नवख्या चैत्रपालवीने हिरवाई तजेलदार दिसत होती. वसंत बहर ओसरत असतानाच वृक्षवल्लींनी फळधारणा केली होती आणि द्विजगणांची चंगळ उडाली होती. काहींची घरटी नटत होती काही घरटय़ात उबवण चालली होती, तर काही घरटय़ांतून पिल्लांची किलबिल ऐकू येऊ लागली होती. सर्व आसमंत नवनिर्मितीने बहरला होता आणि वास्तुपुरुष सुंदरवाडीच्या नवनिर्मितीच्या विचारात दंग होता.
उपराळकर देवचारासमोर मांडलेल्या ‘आदर्श सुंदरवाडी’च्या ढोबळ आराखडय़ावर विचार करत वास्तुपुरुष गेला पंधरवडाभर सुंदरवाडीत पायपीट करत होता. बारीकसारीक निरीक्षणं करत होता, शहरीकरणाच्या आशा-आकांक्षा आणि व्यथा नोंद घेत होता. आज बुद्धपौर्णिमेच्या पहाटेपासून मात्र तो नरेंद्र डोंगरावरून सुंदरवाडीचं विहंगम दृश्य पाहात होता आणि त्याला पहाटस्वप्नात दिसू लागलं होतं एक ‘निसर्ग शहर’! पूर्वेकडून येणाऱ्या, सह्य़ाद्रीच्या सदाहरित वनांनी कुरवाळलेल्या, मरुताच्या शीतल झुळूक मन प्रसन्न करत असतानाच उगवतीला रंगवत रवीराज डोकावला. गेल्याच आठवडय़ात संध्याकाळी याच उंचवटय़ावरून वास्तुपुरुषाने बुध ग्रहाचं सूर्यावरून होणारं अधिक्रमण अनुभवलं होतं आणि त्यावेळी या प्रदूषणरहित आसमंताचं कौतुक त्याच्या मनात दाटलं होतं. हे शहर विकसित होताना इथला परिसर प्रदूषणमुक्त ठेवणं ही पहिली जबाबदारी त्याला जाणवली होती. पक्ष्यांची सुरेल मैफल सुरू झाली. विणीच्या हंगामामुळे ‘नटरंग’ झालेले नर आता गंधर्वाशी सूर जुळवत आपापसातील जुगलबंदीत रंगत, प्रियतमांच्या शोधात आणि प्रियाराधनेत रमले होते. नवख्या चैत्रपालवीने हिरवाई तजेलदार दिसत होती. वसंत बहर ओसरत असतानाच वृक्षवल्लींनी फळधारणा केली होती आणि द्विजगणांची चंगळ उडाली होती. काहींची घरटी नटत होती काही घरटय़ात उबवण चालली होती, तर काही घरटय़ांतून पिल्लांची किलबिल ऐकू येऊ लागली होती. सर्व आसमंत नवनिर्मितीने बहरला होता आणि वास्तुपुरुष सुंदरवाडीच्या नवनिर्मितीच्या विचारात दंग होता. त्याला नरेंद्र डोंगर श्रीकृष्णाच्या ‘गोवर्धन’ पर्वतासारखा भासत होता. सुंदरवाडीला आधार देणारा, तिचं संरक्षण करणारा, तिला ‘जीवन’ देणारा, सर्व प्राणीमात्रांचा तारणहार. नरेंद्र डोंगर, मोती तलाव आणि सह्य़ाद्रीचे पश्चिम उतार यांनी कुशीत घेतलेली सुंदरवाडी ‘निसर्ग-शहर’ या मूलभूत संकल्पनेतूनच विकसित होईल हा विचार आता निश्चित झाला होता. या स्वप्नात दंगलेला वास्तुपुरुष कोणत्या तरी मदभऱ्या गंधाने विचलित झाला. त्याची पावलं त्या दिशेला आपसूक वळली. पण तिथल्या झुडुपापासून येणाऱ्या संथ डुरकावणीने तो थबकला. समोर बहरलेला मधुगंध मोह वृक्ष त्याला खुणावत होता. त्याच्या पायथ्याशी पडलेल्या फुलांच्या मुलायम गालिच्यावर चरणाऱ्या आणि मधूनच जमीन उकरून कंदमुळं शोधणाऱ्या रानडुक्करांच्या कळपाकडे त्याचं लक्ष वेधत होता. वास्तुपुरुष हर्षभरीत झाला आणि तेवढय़ात कळपातील म्होरक्यानेही त्याला हेरलं, एक डुरकावणी दिली आणि पश्चिमेकडे वाटचाल सुरू केली. माद्या आणि पिलावळीनेही म्होरक्यांची पाठ धरली. उपराळकर देवचाराच्या निसर्गदूतांची ओळख पटून वास्तुपुरुषानेही कळपाचा मागोवा घेत देवराईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केलं. निसर्गदूर वास्तुपुरुषाला वन्य वनस्पतींची ओळख करून देत होते, सावध निसर्ग निरीक्षणाचे धडे देत होते, खेळकर-खोडकर वन्यजीवांची झलक देत होते. परिसर सुगंधित होता, पण आता वैशाखाच्या झळाही लागायला सुरुवात झाली होती. पलीकडच्या डोंगर उतारावरील काल रात्रीच्या वणव्याच्या राखाडी खुणा मनाला छळत होत्या. बाजू्च्याच शुष्क वहाळाकडून काहीसा उग्र वास हवेत पसरत होता आणि रानडुक्करांच्या म्होरक्याने पिल्लांना आणि माद्यांना एकत्र करून विरुद्ध दिशेने धूम ठोकली. बहुधा बिबटय़ा वहाळातल्या ओलाव्यात विसावला असावा. वास्तुपुरुष रानडुक्करांच्या पाऊलखुणांचा वेध घेत पुढे निघाला आणि बघता बघता देवराईत पोहोचलाही. उंबर झऱ्यावरील थंडीत ताजातवाना होत असतानाच बाजूच्या वटवृक्ष्यांच्या पारंब्या झुलायला लागल्या. ‘बुद्धम् शरणम् गच्छामि।’ अश्वस्थ वृक्षकुल तुझं स्वागत करत आहेत वास्तुपुरुष. खास या बुद्धपौर्णिमेच्या मुहूर्तावर! ही संपूर्ण देवराई उत्सुक आहे तुझी स्वप्नकहाणी ऐकण्यासाठी, आपल्या अस्तित्वाचं भवितव्य पाहण्यासाठी आणि तुझ्या मुक्ततेची वाटचाल अनुभवण्यासाठी! होऊ दे सुरुवात मग. उपराळकर देवचाराने उत्साहात, तरीही गंभीरपणे वास्तुपुरुषाला आवाहन केलं.
‘होय देवा महाराजा, या अश्वस्थ कुलाला, म्हणजेच संपूर्ण निसर्ग परिसंस्थेच्या प्रमुख आधाराला वंदन करून सुरुवात करतो. माझ्या स्वप्नकहाणीची, ‘निसर्ग-शहर’ सुंदरवाडीच्या नवनिर्मितीची. गेल्या अमावास्येला मी आदर्श सुंदरवाडीच्या विकासनितीच्या ढोबळ आराखडय़ाला तुझ्याकडून मान्यता घेतली. त्या पुढील वाटचाल आहे या शहराला ‘निसर्ग-शहर’चा दर्जा देऊन समर्पक शाश्वत विकासाची धोरणं आखायची. पूर्वी मांडलेल्या संतुलित शहराच्या प्रमुख धोरणांपैकी वन्य परिसराचं संवर्धन याला प्राधान्य देऊन नरेंद्र डोंगर परिसर, सह्य़ाद्रीचे पश्चिम उतार, मोती तलाव आणि तत्सम पाणवठे, त्यांना ‘जीवन’ देणारे नद्या-नाले हा या विकासनितीतला प्रमुख घटक असणार आहे. शहराला आवश्यक असणाऱ्या प्रमुख घटकांच्या आढाव्यावरून हे शहर मध्यम आकाराचं राहावं म्हणून एक काल्पनिक लक्ष्मणरेखा आखली जाईल. पश्चिमेला कोकण रेल्वे ही हद्द राहील, तर दक्षिणेला बाह्य़-महामार्ग. उत्तरेला नरेंद्र डोंगररांग आणि सह्य़ाद्री पर्वतरांग तर पूर्वेला सह्य़ाद्रीच्या पायथ्याचे उतार. या क्षेत्रातील वन्य परिसर जैवविधितेसाठी संवर्धित केले जातील. शेत जमिनी व बागायत ही हरित क्षेत्र म्हणून राखली जातील आणि गाव, वाडय़ा व सध्याचा शहराखालचा परिसर हा विकास क्षेत्रासाठी ठेवला जाईल. थोडक्यात, या तिन्ही परिसरांचं संतुलन साधलं जाईल, प्रत्येकाला प्राधान्य देऊन, प्रत्येकाचं अस्तित्व राखून. या क्षेत्रातून जाणारे प्रमुख राज्यमार्ग भविष्याचा विचार करून विकसित केली जातील आणि त्यांच्या दुतर्फा नैसर्गिक वनीकरण करून त्यांना ‘जैवविविधता मार्ग’ बनविण्यात येईल. या वनीकरणाचं संवर्धन, संरक्षण आणि उपभोग हे स्थानिक जनतेवर सोपवलं जाईल. मोती तलावासारखे इतर पाणवठे नैसर्गिक जल-परिसंस्था म्हणून विकसित केले जातील. शिवाय या संपूर्ण क्षेत्रातील सखल भूखंडांवरही नवीन पाणवठय़ांची निर्मिती केली जाईल. या संपूर्ण परिसरात नैसर्गिक भूगर्भ रचनेनुसार अनेक नद्या-नाल्यांचं जाळं आहे. दुर्दैवाने त्यातल्या अनेक जल-प्रवाहांचं आज गटारगंगेत रूपांतर झाले आहे. या नद्या-नाल्यांचा नैसर्गिक परिसंस्था म्हणून पुनरुद्धार करण्यात येईल. या जल-प्रवाहांवर छोटय़ा बंधाऱ्यांचं जाळं निर्माण करून माती व पाण्याचं संवर्धन करण्यात येईल. त्यातून जल-परिसंस्थांचंही पुनरुज्जीवन होईल. हेही स्थानिक जनतेच्या सहभागातून केलं जाईल. हरित परिसरातील काही शेत जमिनींचं रूपांतर सहकारी तत्त्वार उद्यानात, क्रीडांगणात केलं जाईल. सेंद्रिय शहरी शेतीला उत्तेजन दिलं जाईल. वास्तुपुरुष दम खाण्यासाठी थांबला आणि उपराळकर देवचाराने ती संधी साधली. ‘वास्तुपुरुष, इथपर्यंतची वाटचाल सुंदर व संतुलित विकासाकडे जाणारी आहेत. मग जुनं अस्ताव्यस्त पसरलेलं शहर आणि आता सुरू असलेली अमर्यादित वाढ यांना शाश्वत विकासाची दिशा कशी देणार? शिवाय इथल्या अर्थव्यवस्थेचं काय?’
वास्तुपुरुषाने स्मितहास्य केलं, ‘मी तिथेच येतो आहे. देवा महाराजा. आज सुंदरवाडीची अर्थव्यवस्था प्रामुख्याने व्यापार आणि पर्यटन यावर अवलंबून आहे. काही धोरण नियंत्रण न राहिल्यास हे चित्र र्दुव्यवस्थेकडे जाण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आणि लगतचं गोवा राज्य या परिसरांना पूर्वापार सांस्कृतिक आणि कलेचा वारसा आहे. इथली सर्वसामान्य जनता शिक्षणप्रिय आहे. इथलं निसर्ग व सांस्कृतिक पर्यटन हे बरंचसं परिसराला सुसंगत आहे. हा वारसा हाच पुढील विकासाचा पाया राहील. शहरातील आणि संपूर्ण क्षेत्रातील पुरातन वारसाला वास्तूंचं संवर्धन करण्यात येईल. यात पुरातन राजवाडा, मंदिरं, मिलागरी, वाडे इत्यादींचा समावेश होईल. सुंदरवाडी लाकडाच्या रंगीत खेळण्यासाठी तसंच गंजिफा व चित्रकथीसाठी प्रसिद्ध आहे. हा सर्व सांस्कृतिक वारसा हे इथल्या पर्यटनाचं प्रमुख अंग राहील. त्यातून स्थानिक कलाकारांना रोजगार मिळेल व पर्यटनासाठी आवश्यक इतर सुविधांच्या निर्मितीमुळेही तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होईल. अर्थव्यवस्थेचा दुसरा महत्त्वाचा घटक असेल शैक्षणिक सुविधा, विशेषत: कला-शिक्षण सुविधा, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी सुंदरवाडी ही विद्यानगरी व कलानगरी म्हणून विकसित केली जाईल. त्यासाठी दोन मोठे परिसर राखून ठेवले जातील. स्थानिक जनता, नगरपालिका- राज्य सरकार- केंद्र सरकार आणि मोठे उद्योजक यांच्या एकत्रित सहकार्याने या विद्यापीठांचं व्यवस्थापन करण्यात येईल. या शैक्षणिक सुविधांना पूरक अशा गरजा स्थानिक जनतेकडून उपलब्ध होण्यास उत्तेजन दिलं जाईल. हाही सेवाभावी उत्पन्नाचा एक मार्ग होईल. या अत्याधुनिक सुविधांनी उपलब्ध अशा शिक्षण केंद्राकडे जगभरातले विद्यार्थी आकर्षित होऊन या केंद्राला विश्वभारती किंवा शांतीनिकेतनासारखं स्वरूप मिळू शकेल. आज आधुनिक शैक्षणिक सुविधांसाठी बाहेरील परिसरात शोधाशोध करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी हे वरदानच ठरेल. या उच्च शिक्षणाला पूरक असं कौशल्य विद्यापीठही उभारलं जाईल. इथे आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाबरोबरच स्थानिक शेती-बागायत उत्पादनांना आधार देणाऱ्या उद्योगांचं प्रशिक्षण देण्यात येईल. या विद्यार्थ्यांना आंबा, फणस, कोकम इत्यादींवर प्रक्रिया करण्याचे उद्योग उभारण्यास मदत करण्यात येईल. ही सर्व शेती-बागायत सेंद्रिय राहील व त्यामुळे या उत्पादनांना परदेशी बाजारपेठही उपलब्ध होऊ शकेल.
अर्थव्यवस्थेचा तिसरा घटक असेल आधुनिक व्यापार व्यवस्था व त्यासाठी लागणाऱ्या सुविधा. आज मोती तलावाच्या पश्चिमेला अस्ताव्यस्थ पसरलेल्या ‘उभ्या बाजारा’ची पुनर्निमिती त्याच ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येईल. संपूर्ण परिसरातील सेंद्रिय शेती व बागायत उत्पादनांसाठी हे महत्त्वाचं व्यापार केंद्र राहील. संपूर्ण सहकारी तत्त्वावरील हे व्यापार केंद्र स्थानिक उत्पादनांच्या आयात-निर्यातीला उत्तेजन देईल. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य मोबदला ताबडतोबीने मिळण्याची आश्वासन या व्यापार केंद्राद्वारे देता येईल.
उपराळकर देवचाराने वास्तुपुरुषाचा ओघवता प्रवाह थांबवला, ‘वास्तुपुरुषा, तुझी अर्थव्यवस्थेची मांडणी इतकी समर्पक आहे की इथल्या जनतेचा सर्वागीण उत्कर्ष झाल्याचं चित्र मला दिसायला लागलं आहे. आता मला सांग की हे सर्व करताना या नवनिर्मित शहराची रचना कशी असणार आहे?’
वास्तुपुरुषाने नवनिर्मितीचा आराखडा मांडायला सुरुवात केली. एक महत्त्वाचं धोरण म्हणजे या नगरीची नवनिर्मिती ही नैसर्गिक पद्धतीने उत्क्रांतीसारखं होईल. हे असेल एक मुक्तछंद शहर! नियोजन व आराखडे हे धोरणात्मक असतील, प्रमुख सुविधा-पूरक असतील. विविध नगर परिसर, रहिवासी संकुलं ही स्वनिर्मित असतील, आपोआप उमलत जातील. त्यांच्या यथार्थ विकासासाठी एका बाजूने विकेंद्रीकरणाला तर दुसऱ्या बाजूने छोटय़ा भूखंडांच्या एकत्रीकरणाला उत्तेजन देण्यात येईल. सुंदरवाडीतून जाणारे प्रमुख रस्ते, उत्तर-दक्षिण (कुडाळ ते बांद्रा) व ईशान्य-नेऋत्य (आंबोली ते वेंगुर्ला) असे आहेत. हे रस्ते आकर्षक पद्धतीने व सुविधांनी युक्त असे विकसित केले जातील. आज शहरातील रहिवासी भाग हा विविध वाडय़ांमध्ये विखुरलेला आहे. जमिनीच्या उंच-सखल, काहीशा डोंगराळ स्वरूपामुळे त्याला सुरेख नैसर्गिक व्यक्तिमत्त्व लाभलेलं आहे. या वाडय़ांचं रूपांतर रहिवासी संकुलात होईल, त्यांना प्रमुख रस्त्यांशी जोडण्यात येईल. सर्व रस्त्यांवरील वाहतुकीत पादचाऱ्यांना, दुचाकीस्वारांना, छोटय़ा वाहनांना विशेषत: सर्वसामान्यांच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येईल. सर्व वाहनं प्रदूषणरहित असतील ही खबरदारी घेतली जाईल. विकेंद्रित संकुलं ही सर्व गरजांबाबत तसंच पर्यावरण सोयींबाबत स्वयंपूर्ण असतील. सांडपाणी, कचरा इत्यादींवर प्रक्रिया स्थानिक पातळीवर होऊन त्याचा पुनर्वापर करण्यात येईल. इमारतींची रचनाही परिसराला सुसंगत असेल, आधुनिकतेकडे जातानाही सांस्कृतिक वारसा जपणारी असेल. सर्व इमारतींवर उतरती कौलारू छप्परं राखण्याचा तसेच काही भागात स्थानिक जांभ्या दगडाचा वापर करण्याचा आग्रह धरण्यात येईल. इमारतींना सुयोग्य वायुवीजन असेल, भूकंपाला सामोरे जाण्याची तांत्रिक क्षमता असेल ही खबरदारी घेण्यात येईल. इमारतींसभोवताली मोकळी जागा असेल, ती हरित असेल आणि उंची समर्पक असेल अशी कात्री नियोजन नियमांद्वारे करण्यात येईल. विशेष म्हणजे नगरपालिका कार्यक्षम करण्यासाठीचे प्रयत्न लोकजागृतीतून करण्यात येतील, त्यातूनच भ्रष्टाचाराला आळा घातला जाईल. सर्वागीण नगर विकास संतुलित व शाश्वत असेल. आदर्श सुंदरवाडी ही एकाच वेळी निसर्गनगरी, विद्यानगरी, कलानगरी, सांस्कृतिक नगरी असणार आहे आणि अर्थव्यवस्थेतही स्वयंपूर्ण असणार आहे. ही नगरी कोकणातील इतर शहरांना मार्गदर्शक ठरणार आहे.
वास्तुपुरुष थांबला, त्याने वटवृक्षाच्या दिशेने नजर टाकली. पारंब्या हर्षभरीत होऊन डुलायला लागल्या. ‘वास्तुपुरुषा, अभिनंदन!’ मुक्ततेच्या वाटेने तुझी दृढ पावलं पाहायला लागली आहेत याची खात्री झाली आहे. खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून शाश्वत परिसर निर्मितीच्या, आखणीच्या. आता आपण पुढे जाऊ या. इतक्या दिवसांचं कोकण पुराण, जरी खूप प्रिय असलं तरी आता आवरू या. आमच्या कोकणाबाहेर अनेक वैविध्यपूर्ण परिसर आहेत, तिथेही अशाच समस्या असणार. आता आपण या नवीन परिसरांकडे वळू या. मी आहे कोकणवासी तेव्हा आता पुढची वैचारिक वाटचाल तुझी तुलाच करायला लागणार. मी आहे ऐकायला आणि तिरसट प्रश्न विचारायला. तरीही तुला उत्तेजन द्यायला. तेव्हा पुढच्या अवसेला भेटू या. नवीन परिसराचा विचार करायला. उपराळकर देवचाराने निपुण केलं. वास्तुपुरुष आनंदला आणि उत्स्फूर्ततेने म्हणाला, ‘कोकणच्या उष्ण आणि आद्र्र हवामानाच्या विरुद्ध परिसराकडे वळू या आता. सह्य़ाद्री पर्वतरांग ओलांडून जाऊ या पर्जन्यछाया प्रदेशाकडे, उष्ण आणि शुष्क प्रदेशाकडे. करू या तिथल्या वास्तुरचनांचा, नगररचनांचा विचार- परिसरस्नेही, पर्यावरणस्नेही, लोकाभिमुख दिशेने! तुझा आशीर्वाद असू दे, देवा महाराजा!’
देवराईत पुनवेच्या चांदण्याचा सडा पडला होता. त्यातूनच देवचाराने चंद्रप्रतिमांद्वारे वास्तुपुरुषाला हलकंच गोंजारलं. वास्तुपुरुष शहारला. वर नभांगणात वृश्चिक नक्षत्र पहुडलं होतं, विशाखांनी अस्ताचा पश्चिमेकडचा मार्ग धरला होता. रातव्याची ‘चापुक, चापुक’ साद वास्तुपुरुषाच्या कानावर आली. निसर्गदूताच्या हाकेच्या दिशेने वास्तुपुरुष देवराईतून बाहेर निघाला, सह्य़ाद्री पर्वत ओलांडायला.
उल्हास राणे- ulhasrane@gmail.com

CM Eknath Shinde Haji Ali Darga Aarti Video Kesariya Chadar
एकनाथ शिंदेंनी हाजी अली दर्ग्यात केली आरती? भगव्या रंगाची चादर घेऊन गेले मुख्यमंत्री, पण Video चुकला कुठे?
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक