* आमचे येथील अनेक जण गेली ७० वर्षे भाडेकरू म्हणून दक्षिण मुंबईमध्ये रहात आहेत. आम्ही सर्वानी आम्हा रहिवाशांची गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला, त्याला आमच्या घर मालकांची हरकत आहे. ते त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास तयार नाहीत. मात्र आमचे मालक इमारतीच्या पुनर्विकासासाठी तयार आहेत.   त्यांच्याबरोबर आम्हा भाडेकरूंच्या अनेक बैठका झाल्या, परंतु प्रत्यक्षात काहीच निष्पन्न झाले नाही. सर्व भाडेकरूंची नोंद झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात काही येत नाही, तरी आपण मार्गदर्शन करावे.

-विलास घाडगे, मुंबई</strong>

panvel marathi news, panvel dispute marathi news
पनवेल : शौचालयाला पाणी मागितल्याने गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाकडून महिलेला शिवीगाळ 
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
Jijau Vikas Party Announces Candidates for Bhiwandi and Palghar Lok Sabha Seats
जिजाऊ विकास पार्टी भिवंडी व पालघर लोकसभा लढवणार
what is nato and its purpose
नाटोची ७५ वर्ष; ही संघटना का स्थापन करण्यात आली? तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय?

*  खरे तर आम्हाला आपल्या प्रश्नाचाच रोख समजला नाही. आपल्या प्रश्नाच्या पहिल्या भागाचे उत्तर म्हणजे आपली भाडेकरू गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्यासाठी काय करावे लागेल यासाठी आपण  उपनिबंधकांची भेट घ्यावी व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. शक्य झाल्यास मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे मार्गदर्शन घ्यावे. आपणाला नॉन को. ऑ. बेसवर नक्की गृहनिर्माण संस्था स्थापन करता येईल. दुसरा प्रश्न म्हणजे पुनर्विकासासंबंधी आपल्या बैठका कुणाबरोबर झाल्या. मालकांनी कुणा विकासकाला विकास करण्याचे हक्क दिले आहेत का? या साऱ्या माहितीनंतरच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर देता येईल. आमच्या मते मालक, भाडेकरू, विकासक अशा तिघांचा करारनामा होणे आवश्यक आहे. त्यात सदर इमारत उपकर लागू असणारी इमारत आहे का? हेदेखील पाहणे आवश्यक आहे. या ठिकाणी सर्व गोष्टींचा ऊहापोह करणे शक्य नाही. तेव्हा आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचीच भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेणे इष्ट ठरेल.

* मी एक पदवीधर अविवाहित असून पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मी फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊ इच्छित आहे, तरी भाडेतत्त्वावर फ्लॅट देण्याघेण्याबाबत मार्गदर्शन करावे. – अजिंक्य बनसोडे, पुणे</strong>

* आपण भोडतत्त्वावर फ्लॅट घेऊ इच्छिता म्हणजे तो लिव्ह लायसन्स पद्धतीने घेणार आहात असे गृहीत धरून हे उत्तर देत आहोत. भाडेतत्त्वावर फ्लॅट घेण्यासंबंधीच्या महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत. – १) लिव्ह लायसन्स करारनामा. हा करारनामा ११ महिने ते ५ वर्षांपर्यंत करता येतो. २) सदर करारनामा मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरून नोंदवावा लागतो. ३) सदर माहिती संबंधित पोलीस ठाण्याला कळवणे आवश्यक असते. ४) सदर करारनाम्यापूर्वी गृहनिर्माण संस्थेची परवानगी घेणे आवश्यक. ५) सदर करारनाम्यांच्या अटी/ शर्ती – १) कालावधी २) फर्निचर ३) मासिक भाडे ४) अनामत रक्कम ५) खाली करण्याची पद्धत ६) जागेचा वापर ७) करारभंग करण्यासाठीचे नियम, इ. यासाठी आपण आवश्यक तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

* आमची जागा ही कलेक्टर लँड आहे. आम्ही कलेक्टर साहेबांकडून १९७३ मध्ये रिलीज ऑर्डर घेतली आहे. तर अशा परिस्थितीत आम्हाला कन्व्हेन्स डीड करता येईल का? – रवींद्र नेहरकर, त्रिरूप सोसायटी

* खरे तर आपली कागदपत्रे व कलेक्टर साहेबांनी दिलेले १९७३ मधील आदेश यांचा अभ्यास आधी करून मगच या प्रकारचे उत्तर देता येईल. परंतु आमच्या माहितीप्रमाणे सदर लँड ही कलेक्टर असेल व ती फ्री होल्डमध्ये रूपांतरित झालेली नसेल तर अशा जमिनींचे खरेदीखत (कन्व्हेन्स डीड) न होता त्यांचा भाडेपत्र करार (लीज अ‍ॅग्रीमेंट) होईल. साधारणपणे, महाराष्ट्र शासन महानगरपालिका, स्वायत्त महामंडळे (एम. आय. डी. सी., सिडको. इत्यादी), म्हाडा यांच्या जमिनींची खरेदीखते होत नाहीत. भाडेपट्टा करार होतात. त्यामुळे आपली कागदपत्रे पाहिल्यावरच आमचे मत देणे इष्ट ठरेल.

* मी एका गृहनिर्माण संस्थेचा सदस्य आहे. आमची गृहनिर्माण संस्था सन २००८ मध्ये स्थापन झाली आहे. आमचे पदाधिकारी कन्व्हेअन्ससाठी प्रयत्न करत आहेत. आमच्या इमारतीचे मंजूर नकाशानुसार ११०० चौ. मी. आहे. आणि बिल्डर आम्हाला १०६५ चो. मीटरचे कन्व्हेअन्स करून देण्यास तयार आहे, तर आम्ही तसे १०६५ चौ. मीटरचे कन्व्हेअन्स करून घ्यावे का? याबद्दल मार्गदर्शन करावे.
– मंदार दामोदरे, पनवेल</strong>

* सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, बिल्डरवर कन्व्हेअन्स करून देण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ते त्यालाच करायला सांगावे. आता प्रश्न राहिला तो म्हणजे १०६५ चौ. मीटरचेच कन्व्हेअन्स का करत आहे याचा शोध घ्या. काही वेळा प्रत्यक्ष कब्जामध्ये तेवढीच जमीन असते. काही वेळा आकडा लिहिण्यात चूक असते की उरलेल्या ३५ चौ. फुटांचा त्याने अन्य काही वापर केला आहे? या सगळ्याची माहिती करून घ्या व खरोखर त्याच्या ताब्यातच १०६५ चौ. मीटरचे क्षेत्रफळ असेल तर तसे खरेदीखत करून घेण्यास हरकत नाही. मात्र त्या खरेदीखतात मंजूर नकाशात ११०० चौ. मीटरचे क्षेत्रफळ दाखवले आहे असा उल्लेख आणल्यास अधिक चांगले होईल.

* माझ्या वडिलांनी १ बीएचके (४५० चौ. फूट अंदाजे) चा फ्लॅट सन १९७२ मध्ये घेतला होता. त्यावेळचे खरेदीखत, करारनामा वगैरे गोष्टी काहीही उपलब्ध नाहीत. आता मला जर तो फ्लॅट विकायचा असेल तर काही अडचणी येतील का? – महेश

* या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी तुमच्या वडिलांनी जो फ्लॅट घेतला आहे त्याची स्थिती काय आहे हे प्रथम समजणे आवश्यक आहे. उदा. तो फ्लॅट गृहनिर्माण संस्थेत आहे का? अपार्टमेंटमध्ये आहे का? त्यांच्या नावावर शेअर सर्टिफिकेट आहे का? त्या फ्लॅटचे टॅक्स बिल, लाइट बिल कुणाच्या नावावर आहे या सर्व गोष्टी कळणे आवश्यक आहेत तसेच फ्लॅट घेणारा कर्ज काढून फ्लॅट घेणार आहे का? तो कोणत्या वित्तसंस्थेकडून कर्ज घेणार आहे हेदेखील समजणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच याबाबत ठाम मत देता येईल. तत्त्वत: हा फ्लॅट विकता येईल असे आम्हाला वाटते.

* मी ठाण्यातील एका गृहनिर्माण संस्थेचा सदस्य आहे. आमच्या संस्थेतील एका सदस्याने कोणालाही न विचारता कोणतीही कल्पना न देता संस्थेच्या आवारात लाकडी टेबले, रॅक, आदी समान ठेवले आहे. त्याबाबत विचारणा केली असता मी ते तात्पुरते १/२ महिन्यांकरता ठेवले आहे. प्रत्यक्षात मात्र ते सामान हलवण्याचा विचार देखील करत नाही. आमच्या संस्थेचा सेकेट्ररी याचे निधन झाले आहे. त्यामुळे ते पद रिक्त आहे. संस्थेतील अन्य सदस्य त्या पदावर काम करण्यास फारसे उत्सुक नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही कोणती कारवाई करू शकतो, याबद्दल मार्गदर्शन करावे, ही विनंती.  – सुनील सारंग

* आपण म्हणता ते अगदी खरे आहे. कोणीही सदस्य संस्थेचे पदाधिकारी होण्यास फारसे उत्सुक नसतातच. तरीसुद्धा संस्थेचे व्यवहार ठप्प होऊ नयेत म्हणून आपणाला कुणाला तरी सेक्रेटरी बनवावे लागेल व ही तांत्रिक बाब पूर्ण करावी लागेल. आपली जी समस्या आहे. ती म्हणजे- फर्निचर संस्थेच्या आवारात ठेवण्यासंबंधी! सुदैवाने या फर्निचर व सामानाची मालकी घेण्यासाठी कोणीतरी सदस्य तयार आहे. आपण कार्यकारिणी मार्फत त्याला एक लेखी पत्र देऊन सदर सामान हलवण्यासाठीची मुदत द्यावी. या पत्रात आपण आणखी एक गोष्ट स्पष्ट करावी ती म्हणजे आपण याबाबत त्वरित कारवाई न केल्यास आपल्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करावी लागेल. एवढे करूनही त्याने जर सदर सामान हलवले नाही तर विशेष सर्वसाधारण सभा बोलावून सदर सदस्याला दंड आकारणीचा ठराव मंजूर करून त्याच्या मासिक देयकात तेवढी रक्कम दाखवावी. न भरल्यास त्यावर सरळ दराने संस्थेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारावे. सदर रक्कमही त्याने न भरल्यास आवश्यक तेवढी थकबाकी जमा झाली की त्या सदस्याविरुद्ध कलम १०१ अंतर्गत वसुली दाखला मिळवण्याची कार्यवाही सुरू करावी.