आत्तापर्यंत पुनर्विकास प्रकल्पातील विविध समस्यांचा वेध या सदरातून घेण्यात आला आहे. पुनर्विकास प्रकल्पातील ‘टपाल’ समस्येवर प्रकाश टाकणारा लेख.
शहरवासीयांसाठी ‘पुनर्विकास’ हा शब्द अगदी परवलीचा आणि परिचितही झाला आहे. शहरी भागातील लोकांसाठी पुनर्विकास आता खूप गरजेची बाब बनली आहे. घरांच्या बाबतीत दिवसेंदिवस कठीण बनत चाललेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि दीर्घकाळाचा विचार करता बहुतांश सहकारी गृहनिर्माण संस्था पुनर्विकासाचा पर्याय स्वीकारीत आहेत. त्यामुळे संस्थांचा कायापालट तर होतोच, पण त्याचबरोबर तिथे राहणाऱ्या लोकांचे राहणीमानही बदलते. पुनर्विकास प्रक्रियेत विद्यमान सभासदांची मागणी जास्तीतजास्त मोफत जागा व सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्यापासून सुरू होऊन पुनर्विकासाच्या काळात सध्या वापरात असलेल्या जागेएवढी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे अथवा प्रचलित बाजारभावानुसार पर्यायी जागेचे भाडे, त्यासाठी लगणारी दलाली, भाडे करारनामा, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क तसेच पर्यायी जागेत सामान नेण्या-आणण्यासाठी लागणारा खर्च हा विकासकाने करावा येथे येऊन संपते. अशा सर्व सोयी-सुविधा विद्यमान सभासद विकासकाकडून मान्य करून घेतात आणि रीतसर करारनामा झाल्यावरच सर्व विद्यमान सभासद आपली राहती जागा खाली करून विकासकाने दिलेल्या पर्यायी जागेत स्थलांतरित होतात.
पुनर्विकासाचा कालावधी साधारणपणे २ ते ३ वर्षांचा असल्याने व काही अपरिहार्य कारणांमुळे अधिक कालावधी लागण्याची शक्यता गृहीत धरून विद्यमान सभासद आपला राहण्याचा पत्ता बदली करतात. असा निवासी जागेच्या पत्त्यात बदल करताना पुढील गोष्टी कराव्यात.
१) शासकीय / निम-शासकीय आस्थापने, महानगरपालिका, बँका, शेअर्स कंपन्या, विमा कंपन्या व सर्व नातेवाईक यांपैकी कोणास नवीन पत्ता कळविण्याचे अनवधानाने राहून गेल्यास, नोकरीसाठी आलेले मुलाखतीचे पत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, बोनस शेअर्स, डिव्हिडंट वॉरेंट, दूरध्वनी देयके, विम्याचे हप्ते भरण्याबाबत सूचना, बँकेची धनादेश पुस्तिका, कोर्ट-कचेरीची कागदपत्रे, गावच्या जमिनीसंबंधी उतारे इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे तसेच नातेवाईकांनी / मित्र-मंडळींनी पाठविलेल्या लग्नपत्रिका, वाईट / गोड बातम्या जुन्या पत्त्यावर (पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी) जातात. परंतु पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी असे टपाल / कुरिअर स्वीकारण्याची कोणतीच व्यवस्था अस्तित्वात नसल्याने ती परत पाठविली जातात.
२) पुनर्विकासबाधित सभासद, पर्यायी जागेत भाडे- करारनामा पद्धतीवर राहात असल्यामुळे त्यांचे नाव सदरहू संस्थेच्या सभासदांच्या नावाच्या फलकावर लिहिले जात नाही. त्यामुळे पत्त्यामध्ये बदल करूनदेखील अशा भाडेकरू सभासदाचे नाव त्या संस्थेतील लोकांना व त्या विभागातील पोस्टमनला माहीत नसते. परिणामी त्यांची महत्त्वाची कागदपत्रे / दस्तऐवज परत पाठविली जातात.
३) संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास पूर्ण झाल्यावर त्या जागेत परत राहावयास आल्यानंतर पुन्हा निवासी पत्त्यामध्ये बदल करण्याविषयी सर्व संबंधित आस्थापने, बँका, शेअर्स कंपन्या, सर्व नातेवाईक इत्यादींना पत्र लिहून कळविणे क्रमप्राप्त आहे. असे करताना अनवधानाने कोणास कळविण्याचे राहून गेल्यास महत्त्वाची पत्रे / टपाल / कुरियर पर्यायी जागेतील पत्त्यावर गेल्यास ती परत पाठविली जातील.
वरील तिन्ही कारणांमुळे महत्त्वाचे दस्तऐवज / कागदपत्रे न मिळाल्यामुळे सभासदांचे कधीही भरून न येणारे आर्थिक नुकसान, तसेच मनस्ताप व मानसिक त्रास सहन करावा लागेल. पुनर्विकास कालावधीतील या गंभीर समस्येवर आजपर्यंत कधीही विचार करण्यात आला नाही हे विशेष. पुनर्विकासाच्या कालावधीत विद्यमान सभासदांनी निवासी पत्त्यात बदल करण्याऐवजी त्यांच्या सोयीसाठी पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी पत्रपेटी व टपाल / कुरिअर सेवा स्वीकारण्याची सुविधा पुरविण्याच्या अटी व शर्ती विकासकाबरोबर करण्यात येणाऱ्या करारात अंतर्भूत करण्यासाठी सर्वानी मिळून मागणी करणे हितावह ठरेल.
विकासकाबरोबर करण्यात येणाऱ्या करारात संस्थेच्या वतीने विद्यमान सभासदांच्या सोयीसाठी पुनर्विकास कालावधीत पत्रपेटी सुविधा व रजिस्टर्ड टपाल / कुरिअर सेवा स्वीकारण्याची व्यवस्था पुनर्विकास प्रकल्पाच्या जागेतच उपलब्ध करून देण्याबाबत खालील नमूद केलेल्या अटी व शर्तीचा समावेश करणे फायद्याचे ठरेल :-
(१) इमारतीच्या पुनर्विकासासाठी सभासदांनी आपली सदनिका संपूर्ण रिकामी करून विकासकाच्या ताब्यात दिल्यानंतर संस्थेच्या जागेतच प्रवेशद्वाराजवळ किंवा सुरक्षा रक्षकाच्या चौकीजवळ सर्व विद्यमान सभासदांसाठी स्वतंत्र खण व कुलूपबंद ठेवण्याची व्यवस्था असणारी एका सामायिक पत्रपेटीची सोय विकासकाने करावी. पत्रपेटी स्टेनलेस स्टीलची असावी. पावसाच्या पाण्याने किंवा नियोजित इमारतीच्या बांधकामाच्या वेळी पाणी पडून पत्रपेटी गंजणार नाही, तसेच पत्रपेटीतील महत्त्वाची कागदपत्रे / दस्तऐवज यांना गंज पकडणार नाही.
(२) प्रत्येक पत्रपेटीवर विद्यमान सभासदाचे नाव व त्याचा सदनिका क्रमांक ठळकपणे नमूद करण्यात यावा. पत्रपेटीची एक चावी विद्यमान सभासदास देण्यात यावी व त्याची पोहोचपावती विद्यमान सभासदाने घ्यावयाची आहे. पत्रपेटीची एक चावी संस्थेच्या कार्यकारी समिती पदाधिकाऱ्याकडे असावी. एखाद्या सभासदाने पत्रपेटीची चावी हरवल्यास संबंधित सभासदाने स्वखर्चाने पत्रपेटीची नवी चावी बनवून घ्यावी व मूळ चावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना परत करावी.
(३) पुनर्विकासाच्या कालावधीत विद्यमान सभासद व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे रजिस्टर्ड / स्पीड पोस्ट / कुरिअर सेवेद्वारे येणारी सर्व प्रकारची पत्रे, महत्त्वाचे दस्तऐवज व पार्सल्स बांधकामाच्या ठिकाणी त्यांच्या वतीने विकासकाच्या प्रतिनिधीने स्वीकारण्यासाठी लेखी संमतीपत्र संस्थेमार्फत विकासकाकडे घ्यावे व त्याची एक प्रत विभागीय टपाल कार्यालयात द्यावी. विकासकाने टपाल / कुरिअर स्वीकारण्यासाठी एका जबाबदार व्यक्तीची नेमणूक करून त्याबाबतची संपूर्ण माहिती विभागीय टपाल कार्यालयाला व संबंधित पोस्टमनला द्यावी. अशा तऱ्हेने टपाल / कुरिअर सेवा स्वीकारण्यासाठी नेमणूक केलेल्या व्यक्तीने सभासदांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे येणारी रजिस्टर्ड / स्पीड पोस्ट / कुरिअरची नोंद व सुरक्षितपणे ठेवण्याची व्यवस्था करावी.
(४) संस्थेच्या सभासदांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे काही महत्त्वाचे दस्तऐवज उदाहरणार्थ पारपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना, मुदत ठेव योजनेची प्रमाणपत्रे, धनादेश पुस्तिका, वकिलांच्या सूचना अथवा कोर्टाचे आदेश / समन्स प्राप्त झाल्यास, त्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या व्यक्तीने संबंधित सभासदांना पर्यायी जागेतील दूरध्वनीवर अथवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्याबाबत त्वरित कळविण्याची व्यवस्था करावी. संबंधित सभासदाशी संपर्क न झाल्यास संस्थेच्या कार्यकारी समिती पदाधिकाऱ्यांना त्वरित कळविण्याची व्यवस्था करावी. नाही तरी, आपल्या संस्थेच्या नियोजित इमारतीच्या बांधकामाची प्रगती पाहण्याच्या उत्सुकतेपोटी विद्यमान सभासद व त्यांचे कुटुंबीय पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी वरचेवर भेट देत असतातच. त्यामुळे येताना आपली पत्रपेटी उघडून आपले टपाल तसेच रजिस्टर्ड टपाल / कुरिअर सेवेमार्फत आलेली कागदपत्रे / दस्तऐवज ताब्यात घेणे सहज शक्य होणार आहे. अशा नियमित भेटीचा आणखीन एक फायदा असा होणार आहे की, पुनर्विकासाच्या कामात काही दुर्लक्ष होत असल्यास किंवा अनियमितता आढळून आल्यास अशी बाब संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली जाईल, अशी भीती व एक प्रकारचा वचक विकासकावर राहील.
विश्वासराव सकपाळ- vish26rao@yahoo.co.in