमुळे इथलं दर्शन दुर्लभ असून ते मिळाल्यास भाग्य समजतात.

राजस्थानमध्ये रणथंबोर या वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रदेशात राजपुतांच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या किल्ल्यात वसलेलं कृष्णाच्या लग्नाचं आमंत्रण लाभलेल्या त्रिनेत्र गणेशाचं जगप्रसिद्ध स्थान. गुलाबी रंग ल्यालेलं हे गणेश मंदिर किल्ल्यात संरक्षित असून याला स्वतंत्रपणे भक्कम तटबंदीही आहे. जवळच प्रसिद्ध मोती डुंगरी राजवाडा व नयनरम्य निसर्ग आहे. मध्य प्रदेशातलं इंदूरजवळचं खजराना गणेश हे भव्य मंदिरही उल्लेखनीय आहे. हा जागृत गणेश सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतो, असे मानले जाते. या भव्य मंदिरात इतरही देवतांची उपमंदिरं आहेत. लाहोर व सिक्कीममधलं गंगटोकचं गणेश मंदिरही प्रसिद्ध आहे.

गणेश हे दैवत बौद्ध व जैन धर्मीयांनीही जवळ केल्याने याच्या मूर्ती गुजरात, राजस्थानमधील इतर धर्मस्थळांतही आढळतात. नेपाळ, भूतान व चीन इथेच नव्हे तर बाली, जावा, सुमात्रा या बेटांवर व अफगाणिस्तानापर्यंत या देवतेचा वावर आढळतो. यशदायक म्हणून सर्वानाच हवाहवासा वाटणारा विनायक १०व्या शतकानंतर वाढलेल्या व्यापार उदिमांमुळे समुद्रपार गेला. इथली याची लोकप्रियता कमीच जणू म्हणून हिंदू मंदिर संघटनेची उत्तर अमेरिकेतील फ्लशिंग व क्वीनस, पेलालिंग, जया, मलेशियातील सिद्धिविनायक मंदिरं तसंच जर्मनीतील फ्रँकफर्ट, मन्चेन, न्यूरेन्बर्ग, फर्डिनांड, स्टग्गार्ट, हट्टिन्जेन इथली वरसिद्धी वा सिद्धिविनायकाची मंदिरंही आहेत.
डॉ. उदयकुमार पाध्ये – cosmic_society_india@yahoo.co.in