आज शिवमंदिरातलं वातावरण अगदी मंगलमय होतं. अनेक गावकरी कालच विठुरायाचं दर्शन करून आले होते. आषाढी एकादशीचा उपवास नुकताच सोडला होता. थकावट होती, पण मनं प्रसन्न होती, नवनिर्मितीसाठी आसुसलेली होती. दुपार ओसरता ओसरताच एकेकजण मंदिरात यायला लागला होता. दिंडीतल्या अनुभवांची देवाणघेवाण चालली होती. पुनर्वसू नक्षत्रानेही चांगला शिडकावा केला होता. विहिरी भरल्या होत्या, झरे झुळझुळायला लागले होते, परिसर हिरवागार झाला होता. शिवारात अंकुर फुटले होते. दिवस मावळता मावळता वास्तुपुरुष घाईघाईने मंदिरात शिरला, ‘‘रामराम मंडळी! माफ करा, उशीर झाला मला आज. गेला पंधरवडाभर भूकंपग्रस्त गावांना भेटी देत होतो. तीन पुनर्वसीत गावं राहिली होती, ती पुरी करून आलो आज. सर्व प्रश्न समजले, अडी-अडचणीही समजल्या. उकल आता चर्चेतूनच करू या.’’
वास्तुपुरुषाची नजर बिल्ववृक्षाकडे वळली. काजव्यांनी डोळे मिचकावून इशारा दिला. उपराळकर देवचार आधीच हजर होता. वास्तुपुरुषाने नतमस्तक होऊन सुरुवात केली.
‘‘मंडळी, मी तुमच्या परिसरात भरपूर भटकंती केली आहे. भूकंपग्रस्त आणि मराठवाडय़ातील इतरही परिसर अनुभवला आहे. भूकंपानंतर काही उद्ध्वस्त गावांचं नवीन जागी संपूर्ण पुनर्वसन सरकारी प्रकल्पाद्वारे झालं. काही गावांतील घरांचं नूतनीकरण जुन्या जागीच झालं, सरकारी मदतीने किंवा स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने. तुमच्या गावासारखी अनेक गावं तशीच राहिली, स्वत:च्याच हिमतीवर खडतर प्रसंगांवर आणि परिस्थितीवर मात करत. खडतर हवामानाच्या जोडीला आपल्याला भूकंपप्रवण क्षेत्रालाही सामोरं जायचं आहे, गेल्या भूकंपाच्या दु:खद आठवणी मागे सारत. तुम्हाला सर्वागीण आणि संतुलित विकासाशिवाय पर्याय नाही. शिवाय आधुनिक शास्त्र आणि तंत्रज्ञान यांचाही यथार्थ वापर या विकासात आपल्याला करायला हवा. म्हणजेच पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून आपल्याला विकास नियोजन करायला हवं. गेल्या शिवरात्रीला आपण परिसर आणि शिवार नियोजनासंबंधी तपशीलवार चर्चा केली आणि त्यावर तुम्ही विचारमंथन केलं असेलच. आता पुढे जाऊन ग्रामविकास आणि गृहरचनांसंबंधी मला आपले विचार जाणून घ्यायचे आहेत. तर मग करा सुरुवात!’’
एका तडफदार तरुणाने उत्साहात सुरुवात केली, ‘‘मी लातूरच्या तंत्रमहाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्या निमित्ताने लातूर शहरही मी अनुभवत असतो आणि आमच्या या गावाशी सतत तुलना करत असतो. लोकांचं राहाणीमानही पाहात असतो. मी प्रत्येक सुट्टीत गावी येतो, कुटुंबात रमतो, शिवारात हुंदडतो आणि तृप्त होऊन पुन्हा शहरात जाऊन अभ्यासाला लागतो. पण माझे बहुतेक मित्र मला हसतात. त्यांना शहरी जीवनाचंच आकर्षण आहे. अर्थात मलाही शहरातील अनेक गोष्टी, सुविधा आवडतात. पण मन रमत नाही तिथे. मला संधी मिळाली तर मी आपल्या गावाचंच शहर करीन म्हणतो. कशी वाटते ही कल्पना तुम्हाला?’’
गावकऱ्यांत चुळबुळ सुरू झाली. वास्तुपुरुषाने बिल्ववृक्षाकडे नजर टाकली. काजवे संथपणे ‘येरझाऱ्या’ मारायला लागले होते! वास्तुपुरुषाला त्या तरुणाचं कौतुक वाटलं, ‘‘शाबास मित्रा, आवडला मला तुझा उत्साह आणि तडफ. तुझ्या ‘शहरीकरणा’च्या स्वप्नात मला गावचा रम्य परिसर, शिवारातली शेती, घरोब्याची संस्कृती आणि शहरी सुविधा, तिथलं मनमोकळं वातावरण यांची सांगड होऊ घातलेली दिसते आहे. मी यालाच ‘आदर्श ग्रामविकास’ म्हणेन. चला तर आपण सुरुवात करू या ग्रामरचनेपासून. इथल्या गावांची रचना तर तुम्ही जगतच आहात. शिवाय आजूबाजूची पुनर्वसित गावंही तुम्ही पाहिली आहेत, नवीन जागेत वसलेली सरकारनिर्मित गावंही तुमच्या माहितीची आहेत. शिवाय तुमच्यापैकी अनेकांनी शहरंही थोडीफार पाहिली आहेत, अनुभवली आहेत. तर मग कसं असणार आहे तुमचं ‘आदर्श गाव’?
एका मध्यमवयीन महिलेने पदर खोचून सुरुवात केली, ‘‘मला दोन-तीन अडचणी दिसतात. आमचं हे गाव कसं पूर्वापार घडत आलं आहे, सोयीनुसार जागा आखल्या गेल्या आहेत. जाती-धर्मानुसार वाडय़ा जमल्या आहेत, प्रत्येकाच्या स्वतंत्र विहिरी आहेत. मंदिर, मशीद, शाळा, चावडी यांना सर्वानी मिळून जागा दिल्या आहेत. दुकानं घरांना लागूनच आहेत आणि आठवडय़ाचा बाजार रस्त्यावरच गावाच्या बाहेर भरतो. यात तर बदल आपण करू शकत नाही. आता अधूनमधून वाडय़ा-वाडय़ांमधून झगडे होतात, पण तसं गाव गुण्यागोविंदाने नांदतं आहे. अडचणीही खूप आहेत. नळाने पाणीपुरवठा नाही, वीज मनाप्रमाणे येते जाते, सांडपाणी वाट मिळेल तिथून वाहतं आणि जमिनीत मुरून जातं.
कचराही इकडे तिकडे, सगळं गावच उकिरडय़ासारखं वाटतं कधी कधी. शौचालय नाही. पुरुष जातात शिवारात आणि आम्ही महिला पहाटेपूर्वीच्या अंधारात बसतो कुठे तरी लपतछपत, सर्व लाज गुंडाळून. आता ‘आदर्श’ सोयी इथे आणायला जागा कुठे आहे? काळाबरोबर आता काही गोष्टी चुकीच्या ठिकाणी दिसायला लागल्या आहेत, पण त्या बदलणार कशा आणि कुठे? घरंही अशी, कशीबशी डागडुजी करून सावरली मागच्या भूकंपानंतर. पण आता परत जर धरती थरथरली तर आमचं काही खरं नाही. मला वाटतं बाजूच्या शिवाराच्या जागेत नवं गाव उभारू या, अगदी ‘आदर्श’! पण जागा आणि पैसे कोण देणार? आम्ही बहुतेकजण तर कर्जबाजारीच. सांगा आता!’’
बैठकीने अचानक गंभीर स्वरूप घेतलं. बहुतेक गावकऱ्यांनी त्या महिलेच्या बोलण्याला माना डोलावल्या. काही तरुण मुलं-मुली अस्वस्थ दिसत होती. बिल्ववृक्षावरचे काजवे चक्रावले होते. वास्तुपुरुषाच्या कानात देवचाराचा आवाज घुमला, ‘‘अरे वास्तुपुरुषा, मार्ग सुचव पटकन नाही तर संपूर्ण गाव हतबलतेकडे वळेल. तरुणही निराश होतील.’’
इतक्यात एक तरुण मुलगी उभी राहिली, ‘‘क्षमा करा, लहान तोंडी मोठा घास घेण्याच्या माझ्या अगोचरपणाला, पण राहावत नाही मला हे ऐकत. तुम्ही सर्व ज्येष्ठ गावकरी खरं तर आम्हा मुलांचे गुरुजन. आता गुरुपौर्णिमा येऊ घातली आहे, तेव्हा तुम्हाला वंदन करून आधीच तुमचे आशीर्वाद मागते. आता मात्र तुम्हाला माझं ऐकावं लागेल. मला वाटतं, तुम्हा सर्वाचे विचार गंजत चालले आहेत. नवीन विचारांचीसुद्धा तुम्हाला भीती वाटायला लागली आहे. एवढय़ा मोठय़ा भूकंपातून आपण बाहेर पडलो, मग या सटर-फटर अडचणींना काय घाबरायचं? आपण प्रयत्न केले तर मार्ग नक्कीच निघेल. आपण सर्व मिळून जर जागा वाटपाला तयार झालो, सहकारी तत्त्वावर हा आदर्श गावाचा प्रकल्प राबवायचं ठरवलं तर सरकारकडूनही निधी मिळेल.
आम्ही सर्व तरुण मिळून मोठय़ा बँकांना, उद्योजकांना साकडं घालतो मदतीसाठी. करू परतफेड गेल्या शिवरात्रीला ठरल्याप्रमाणे शेती-उद्योग उभे करून. आम्हाला या नियोजनातलं ज्ञान नाही, पण नवनिर्मितीसाठी जिद्द आहे. तुम्ही ज्येष्ठ गुरुजनांनी आम्हाला ज्ञान पुरवा, तुमचे अनुभवाचे बोल सांगा आणि आपण सर्व मिळून आदर्श नगरी उभारू या, इथेच किंवा नव्या जागेवर.’’ सर्व तरुणाईने ‘जय हो’ चा घोष केला तर ज्येष्ठांनीही माना डोलवून, टाळ्या वाजवून या विचारांचं कौतुक केलं.
वास्तुपुरुषाने बिल्ववृक्षाकडे नजर टाकून मूकसंमती घेतली आणि चर्चेची सूत्रं आपल्या हाती घेतली, ‘‘मंडळी, प्रास्ताविक तर उत्तमच झालं. चला आता नियोजनाच्या विचाराला लागू या. दोन्ही मार्ग आपल्यापुढे आहेत, याच जागी पुनर्निर्मिती किंवा नवीन जागी नवनिर्मिती. पण सर्वप्रथम आपल्याला तज्ज्ञांकडून इथल्या भूगर्भरचनेचा अभ्यास आणि अहवाल मिळवायला हवा. या भूकंपप्रवण क्षेत्रात भूकवचातील भेगा टाळून सुरक्षित उभारणी करायला हवी. जमिनीच्या उंच-सखलतेचाही नीट अभ्यास करायला हवा व त्यानुसार गावाची नवरचना करायला हवी. आपण सर्वानीच परिसरातले सरकारी पुनर्निर्मितीचे आराखडे पाहिले आहेत. कुठेही गावकऱ्यांचं समाधान नाही. घरं मिळाली, पण घरपण लाभलं नाही. गावकऱ्यांच्या मूलभूत गरजा भागल्या नाहीत. गुराढोरांचा, शेतीचा विचार झाला नाही. तेव्हा आपण ही चूक करायची नाही. गावाच्या सर्वसामान्य गरजांचा विचार प्रथम करायचा, आधुनिक सुविधांचाही अंतर्भाव करायचा आणि सर्वसहमतीने नियोजन करायचं. आपल्याला बाहेरील विकासकाची गरज नाही. आपणच सर्वसमावेशक, सर्वागीण आणि संतुलित विकासाची आखणी आणि अंमलबजावणी सहकारी तत्त्वावर करायची. याच जागेवर पुनर्निर्मिती होणार असेल तर विनोबाजींच्या ‘भूदान’ पद्धतीने सर्वजण गावासाठी आवश्यक अधिक जमीन देतील.
रस्तेरुंदीसाठी, सार्वजनिक सुविधांसाठी जागा देतील. जर नवीन जागेवर नवनिर्मिती होणार असेल, तर ज्यांच्या शिवारांची जागा त्यासाठी जाईल त्यांना भरपाई म्हणून जुन्या गावठाणातली जागा देता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वागीण आणी संतुलित विकासाचा विचार. यात कुठेही तडजोड करण्यात येणार नाही. नवनिर्मितीत जाती-धर्मानुसार वाडय़ा असणार नाहीत तर आधुनिक शहरांप्रमाणे सर्वसमावेशक रहिवासी, सांस्कृतिक, व्यापारी, शैक्षणिक, औद्योगिक व कृषी विभाग असतील. इथे सभागृह, व्यायामशाळा, क्रीडांगणं असतील. नगरीचा नियोजन आराखडा हा जमिनीच्या आणि पर्यावरणाच्या अनुकूलतेनुसार असेल. बाजारपेठेसाठी खास जागा व मूलभूत सोयी असतील. आराखडा सौरमार्ग, वाऱ्याची दिशा आणि स्थानिक हवामान यांच्याशी सुसंगत असेल. त्यामुळे तो निसर्गासारखा मुक्तविहारी असेल. सरकारी वीजपुरवठय़ाला पूरक म्हणून सौर व जैविक ऊर्जानिर्मिती गावातच करू या.
संपूर्ण परिसराचा पाणलोट विकास करून गावाला नळ-पाणीपुरवठा करू या आणि पाण्याचा वापर जबाबदारीने करू या. सांडपाण्याचा शास्त्रीय पद्धतीने पुनर्वापर करू या. प्रत्येक घरात तसंच इतरत्र सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय करू या. मैला आणि जैविक कचऱ्याचं खतात रूपांतर करून ते शेतीसाठी वापरू या. हा विकास कृषीआधारित असेल आणि सर्व कृषीउद्योग, व्यापार सहकारी तत्त्वावर चालेल. स्वत: गाव पुढाकार घेऊन ही पुनर्निर्मिती किंवा नवनिर्मिती करत असल्याने सरकारकडून किंवा मोठय़ा उद्योजकांकडून निधी मिळणं शक्य होईल. शिवाय आपण हा निधी परतफेडीच्या तत्त्वावरच घेऊ.’’
सर्व तरुणवर्ग वास्तुपुरुषाचं विवेचन एकाग्रतेने ऐकत होता, तेवढय़ात एका वृद्ध गावकऱ्याने वास्तुपुरुषाला रोखलं, ‘‘गावाची विकास योजना काहीशी समजली. पण आमच्या घरांचं काय? त्यांचं काय होणार नवीन आराखडय़ात? ती सरकारी घरांप्रमाणे होणार असतील तर नको आम्हाला हा विकास.’’
‘‘मी तिकडेच वळतो आहे आजोबा आणि आम्हाला इथे तर तुमच्या अनुभवाची गरज आहे.’’ वास्तुपुरुषाने आजोबांना शांत करून सुरुवात केली, ‘‘मला वाटतं, तुमच्या इथल्या पारंपरिक घरांची रचना अगदी परिसराला समर्पक रीतीने सामोरी जाणारी आहे, ज्येष्ठांनी ती अनुभवातून विकसित केली आहे. तेव्हा आपण त्याच रचनेत काय आवश्यक सुधारणा करायला लागतील ते पाहू. प्रथम म्हणजे, इथली घरं ही भूकंपाला सामोरी जाणारी असली पाहिजेत. त्यामुळे त्यासाठी तंत्रज्ञानानुसार आवश्यक ते बदल आपल्याला करायला लागतील. आपण पाहिलं की भूकंपात विस्कळीतपणे बांधलेल्या, सांधेतोड नसलेल्या दगडी भिंती कोसळल्या, अवजड धाब्याची छप्परं कोसळली आणि अनेक जीव गेले. आता आपण हेच दगड-गोटे वापरून, सिमेंट-चुन्याच्या साहाय्याने, मशीनने मोठे ठोकळे तयार करू. हाही एक रोजगार उपलब्ध होईल, सामानाचा पुनर्वापर होईल, खर्चात बचत होईल. हे ठोकळे वापरून, सांधेतोड करून भिंती अशा बांधू की बाहेरून घर दगडी, अगदी पारंपरिक पद्धतीचं दिसेल, तर आतून गिलावा केल्यासारखं असेल. दगडी भिंतींमुळे इथल्या विषम हवामानातही घरं आतून सुखावह राहतील. हे बांधकाम वेगाने होईल आणि भूकंपविरोधक तंत्र वापरल्याने घरं सुरक्षित राहतील. छप्परात बदल करून ती हलकी करावी लागतील, उतरती करावी लागतील. यासाठी कौलं किंवा पत्रे वापरता येतील. असं छप्पर तापू नये म्हणून त्याला वर बांबूंच्या चटयांचं आवरण करता येईल. वर भाजीपाल्याचे वेल सोडता येतील. बाकी खिडक्या, दरवाजे ही रचना पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे आतल्या चौकाच्या बाजूनेच आणि लहान आकाराच्या असतील. धाबा गेल्याने आता वाळवण, रात्रीचं झोपणं यासाठी चौकाचाच वापर करू, त्यासाठी चौकाचा आकार वाढवू. सौरगवाक्षाचा उपयोग करून ऊन-सावलीचा समर्पक वापर करू. आता प्रत्येक घरात स्वच्छतागृह असलंच पाहिजे. त्यावर आणि गोठय़ावर जैविक ऊर्जेची निर्मिती करून ती स्वयंपाकघरासाठी पुरवू. संपूर्ण गावाचं सांडपाणी सखल भागाकडे भुयारी पद्धतीने नेऊन त्याचं जैविक शुद्धीकरण करून शेतीसाठी पुनर्वापर करू. घराघरांचे गट करून सौरऊर्जेचा वापर विजेला पूरक म्हणून करू. घराघरांत वापरलेलं पाणी अंगणातील बागायतीला वापरू, घराचा परिसर आद्र्र आणि शीतल ठेवू. ही झाली अगदी मूलभूत सूत्रं. हे सर्व करताना आपण सर्वजण बांधकाम आणि दुरुस्तीचं तंत्रज्ञान आत्मसात करू आणि स्वावलंबी होऊ.’’
गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसू लागलं. तरुणवर्गात तर उत्साहच संचारला. वास्तुपुरुषाचं मन प्रसन्न झालं. तो बिल्ववृक्षाकडे पाहून म्हणाला, ‘‘उपराळकर देवचारा, कशी वाटली माझी योजना? शिवाय ही योजना फक्त याच गावासाठी, परिसरासाठी न राहता ती इतर अशाच खडतर, विषम हवामानाच्या परिसरात वापरता येईल. गुजरातमधील भूज परिसरात असाच हाहा:कार भूकंपाने केला होता. तिथे किंवा राजस्थानच्या मरुभूमीतही हीच योजना थोडेफार समर्पक बदल करून वापरता येईल. आशीर्वाद असू दे गुरुदेवा, गुरुपौर्णिमेचा!’’
बिल्ववृक्षावरील काजवे जोमाने लखलखले. चांदण्या रात्री दुरून मोरांचा केकारव झाला. वास्तुपुरुष आनंदला. येणाऱ्या पुष्य नक्षत्राचं स्वागत त्याचं वाहन करत होतं. वास्तुपुरुषाने निर्धार केला आता दुसऱ्या परिसरात मार्गक्रमण करण्याचा. मध्यभारतातील समशितोष्ण प्रदेशात जायचा. उपराळकरानेही मान्यता दिली त्या विचाराला आणि ठरवलं भेटायचं आषाढ अमावास्येच्या मुहूर्तावर, येणाऱ्या मंगलमय श्रावणाचं स्वागत करायला!
ulhasrane@gmail.com