प्रत्येक वेळी हे सदर प्रसिद्ध झाल्यानंतर ई-मेलच्या माध्यमातून अनेक वाचक निरनिराळे प्रश्न विचारत असतात. यामध्ये त्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखाविषयी तर प्रश्न असतातच, पण त्याचसोबत स्वत:च्या घराच्या इंटिरियरबाबत देखील असतात. तसेच सर्वसाधारण इंटिरियर डिझायनिंग आणि इंटिरियर डिझायनर यासंबंधीही असतात.

हे प्रश्न वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे इंटिरियर डिझायनर या घटकाविषयीची अनभिज्ञता आणि भीती. आपल्यापैकी अनेकांना इंटिरियर डिझाइनरचा आपल्या घराच्या नूतनीकरणात काय वाटा असतो? त्याचे काम कशा प्रकारे चालते? हेच माहीत नसते. मग यातूनच तयार होते गैरसमजांची एक मालिका.

Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
Amazon Gudi Padwa Sale 2024 going to offer deals and more on online shopping sites Read Everything About Offers
गुढीपाडव्यानिमित्त ॲमेझॉनचा बंपर सेल सुरू; साडी, दागिने अन् इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट, तुम्ही कधी करताय खरेदी?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या

खरं तर घराचे इंटिरियर डिझाइन (इथे मुद्दाम डिझाइन हा शब्द वापरलाय डेकोरेशन नव्हे) करताना जे सर्व घटक आवश्यक असतात त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक इंटिरियर डिझाइनर असे म्हटल्यास वावगे ठरू नये. परंतु बरेच लोक इंटिरियर डिझायनरची तुलना थेट एखाद्या कंत्राटदाराबरोबर करतात, अर्थात हे अपुऱ्या माहितीमुळे घडते. पण वस्तुस्थितीत मात्र इंटिरियर डिझाइनर होण्यासाठी त्या प्रकारच्या महाविद्यालयात जाऊन या विषयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. या अभ्यासक्रमात इमारत बांधकामाच्या तंत्रशुद्ध माहितीपासून ते घरातील लहानात लहान खिळा कसा आणि कुठे ठोकावा इथपर्यंतचा समावेश असतो. त्यामुळेच एक प्रशिक्षित इंटिरियर डिझायनर आपल्या घरातील बदल सुचवत असताना, आपल्या इमारतीचे बांधकाम कोणत्या पद्धतीचे आहे. सुचविलेल्या बदलांनी इमारतीच्या सुरक्षेला कोणताही धोका उद्भवणार नाही ना? याची खातरजमा करूनच बदल सुचवतो. हेच ज्ञान अशिक्षित कंत्राटदाराला असेलच याची खात्री नाही त्यामुळे आपल्या इमारतीचे आणि घराचे भवितव्य सुरक्षित ठेवायचे असल्यास प्रशिक्षित आणि अनुभवी इंटिरियर डिझाइनरला पर्याय नाही.

इंटिरियर डिझाइनर नियुक्त करण्याबाबत असणाऱ्या अनेक गैरसमजांपैकी महत्त्वाचा आणि मोठा गैरसमज असतो तो इंटिरियर डिझायनरला देण्याच्या शुल्काचा. घराच्या इंटिरियरवर होणाऱ्या खर्चाच्या काही टक्के अशा प्रमाणात इंटिरियर डिझायनरचे शुल्क असते. हेच शुल्क म्हणजे अनेकांना अवास्तव खर्च वाटतो. प्रत्यक्षात हेच शुल्क आपल्याला पुढे होणाऱ्या अवास्तव खर्चापासून आणि मनस्तापापासून वाचवते. कसं ते आपण पुढे पाहू या.

इंटिरियर डिझायनरचे काम सुरू होते आपल्या घराची इंचन् इंच मापे घेऊन. याच मापांचा उपयोग करून आपल्या घरातील फर्निचर व इतर वस्तूंचे प्लॅनिंग केले जाते. मागे एका लेखात आपण प्लॅनिंगविषयी सविस्तर बोललोच होतो. तर या प्लॅनिंगमुळे घरासाठी काय आवश्यक, काय अनावश्यक याचा आधीच अंदाज येतो. त्याचसोबत खर्चाचे योग्य अंदाजपत्रकदेखील बनवता येते, जेणेकरून अनावश्यक खर्चावर आधीच कात्री लागते. एका अनुभवी इंटिरियर डिझायनरला बाजारात कुठे, कोणत्या वस्तूंची खरेदी करावी याचे पुरेपूर ज्ञान असल्याने दहा दुकाने धुंडाळण्याचा वेळ वाचतो, शिवाय वस्तूच्या दर्जाबाबत देखील आपण इंटिरियर डिझायनरवर अवलंबून राहू शकतो. इंटिरियर डिझायनरकडे सातत्याने काम करणारे कुशल कारागीर देखील असतात, ज्यामुळे कामातही एक विशिष्ट दर्जा राखला जातो. याही पुढे जाऊन आपण जर इलेक्ट्रिक आणि प्लम्बिंगसारख्या कामांचा विचार केला तर त्यात तंत्रशुद्धताही जास्त महत्त्वाची असते. घरात लाइटचे किती कुठे आणि कोणते पॉइंट घ्यायचे, बाथरूममधील नळ कोणत्या उंचीवर असावेत? यासारख्या गोष्टी सामान्य माणसाला अचूक समाजतीलच असे नाही. बरेच वेळा सर्व काम झाल्यावर लक्षात येते काही इलेक्ट्रिक पॉइंट्स फर्निचरच्या मागे लपून गेलेत किंवा गरजेपेक्षा जास्त पॉइंट्स घेतले गेलेत अथवा गरजेच्या ठिकाणी नेमका पॉइंटच नाही. थोडय़ाफार फरकाने हीच गोष्ट प्लम्बिंगलाही लागू पडते. तर इथे इंटिरियर डिझायनरची भूमिका महत्त्वाची ठरते. इंटिरियर डिझायनरकडे इलेक्ट्रिक लेआऊट, प्लम्बिंग लेआऊट. आधीच कागदावर तयार केलेला असल्याने काही राहून जाण्याची किंवा त्यात कोणती चूक होण्याची शक्यता जवळपास मावळतेच. यामुळे नंतर तोडफोड आणि एकाच कामावर दुप्पट खर्च व मनस्ताप सगळेच टळते.

इंटिरियर डिझायनरविषयी आणखीही काही गैरसमज असतात. ते म्हणजे इंटिरियर डिझायनर ग्राहकाचे मत विचारत न घेता स्वत:चे सगळे निर्णय आणि आवडी ग्राहकावर थोपवतो. याचसोबत इंटिरियर डिझायनर नेहमी महागडय़ा वस्तू खरेदी करायला लावतो आणि कामाची किंमत वाढवतो.

तुम्हाला सांगायला हरकत नाही, हे दोन्ही तद्दन गैरसमज आहेत. इंटिरियर डिझाइनर हा ग्राहक, त्याचे घर आणि काम करणारे कारागीर यांच्यात एक दुवा म्हणून कार्यरत असतो. वस्तूचा रंग, आकार, पोत या साऱ्यांत छान काय दिसेल याचे मार्गदर्शन जरूर तो करतो. परंतु शेवटची निवड करण्याचे स्वातंत्र्य मात्र ग्राहकाकडेच राहते. इंटिरियर डिझायनर कधीही आपल्याला महागडय़ा वस्तू घेण्याची जबरदस्ती करत नाही. बाजारात काय उपलब्ध आहे आणि त्यातले काय आपल्या आवाक्यात आहे हे सांगण्याचे काम इंटिरियर डिझायनरचे असते, त्याचबरोबर बाजारात काय नवे आहे याचे अद्ययावत ज्ञान आपल्या ग्राहकाला देण्याची जबाबदारीही इंटिरियर डिझायनरचीच असते. एक कसलेला इंटिरियर डिझायनर नेहमीच त्याच्या ग्राहकाला आपल्या अर्थसंकल्पाची जाणीव करून देत राहतो, जेणेकरून क्लायंटचे आर्थिक गणित बिघडू नये.

इंटिरियर डिझायनर नियुक्त करण्याचे आणखीही बरेच फायदे आहेत. इंटिरियर डिझायनर तांत्रिक ज्ञानाने परिपूर्ण असतोच, पण त्याचसोबत इंटिरियर डिझायनिंगचा अभ्यासक्रम अप्लाइड आर्टच्या अंतर्गत येत असल्याने तो एक उत्तम आर्टिस्टही असतो. त्यामुळेच एकीकडे घराची तांत्रिक बाजू बळकट करतानाच दुसरीकडे सौंदर्यदृष्टीचा वापर करून घराला नेत्रसुखदही बनवतो. गृहसजावटीच्या निरनिराळ्या शैली अभ्यासलेल्या असल्याने घर सजवताना डिझाइनमध्ये विस्कळीतपणा न येत उलट एकसंधपणे एखादी थीम राबवली जाते. थोडक्यात सांगायाचे तर आपण जे पैसे खर्च करतो त्याचे क्वालिटीमध्ये रूपांतर इंटिरियर डिझायनर करतो म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आता तर नवनवीन तंत्रज्ञानाचा (कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा) वापर करून अनेक डिझायनर्स आभासी स्वरूपात संपूर्ण घर डिझाइन करून दाखवतात, ज्यामुळे आपल्या भविष्यातील घराचे चित्र अधिक सुस्पष्ट व्हायला मदत होते.

एक उत्तम डिझायनर आपल्या ग्राहकाची प्रत्येक टप्प्यावर साथ देतो. घराचे इंटिरियर करणे ही एक लांबलचक आणि वेळखाऊ अशी प्रक्रिया आहे. योग्य इंटिरियर डिझायनरच्या साथीने आपण ही प्रक्रिया आनंददायी बनवू शकतो. जे लोक नोकरी-व्यवसायात व्यस्त असतात त्यांच्यासाठी तर इंटिरियर डिझायनर म्हणजे मदतीचा दुसरा हातच. आपण मेहनतीने घेतलेल्या घराचा कोपरान्कोपरा योग्य पद्धतीने वापरला जावा आणि आपण मेहनतीने कमावलेल्या पैशांचा योग्य मोबदला मिळावा असे वाटत असेल तर इंटिरियर डिझायनरचा सल्ला जरूर घ्यावा. शेवटी इंटिरियर डिझायनर्स असतातच आपल्या स्वप्नातले घर प्रत्यक्षात उतरवण्यासाठी.

(इंटिरियर डिझायनर)

ginteriors01@gmail.com