mohan-gandre

हल्ली घराघरांवर टीव्हीच्या डीश किंवा छत्र्या आपल्याला लावलेल्या पाहायला मिळतात. पूर्वी म्हणजे साधारण
१९५०- ६० साली, व्होल्वच्या रेडिओसाठी इमारतीवर किंवा घराच्या बाहेर, दुरस्थ रेडिओ केंद्रातर्फे प्रक्षेपित झालेल्या ध्वनी लहरी पकडून घरातील रेडिओपर्यंत आणणाऱ्या एरिअल दिसायच्या. रेडिओमध्ये व्हाल्वच्या जागी ट्रांझिस्टर वापरायला लागल्यावर या बाहेरच्या एरियलची आवश्यकता राहिली नाही. त्याकाळी म्हणजे साधारण १९६५-६६ पर्यंत इमारतीवर अशा रेडिओसाठी लावलेल्या एरिअलची संख्या अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच होती. कारण घरोघरी रेडिओ आलेले नव्हते. रेडिओ विकत घेणे ही केवळ चांगल्या आर्थिक परिस्थिती असणाऱ्या घरांचीच मक्तेदारी होती.
इटलीचा शास्त्रज्ञ माक्रोनी ह्यंनी १८९६-९७ साली रेडिओ लहरी दूरवर पाठविण्याचा आणि दुरस्थ ठिकाणी जशाच्या तशा ऐकण्याचा शोध लावला, परंतु भारतात मात्र त्याचा प्रसार आणि उपयोग घरोघरी होण्यासाठी बरीच वर्षे जावी लागली. एकेकाळी रेडिओ, फ्रिज, आणि प्रत्येक खोलीत विजेवर चालणारा पंखा अशा काही गोष्टी फक्त आर्थिक परिस्थिती उत्तम असणाऱ्या कुटुंबातच वापरात होत्या. सर्वसामान्यांच्या घरात त्या दिसणे शक्यच नव्हते. त्यामुळे चाळीच्या वस्तीत जेथे बरीच कुटुंबे राहात होती किंवा मोठय़ा संखेने घरे असणाऱ्या वस्तीत एखाद् दोन घरी असणारा रेडिओ इतर रहिवाशांकरिता मोठे अप्रूप होते.
अगदी सुरुवातीला, एक-दीड फूट लांबीच्या, फुटभर उंच आणि सहा-सात इंच रुंद अशा लाकडी खोक्यात विजेवर चालणारे रेडिओचे सर्व तंत्रज्ञान सामावलेले होते, कालानुरूप त्याच्या आकारमानात बदल होत राहिले. कार्यक्रम ऐकण्यासाठी एक-दोन ब्यांडपासून अनेक ब्यांड असणारे रेडिओ मिळत असत. तसेच ह्यच्या तत्रांमध्ये काही व्हॉल्वचा उपयोग केला जायचा. नंतर त्यांची जागा ट्रांझिस्टरने घेतली. जितके ब्यांड अधिक आणि जितके इव्हॉल्व जास्त त्यावरून त्याचा दर्जा ठरत असे. तसेच त्यामुळे त्याची किंमत देखील त्यावर कमी-जास्त अवलंबून होती. हे व्हॉल्व विशिष्ट तापमानात तापल्याशिवाय रेडिओचा आवाज बाहेर पडायचा नाही. ते कितपत गरम झालेत आणि आवजाची सुष्पष्टता जास्तीत जास्त किती मिळू शकते हे दर्शविण्यासाठी रेडिओवर एक हिरव्या रंगाच्या दर्शकाची (इंडिकेटर) व्यवस्था असायची. वेगवेगळ्या रेडिओ स्टेशनवरून प्रक्षेपित होणारे कार्यक्रम ऐकण्यासाठी एकापुढे-मागे होणाऱ्या काटय़ाने त्या स्टेशनशी जोडले जाण्याची व्यवस्था रेडिओवरील एका इंडिकेटर पट्टीवर केलेली असते. मीडियम वेव, शॉर्ट वेव अशा दोन मुख्य ध्वनी लहरींवरून रेडिओचे कार्यक्रम ऐकणे शक्य असते. आता त्यात एफएम ध्वनी लहरीची भर पडली आहे. आणि त्यावरून प्रसारित होणारे कार्यक्रमच हल्ली जास्त करून ऐकले जातात. जसजसे भविष्यात रेडिओचे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसतसे रेडीओच्या अंतर्बाह्य़ रूपात बरेच बदल होत गेले. आणि लोकांचे राहाणीमान आधुनिक होऊ लागल्यावर रेडियो घरोघरी गाऊ बोलू लागले. त्यासाठी बरीच वर्षे वाट पाहावी लागली.
पूर्वी परदेशी बनावटीचे रेडिओ बाजारात उपलब्ध होते, उदा. फिलिप्स, जी. ई. सी., मार्कोनी, वगैरे. नंतर भारतात मर्फी, बुश वगैरे नामवंत कंपन्या रेडिओ बनविण्याच्या उद्योगात आपले बस्तान बसवून होत्या. भारतातील रेडिओ बनविणाऱ्या कंपन्यांनी हजारो, कुशल अकुशल कामगारांना रोजगार मिळवून दिला होता. हजारो स्त्रियांनी त्या नोकरीच्या साहाय्याने आपल्या संसाराला आर्थिक हातभार लावला होता.
एरिअल रेडिओ ऐकण्यासाठी घराबाहेर एक एरिअल बसवावी लागत असे, अगदी सुरुवाती सुरुवातीला इमारतीच्या घराच्या छतावर एक लांब वायर दोन बांबूच्या आधारे ताणून बसवून तिचे एक टोक घरातील रेडिओला आणून जोडावे लागत असे. नंतर या एरिअलमध्ये देखील नवनवे प्रकार बाजारात उपलब्ध झाले. कोळ्याच्या जाळ्यांसारखी दिसणारी एरिअल घराच्या बाहेर सहज लावता यायची आणि त्यावर लक्ष ठेवणे सहज शक्य होत असे. कारण छतावर लावलेली तार कावळे त्यांच्या घरटय़ासाठी तोडत असत. त्यामुळे कोळ्याच्या जाळ्यासारखी चौकोनी किंवा वर्तुळाकार प्रकारची एरिअल ज्यास्त लोकप्रिय होती. रेडिओ तंत्रज्ञानात ट्रांझिस्टरचा शिरकाव झाला आणि व्हॉल्व आणि एरिअल यांची गरज संपली.
रेडिओवरून त्याकाळी प्रसिद्ध होणारे काही कार्यक्रम आजही पूर्वीइतकेच श्रवणीय आहेत. आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके आणि प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेले गीतरामायण आजही रसिकांच्या मनाला भुरळ घालते. बाळ कुरतडकर ह्यांचा प्रभाकर पंत, प्रभाकर जोशी यांचा टेकाडे भावजी, मीना प्रभूंची मीना वाहिनी.. ह्यंनी सादर केलेला आणि मराठीतील नामवंत विनोदी लेखकांनी लिहिलेला प्रापंचिक सामाजिक विषयावर बेतलेला ‘पुन्हा प्रपंच’ खुसखुशीत संवाद आणि नम्र विनोद असलेला कार्यक्रम कोण बरे विसरू शकेल? दुपारी घरकाम निवांतपणे उरकता उरकता गृहिणींसाठी सादर होणारा वनिता मंडळ हा कर्यक्रम तर गृहिणींचा पहिल्या पसंतीचा कार्यक्रम होता. आघाडीचे भावगीत गायक म्हणून अरुण दाते ह्यंना सर्व जगात रेडिओवरील ज्या कार्यक्रमामुळे ओळख मिळाली तो ‘भाव सरगम’ हा भावगीतांचा लोकप्रिय झालेला कार्यक्रम, असे किती लोकप्रिय कार्यक्रम सांगावेत! पण त्याकाळी सर्व भाषिक, आबालवृद्धांना ज्या कार्यक्रमाने अक्षरश: वेड लावले तो कार्यक्रम म्हणजे रेडिओ सिलोनवरून दर बुधवारी रात्री ९ वाजता सादर होणारा बिनाका गीत माला. हा कार्यक्रम सुरू होण्याचा बिगुल वस्तीत घराघरांत ऐकू गेल्यावर त्याचे सर्व वयोगटातील सर्व भाषिक रसिक ज्या घरात रेडिओ असेल त्या घराच्या बाहेर मिळेल त्या जागी बसून श्रवणानंदात तल्लीन होऊन जात असत. तो कार्यक्रम सादर करणारे अमीन सयानी ह्यंचा आवाज तर आवाजाच्या दुनियेत अजरामर स्थान पटकावून बसला आहे. आजही व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आणि यू टय़ूबवर त्याची जादू सुरूच आहे. काही लोकांना मात्र ह्यवरून रोज जाहीर होणाऱ्या बाजारभाव ह्यंना कार्यक्रमाची प्रतीक्षा असायची, त्यांच्यासाठी न्यूयॉर्क कॉटनचा भाव ऐकणे त्यांच्यासाठी त्या दिवशीचा सर्वात महत्त्वाचा आणि नशीब आजमावणारा कार्यक्रम असे. क्रिकेटच्या टेस्ट मॅचेस सुरू झाल्या की त्या मोसमात रेडियोला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होत असे. कारण त्या खेळाचे धावते समालोचन घरबसल्या ऐकण्यासाठी तो एकमेव पर्याय उपलब्ध होता. त्यासाठी काही हौशी लोक आपल्या रेडिओला अधिकचा कर्णा लावून रस्त्यावर गर्दीसाठी ते समालोचन ऐकण्याची व्यवस्था करून देत असत. त्याकाळी मुंबईत फक्त चहा, कॉफी देणारी हॉटेल बरीच होती. ह्य दुकानांतून दिवसभर रेडिओ ठणाणा वाजत राहायचा.
अशी तंत्रज्ञानावर चालणारी वस्तू म्हटली की त्याला दुरुस्ती ओघाने आलीच. रेडिओ दुरुस्तीचे एकतरी दुकान प्रत्येक वस्तीत त्याकाळी असायचे. काही नोकरपेशांच्या लोकांचा रेडिओदुरुस्ती हा जोडधंदा असे.
साठावे दशक संपता संपता टेलिव्हिजनचा प्रवेश भारतात झाला आणि त्या रंगीत दृक्श्राव्य मध्यमापुढे रेडिओची लोकप्रियता हळूहळू कमी होत गेली. भिंतीवरच्या फळीवर किंवा टेबलावर स्थानापन्न झालेला मोठा रेडिओ आता शोधावाच लागेल. व्हॉल्वचा रेडिओ तर आता जवळजवळ अस्तंगत झाल्यात जमा आहे. त्याचीही गाठभेट आता एखाद्या म्युझियममध्येच पडू शकेल.
अमीन सयानी ह्यंचा आवाज तर आवाजाच्या दुनियेत अजरामर स्थान पटकावून बसला आहे. आजही व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आणि यू टय़ूबवर त्याची जादू सुरूच आहे. काही लोकांना मात्र ह्यवरून रोज जाहीर होणाऱ्या बाजारभाव ह्यंना कार्यक्रमाची प्रतीक्षा असायची, त्यांच्यासाठी न्यूयॉर्क कॉटनचा भाव ऐकणे त्यांच्यासाठी त्या दिवशीचा सर्वात महत्त्वाचा आणि नशीब आजमावणारा कार्यक्रम असे. क्रिकेटच्या टेस्ट मॅचेस सुरू झाल्या की त्या मोसमात रेडियोला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होत असे. कारण त्या खेळाचे धावते समालोचन घरबसल्या ऐकण्यासाठी तो एकमेव पर्याय उपलब्ध होता. त्यासाठी काही हौशी लोक आपल्या रेडिओला अधिकचा कर्णा लावून रस्त्यावर गर्दीसाठी ते समालोचन ऐकण्याची व्यवस्था करून देत असत. त्याकाळी मुंबईत फक्त चहा, कॉफी देणारी हॉटेल बरीच होती. ह्य दुकानांतून दिवसभर रेडिओ ठणाणा वाजत राहायचा.
gadrekaka@gmail.com