गेल्या चार-पाच दशकांत जितक्या वेगाने जीवनशैलीमध्ये बदल झाले तितक्या वेगाने यापूर्वी कधीही झाले नाहीत. लोकसंख्या अक्राळविक्राळ वाढली. भारतातील तरुणांची संख्या सध्या जगात सर्वात अधिक आहे. या तरुण पिढीला कदाचित हे झपाटय़ाने झालेले बदल जाणवणे अपेक्षित नाही, पण साधारण पन्नाशी किंवा साठी गाठलेल्या लोकांना मात्र ते स्वत: या बदलाचे साक्षीदार असल्यामुळे ते नक्कीच जाणवत असतील. शहरांचे विस्तार अवास्तव व गैरशिस्त वाढले. मोठमोठय़ा वाडय़ांची व चाळींची जागा उंच उंच इमारतींनी आणि अपार्टमेंटस्नी घेतली. नुसती जीवनशैली बदलली असे नाही तर विचार करण्याची दिशा देखील बदलली आहे. विज्ञान अतिशय वेगाने पुढे जात असल्यामुळे हे बदल देखील त्याच गतीने होत आहेत, त्यामुळे बऱ्याच वेळेला हे बदल नेमके कधी झाले हे लक्षात देखील येत नाहीत.

४०-५० वर्षांपूर्वी चार चाकी तर सोडा, पण साधी (आता साधी असे वाटते!) स्कूटर किंवा मोटरसायकल ही सामान्य माणसाच्या जीवनात फक्त बघण्याचीच बाब होती. घरात दूरध्वनी असला तर ते श्रीमंताचे किंवा डॉक्टरचेच असले पाहिजे हे नक्की सांगता येत होते. सामान्य माणूस पोस्ट कार्यालयात रात्री जाऊन ट्रंक कॉल लावायच्या फिकिरीत असायचा व फोन लागला तर हात स्वर्गाला टेकले असे वाटायचे! रेडिओ जिथे चैनीची समजली जात असे, तिथे चित्रवाणी संच असणे अशक्यच होते. लॉन्ग प्ले तबकडय़ा आल्या व संगीत क्षेत्रात केव्हढी क्रांती झाली असे वाटत होते. कॅसेटस् आल्या व गेल्या. कॉम्प्यॅक्ट डिस्क आल्या तेव्हा त्यात तीनशे-चारशे गाणी साठविता येतात याचे केव्हढे अप्रूप वाटले होते! आता पेन ड्राइव्हज आले आहेत ते किती दिवस चालतील माहिती नाही.

आमच्या कार्यालयात १९९० साली पहिला वैयक्तिक संगणक आला त्याची हार्ड डिस्क २० मेगाबाइट क्षमतेची होती व त्यावर आमचे चार चार प्रबंध लिहिले जाऊन खूप जागा शिल्लक राहात होती! आगगाडीचे आरक्षण मिळणे काही वर्षांपूर्वी पूर्व पुण्याईवर अवलंबून होते. आता मात्र आगगाडी, बसेस, विमाने, लोकल आणि परदेशातील गाडय़ांची देखील आरक्षणे आपल्याला मिळू शकतात. कोणतीही गोष्ट आणण्यासाठी आता दुकानात जाण्याची गरज राहिलेली नाही, तर हव्या त्या गोष्टी बसल्या जागी सहज उपलब्ध होत आहेत व त्यामुळे त्यातील नवलाई संपली आहे.

आता ४ ते ६’’ लांबीच्या स्मार्ट फोनने तर एव्हढी क्रांती केली आहे की तो हातात असला की आपल्या बोटांच्या तालावर
अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्याचा राक्षसच दूरचित्रवाणी, संगणक, रेडिओ, बँक, पोस्ट कार्यालये आणि सरकारी कार्यालये या सर्व भूमिका बजावू लागला आहे. पूर्वी शनिवारी सुट्टी असली की घरातील इतर कामे करण्यासाठी वेळ राखून ठेवावा लागत होता. आता मात्र असला काही वेळ ठेवावा लागतो हे कुणाच्या मनात देखील येत नाही. हे बदल कालानुरूप असले व ते आपण स्वीकारत असलो तरी आपल्या जीवनाला लागलेले हे वळण सरळ आहे की खरोखरच वळणावळणाचे आहे हे आकलनाबाहेर चालले आहे. कारण या भ्रमणध्वनीचा उपयोग फक्त गप्पा मारण्यासाठीच न करता सोय म्हणून व ज्ञानार्जनाचे साधन म्हणून त्याचा वापर केला तर त्याची उपयुक्तता वादातीत आहे. पण घरामध्ये तेढ वाढविण्याचे कार्यच या भ्रमणध्वनीकडून होत असेल तर विज्ञानाचा तो पराभव म्हणावा लागेल. भ्रमणध्वनी प्रत्येकाच्या हातात आला आणि त्याने अनर्थ माजविण्यास सुरुवात केला, असेच सर्वसाधारण चित्र दिसते. अविश्वासाचे वातावरण वाढू लागले आहे. केलेला कॉल किंवा झालेले संभाषण डिलीट करण्याची सोय या दूताने केली. पण त्यातून लपवालपवी वाढीस लागली. यातील डिस्प्लेवर कोण फोन करीत आहे ते दिसू लागले व मग सोयीप्रमाणे कॉलकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढले. नको असलेले जाहिरातींचे कॉल टाळणे हा चांगला उपयोग होतो, हे खरे असले तरी आपल्या क्षमतेने काम न करणाऱ्या लोकांनी या सुविधेचा दुरुपयोग चालविलेला आहे. ऊठसूट फोन करीत राहणे अनेकांचा उद्योगच झाला आहे. संदेश येतो न येतो तोच फोन वाजतो, ‘मेसेज मिळाला का हो?’ संदेश पाठविल्यावर त्या माणसाला तो वाचून त्यावर काही कृती करायला थोडातरी वेळ द्यावा की नाही? पण भ्रमणध्वनीमुळे मनाची अस्वस्था वाढत चालली आहे. विमान थांबल्या थांबल्या इतक्या घाईघाईने भ्रमणध्वनी चालू केला जातो की जणू यांना पंतप्रधानांचाच कॉल येणार आहे. या असल्या अस्वस्थतेतून शरीरावर आणि मनावरही दुष्परिणाम जाणवू लागतात. मनाचा तोल लवकर ढळतो व त्याचे परिणाम घरातील इतरांना देखील भोगावे लागतात.

कामाच्या ठिकाणी देखील भ्रमणध्वनी ढवळाढवळ करीत आहे. कामात दंग असलेला माणूस अचानक अंगात आल्यासारखे करतो, कारण खिशातला भ्रमणध्वनी वाजू लागतो. मग महत्त्वाचे काम, महत्त्वपूर्ण बैठक हे सारे सोडून तो त्या कॉलला महत्त्व देतो. यात त्याचे स्वत:चे तर नुकसान होतेच, शिवाय त्या कार्यालयाच्या क्षमतेमध्येदेखील घट होत असते. पण लक्षात कोण घेतो? भ्रमणध्वनी घरी विसरला तर माणसे आजारी दिसू लागतात. तो काही वेळ वाजला नाही तर रेंज तर गेली नाही ना म्हणून पुन: पुन्हा त्याच्याकडे पाहिले जाते. त्याच्यातला निधी संपला तर लोक इतके बेचैन होतात की जणू त्यांच्याच शरीरातले त्राण निघून चालले आहे!

भ्रमणध्वनी अनेकांच्या रस्त्यावरील अपघाती मृत्यूला आमंत्रण ठरला आहे. पण त्यातून इतर काही बोध घेत आहेत हे जाणवत नाही. हातवारे करीत मोठमोठय़ाने या फोनवर बोलणारी मंडळी पाहिली की हसावे की रडावे तेच कळत नाही! तासन्तास फोनवर बोलत असलेली तरुणाई खरोखरीच विज्ञानाने दिलेल्या या वरदानाचे रूपांतर शापात तर करीत नाही ना असे वाटू लागते. तातडीचे संदेश देण्यासाठी, दैनंदिन व्यवहार विनासायास करण्यासाठी व वेळ वाचविण्यासाठी हे उपकरण नक्कीच उपयोगी आहे. पण वास्तवात मात्र याचा दुरूपयोगच अधिक होत आहे असे दिसते. परीक्षेत कॉपी करण्यासाठी, लोकांना धमक्या देण्यासाठी, अतिरेकी कारवायांसाठी आणि उगीचच चकाटय़ा पिटण्यासाठी ह्या उपकरणाचा वापर आपल्या देशात अधिक होत आहे. घराच्या चार भिंतींच्या आत या उपकरणाचे काम मर्यादितच असले पाहिजे हे प्रत्येकाने ध्यानात घ्यावयास हवे.

या उपकरणाने दुनिया जेवढी जवळ आणली तेवढीच मनामधील अंतरे वाढविली असे बऱ्याच वेळा वाटून जाते. चार भिंतींच्या आत एकमेकांशी संवाद साधताना भ्रमणध्वनी जर आवश्यक वाटू लागला असेल तर तो दैवदुर्विलास आहे. घरातल्या कचऱ्यांचे निवारण निसर्गदूतामार्फत होऊ शकेल, पण मनातली जळमटे मात्र काढणे ह्या भ्रमणदूताला शक्य नाही. उलट त्याच्या अति वापराने ही कोळीष्टके मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यांत अधिक दाटीवाटीने दिसू लागली आहेत.
घराकडून अशी अपेक्षा असते, की त्या चार भिंतींत माणूस म्हणून कसे वागायचे ह्याचे बाळकडू त्याने द्यावे. हे बाळकडू घेताना जर या विविध वैज्ञानिक उपकरणांचा वापर मोठय़ा लोकांनी तारतम्याने केला तर घरात वाढत असलेली बालमंडळी हळूहळू त्या सवयी उचलतात व प्रगल्भ बनतात. त्यांना विज्ञानाचे आकर्षण वाटू लागते व त्यातून राजस, सात्त्विक आणि सत्य प्रवृत्ती वाढीस लागते. राजहंसाच्या नीरक्षीर विवेकाची जोपासना प्रत्येक घराने या विज्ञान युगात करावी आणि घराचे घरपण अबाधित ठेवावे असे मनापासून वाटते.
सह संचालक, जैवविज्ञान वर्ग,
भाभा अणुशक्ती केंद्र
डॉ. शरद काळे sharadkale@gmail.com 

nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी

knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?

Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…

quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?