गत मुंबईतील वास्तुकला सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून झालेल्या जडणघडणीचा इतिहास व वर्तमान पुनर्वकिासाचा आढावा.
इमारती फक्त अल्पकाळ टिकणाऱ्या निवाऱ्याच्या जागा नसून, त्या अनेक वष्रे टिकून राहण्यासाठीच असतात. त्यांची आंतर्बा रचना स्थापत्यशास्त्र व वास्तुकला-सौंदर्यपूर्ण असेल तर त्या अधिक काळ स्मरणात राहतात. सन एकोणीस व विसाव्या शतकातील जडणघडणीत मुंबईचा अनेक अंगांनी विकास झाला व त्यातून स्मार्ट व सुंदर अशा ‘मुंबई’ शहराची निर्मिती झाली. आजही कार्यरत असलेल्या विविध शैलीतील अनेक इमारती मुंबईचा ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखल्या जातात. पण काही नावीन्यपूर्ण व गौरवशाली ऐतिहासिक इमारती, एक तर दुर्लक्षिल्या जात आहेत किंवा एकापाठोपाठ त्या नजरेआड तरी होत आहेत, हा सर्वार्थाने चिंतेचा विषय आहे. काही महिन्यांपूर्वी फोर्टच्या डी. एन. रोडवरील एलआयसीची वादग्रत इमारत नाइलाजास्तव पाडून टाकण्यात आली. एस्प्लनेड मेन्शन, वॉटसन हॉटेल, रॉयल ऑपेरा हाऊस यांसारख्या अनेक उत्कृष्ट इमारती याच मार्गावर आहेत. उर्वरित इमारतींची संवर्धन व संरक्षणाच्या भूमिकेतून डागडुजी केली जात नाही, म्हणून त्यासुद्धा हळूहळू कमकुवत होत आहेत! गतकाळातील इमारतींकडे होत असलेले दुर्लक्ष व वर्तमानातील घिसाडघाईने बांधण्यात येणाऱ्या इमारतीकडे पाहून भविष्यातील मुंबईचा नवनिर्मित चेहरा येणाऱ्या पिढय़ांसाठी कसा असेल ही वस्तुस्थिती त्याहीपेक्षा अधिक चिंतेची आहे . गत मुंबईतील वास्तुकला सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून झालेल्या जडणघडणीचा इतिहास व वर्तमान पुनर्वकिासाचा आढावा थोडक्यात असा-
मुंबईच्या इतिहासात, सन १८६० व सन १९७४ मध्ये मोठय़ा प्रमाणात समुद्रात भराव टाकून जमीन वाढवण्याचे काम केले गेले व ते मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठे बदल समजले जातात. या बदलाचे पहिले श्रेय गव्हर्नर सर बार्टल फ्रियरना जाते. सन १८६० मध्ये, फोर्ट विभागाचे कार्यक्षेत्र वाढवण्यात येणाऱ्या अडचणी व संलग्न इमारतीतून, दाटीवाटीने राहणाऱ्या नागरिकांच्या गरजांचा विचार करून, बार्टलने फोर्ट परिसराच्या नवनिर्माणासाठी त्या भोवतालचे सुरक्षा कवच व मुख्य दरवाजे पाडून हा परिसर खुला केला. त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामाच्या सन्मानाप्रीत्यर्थ, सन १८६९ मध्ये ज्या जागेवर चर्चगेटकडील मुख्य द्वार होते त्याच जागेवर फ्लोरा फाउंटन हे शिल्प उभे केले. आराखडय़ानुसार, फोर्टच्या पूर्वेस प्रस्तावित नागरी इमारती व पच्छिमेकडील निवासी संकुल यामध्ये २२ एकराच्या ‘ओव्हल’ आकारातील मदानाची रचना आजही या परिसराचा आत्मा आहे. या मदानात युरोपियन लोक गोल्फ खेळत असत; आज तेथे क्रिकेट व फुटबॉल हे खेळ खेळले जातात. या संपूर्ण परिसरास ‘एस्प्लनेड कोर्ट’ असे म्हणत. सन १८७१-१८७८ मध्ये, नवीन आराखडय़ानुसार विस्तारित जागेतील पूर्व भागात सचिवालय, विद्यापीठ, राजाभाई टॉवर, न्यायालय, छत्रपती शिवाजी संग्रहालय, तारघर व सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या नागरी इमारती उभ्या राहिल्या. या लक्षवेधी व भव्य इमारती व्हिक्टोरियन गॉथिक शैलीत बांधल्या आहेत. या परिसरातील काही इमारतींचे आराखडे, जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट, जॉर्ज विटेट या ब्रिटिश आíकटेक्टने बनवले होते. जॉर्ज विटेटनी बनवलेल्या पोस्ट ऑफिस व छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या संरचनेत कमळ फुलाच्या पाकळयावरील मध्यवर्ती घुमट, गोलकोंडा व विजापूर शैलीतील खिडक्या व माíगकेवरील पसरट सज्ये भारतीय, मुगल, मराठा व जैन या वास्तुशैलीतील वैशिष्टय़पूर्ण घटकांना धरून केलेला दिसून येतो.
ओव्हल मदानाच्या पश्चिमेस, सलग अठरा निवासी संकुलातील इमारतींचे आराखडे भारतीय वास्तुविशारदांनी सन १९२०-४० च्या दरम्यान जगप्रसिद्ध ‘आर्ट डेको’ शैलीत बनवले होते, हे विशेष. प्रत्येक इमारतीच्या आराखडय़ात ‘आर्ट डेको’ शैलीतील विविधतेचा वापर कल्पकतेने केलेला दिसून येतो. यातील बारकावे, मन प्रसन्न करणारे आहेत. या सर्व इमारतींची मानवी दृष्टिक्षेपात मावणारी एकसारखी उंची, इमारतींच्या बा पृष्ठभागास हळुवारपणे जाऊन मिळणारे बाल्कनीच्या एका टोकाचे अर्धगोलाकार वळण, त्याच आकारात वळण घेतलेल्या पसरट सज्ज्यांची सहजता, मध्यवर्ती जिना, बाल्कनीचा पृष्ठभाग व खिडक्यावरील लोखंडी सुरक्षा कवचांचे विविध कलात्मक आकृतिबंधांतील लोभस रंगसंगती, फिकट हलका व मुलायम रंगातील बादृष्टय़ा ही या शैलीची ‘खासियत’ समजली जाते. इमारतींना कोर्ट वू, इम्परेस कोर्ट, ग्रीन फिल्ड अशी नावे ठेवून परिसरावर सर्वाधिक वर्चस्व गाजवणाऱ्या कार्यस्थळाचा गौरव इमारतींच्या नावात ‘शब्दबद्ध’ केला आहे. मोहक लिपीतील सर्व पाटय़ा पटकन नजरेत येतील अशा समान उंचीवर आहेत. अशा अनेक वैशिष्टय़ामुळे अल्पावधीतच या शैलीने जगभरातील श्रीमंत लोकांच्या मनात स्थान मिळवले. या संकुलातील निवासी व चर्चगेट स्टेशनसमोरील इरॉस सिनेमागृहाची इमारत, वास्तुकला सौंदर्यशास्त्राच्या कसोटीवर पुरेपूर उतरतात. अनेक वर्षांच्या फरकाने विकसित झालेल्या दोन वेगळया शैलीत साकारलेला हा परिसर खऱ्या अर्थाने मुंबईची शान म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून हे वैभव टिकवून ठेवण्यात या परिसरातील रहिवाशांचाही खूप मोठा सहभाग आहे व पुढील काळातही हे वैभव टिकून राहील यात शंका नाही. हे रहिवासी आजूबाजूचा परिसर व ओव्हल मदानाबाबतीतही तेवढेच जागरूक असतात. ओव्हल मदानाच्या पश्चिमेकडील महर्षी कर्वे मार्ग व मरिन ड्राइव्ह, सुभाषचंद्र बोस मार्गावरील ‘आर्ट डेको’ संकुल वगळले तर उर्वरित मुंबईत अनेक विसंगत बदल झालेले दिसून येतात. पण अनेक वर्षांपूर्वी साकारलेल्या इमारतींच्या ‘आकाशरेषे’त आजवर कसलाही बदल झालेला नाही! या मदानाच्या उत्तर किंवा दक्षिण बाजूच्या मध्य टोकावर उभे राहून इमारतीच्या शिखरांची ‘आकाशरेषा’ व बदलत्या मोसमातील निसर्गछटा, न्याहाळण्याचा आनंद, लेखकाने अनेक वर्षे अनुभवला आहे.
सन १९२४ साली, मुंबईचे गव्हर्नर सर लेज्ली विल्सन यांच्या देखरेखीखाली कुलाबा ते मलबार हिलच्या पायथ्यापर्यंत बॅक बे रेक्लमेशन योजनेतून २२ स्वे. कि. मी. जमीन तयार केली. मुंबईच्या इतिहासातील हा दुसरा मोठा बदल होता. या कामातील घोटाळा के. एफ. नरिमन या सामाजिक कार्यकर्त्यांने उघडकीस आणला. त्यांनी दाखवलेल्या सामाजिक कार्याची दखल म्हणून या परिसराला ‘नरिमन पॉइंट’ व परिसरातील एका रस्त्यास वीर ‘नरिमन पथ’ असे नाव दिले. सन १९२०-४० च्या दरम्यान मरिन ड्राइव्ह स्त्याला लागून ‘आर्ट डेको’शैलीत निवासी संकुले बांधण्यात आली. शहरी जीवन नेमके कसे असावे याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून या दोन्ही परिसराचा उल्लेख करता येईल. मदानाच्या पश्चिमेकडील निवासी रहिवाशांना, ओव्हल मदानातील खुली हवा व गॉथिक शैलीतील इमारतींच्या आकाशरेषेच्या पाश्र्वभूमीवर उगवत्या सूर्यदर्शनाचा आनंद घेता येतो, तर मरिन ड्राइव्ह परिसरातील रहिवाशांना अथांग सागरात कलाकलाने विलीन होणाऱ्या सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. ही दोन्ही दृष्ये सर्व स्तरातील वयोगट व कलासक्त मनास उल्हसित करणारी आहेत. म्हणूनच या परिसराकडे मुंबईतील नागरिक व परदेशी पर्यटक नेहमीच आकर्षति होतात. या दोन्ही परिसरापकी एकास मानवी स्पर्श लाभला आहे, तर दुसऱ्यास मानवी स्पर्शाबरोबर निसर्गसौंदर्याची पुरेपूर साथ मिळालेली आहे. या दोन्हीत, स्थापत्य व कला-सौंदर्यशास्त्राचा उत्तम मिलाफ साधला गेला आहे. या मदानाच्या पूर्वेस व्हिक्टोरियन तर पश्चिमेस ‘आर्ट डेको’ अशा परस्परविरोधी शैलीतील संकुले आहेत. मरिन ड्राइव्हवरील निवासी इमारतींचा ‘आर्ट डेको’ संकुल, सहा पदरी रस्ता कठडय़ाला सोबत करणारी भलीमोठी मोकळी जागा व ४.३ कि.मी. लांब समुद्रकिनाऱ्यालगतचा कठडा- जो तेथील टेटापॉड व या जागेस भेट देणाऱ्या असंख्य पाहुण्यांचा मित्र आहे. अशा अनेक मिश्र वास्तुकला-संवेदन सौंदर्याने भरलेले हे दोन्ही परिसर जगातील एकमेव व अद्वितीय असे आहेत. या परिसरापकी एका परिसराची निवड करावयाची झाली तर मरिन ड्राइव्हपेक्षा ओव्हल मदानाचा परिसर मला अधिक आकर्षक व आव्हानात्मक वाटतो!
ब्रिटिशकालीन मुंबईच्या जडणघडणीत फक्त ब्रिटिश नव्हे तर अनेक भारतीयांचाही वाटा होता. सर जमशेदजी जीजीभाय यांनी जे. जे. हॉस्पिटल, जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् या इमारती बांधल्या. राजनीतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जगन्नाथ शंकरशेठ यांचे मुंबईच्या विकासात फार मोठे योगदान आहे. प्रेमचंद रायचंद यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ राजाभाई टॉवरसारखी सुंदर इमारत बांधली. अशी किती तरी नावे या यादीत जोडता येतील. आर्ट डेको संकुलातील अनेक इमारतींचे आराखडे, जी. बी. म्हात्रे व ग्रेगसन बॅटले किंग या भारतीय आíकटेक्टनी बनवले होते. ब्रिटिशकालीन मुंबई शहराचा विस्तारसुद्धा टप्प्याटप्प्यानेच झाला होता हे वरील माहितीवरून समजते, पण भारतीयांनाच नाही तर सबंध जगाला मुंबईचे आकर्षण वाटते; आणि त्याचे संपूर्ण श्रेय ब्रिटिश व भारतीय आíकटेक्टनी दाखवलेल्या दूरदृष्टीलाच द्यायला हवे! अशा शहराबाबत स्थानिक नागरिकांना नेमकी हीच बाब अभिमान वाटणारी तर परदेशी पर्यटकांना आकर्षति करणारी असते. सन १९७०-९० च्या दरम्यान, जवळपास सारख्या दिसणाऱ्या अनेक इमारती असलेली संकुले म्हाडाच्या माध्यमातून मुंबईच्या विविध भागांत उभी राहिली. जर का या इमारती शैलीबद्ध बांधल्या असत्या तर स्वातंत्र्यानंतरच्या मुंबई उपनगराचे चित्र वेगळेच दिसले असते. या जडणघडणीत जवळपास सर्व इमारतींचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम व वेळो वेळी डागडुजी न केल्यामुळे, अल्पावधीतच या सर्व इमारतींचा पुनर्वकिास करावा लागत आहे. वर्तमान मुंबईत एकाच वेळी होणाऱ्या सर्व विकासकामामुळे, शहराला कारखान्याचे रूप आले आहे. शहरे फक्त अमाप पसे मिळवण्याची केंद्रे असतात अशा समजुतीने अनेक स्थपती या शहरातील जमिनीचे माप व बेढब आकाशरेषा निश्चित करत आहेत ही अत्यंत खेदाची बाब आहे.
अनेक वर्षांपूर्वी कला-सौंदर्यातून घडवलेल्या मुंबई शहराच्या ‘स्मार्ट’ इतिहासातून खूप काही शिकण्यासारखे आहे ते अव्हेरून शहरातील काही मुख्य जागा व उपनगरेही चित्रविचित्र आकारात वाढत आहेत. काळानुरूप विकास होण्याबद्दल दुमत नाही, पण आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या पुरातन वास्तूंचे महत्त्व जमेस धरून विकास साधला गेला तर तो अधिक योग्य व अनुरूप ठरेल; त्यामुळेच शहराची ओळख टिकून राहते. वर्तमान मुंबईच्या दिशाहीन, निरुद्देशाने पुनर्वकिासातून आकार घेणारे बहुढंगी मुंबईचे चित्र ब्रिटिश गव्हर्नरांकडे असलेल्या दूरदृष्टी व उद्देशाच्या जवळपासही पोहोचत नसल्याची खंत कलासक्त मनास कायम बोचत राहणार!
आर्किटेक्ट
fifthwall123@gmail.com