गाव म्हटलं की आपलं मातीशी असलेलं नातं अधिक दृढ होतं. नेरूळसारख्या निसर्गरम्य ठिकाणी माझं बालपण गेलं आणि तिथल्या एका खेडेगावात मी लहानाचा मोठा झालो. पण बदलत्या जगरहाटीत गेल्या तीन दशकांत माझ्या घराचं पालटलेलं रूप मी बघितलंय आणि ते मनसोक्त अनुभवलंयही. छोटय़ाशा कुडाच्या खोपटय़ाचे नंतर कौलारू घरात रूपांतर जसे झाले, तसेच सभोवतालच्या परिसराने टाकलेली कात आणि त्या गावानं आधुनिकतेची पांघरलेली झालर हे नक्कीच सुखावणारं होतं आणि आहेही.
मी अगदी लहान म्हणजे दुसरी-तिसरीत असताना आमचं घर शेणाने सारवलेल्या भिंती पण कधीही वारा-पावसात हलणार नाहीत..अगदी लाईटही नसायचे, पण रॉकेलच्या चिमणीची साथ मात्र सदैव असायची. कोदीवले हे आमचं गाव तसं अगदी माथेरानच्या पायथ्याशी अन् नेरळ स्थानकापासून चार किमीच्या अंतरावर असलेलं..
मुंबईपासून नेरळ रेल्वेने जवळपास ८०किमींच्या आसपास आहे, साधारण दोन तासांत व्यक्ती मुंबईत पोहोचते. त्यामुळे नोकरीधंद्यासाठी रोज अपडाउन करणे सहजशक्य. मीही गेली १०वर्षे इथूनच प्रवास करतोय.. कितीही शहराचं आकर्षण असलं तरी आपल्या या निसर्गरम्य परिसराची उणीव कशानेच भरून निघणार नाही. शाळा-कॉलेज, वैद्यकीय सुविधा पुरविणारे दवाखाने, एसटी-रिक्षा तसेच बाजारपेठ आदी सगळ्यांची सोय असल्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून मुंबईसारख्या मायानगरीतील विकासकांचे या शांत अन् निसर्गरम्य परिसराकडे लक्ष जाणार नाही असे कसे होईल?
आज मुंबईतील नामवंत विकासकांनी येथे बस्तान बसविल्याने साहजिकच या भागाचा दर वाढणार यात शंका नाही. मोकळी हवा, गावातील मज्जा अन् उदरनिर्वाहासाठी रोजगाराची सोय यामुळे गाव सोडून बाहेर स्थिरावण्याचे प्रमाण खूप नगण्यच. उपनगरापासून काही तासांच्या अंतरावर असलेले माझे कोदीवले गाव म्हणजे सेंट्रल लोकेशनच.. तुम्ही येथून मुंबई-पुण्यात काही तासांत पोहोचता, तर पनवेल रस्त्यामार्गे काही मिनिटांत गाठता.
कौलारू घर, नदी, आजूबाजूला भातशेती अन् झाडांची दाटी या सर्वामुळे इथलं वातावरण हवेशीर, मोकळं आणि मनाला भावणारं आहे. गावात मंदिर असल्याने संध्याकाळी नित्यनेमाने आरती होते. प्रत्येक सुखदु:खात अजूनही शेजारधर्म पाळणारे गावकरी जणू एक कुटुंबच. अशा सर्व गुणसंपन्न असलेल्या माझ्या परिसराशी असलेला स्नेह हा घराला असलेल्या मातीच्या गंधामुळेच आहे.
गेली २० वष्रे नेरूळ, कर्जतमध्ये फार्म हाऊस, बंगले, सेकंड होम असे गृहप्रकल्प राबवित आहोत. त्यामुळे या वर्षांमध्ये हा भाग कसा विकसित होत गेला हे आम्ही प्रत्यक्ष पहात आहोत. निसर्गाचं सान्निध्य म्हणता येईल असाच हा परिसर आहे. प्रदूषण नाही की गजबजाट नाही. अगदी शांतता असलेला हा परिसर लोकांच्या पसंतीस उतरत आहे. गेल्या ५/६ वर्षांपासून आम्ही अगदी स्टेशनपासून जवळ असे गृहप्रकल्प सामान्य माणसांचा विचार करून राबवित आहोत. बदलापूरमध्ये घरांच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे लोक येथे घर घेण्यास पसंती दर्शवत आहेत. पूर्वी अनेकजण निवृत्ती नंतरचं आयुष्य घालविण्यासाठी या परिसराचा विचार करत होते. आता मात्र कायमच्या वास्तव्यासाठी इथल्या घरांना पसंती दिली जात आहे.
डी. एस. कुलकर्णी, सॉफ्ट कॉर्नर