पार्टी किंवा सहभोजनासारख्या समारंभांना जायला सर्वानाच आवडतं. पण हाच समारंभ एखाद्याच्या घरी असेल तर त्याची मौज काही औरच असते. तेव्हा घरी पार्टी करत असाल तर काय कराल याविषयी थोडक्यात –
एप्रिल – मे महिन्याचे दिवस म्हणजे उन्हाळी सुट्टीची मौज अनुभविण्याचे दिवस. या दिवसांत घरोघरी ना ना तऱ्हेचे बेत शिजू लागतात. कुणी प्रवासाला जायचे बेत आखतात, तर कुणी वाळवणाचे, तर कुणी कॅिम्पगचे. थोडक्यात काय तर नातेवाईक किंवा मित्रमंडळींबरोबर एकत्र येऊन मजा करायला आपण सर्वच उत्सुक असतो. पण या दिवसांत सर्रासपणे साजरा होणारा बेत म्हणजे पार्टीचा अथवा एकत्रित सहभोजनाचा. शिवाय असे प्रसंग साजरा करायला निमित्त लागतंच असं नाही, तर साधं निमित्तही पुरेसं ठरतं.
मग बाब्रेक्यू पार्टी, चांदण्या रात्रीचे भोजन किंवा गच्चीवरील भोजन असे बेत रंगू लागतात. जर अशा काही प्रसंगांचे आयोजन तुमच्या घरी करीत असाल तर घराच्या मांडणीत छोटेसे बदल करूनदेखील तुम्ही दिमाखदार आणि सुटसुटीत सोहळ्याचे आयोजन करू शकतात. यासाठी सर्वप्रथम पार्टीचे आयोजन कुठे करणार आहात, ती जागा निश्चित करणे. जसे, घरासभोवतालच्या बागेत किंवा गच्चीवर अथवा घरातल्या मोकळ्या जागेत. या समारंभाची नेमकी (थीम)संकल्पना काय आहे, जसे बाब्रेक्यू, आमरसपुरीचे भोजन किंवा पारंपरिक जेवणाचा प्रकार ते प्रथम लक्षात घ्यावे.
जागा आणि मेनू निश्चित झाला की, टेबलाची मांडणी व प्रकाशव्यवस्थेकडे लक्ष द्यावे. आजकाल बाजारात संध्याकाळच्या जेवणासाठी बागेत अथवा गच्चीसारख्या मोकळ्या जागेत लावण्यासाठी विशेष प्रकारचे दिवे मिळतात. मंद तरीही पुरेशा अशा त्या प्रकाशात जेवताना एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती होत असते.
लहानसहान चमच्यापासून ते मोठय़ा ताटांपर्यंत तसेच नॅपकिन, टिश्यू पेपर अशा आवश्यक त्या गोष्टींची मांडणी टेबलावर करावी. म्हणजे ऐनवेळी एखाद्या गोष्टीची गरज भासल्यास कोणालाही ताटावरून उठावे लागणार नाही. फिरत्या टेबलाचादेखील अशावेळी वापर उपयुक्त ठरू शकतो. टेबल-खुच्र्याची मांडणी सहज सुटसुटीत असावी, जेणेकरून गप्पा मारत जेवण्याचा आनंद सहजपणे घेता येईल.
जर हा समारंभ घराच्या बागेतील हिरवळीवर होत असेल, तर त्यासाठी प्रथम उगविलेल्या तणांची नीट छाटणी करावी. अशावेळी भडक स्वरूपाच्या दिव्यांचा वापर करू नये. कारण या प्रकाशाकडे आकर्षति होऊन किडे-माश्या त्याभोवताली फिरण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी टेबलावर पदार्थाची मांडणी करताना ते योग्यप्रकारे झाकले जाईल याकडे पुरेसे लक्ष द्यावे. त्याचबरोबर टेबलावरील टेबलक्लॉथ व्यवस्थितपणे बांधले गेले आहे ना तेदेखील पाहावे. अन्यथा ऐनवेळी टेबलक्लॉथ घसरून नसत्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
फुगे किंवा दिव्यांच्या माळा अथवा रंगीत रिबिनींचा वापर करून बागेत सजावट करणे सहजसोपे असते. त्याचबरोबर सुगंधित फुलांचा वापर केल्यास वातावरण अधिक रंगतदार होऊ शकेल. अलीकडे दिवाळीच्या सुमारास तऱ्हेतऱ्हेचे फॅन्सी दिवे मिळतात. ज्यात मेणबत्ती अथवा पणती ठेवून ते सहजपणे उंचावर लटकविता येतात. बागेमधील पार्टीसाठी अशा दिव्यांची सजावट खूपच आकर्षक ठरते.
बऱ्याचदा असे दिसून येते की, अशाप्रकारच्या पार्टी समारंभासाठी गावरान मेनू अन् तोदेखील चुलीवरचा स्वयंपाक यासारखी संकल्पना निवडली जाते. त्यामुळे अशावेळी धुराचे योग्य तऱ्हेने व्यवस्थापन होणे अतिआवश्यक असते. चूल आणि टेबलांची मांडणी यात योग्य ते अंतर राखावे. तसेच संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेऊन योग्य त्या तरतुदी करून ठेवाव्यात. जसे आग विझविण्यासाठी असलेले स्प्रे, पाण्याची पुरेशी व्यवस्था वगरे.
अलीकडे बाल्कनी पार्टी हादेखील प्रकार रुजू होऊ लागला आहे. यात बाल्कनीमध्येच टेबल आणि पदार्थाची मांडणी केली जाते नि त्यासमोरील घराच्या मोकळ्या जागेत जो तो ताट हातात घेऊन फिरत अथवा ठिकठिकाणी बसून गप्पा मारीत पार्टीची मजा अनुभवली जाते. या प्रकारच्या पार्टीमध्ये सजावटीपेक्षा मांडणीला अधिक महत्त्व असते. त्यामुळे घरातील फíनचरची थोडय़ाफार प्रमाणात हलवाहलवी करावी लागते. जेणेकरून लोकांना मोकळेपणाने वावरता येऊ शकेल. आपल्या आप्तस्वकीयांबरोबर गप्पा मारीत सहभोजनाचा आनंद लुटायला सर्वानाच आवडते. हा समारंभ संस्मरणीय करण्यासाठी गरज आहे ती
फक्त थोडय़ाशा कल्पकतेची. छोटय़ाशा जागेचादेखील कल्पकतेने वापर करून सजावट केल्यास घरात किंवा घरासमोरील मोकळ्या अंगणात छोटेखानी घरगुती पार्टी समारंभ सहज शक्य आहे.
निलंजन गुप्तो, इंटिरीअर डिझायनर
शब्दांकन : सुचित्रा प्रभुणे