रत्नागिरी शहरापासून १५ कि.मी. अंतरावर १२ वाडय़ांनी हातात हात गुंफून वसलेलं एक कोतवडे गाव. या हिरव्या रानातली एक वाडी- धामेळेवाडी. एका बाजूला खळखळणाऱ्या कोतवडे नदीशी दंगामस्ती करीत तिच्याोत घुसलेली; आणि दुसऱ्या बाजूला उभ्या डोंगराला सुखाने टेकलेली, कोंदणातल्या पाचूसारखी साखरतर खाडीस कोतवडे नदी.आणि परिसरातले ओढे यांच्यावर पूल बांधले गेल्यामुळे रत्नागिरीहून निघालेल्या लाल गाडीने- एस.टी.ने- धामेळेवाडीपर्यंत येऊन तिला अगदी कवेत घेतले आहे.
मूळचे ‘गणपुले’ असलेले, कालांतराने चतुरस्र बुद्धी, व्यवहार कुशलता, बाणेदारपणा या अंगभूत गुणांमुळे ‘बुद्धी सहस्त्रेषु’ म्हणजे सहस्रबुद्धे या नावाने प्रसिद्ध झालेल्या सहस्रबुद्धे यांची धामेळेवाडीत सर्वात जास्त म्हणजे ११ घरे. यांच्याचपैकी एक निस्सीम शिवभक्त दर सोमवारी नदीपलीकडील पिरंदवणे या गावातील श्री सोमेश्वर मंदिरात जाऊन श्री शंकराचे दर्शन घेतल्याशिवाय ते उपास सोडीत नसत. एकदा पुरामुळे जाणे अशक्य झाले असता पाणी ओसरण्याची वाट बघत ते तिथेच बसून राहिले. त्यांची ही निस्सीम श्रद्धा बघून ईश्वराने दृष्टान्त दिला की, ‘तुझ्याच वाडीत धामणीच्या झाडाखाली गाईने पान्हा सोडला आहे तेथे जाऊन पूजा कर व उपास सोड.’ या आदेशानुसार पिवळ्या फुलांच्या धामणीच्या झाडाखाली स्वयंभू शिवलिंग दिसले. मनोभावे पूजा करून त्यांनी उपास सोडला. धामणीच्या झाडाखाली प्रकट झालेले शिवलिंग म्हणून हे श्री धामणेश्वर मंदिर.
पेशव्यांच्या उत्कर्षांच्या काळात ३५०-४०० वर्षांपूर्वी या निसर्गरम्य परिसरात स्वयंभू जागृत श्रीदेव धामणेश्वराचे भव्य मंदिर बांधले गेले, असे म्हणतात. संपूर्ण मंदिर पाषाणाचे असून शिल्पकाम व नक्षीकाम असलेले दोन घुमट अतिशय देखणे आहेत. पायापासून घुमटापर्यंत जांभ्या रंगाच्या विशाल पाषाणांचे (चिरा) एकावर एक थर रचून हे ‘बिनखांबी’ मंदिर उभे राहिले आहे. लहान दीड-दोन फुटी चिरे उचलायला पाच-सहा माणसे लागतात, तर वरचे मोठे चार-साडेचार फूट लांबीचे चिरे उचलणं हे १०-१२ माणसांचंच काम. प्रतिकूल परिस्थितीत कुठल्याही सोयीसुविधा नसताना या निर्जन जागी हे विशाल दगड वाहून आणणे, एकमेकांवर चढविणे आणि कल्पक वास्तुनिर्मिती करणे हे अग्निदिव्य कसे पार पडले असेल, हे नवलच आहे. चुनागूळ (चुनेगच्चीचे) याचे मिश्रण या मनमोहक बांधकामात वापरले आहे. संपर्काचे पूल नसताना अत्यंत प्रमाणबद्ध, आकर्षक टुमदार, शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेले हे मंदिर निसर्गाच्या कुशीत आकाराला यावे हे अद्भुतच आहे. वलयांकित रेषेतील सौंदर्य पारखणारी कलाकाराची नजर, त्याला लाभलेली बोटांची साथ आणि त्यातून निर्माण झालेला हा कलाविष्कार. श्री धामणेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण चौथऱ्यापासून दोन्ही घुमटांपर्यंतचे बांधकाम, आंतरबाह्य शिल्पकलेचे कोरीव काम, सुबक नक्षीकाम म्हणजे ऐतिहासिक वैभवाच्या पाऊलखुणाच. मंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार नक्षीदार आहे. मंदिराच्या पश्चिमेस खोलगट भागात स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेताना माथा लवतोच. अभिषेकाचे उदक बाहेर जाण्यासाठी उत्तरेस देखणे गोमुख आहे. मंदिराचा दर्शनी भाग उंचावर असून भाविकांसाठी विस्तीर्ण सभामंडप आहे. याच ठिकाणी श्री गणेश व नंदी असून चार भव्य दीपमाला हे मंदिराचे वैभव आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोर सुशोभित तलाव आहे. त्यातील फुललेल्या कमळांची शोभा अवर्णनीय आहे. या तलावाचे दोन भाग असून एक भाग जनावरांसाठी व दुसरा देवळासाठी वापरला जातो. हे नियोजन स्तुत्य आहे. उत्तरेला वाडीवर जाण्यासाठी ७०० पावलांची चिरेबंदी पाखाडी आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस आड (विहीर) तर समोर धर्मशाळा आहे. चारही बाजूंनी विस्तीर्ण चिरेबंदी आवार आहे.
काळाच्या ओघात प्लॅस्टर गळून पडले, दगडी बांधकाम झिजू लागले, भेगा पडल्या, त्यातून वडपिंपळ झाडे उगवून पाळेमुळे खोलवर जाऊ लागली. वाडीतील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले शेतीप्रिय उद्योजक पांडुरंग धोंडू खेडेकर यांच्या प्रेरणेने त्यांचे सुपुत्र रमाकांत पांडुरंग खेडेकर, गजानन पांडुरंग खेडेकर, वाडीचे खोत सुधाकर सखाराम सहस्रबुद्धे, त्यांचे पुत्र विनायक सुधाकर सहस्रबुद्धे, पब्लिक देवस्थान ट्रस्ट कोतवडे यांचे मार्गदर्शन व वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ मंडळी यांच्या एकत्रित सहयोगाने मूळ वास्तूरचनेत कोणताही बदल न करता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून २०१२ साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. १३ महिने काम चालले. गणेश, नंदी, कासवराज हे संगमरवरी स्वरूपात पुनरुज्जीवित करण्यात आले.
हिरव्या वनश्रीमध्ये स्थापत्यशास्त्राचा अजोड आदर्श नमुना असलेले श्री धामणेश्वर मंदिर, कलेच्या गतकाळच्या वैभवाच्या खुणा जपत कोतवडय़ाच्या धामेळेवाडीत नव्या आकर्षक रूपात भक्तांची वाट बघत उभे आहे.
सुचित्रा साठे – vasturang@expessindia.com

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद
khajina vihir Vitthal temple
सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरी