सध्याची बदलती जीवनशैली आणि कामाच्या व्यापात वाढत जाणारा ताणतणाव यामुळे अनेकजण आजकाल विरंगुळ्याचे पर्याय शोधताना दिसत आहेत. कॉर्पोरेट आणि काही खाजगी कंपन्यांनी ५ दिवसांचा आठवडा ही संकल्पना रूढ केली. पर्यायाने शनिवार-रविवार सुट्टी. मग आठवडाभर कामाच्या रहाटगाडग्याला कंटाळलेले लोक सेकंड होम किंवा वीकेंड होमच्या पर्यायाचा विचार करू लागले. रोजच्या दगदगीतून थोडं लांब जाऊन चार घटका निवांत घालवता यावेत हाच यामागचा विचार.
वीकेंड होम अर्थात सुट्टी घालविण्यासाठीचे दुसरे घर. रोजच्या दगदगीच्या आयुष्यात चार घटका शांतता लाभावी आणि चार दिवस निवांत घालवावेत आणि नव्या जोमाने पुन्हा कामाला सज्ज व्हावे. युरोपात अगदी लोकप्रिय असणारी ही संकल्पना आपल्याकडे श्रीमंत वर्गात रूढ झाली. पण आज हीच सेकंड होमची संकल्पना थेट मध्यमवर्गीयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. गेल्या १०-१५ वर्षांत या सेकंड होमच्या पसाऱ्यात अगदी सर्वच स्तरातील लोकांचा समावेश झाला. यामागची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतील.
१. काहीजण फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून जागा घेतात.
२. काही निवृत्तीनंतरची सोय म्हणून जागा घेतात.
३. एक महत्त्वाचे कारण म्हणजे सुरुवातीला शहराबाहेर एकांतात असलेली ही ठिकाणं कालानुरूप डेव्हलप होत जातात आणि जुन्या जागामालकांना जागा विकून चांगला परतावा मिळतो. या दृष्टीनेही अनेकजण इन्व्हेस्टमेंट म्हणून सेकंड होमचा विचार करताना दिसतात.
मुंबईचा विचार केल्यास मुंबईपासून तीन चार तासांच्या अंतरावरील लोणावळा, कर्जत, नेरळ या ठिकाणांना थंड हवेची आणि शांततेची ठिकाणे म्हणून प्राधान्य मिळू लागले. त्यातही लोणावळ्याला जास्त प्राधान्य दिले गेले. अनेक उद्योगपती, सिनेकलाकारांनी सुट्टीसाठी खास बंगल्यासाठी लोणावळ्याकडे धाव घेतली. हळूहळू तिथे जागांचे भाव गगनाला भिडले. मुंबईसारखीच गर्दी झाली आणि इतर पर्याय शोधायला सुरुवात झाली आणि आता तर ही संकल्पना फॅशनसारखी घराघरात पसरली. मुंबई पुण्याशी असलेली कनेक्टिव्हिटी यामुळे अनेकांनी लोणावळा तळेगावला प्राधान्य दिले. तिथल्या यशामुळे आणि वाढत्या मागणीमुळे मुंबईहून दोन तासाच्या परिघात असणाऱ्या सर्वच ठिकाणी ही प्रथा रूढ होऊ लागली. एका दिवसात आपल्या दुसऱ्या घरी जाऊन येता आले पाहिजे ही एकाच शक्यता विचारात घेतली जाऊ लागली.
आर्थिकदृष्टय़ा थोडे स्थिरस्थावर झालेल्या अनेकांची नजर सेकंड होमकडे वळू लागली. प्रामुख्याने तरुण पिढी याबाबत पुढाकार घेताना दिसत आहे. आयटीच्या बूममुळे मध्यमवर्गीयांची परदेशात जाण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. पगाराचे आकडेही फुगत जाऊन लाखाच्या घरात पोहोचले. त्यात भर म्हणजे अनेक बँकांनी सेकंड होम्साठीही लोन द्यायला सुरुवात केली. मग कमी व्याजाचे आणि दीर्घ मुदतीचे गृहकर्ज घेऊन जागेत पैसे गुंतवल्यास आयकरात भरघोस सवलत मिळते या सी. ए. च्या सल्लय़ावर उपाय म्हणून तरुण पिढीही सेकंड होमकडे आकृष्ट होऊ लागली. त्याचबरोबर भविष्यातील आर्थिक सुरक्षितताही निश्चित होते. यामुळेच सेकंड होमचा पर्याय योग्य ठरू लागला.
सेकंड होम घेण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे शहरापासून जरा दूर असल्यामुळे जागांचे भावही आपल्या आवाक्यात असतात. शिवाय शहरी भागात देऊ केल्या जाणाऱ्या अनेक सुखसुविधा इथेही दिल्या जात आहेत. अशा ठिकाणी छान मोकळी हवा, मुबलक पाणी, पुरेसा वीजपुरवठा अशा सोयी उपलब्ध असतात. त्यामुळे येथील वास्तव्य सुखाची व शांततेची अनुभूती देणारे ठरते.
काही वर्षांपूर्वी सेकंड होम म्हणजे छोटीशी का होईना, पण स्वतंत्र बाग असलेला आपल्या हक्काचा बंगला असं स्वरूप होतं. परंतु काहींच्या बाबतीत यात काही त्रुटी अथवा अडचणी होत्या. त्यातील पहिली म्हणजे एवढय़ा मोठय़ा घराची निगा कशी राखायची? वरचेवर एकाच ठिकाणी जाण्याचा येणारा कंटाळा. दुसरी प्लॉट घेऊन घर बांधणे हा थोडा खर्चीक प्रकार होऊ लागला. कालांतराने असा बंगला विकताना लोकांच्या आवडीनिवडीमुळे त्यावर र्निबध येऊ लागले. मग यातून स्टुडियो अपार्टमेंट, छोटे फ्लॅट असे अनेक पर्याय निघाले.
सेकंड होम म्हणून लोकांनी बंगल्याऐवजी अशा पर्यायांना पसंती द्यायला सुरवात केली. विशेषत: मध्यमवर्गीय लोकांनी. ‘घर पाहावे बांधून’ या उक्तीतला गर्भित त्रास टाळून लोकांनी बांधीव जागा घेणे पसंत केले. विरंगुळा म्हणून गेल्यानंतर आपल्याला छोटी जागाही पुरते, त्याचा मेंटेनन्स कमी होतो, साफसफाईत जास्त वेळ आणि श्रम जात नाहीत. या सर्वच गोष्टी पथ्यावर पडू लागल्या. कमी आकारामुळे १० ते १५ लाखांच्या आत सदनिका मिळणे शक्य होऊ लागले. सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरुवातीला एकांतात असलेल्या या ठिकाणांवर कालांतराने वस्ती आणि मागणी वाढू लागली. परिणामी सेकंड होमचा ट्रेंड जोमात आहे.
मध्यमवर्गासाठीही सेकंड होम
नेरळ-बदलापूर येथे मोठय़ा प्रमाणात कन्स्ट्रक्शन व्यवसायात असणाऱ्या ‘शाश्वत समूहाचे’ प्रमुख भागीदार चंद्रशेखर भिडे म्हणाले, ‘‘या व्यवसायात येताना एक गोष्ट मनात नक्की केली होती, की मुंबई शहरापासून जवळचं असणाऱ्या ठिकाणी मध्यमवर्गीयांना परवडेल अशा दरात घरे उपलब्ध करून देणे. वाढती मागणी बघता बंगलो स्कीम्सचा पर्याय थोडा मागे सारून १ अथवा २ बीएचके फ्लॅट बांधण्याचा विचार केला. पैसा पैशाकडे जातो यानुसार जागांमधील इन्व्हेस्टमेंट ही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी न रहाता गरीब आणि मध्यमवर्गीयांनादेखील त्याचा लाभ घेता यावा यासाठी कमी दरांची घरे उपलब्ध करून देणे हा विचार डोक्यात घेऊन कामाला सुरुवात केली होती. या स्कीमला चांगल्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळाला. बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव येथे किमान १००० ते ११०० लोकांना फर्स्ट किंवा सेकंड होम उपलब्ध करून दिली. आता माथेरानच्या पायथ्याशी नेरळ स्टेशनपासून फक्त ८०० मीटर अंतरावर नवीन स्कीम चालू करतोय, ज्यात ८ लाखांपासून १८ लाखांपर्यंत वेगवेगळ्या किमतीचे फ्लॅट आहेत. विविध बँकांशी बोलणे करून लोकाना कमीत कमी त्रासात / व्याज दरात जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करण्याची सोय केलीय. जास्तीतजास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा इतकीच इच्छा.’’
निसर्गाचा सहवास
डॉ. आदित्य यांनी निसर्गाची आवड आणि आपल्या गावची ओढ यामुळे सावंतवाडी येथे स्टेशनपासून जवळ एका प्रकल्पात जागा घेतली. ते म्हणतात, ‘‘आपल्या गावात आपलं एखादं घर असावं असं लहानपणापासून स्वप्न होतंच, पण बंगला बांधायचा म्हणजे तेवढा खर्च आता परवडणारा नव्हता. महत्त्वाचं म्हणजे वरचेवर जाणं होणार नसल्याने त्याची निगा करणे कठीण होणार. म्हणून मी फ्लॅटचा पर्याय निवडला. तिथे पाणी, खेळती हवा आणि टापटीप परिसर यामुळे मन प्रसन्न होतं. निवृत्तीनंतर आई-बाबांनाही तिथे जाऊन राहणे सोयीचे होते.’’
फायद्याची गुंतवणूक
अशाच एक सेकंड होमच्या समाधानी ग्राहक म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका स्वाती चांदोरकर. त्यांच्या मते, ‘‘मी २०१०मध्ये ‘द नेस्ट’ या विक्रमगडस्थित बंगलो स्कीममध्ये प्लॉट घेतला होता. आज पाच वर्षांत त्याची किंमत दुपटीपेक्षा जास्त झाली आहे. सध्याच्या काळात याहून चांगली इन्व्हेस्टमेंट कोणती मिळेल? आता तर विक्रमगड तालुका झाला आहे, अजून किमती वाढण्याची खात्री आहे.’’
मनाच्या शांततेसाठी..
प्रज्ञा खेडेकर यांनी कर्जत येथे एका इमारतीमध्ये जागा घेतली आहे. त्या म्हणतात, ‘‘जागा घेताना आम्ही एक गोष्ट नक्की केलेली की महिन्यातून एखाद दोन वेळा तरी तिथे रहायला जायचं. मुंबईच्या गर्दीपासून थोडा वेळ निवांत घालवता यावा हा यामागचा हेतू. इथे राहायला गेलो की मनाला खूप शांतता मिळते. आम्ही घेतलेला हा निर्णय नक्कीच समाधानकारक आहे.
manasi.akerkar5@gmail.com