येत्या काही काळातही डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव राहणार असल्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले. या पाश्र्वभूमीवर हे आजार टाळण्यासाठी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सुचविलेले उपाय..

राज्यातील सर्व प्रमुख शहरांत तसेच ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. उपलब्ध माहितीनुसार गेल्या वर्षांच्या तुलनेत या वर्षी ऑगस्ट २०१६ पर्यंत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होऊन ती २५७२ इतकी नोंदविण्यात आली आहे. त्यात विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक या शहरांमध्ये डेंग्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवरून एक गोष्ट सिद्ध होते की, साधारणत: ऑगस्टमध्ये म्हणजेच ऋतू बदलाच्या काळात एडिस इजिप्ती या डासांची पैदास वाढून डेंग्यूच्या साथीला सुरुवात होते व ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात वाढीस लागते. साधारणत: ३० टक्के नागरिक हे पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेतात. पालिका रुग्णालयातील साथीच्या आजारांच्या रुग्णकक्षात मर्यादेपेक्षा अतिरिक्त रुग्ण दाखल करण्यात आले असून, अनेक रुग्णांना चटईवर झोपवून तर काही ठिकाणी एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवून उपचार करण्यात येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया झालेल्या रुग्णांची संख्या सरकारी आकडेवारीपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अशा साथींच्या आजारावर अत्यंत परिणामकारक अशी उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे.

bournvita not health drink
बोर्नविटा ‘हेल्थ ड्रिंक’ नाही? केंद्र सरकारने का काढला असा आदेश?
Over 100 Private Hospitals in Pune Operate Without Renewed Licenses
धक्कादायक! पुण्यात शंभरहून अधिक रुग्णालये विनापरवाना
chhagan bhujbal, armstrong company
भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जिल्हा बँकेकडून २६ कोटींचा लाभ, थकीत कर्जफेडीसाठी ‘ओटीएस’ योजनेत सहभाग
Two nurses have been immediately suspended for transfusing blood of wrong blood group to two patients in Aundh District Hospital Pune news
रुग्णांच्या जिवाशी खेळ महागात! जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिका तत्काळ निलंबित

डेंग्यू हा एक विषाणूजन्य ( व्हायरल ) आणि डासामार्फत होणारा आजार आहे. एडिस इजिप्ती जातीचा डास चावल्यामुळे कोणत्याही वयाच्या व्यक्तीला हा रोग होतो. या डासाची मादी दिवसा चावते. त्यामुळे अचानकपणे ताप येतो. अंनोफिलिस डासाची मादी चावल्यामुळे कोणत्याही वयाच्या व्यक्तीला मलेरिया हा रोग होतो.

प्रतिबंधक उपाययोजना :  महानगरपालिका

पातळीवर :–  डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे :  मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरात हजारोंच्या संख्येने नवीन बांधकामे सुरू आहेत. बांधकामाच्या ठिकाणची एकूण परिस्थितीच डासांच्या उत्पत्तीस प्रामुख्याने कारणीभूत ठरते. बांधकामाच्या ठिकाणी पत्रे,

पाण्याचे पिंप, पाणी साठविण्यासाठी बांधण्यात आलेले हौद, हेल्मेट, घमेले, एम. एस. चॅनेल्स, कामगारांच्या झोपडीसदृश घरावर लावण्यात येणाऱ्या ताडपत्री वा प्लास्टिकला पडणाऱ्या घडय़ा आदी ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. इमारतीच्या बांधकाम परिसरात तळघर व जमिनीखाली

असलेल्या परिसरामध्ये पावसाचे पाणी किंवा झिरपणारे पाणी साचू नये यासाठी अधिक क्षमतेचे पंप बसवून पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. इमारतीतील शौचालये, न्हाणीघरासाठी केलेल्या खड्डय़ामध्ये तसेच इतर ठिकाणी क्युरिंग प्रक्रियेसाठी टाकण्यात आलेले पाणी योग्य वेळी काढून टाकावे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डॉक्टरची नियुक्ती करणे, कामगारांना आरोग्य पुस्तिका देणे, नव्या कामगारांची हिंवतापविषयक रक्त चाचणी करून घेणे, कामगारांना मच्छर प्रतिबंधक जाळ्या उपलब्ध करून देणे व कामगारांचा निवासाचा परिसर स्वच्छ ठेवणे विकासकांना बंधनकारक करण्यात आले असून, वरील आदेशाचे पालन न करणाऱ्या विकासकांचे बांधकाम थांबवून त्यांच्याविरूद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जनजागृती  :  सहकारी गृहनिर्माण संस्था, बैठय़ा चाळी, झोपडपट्टय़ामध्ये फिरून डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांना आमंत्रण देणारी डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पालिका कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविका व सामाजिक संस्थांच्या मदतीने घरामध्ये डासांच्या अळ्या होऊ  नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत नागरिकांना माहिती देण्यात यावी. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे झोपडपट्टीपेक्षा टॉवरमध्ये डासांची उत्पत्ती चौपट प्रमाणात आढळून आल्याची माहिती पालिकेच्या पहाणीत उघड झाली आहे. चर्चगेट येथील यशोधन इमारतीमधील चार बडय़ा सनदी अधिकाऱ्यांच्या घरात तसेच वांद्रे येथील चित्रपट अभिनेत्यांच्या घरात एडिस इजिप्ती डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई कोणावर व कशी करावी हा मुख्य प्रश्न आहे.

१) स्वच्छतेबाबतची अनास्था  :  मोठा गाजावाजा करण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियान योजनेची अवस्था दयनीय आहे. स्वच्छतेबाबत आपल्या अनास्थेमुळेच विविध साथींच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. याला पालिकेबरोबर सर्वसामान्य नागरिकही तितकेच जबाबदार आहेत.

२) शहरात गल्लोगल्ली व प्रमुख रस्त्याच्या मार्जिनल जागेत व फुटपाथवर बेकायदेशीररीत्या चालविण्यात येणाऱ्या कटिंग चहाच्या टपऱ्या तसेच विविध प्रकारच्या खाद्य पदार्थाच्या व चायनीजच्या गाडय़ादेखील डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरत आहे, याचे भान सर्व नागरिकांनी ठेवणे आवश्यक आहे. अशा टपरीधारकांचे सर्व व्यवहार म्हणजे कप/ग्लास विसळणे, प्लेटस् धुणे, भांडी धुणे वगैरे सर्व व्यवहार रस्त्याच्या कडेला चालतात. सर्व प्रकारची घाण व घाणेरडे पाणी रस्त्यालगत जमा होत असते. त्यांची पाणी साठविण्याची प्लास्टिकची पिंपे व डबे यांची तपासणी करून कारवाई होणे आवश्यक आहे.

३) शहरातील चौकाचौकांत असणारी वाहतूक बेटे व उद्यानात बसविण्यात येणाऱ्या कारंज्याच्या तळाशी व इतरत्र पाणी साचू न देणे.

४) शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या पाणी साठविण्याच्या टाक्यांची नियमित तपासणी करणे.

डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया निर्मूलनासाठी महानगरपालिका अधिकारी प्रत्यक्ष कृती करण्याऐवजी  केवळ कागदी घोडे नाचविण्यातच धन्यता मानत आहेत. एकीकडे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका  जनजागृती  करीत आहे, तर दुसरीकडे डासांच्या उत्पत्तीचे मुख्य कारण ठरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना मात्र केवळ नोटिसाच बजावून कारवाई करण्याचा इशारा देण्यात येत आहे; परंतु आजपर्यंत अशा दोषी बांधकाम व्यावसायिकांवर तसेच बेकायदा टपरी धारकांवर / रस्त्यावर खाद्य-पदार्थ विकणाऱ्यांवर कोणतीच कारवाई  होताना दिसत नाही. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या आजारांचा सामना स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व नागरिकांनी मिळूनच करणे ही काळाची गरज आहे.

प्रतिबंधक उपाययोजना

* घरातील शोभेच्या झाडांच्या कुंडीखाली ठेवण्यात येणाऱ्या प्लेटमध्ये पाणी साचू देऊ  नये.

*  फेंगशुईप्रमाणे घराची वास्तुरचना करताना एका धातूच्या प्लेटमध्ये पाणी ओतून त्यामध्ये धातूचे कासव ठेवतात. अशा वेळी नियमितपणे पाणी बदलण्याची काळजी घ्यावी.

*   एअर-कुलरमधील तसेच फ्रीजच्या मागील भागात साचलेले पाणी नियमितपणे काढून टाकावे.

*   वातानुकूलित यंत्रातून पडणारे पाणी ट्रे अथवा बादलीमध्ये जमा होत असेल तर दररोज असे जमा होणारे पाणी काढून टाकावे.

*   पाणी साठविण्याची सर्व भांडी, टाक्या, इत्यादी योग्य प्रकारे झाकून ठेवणे.

*   नारळाच्या करवंटय़ा, रबरी टायर्स, रिकामे डबे यामध्ये पाणी साचून रहाते म्हणून अशा वस्तू कचराच्या डब्यात फेकून देणे.

*   झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

*   आपले घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.

*   गप्पी मासे डासांच्या अळ्या खातात. म्हणून साठवणीच्या / साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावेत.  महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत गप्पी मासे मोफत दिले जातात.

*   डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाचे रुग्ण आढळल्यास महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास त्वरित कळवावे. म्हणजे संबंधित कर्मचारी रुग्ण संशोधन कार्यवाहीसाठी बाधित घराचा व परिसरातील आजूबाजूच्या घरातून डासांच्या अळ्या /उत्पत्ती स्थानांचा शोध घेतील व रासायनिक धूर फवारणी करतील.

विश्वासराव सकपाळ vish26rao@yahoo.co.in