मनोरे वास्तुकला बांधकामाला प्राचीन इतिहास आहे. साम्राज्य वैभवाबरोबर आपल्या धर्माचं अधिष्ठान असलेल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कार दाखवण्याचा प्रयत्नही त्या पाठीमागे आहे. जोडीला संरक्षण म्हणून टेहाळणी करण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. सागरी प्रवास करणाऱ्या जहाजांना दिशादर्शन करण्यासाठी उंचावरील दीपगृहाकरता मनोरे बांधले गेले. मिनार-मनोरे बांधकामात कालानुरूप स्थित्यंतरे घडत गेली. भव्य-दिव्य उंच-उत्तुंग मनोरे उभारण्याची जगात स्पर्धाच सुरू झाली. त्यातील काहींना जागतिक वारसाबरोबरीने मानवनिर्मित आश्चर्य म्हणूनही त्याकडे बघितले जाते..
मनोरे (Towers) या वास्तुकला प्रकाराला हजारो वर्षांचा इतिहास आहे. जगातील अनेक सत्ताधीशांनी आपले साम्राज्य वैभव दाखविण्यासाठी याची उभारणी केली असली तरी आपल्या धर्माचं अधिष्ठान असलेल्या, संस्कृतीचा कलात्मक आविष्कार दाखवण्याचा प्रयत्नही त्यापाठीमागे आहे. जोडीला परिक्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी, टेहाळणी करण्यासाठीही त्याचा उपयोग होत असे. सागरी प्रवास करणाऱ्या जहाजांना दिशादर्शन करण्यासाठी उंचावरील दीपगृह बांधण्यासाठी मनोरे बांधलेत.
कालानुरूप अनेक ऐतिहासिक बांधकामात स्थित्यंतरे घडत गेली, त्यात मनोरे बांधकाम अपवाद नाही. नंतर भव्य-दिव्य- उंच, उत्तुंग मनोरे उभारण्याची जणू स्पर्धाच चालू झाली. परिणामी साऱ्या जगाचं लक्ष वेधणाऱ्या मनोरेसदृश्य अनेक वस्तूंची निर्मिती होताना तो एक आकर्षणासह कुतूहलाचा विषय झालाय. त्यातील काहींना जागतिक वारसाबरोबरीने मानवनिर्मित आश्चर्य म्हणूनही त्याकडे बघितले जाते. यामध्ये इटलीतील पिसाचा झुकता मनोरा, फ्रान्सचा आयफेल टॉवर तर भारतभूमीवरील कुतूबमिनार हे मनोरे म्हणजे त्या त्या राष्ट्राचं वैभव आहे..
पिसाचा झुकत मनोरा : इटलीतील एका कॅथेडूलच्या परिसरातील हा पांढराशुभ्र मनोरा ११व्या शतकात बांधला गेला. या पिसाच्या झुकत्या मनोऱ्याचं गारूड साऱ्या जगावर आजही आहे. निरभ्र आभाळाच्या पाश्र्वभूमीवर या मनोऱ्याचं दर्शन लांबवरूनच होते. ही सात मजली कलात्मक मनोरा वास्तु उभारताना प्रारंभीपासूनच वास्तुविशारदांना अनेक अडचणी येत गेल्या. हा मनोरा उभारताना त्यांना ध्यानी आले की, जेथे ही टोलेजंग वास्तू उभारतोय तेथील एका बाजूची जमीन भुसभूशीत असून पायाच्या बांधकामातही काही त्रुटी राहिल्याने त्याचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच तो एका बाजूस कलायला लागला. मनोरा सरळरेषेत उभा करण्याच्या प्रयत्नातच सुमारे २०० वर्षे जाऊनही तो सुमारे साडेपाच अंशात एका बाजूस झुकताच राहिला. इ.स. २००० साली आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून मनोरा झुकण्याचा कोन ३.९९ अंशावर आणला गेला. परंतु सरळरेषेत उभा करता आला नाही.
या मनोऱ्याची झुकलेल्या दिशेकडील उंची ५५.८६ मी. (१८३.९६ फूट) तर जमिनीकडून विरुद्ध दिशेनी ५६.३७ मी (१८५.९३ फूट) इतकी असून त्याच्या भिंतीची रुंदी २.४४ मी (८.०६ फूट) इतकी आहे. या मनोऱ्याच्या शिखराकडे जाण्यासाठी अंतर्गत भागातून एकूण २९६ पायऱ्या आहेत. या मनोऱ्याचा  खरा वास्तुविशारद कोण याबद्दल जाणकारांत मतभिन्नता आहे.
या मनोऱ्याचे बांधकाम तीन टप्प्यामध्ये १९९ वर्षे चालले होते. पैकी तळाकडील मारबलयुक्त बांधकामाला इ.स. ११७३ मध्ये प्रारंभ झाला. दुसऱ्या मजल्याचे बांधकाम चालू असताना सदोष जमिनीमुळे तो एका बाजूस झुकायला लागल्यावर पुढील १०० वर्षे बांधकाम स्थगित ठेवले.  पुन्हा १२७२ मध्ये बांधकामात अडथळे आलेच. अखेर इ.स. १३१९ मध्ये हा मनोरा बांधून पूर्ण झाला. या मनोऱ्याला साजेशा अशा सात प्रचंड घंटा त्यात आहेत. त्यातील सर्वात मोठी घंटा १६५५ मध्ये उभारली गेली.
दुसऱ्या महायुद्धात या मनोऱ्याचा उपयोग टेहाळणीसाठी झाला. मनोराअंतर्गत भागात व बाह्य़ भागात इटालियन वास्तू शिल्पकलेशी सुसंगत सौंदर्याचा आविष्कार जाणवतो. सर्वात वरच्या मजल्यावरून दूरवरचे विहंगम दृश्य पहाण्यासाठी सुरक्षित लोखंडी कठडे आहेत. सुरक्षेसाठी बाह्य़ भागाचे प्रचंड खांब भव्यता दर्शवितात.
आयफेल टॉवर : जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांतीचे औचित्य साधून फ्रान्समध्ये एक भव्य मेळावा भरवला जाणार होता. या प्रसंगी काहीतरी विशाल, भव्य-दिव्य असे स्मारकरूपी वास्तुशिल्प उभारण्याची कल्पना सरकारकडे सादर केली गेली. त्यासाठी ‘गुस्ताव आयफेल’ यांच्या तंत्रज्ञ अस्थापनेतल्या मोरिस कोचलिन आणि एमिल नौजर या स्थापत्य कलेच्या जाणकारांनी अशा भव्य नियोजित मनोऱ्याची कल्पना आराखडय़ासह सादर केली. कलाकृतीची जाण असलेल्या स्टिफन यांनी या मनोऱ्याची शोभा वाढवण्यासाठी त्यात कलापूर्ण कमानी आणि स्टेनग्लास काचेच्या दालनाची भर घातली. असल्या महाकाय प्रचंड बांधकामांनी मूळच्या नोत्रेदामे लावूर वस्तुसंग्रहालयाला बाधा येईल या कारणास्तव काही कलाकार जाणकारांनी त्याला विरोध केला. त्यावर तज्ज्ञाचे विचार मंथन होऊन इ.स. १८८९ मध्ये हा ३२४ मी. उंचीचा मनोरा बांधून पूर्ण झाला.
या मनोऱ्या बांधकामासाठी ३०० कामगार कार्यरत होते. पैकी फक्त एकाचाच मृत्यू झालाय. विशेष म्हणजे या मनोऱ्याच्या बांधकामासाठी कुठलाच भाग बांधकामाच्या जागी तयार केला नसून, १८,०३८ भाग कारखान्यातून सुमारे दोन दशलक्ष रिबेटच्या साह्य़ानी एकमेकांना जोडण्यात आलेत. मनोऱ्याच्या शिखर भागाकडे जाण्यासाठी लिफ्ट आहे. रात्रीच्या समयी येथून दिव्याच्या रोषणाईनीसह दूरवरचे विहंगम दृश्य पहाण्यासारखे असते.
बांधकामाच्या करारासह काही काळाने हा मनोरा नाहीसा करण्यात येणार होता. परंतु आकाशवाणी, दूरदर्शन प्रक्षेपण, हवामान खात्यासाठी त्याची उपयुक्तता ध्यानी घेऊन हा मनोरा कायम ठेवण्यात आला. या मनोऱ्यास तीन टप्पे असून पैकी पहिल्या, दुसऱ्यावर उपाहारगृह आहे तर सर्वोच्च टप्पा २७६ मी.वर आहे.. हा उत्तुंग, विशाल मनोरा म्हणजे मानवनिर्मित आश्चर्यासह कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा अनोखा संगम असल्याने पर्यटकांचे आकर्षण आहे.
टोक्यो टॉवर (जपान) : दुसऱ्या महायुद्धात बेचीराख झालेला जपान देशही उत्तुंग व भव्य बांधकामाच्या स्पर्धेत ‘हम भी कुछ कम नही’ आघाडीवर आहे. आपल्या आर्थिक महासत्तेचे जगाला दर्शन घडवण्यासाठी इ.स. १९५८ मध्ये जपानी प्रशासनाने प्रचंड मनोरा उभारला. त्यामागे आयफेल टॉवरचा आदर्श होताच. ‘टाकाऊतून टिकाऊ’ या सूत्रानुसार महायुद्धात मोडतोड झालेल्या रणगाडय़ांचे लोखंड या मनोऱ्यासाठी वापरले गेले.
हा मनोरा जगातील सर्वात उंच मनोरा म्हणून ओळखला जावा. या पाठोपाठ दूरदर्शन-आकाशवाणी प्रक्षेपण आणि पर्यटकांचे आकर्षण हा उद्देश हा मनोरा उभारताना होताच. ३३२ मी. उंचीचा हा मनोरा आयफेल टॉवरपेक्षा उंच असून वजनालाही कमी आहे. त्याच्या पांढऱ्या-केशरी रंगाने मनोऱ्याचे सौंदर्य खुलवले आहे. भूकंपासारख्या नैसर्गिकआपत्तीतही मनोरा सुरक्षित राहील याची तंत्रज्ञांनी काळजी घेतली आहे. या मनोऱ्यापासून स्फूर्ती घेऊन कालांतराने चीन, रशिया, दुबई, कॅनडा येथेही उंचच उंच मनोरे बांधले गेले. पण आजमितीस या ६३४ मी. उंचीच्या जपानच्या ‘टोक्यो स्कायट्री’ टॉवरची उंची सर्वोच्च धरली जाते. जपानमध्ये डिजिटल सिग्नलची अंमलबजावणी केल्याने हा मनोरा उपयोगी ठरला. पर्यटकांना येथे येण्यासाठी या मनोऱ्यानजीक स्कायट्री नावाचे रेल्वे स्थानक निर्माण केले गेले.
या मनोऱ्याच्या बांधकामात मध्यभागीचा शाफ्ट बाकीच्या लोखंडी बांधकामाशी जोडल्याने त्याचा मध्यवर्ती स्तंभ हलता आहे. त्यामुळे वादळ-भूकंपातही हा मनोरा सुरक्षित आहे. ११ मार्च, २०११ रोजी तीव्र भूकंपाच्या तडाख्यातही त्याला नुकसान झाले नाही. या मनोऱ्याच्या अनुक्रमे ३५० मी. व ४५० मी. उंचीवर सुरक्षित काचेची तावदानं असल्याने तेथून सुमिदा नदी आणि टोक्यो परिसराचं नयनरम्य दृश्य घडते. आयफेलप्रमाणेच हा महाकाय मनोराही जगाच्या पर्यटकांचे आकर्षण आहे.
कुतुबमिनार : प्राचीन काळापासून अनेक साम्राज्यांच्या वास्तुरूपी पाऊलखुणा भारतात आढळतात. त्यापैकी राजधानी दिल्लीचा कुतुबमिनार हा मनोरा सर्वश्रुत आहे. मध्ययुगीन ही मिनारवास्तू दिल्लीच्या  मेहरौली परिसरात असून तिचं बांधकाम विटा-चुन्याचे असले तरी काही भागात लालरंगी वाळुमिश्रित पत्थर आणि संगमरवरी बांधकामाने त्याचे सौंदर्य वाढवले आहे. या मनोऱ्याची उंची ७३ मी. (२४० फूट) आहे. हा भारतातील सर्वात उंच मनोरा गणला जातो.
या मनोऱ्याच्या अनेक जागी कुराणाचा संदेश तथा आज्ञाही आढळतात. याचे बांधकाम करताना पावसासह प्रतिकूल हवामानाचा त्यावर परिणाम होणार नाही यासाठी वास्तुविशारद दक्ष होते. मनोऱ्याच्या त्याच्या अंतर्गत भागात गोलाकार अशा ३७९ पायऱ्या आहेत. दिल्लीच्या मेट्रो रेल्वेचे कुतुबमिनार स्थानक उभारून पर्यटकांची सोयही केली आहे. दिल्ली सुल्तानशाहीचा संस्थापक कुतुबुद्दिन-ऐबक यांनी इ.स. १२०० मध्ये मनोरा बांधकामाला प्रारंभ केला. त्याचा वारसदार आणि जामात अल्तमश यांनी मनोऱ्यातील तीन मजल्यांचे काम पूर्ण केले. इ.स. १३३९ मध्ये या मिनारावर वीज पडून नुकसानही झाले. मात्र फिरोजशहा तुघलक यांनी पुढील उर्वरित बांधकाम पूर्ण केले. १६ व्या शतकातील भूकंपानेही या मनोऱ्याचे नुकसान केले होते. त्याची दुरुस्ती सिकंदर लोदी यांनी करून तो पूर्ववत केला. १९०३ मध्ये भूकंपाने जे नुकसान झाले त्याची दुरुस्ती ब्रिटिश अंमलदार मेजर रॉबर्ट स्मिथ यांनी केली.
कुतुब समूह क्षेत्रात मिनारसभोवती ऐतिहासिक महत्त्वाच्या अनेक लहान-मोठय़ा कलात्मक वास्तु आहेत. त्यात दिल्लीचा लोहस्तंभ, मशीद, अलाई दरवाजा, अल्तमशची कबर, अल्लाउद्दिन मदरसा यांचा समावेश आहे. तुर्की आक्रमकांशी संपर्क येण्याआधीपासून हा मनोरा उभारला आहे. आपल्या देशात अनेक किल्ले, गडकोट, सागरकिनारीची उंच दीपगृहे या ठिकाणी लहान-मोठे मनोरे आढळतात. त्यामधील औरंगाबादनजीकच्या दौतलाबाद किल्ल्यातील ‘चांदमिनार’ असाच एक भव्य मिनार मनोरावास्तू आहे. कुतुबमिनारनंतर या मनोऱ्याचा क्रमांक आहे. हा देखणा-कलापूर्ण मनोरा इ.स. १४३५ मध्ये आक्रमक अल्लाउद्दिन बहामनीने बांधला आहे. धार्मिक सणावारी राजघराण्यातील स्त्रीवर्गाला चंद्रदर्शनासाठी या मनोरा-मिनारचा उपयोग होत असे.
ब्रिटिश राजवटीत आपल्याकडे मनोरासदृश अनेक बांधकामे झाली, त्यातील मुंबई विद्यापीठ परिसरातील राजाबाई टॉवर हा दखल घेण्यासारखा मनोरा म्हणजे मुंबई नगरीची शान आणि ओळखच झालीय.
अरुण मळेकर – vasturang@expressindia.com

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
loksatta. pune, Anniversary, Special article, mental health, society by psychiatrist and actor Dr. mohan agashe
वर्धापनदिन विशेष : सक्षम मानसिक आरोग्यासाठी
A minor girl was beaten up by goons on a bike in Jaripatka police station limits Nagpur
नागपुरात गुन्हेगार सुसाट! भरचौकात गुंडांनी तरुणीसोबत…
unearth Harappan site near Dholavira
सोन्याच्या शोधार्थ निघालेल्या ग्रामस्थांना मिळाला तब्बल ४५०० हजार वर्ष जुना सांस्कृतिक खजिना; काय नेमके आहे प्रकरण?