गणपती म्हणजे लाडका पाहुणा, याची आपण आतुरतेने वाट पाहात असतो. याच्या पाहुणचारासाठी खूप आधीपासूनच आपल्या घरात गडबड चाललेली असते. सर्वजण घराची साफसफाई करून घर सुशोभित करतात. काही जण घराला रंग लावून घेतात. मखर विकत आणतात किंवा मग घरात मखर बनविण्याची धामधूम चालू असते.

भाद्रपद महिन्यात अनेकांच्या घरी गणपती येतो. आज सगळ्यांच्या घरी गणपती विराजमान झालेले असतील. गणपती घरी येणार ही कल्पनाच मनाला आनंद देणारी असते. हा आपला गणपती म्हणजे लाडका पाहुणा, याची आपण आतुरतेने वाट पाहात असतो. याच्या पाहुणचारासाठी खूप आधीपासूनच आपल्या घरात गडबड चाललेली असते. सर्वजण घराची साफसफाई करून घर सुशोभित करतात. काहीजण घराला रंग लावून घेतात. मखर विकत आणतात किंवा मग घरात मखर बनविण्याची धामधूम चालू असते.

गणेशाच्या आगमनावेळी त्याचे स्वागत करण्यासाठी दाराला आंब्याचे डहाळे लावले जाते. त्याने एक प्रकारची मंगलता वाटते. दाराला फुलांचे तोरण किंवा लोकरीचे, मण्यांचे वगैरे तोरण लावले जाते. दारात रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते. ही तयारी सांगते की, बाप्पा या, तुमचे आमच्या घरात प्रवेश करणे म्हणजे आमचे मोठे भाग्यच आहे. घरात गणेशासाठी वेगवेगळी सुगंधी फुले, पाने, हार, उदबत्त्या, कापूर, हळदकुंकू वगैरेंनी तबक सुशोभित केले जाते.

मग मानाने गणपतीला आपल्या घरात- सुंदरशा मखरात बसविले जाते. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते. घरात पै पाहुण्यांचा राबता असतो. सगळे जण नटूनथटून असतात. त्याच्यासमोर लावलेला दिवा किंवा समई यांचा मंद प्रकाश पडलेला असतो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटलेला असतो, तबकात वेगवेगळी वासाची फुले असतात आणि मग असे वाटते की, या माझ्या घरात पवित्रता आणि सुगंधाचे साम्राज्यच पसरलेले आहे. आपण त्याच्या भक्तीत तल्लीन होऊन जातो.

गणपतीच्या डोक्यावरचा मुकुट, गळ्यातील हार, त्याच्या हातातल्या अंगठय़ा शोभिमान असतात, तरी आपण प्रेमाने वाहिलेले लाल जास्वंदीचे फूल, दुर्वाचा किंवा फुलांचा हार गणपती आनंदाने स्वीकारतो. स्वयंपाकघरात बायकांची जेवणाची गडबड चालू असते. मोदकांचा नैवेद्याचा घाट घातलेला असतो. दुपारी हॉलमध्ये बसविलेल्या देवाला मन:पूर्वक नैवेद्य दाखवून सगळे एकसुरात आरती म्हणून गजाननाला प्रसन्न करतात. संध्याकाळी पाहुणे येऊन तीर्थप्रसाद घेऊन जातात. परत रात्री आरती होते. काहीजणांच्या घरी रात्री, गाणी, गप्पा-गोष्टी यांची पाहुण्यांबरोबर मैफल होऊन जागरण केले जाते. दिवस-रात्र बाप्पासमोर दिवा तेवत ठेवायची घरच्या लोकांनी दक्षता घेतलेली असते. त्यामुळे या पाहुण्याने आपल्याला दिवस-रात्र गुंगवून ठेवल्यासारखे वाटते.

या गणपतीचे आपल्या घरातले पाहुणचाराचे दिवस कसे संपतात ते कळतच नाही. एक अमाप उत्साह घरात सगळ्यांमध्ये संचारलेला असतो. या पाहुण्या बाप्पासाठी काय करू नि काय नको असे झालेले असत.

आणि मग आपल्या घरातील गणपतीच्या विसर्जनाची वेळ येते. त्याला निरोप देताना व ‘पुढच्या वर्षी लवकर ये’ असे सांगताना घरातील सर्वजणांचा कंठ दाटून येतो. गणपती विसर्जन करून आल्यानंतर, आपले घर रिकामे वाटते, हे सर्वानाच जाणवते.

‘हे गणाधीश तुझे असेच प्रेम आमच्यावर कायमचे राहू दे आणि आमच्या घरावर म्हणजेच घरातील सदस्यांवर तुझी कायमची कृपादृष्टी राहू दे,’याशिवाय आपले वेगळे मागणे काहीच नसते.

 

मग मानाने गणपतीला आपल्या घरात- सुंदरशा मखरात बसविले जाते. साग्रसंगीत त्याची पूजा केली जाते. घरात पै पाहुण्यांचा राबता असतो. सगळे जण नटूनथटून असतात. त्याच्यासमोर लावलेला दिवा किंवा समई यांचा मंद प्रकाश पडलेला असतो.

madhurisathe1@yahoo.com