टॉवरच्या सातव्या मजल्याच्या छोटय़ाशा गॅलरीत सुन्न मनाने बसले होते. दोन वर्ष झाली येथे येऊन, पण मन रमत नाही. ब्लॉकमध्ये असताना खालीच रहात असल्याने जाता-येता कोणीही बोलायला येत होते. मुद्दामहून कोठे जाण्याची गरज पडत नव्हती. चार वेळा काही आणायला जायचे तर सहज जमत होते. आता मात्र दरवेळेस लिफ्टचे पाय धरावे लागतात. विचार करता करता मन मागे जात जात आजपर्यंत निरनिराळ्या ठिकाणच्या घरांच्या आठवणी येऊ लागल्या.

मी लहान असताना आम्ही वाडय़ात राहायचो. वाडय़ात एकंदर सातआठच बिऱ्हाडे; पण सारी एकदिलाने जिवाभावाने राहायची. वाडय़ात समोरच भलेमोठे अंगण  होते. एका बाजूला हौद आणि बाजूलाच शौचालय. दोन खोल्यांच्या जागेत स्वयंपाकघरात जेमतेम अंघोळ करता येईल एवढी छोटीशी मोरी. त्यामुळे कपडे धुणे भांडी घासणे ही कामे हौदावरच होत असत. गॅसही नव्हते. कोळशाच्या शेगडय़ा आणि चुली. अंघोळीचे पाणी तापवायला बंब. दुपारचे चार वाजले की शेगडीच्या राखेने कंदीलाच्या काचा स्वच्छ पुसून साफ करायच्या आणि संध्याकाळच्या दिवे लागणीच्या वेळेची तयारी करून ठेवायची. हे रोजचे काम अगदी ठरलेले. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे प्रत्येक घरात दोन-तीन पिढय़ा आनंदाने नांदत असायच्या. गणपती असो वा दिवाळी वा उन्हाळ्याची कामे, सारी एकत्रितपणे केली जायची. वाडा म्हणजे जणू काही एकच मोठे कुटुंब आहे असे वाटायचे आणि म्हणूनच कोणावरही संकट आले,  सुख-दु:खाचे प्रसंग आले तरी ते वाटून घेतले जायचे. एकमेकांना आधार दिला जायचा.

भल्यामोठय़ा अंगणात खेळ तरी किती प्रकारचे खेळले जायचे त्याला गणतीच नाही. सुटी असली की आम्ही सारी मुले अंगणातच असायचो. लंगडी, खोखो, लपाछपी, सोनसाखळी असे खेळ तर असायचेच शिवाय टिक्कर, सागरगोटे, दोरीच्या उडय़ा असेही खेळ असायचे. खूप मज्जा यायची आणि व्यायामही भरपूर व्हायचा. पतंगाच्या दिवसांत मांजा करणे हेही एकच काम असायचे. काच आणि सरस कुटून दोऱ्याला लावली की, कडक मांजा तयार व्हायचा. या मांजाने दोन-चार पतंग तरी सहज काटले जायचे. कटलेल्या पतंगाच्या मागे धाऊन ती पकडून उडविण्यात जास्त आनंद असायचा. भोक्यांची गंमत आणखी वेगळीच भोक्यांची शर्यत लावायची आणि ज्याचा भोवरा आधी थांबेल त्याच्या भोक्याला बाकीच्या भोवऱ्यांनी मारून मारून तो फोडायचा. भोवरा फिरवणं हीसुद्धा एक कलाच होती. गोटय़ा खेळताना त्या जिंकलेल्या लहान-मोठय़ा गोटय़ांटे डबे भरलेले असायचे. दुपारच्या वेळी गोटय़ा खेळण्यात मुले दंग असायची. पतंग, गोटय़ा, भोवरे हे खेळ सर्वसाधारणपणे मुले खेळायची. तर मुली टिक्कर, दोरी उडय़ा, सागरगोटे या खेळात दंग असायच्या. मे महिन्यात सावलीत कोठेतरी पथारी पसरून पत्त्यांचे असतील नसतील तेवढे खेळ खेळले जायचे. आपसात फारशी भांडणे कधी व्हायची नाहीत.

रेडिओ, दूरदर्शन नव्हतेच. एखाद्या श्रीमंताच्या घरी मर्फीचा भलामोठा रेडिओ असायचा. आमच्या घराजवळच एक डॉक्टरीणबाई राहायच्या. संध्याकाळच्या वेळेस त्या आमच्याकडून पाढे, श्लोक म्हणवून घ्यायच्या. आमच्या बाजूचे दोन-तीन वाडे सोडून गवळ्याचा गोठा होता. तेथून आम्ही दूध आणत असू. गोठय़ातली एखादी गाय व्यायली की आवर्जून नेहमीच्या गिऱ्हाईकांना चीक आणून दिला जायचा. मग आईपण गाईसाठी गवळ्याच्या चरवीत ज्वारी टाकायची. आणि चिकाचा गूळ घालून मस्तपैकी चवदार खरवस बनवायची. साऱ्यांचीच आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने  बिना चपलेने टॉवेलने भरलेल्या पिशवीचे दप्तर पाठीवर घेऊन चालत जायला कोणालाही लाज वाटत नसे. स्वस्ताई तर इतकी होती की काही विचारू नका. कधी कधी वडील आम्हाला खाऊसाठी एक आणा द्यायचे. त्या काळी ढब्बू पैसा असायचा. अशा चार ढब्बू पैशांचा एक आणा व्हायचा. आणि चार पैशांचा एक आणा व्हायचा. मग त्या एक आण्यातून १ पैशाचे चुरमुरे (खूप यायचे), १ पैशाचे शेंगदाणे आणि एक पैशाच्या गोळ्या घेऊन एक पैसा शिल्लक ठेवायचा अशी सारी मजा मजा वाडय़ात असताना व्हायची.

गाव सोडून आम्ही मुंबईत आलो ते लांबलचक चाळीत. नळावरची भांडणे म्हणजे काय ते चाळीत आल्यावरच समजले. संध्याकाळी ४ ते ६ पाणी यायचे. सात बिऱ्हाडांत दोन नळ. मजल्यावर एकूण एका लाइनीत १४ बिऱ्हाडे. दुसऱ्या दिवशी ४ वाजेपर्यंत पाणी पुरवावे लागे. घरात माणसे भरपूर असायची. नंबर लावून एकेकाने दोन दोन बादल्या पाणी घ्यायचे. हे नंबर सकाळपासूनच लावून ठेवायचे. दोन तास हे काम चालायचे तरी कधी कधी पुरेसे पाणी मिळायचे नाही. लहान बादली, मोठी बादली यावरून भांडणे ठरलेली. संध्याकाळी कपडे धुण्यासाठीची जागाही असेच एखादे फडके टाकून अडवून ठेवली जायची. रोज कशाना कशावरून कोणाचे ना कोणाचे भांडण जुंपायचेच. एरवी गळ्यात गळे घालून मिरवणारी माणसे, पाण्याच्या वेळीच एवढी हमरीतुमरीवर कशी येतात मला समजायचेच नाही. एखाद्या मुलाला परीक्षेत कमी मार्क मिळाले किंवा चाळीतच कोणाचे प्रेमप्रकरण सुरू झाले, तर साऱ्या बातम्या घरच्या आधी चाळकऱ्यांनाच माहीत व्हायच्या. एखाद्या मुलीला बघायला येणार असतील तर चाळीत सगळीकडे आधीच कुजबुज सुरू व्हायची. आणि मग मुलगा यायची नेमकी वेळ साधून सारी बिऱ्हाडे गॅलरीत उभी राहायची. मुलगा दिसतो कसा, त्याच्याबरोबर कोण कोण आले इथपासून मुलीला काय काय प्रश्न विचारले या साऱ्यांची बित्तंबातमी चाळकऱ्यांना असायची. एखादा नवीन पदार्थ केला तर हमखास कोणतरी घरात घुसणार. ‘‘काय काकू, आज काय विशेष. वास छान येतोय.’’ असे म्हटले की हमखास चव बघायला पदार्थ हातावर ठेवावाच लागे. पण हेच शेजारीपाजारी सुखदु:खातही घरच्यासारखेच पाठीशी उभे राहायचे. दिवाळीचे कंदील एकत्र जमून करायचे, चढाओढीने रांगोळ्या काढायच्या, सर्वाच्या घरी आरतीला जायचे, ही सारी गंमतही चाळीतच असायची. जिवाला जीव देणारी माणसे कशी असतात ते वाडा आणि चाळ संस्कृतीतच समजले आणि म्हणूनच आत्ताच्या या भावनाविरहित घरात त्या संस्कृतीची आठवण प्रकर्षांने होते.

आमचे लग्न झाल्यावर आम्ही आलो बंद दारांच्या ब्लॉक संस्कृतीत. मात्र सुरुवातीला ब्लॉकमध्ये राहायला आलेले सर्वच चाळीतून अथवा वाडय़ातून आलेले असल्यामुळे सुरुवातीला सारेच एकमेकांशी बोलायला उत्सुक असत, त्यामुळे ब्लॉकची दारेही उघडीच असत. होळी, गणपती, कोजागिरी असे सारे उत्सव गच्चीत साजरे केले जायचे, पण जसजशी वर्षे उलटत गेली तसतशी आपुलकी कमी होत गेली. जगण्यात स्पर्धा आली. पैसा मोठा झाला आणि घराचीच नव्हे तर मनाची दारेही बंद झाली. एकमेकांतली आपुलकी नष्ट झाली. इतकी की, आज ४०/४२ वर्षे एकत्र राहून तोंडदेखली चौकशीसुद्धा एकमेकांना करावीशी वाटेनाशी झाली.

इमारत मजबूत असूनही नवीन राहणीमानाप्रमाणे लोकांना टॉवरचे आकर्षण वाटू लागले. त्यात काहींच्या वैयक्तिक स्वार्थापायी बहुमजली इमारतीचे फॅड निघाले. एखाद्या वृद्धाला जसे म्हातारा झाला, त्रास देतो म्हणून वृद्धाश्रमात टाकले जाते तद्वतच घर जुने झाले म्हणून पाडायचा विचार सुरू झाला. वास्तविक मुंबईत अनेक चाळी, जुनी घरे १००/१५० वर्षे जुनी असली तरी चांगल्या अवस्थेत उभी आहेत. आज ४०/४२ वर्षे लग्नापासून वृद्धत्वापर्यंतच्या साऱ्या आठवणी, सुखदु:खाचे क्षण जेथे घालविले ते घर पाडायचे ठरले. आणि साऱ्यांना टॉवरचे वेध लागले. टॉवर बांधायचे पक्के झाले आणि ५ वर्षे बाहेर काढून आम्ही टॉवरमध्ये राहायला आलो. पण जेव्हा जुन्या बिल्डिंगसमोरून जाताना ती बिल्डिंग हातोडे मारून पाडली जात होती तेव्हा जणू कोणी आपलेच हातपाय तोडत आहेत असे वाटून दु:ख होत होते. एवढय़ा वर्षांच्या साऱ्या आठवणी मातीच्या ढिगाऱ्यात गाडल्या जात होत्या. शेवटी मनाला इतका त्रास होऊ लागला की रस्ताच बदलून टाकला. मला समजत नाही की लोकांच्या कसे लक्षात येत नाही की मजबूत बिल्डिंग पाडून आपण कामगारांचे श्रम आणि राष्ट्रीय संपत्तीची हानी नाही का करत!

शेवटी एकदाचे तीन वर्षांनंतर या सातव्या मजल्यावर राहायला आलो. वर्षां-दीड वर्षांतच नव्याची नवलाई संपली. लिफ्ट बंद पडू लागली, नळाला पाणी येईनासे झाले. माणसाचे दर्शन तर दुर्मिळच झाले. रोज नव्या समस्या उभ्या राहू लागल्या. गॅलरीत राहून खाली बघावे तर माणसे मुंग्यासारखी दिसू लागली. वर बघावे तर स्वर्ग जवळ वाटू लागला. लिफ्टने खाली जाणेही जिवावर येऊ लागले. असं म्हणतात की, आपण जे बोललो त्याला वास्तू तथास्तु म्हणते. म्हणून असे वाटते की जेथे टॉवरचा विचार चालू असेल तेथे तरी वास्तूने तथास्तू म्हणू नये आणि परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना की देवा रे सर्वाना सुबत्ता दिलीस तसे सद्विचार, सद्भावना, आपुलकी देरे बाबा!

आमचे लग्न झाल्यावर आम्ही आलो बंद दारांच्या ब्लॉक संस्कृतीत. मात्र सुरुवातीला ब्लॉकमध्ये राहायला आलेले सर्वच चाळीतून अथवा वाडय़ातून आलेले असल्यामुळे सुरुवातीला सारेच एकमेकांशी बोलायला उत्सुक असत, त्यामुळे ब्लॉकची दारेही उघडीच असत. होळी, गणपती, कोजागिरी असे सारे उत्सव गच्चीत साजरे केले जायचे, पण जसजशी वर्षे उलटत गेली तसतशी आपुलकी कमी होत गेली. जगण्यात स्पर्धा आली. पैसा मोठा झाला आणि घराचीच नव्हे तर मनाची दारेही बंद झाली. एकमेकांतली आपुलकी नष्ट झाली. इतकी की, आज ४०/४२ वर्षे एकत्र राहून तोंडदेखली चौकशीसुद्धा एकमेकांना करावीशी वाटेनाशी झाली.

एखादा नवीन पदार्थ केला तर हमखास कोणतरी घरात घुसणार. ‘‘काय काकू, आज काय विशेष. वास छान येतोय.’’ असे म्हटले की हमखास चव बघायला पदार्थ हातावर ठेवावाच लागे. पण हेच शेजारीपाजारी सुखदु:खातही घरच्यासारखेच पाठीशी उभे राहायचे. दिवाळीचे कंदील एकत्र जमून करायचे, चढाओढीने रांगोळ्या काढायच्या, सर्वाच्या घरी आरतीला जायचे, ही सारी गंमतही चाळीतच असायची. जिवाला जीव देणारी माणसे कशी असतात ते वाडा आणि चाळ संस्कृतीतच समजले आणि म्हणूनच आत्ताच्या या भावनाविरहित घरात त्या संस्कृतीची आठवण प्रकर्षांने होते.