दीपावलीला फराळाला सर्व गच्चीत जमत असत. एकत्र फराळाचा आनंद सर्वानाच हवाहवासा होता. त्याशिवाय सोसायटीत पूजा दरवर्षी  होत असे. नवरात्रात बऱ्याच घरातून आलटून पालटून एकाकडे भोंडला होत असे.

आता पुन्हा आम्ही आमच्या जागेतून भाडय़ाच्या जागेत राहावयास जाणार होतो. चाळीस वर्षे स्वत:च्या घरात राहून झालं होतं. बिल्डिंग जुनी झाली होती. पाचसहा वर्षांच्या सोसायटीच्या प्रयत्नांतून आता यश आले होते. त्यानंतर दोनतीन वर्षांनी आम्हाला नवीन जागा आमच्या ताब्यात मिळणार होती. बरेच वर्षांनी यश आले म्हणून खूप खूप आनंद होत होता. पण मध्येच आपली जागा सोडायला लागणार म्हणून डोळे भरून येत होते. मला मुलीचं लग्न ठरलं तेव्हाच्या गोष्टीची आठवण येत होती. लग्न ठरल्याचा आनंद, जावई छान, उत्तम मिळाला म्हणून आनंद होत होता. आणि मध्येच मुलगी आता आपल्या घरातून दुसरीकडे जाणार म्हणून रडू येत होते. अगदी तशीच आज माझी अवस्था झाली होती. फक्त पाठवणी माझी होत होती.

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Divorce tendency of financially capable women
सुखी संसाराला अहंकाराचे ग्रहण! आर्थिक सक्षम महिलांचा घटस्फोटाकडे कल
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच
Benefits Of Eating Green Banana
कच्च्या केळीमधील पोषणाचा साठा किती? जेवणात हिरव्या केळ्यांचा कसा वापर करावा, कुणाला होईल सर्वाधिक फायदा?

चाळीस वर्षांपूर्वी आम्ही डोंबिवलीची भाडय़ाची जागा सोडून मुलुंडला स्वत:च्या घरात आलो होतो. तेव्हा आमचं चिमुकलं तीन वर्षांचं होतं. डोंबिवली सोडली तेव्हा तो शेजारच्या आजी-आजोबांना ‘आम्ही आता मुलुंडला जाणार’ असं सांगायचा. आणि मुलुंडला आल्यावर आम्ही कुठे बाहेर गेलो, तर आता मुलुंडला जाऊ म्हणून रडायचा. फक्त मुलुंड म्हणजे फक्त त्याचं घर असा त्याचा समज झाला होता.

आम्ही मुलुंडला आलो ते ७६ साली. तेव्हा मुलुंड पूर्वेला एवढी वस्तीच नव्हती. त्यात स्टेशनच्या आसपास जरातरी होती. पण आताचा ९० फुटी रस्ता जवळजवळ नव्हताच. पुढला सगळा भाग शेतीचा आणि ओसाड होता. स्टेशन जवळ ते घरापर्यंत ज्या काही इमारती होत्या, त्या फक्त दोन किंवा तीन मजली होत्या. दुकानं तर अगदी कमी होती. एक गंमत म्हणजे ऐन वेळी काही आणायचं असेल चहा, साखर वगैरे, तर जवळजवळ दहा मिनिटे चालावं लागत होतं. रस्त्यावर रहदारी बिलकूल नाही, गाडय़ा नाहीत, क्वचित सायकल दिसे. रिक्षा पूर्वेला नुकत्या सुरू होत होत्या. फक्त दोन-तीनच होत्या. तेव्हाच भाडं फक्त आठआणे, पण ते पण महागच होतं तेव्हा. आजुबाजूचं वातावरण अगदी गावासारखं. सकाळी कोंबडा अरवत असे. रस्त्यावर आजुबाजूला ताडा माडाची काही झाडे होती. ताडगोळ्यांची विक्री होत असे. पावसाळ्यात तर रात्री बेडूक ओरडत असत. कापशीच्या वगैरे मोठय़ा झाडावर रात्री वटवाघुळ येत असत. एकूण सर्व शांत शांत असे.

सर्वसामान्य कुटुंबात तेव्हा टीव्ही, फ्रीज, फोन नव्हता. त्यामुळे सोसायटीत कोणाकडे काहीही असे नवीन आले की, एकमेकांकडे जाणे-येणे होत असे. टीव्ही म्हणजे मोठय़ांना-लहानांना तर अगदी अप्रूप गोष्ट होती. त्यात लहान मुलांना तर खूप आनंद वाटे. ज्याच्याकडे टीव्ही आला त्याच्याकडे सर्व जात, त्याचं कौतुक होत असे. त्यातही सोसायटीच्या आसपास थोडा कामकरी वर्ग, झोपडय़ा असत, तेथून ही लहान-मोठी मुले टीव्ही वरचे छायागीत बघायला येत असत. कार्यक्रम संपला की छोटे थिएटर सुटल्यासारखे सर्व बाहेर पडत.

जसं टीव्हीचं तसं फ्रिजचं. तेव्हा गोदरेज आणि ऑल्विन दोन फेमस होते. कोणाकडे फ्रिज आला की सगळी आवर्जुन बघायला जात. त्यात बायकांचा सहभाग जास्त असे. मग आमच्याकडे कोणता? त्याच्याकडे कोणता? यावर भरपूर चर्चा होत असे. अर्थात आमचाच छान असे, हं का.

हळूहळू टीव्ही, फ्रिज येत होते. शेवटी माणूस हा करमणूक प्रिय असतोच. पण रस्त्याचा भाग करमणूक करत असे. आता हळूहळू पुढच्या जमिनीवर इमारती होणार असे दिसत असे. या कामकरी वर्गाचे कामगार रात्रीच्या वेळी दिवसभराची कामे आटपून स्त्री-पुरुष वेश करून नाच, नाटक करत असत- तेही मुलांना दिसत असे. वस्ती अगदी कमी त्यामुळे दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावरून हायवे दिसत असे. ९० फुटी रस्त्याचं काम सुरू असे. त्यावेळी दुपारी दीडच्या सुमारास सुरुंग लावत असत. दुपारच्या वेळात शाळा सुटलेल्या असत. रस्त्यावर मोठय़ाने शिटय़ा वाजवून लांब उभे राहण्यास सांगण्यात येत असे. शाळेच्या मुलांना तर दररोज हा खेळच वाटे. आईचे बोट धरून थोडी घाबरून आपली आणि आईची काळजी घेत असत. शेवटी धावत सुटत. पण बऱ्याचदा हे जमिनीखालचे दगड २-३ मजल्यावर एवढय़ा जोरात येत क्वचित खिडकीची काच पण फुटत असे. या काळात म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी मुलांना बाग हवी ही संकल्पना नव्हती. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन (पश्चिम मुलुंड) गार्डन, येथे आईबाबा कौतुकाने नेत. तर कधी तलावपाळी ठाणे येथे जात असत. ‘रेडी टु इट’ हे तेव्हा माहीतही नव्हते. कोणत्याही दुकानात बिस्किटे, गोळ्या, पाव असेच मिळत असे. चिवडा, समोसा, चकल्या अशा तऱ्हेचे सर्व पदार्थ घरातच होत असत. दीपावलीला फराळाला सर्व गच्चीत जमत असत. एकत्र फराळाचा आनंद सर्वानाच हवाहवासा होता. त्याशिवाय सोसायटीत पूजा दरवर्षी  होत असे. नवरात्रात बऱ्याच घरातून आलटून पालटून एकाकडे भोंडला होत असे. याशिवाय चाळीस वर्षांपूर्वी प्रत्येक घरात ‘दो या तीन बच्चे लगते है अच्छे.’ त्यामुळे बिल्डिंग लहान असूनसुद्धा पंधरा-वीस मुले खेळायला एकत्र जमत. याशिवाय मुलांचे वाढदिवस यातही मुलांना एकत्रित होणे येई. त्यामुळे प्रत्येक घरात जाणं होत असे. सोसायटीची सहल होत असे. एकूण माणसं एकमेकांना जोडलेली असत. कोणाकडे काही अडचण किंवा कोणी आजारी वगैरे असेल, तर सर्वच त्यांना तत्परतेने मदत करत.

बघता बघता चाळीस वर्षांचा काळ लोटला. सगळं वातावरण बदलत गेलं. मुलंही मोठी होऊन वेगवेगळ्या ठिकाणी परदेशात स्थायिक झाली. त्यांच्या भेटी कॉम्प्युटर अ‍ॅप्समुळे होत असतील. पहिल्या काहींनी दुसरीकडे जागा घेतल्या, नवीन लोक राहावयास आले.

आता सर्वाकडे टीव्ही, फोन, कॉम्प्युटर आले. नावीन्य ओसरलं, जाणं-येणं कमी झालं. पण या मुलुंड पूर्वेच्या, चाळीस वर्षांतील आठवणी मात्र अगदी साठवणीसारख्या मनात घोळत राहतील. अर्थात कोणीही जुन्यापैकी भेटले की तेसुद्धा या आठवणीत रमून जातात.

आता दोन-तीन वर्षांत आमची आम्रपाली नव्या सुंदर रूपात आमचे स्वागत करेल. अर्थात तेव्हाही मिळणारा आनंद असाच सुखदायी असणार आहे.