अभिजीतने एवढा मोठ्ठा फ्लॅट घेतला तेव्हा त्यांना केवढे कौतुक वाटले होते. तीन बेडरूम हॉल किचनचा सुमारे १२०० स्क्वे. फुटांचा ऐसपैस फ्लॅट १०-१२ पाहुण्यांना एका रात्रीच्या निवाऱ्यासाठी अपुरा कसा पडू शकतो, याचे कोडे त्यांना उलगडत नव्हते.
भल्यामोठय़ा बाल्कनीत बसून रेखाताई अभिजीतची, म्हणजे त्यांच्या लेकाची हॉटेलमधल्या खोल्या बुक करायची धावपळ बघत होत्या. त्यांच्या नातवाच्या मुंजीसाठी बाहेरगावाहून १०-१५ पाहुणे येणार होते. खरे तर पाहुणे तरी कसे म्हणायचे त्यांना.. अभिजीतचीच आते, चुलत, मावस भावंडे होती. धावतपळत मुंजीच्या आदल्या दिवशी येऊन मुंज आटोपल्यावर दुसऱ्या संध्याकाळी परतणार होते. मुंज होती एका शानदार ए.सी. हॉलमधे. म्हणजे फक्त एका रात्रीचा झोपण्याचा प्रश्न होता. त्यासाठी हॉटेलच्या खोल्या बुक करायची काय गरज, हा प्रश्न त्यांनी लेकाला विचारल्यावर, ‘आई कमालच करतेस तू. अगं ते सगळे झोपणार कुठे?’ लेकाने आईकडे विचित्र नजरेने पाहत त्यांना प्रतिप्रश्न केला. उतारवयात आता कुठल्याच बाबतीत आग्रह न धरण्याचे पथ्य पाळणाऱ्या रेखाताई मग गप्पच बसल्या. त्यांची नजर सहजपणे लेकाच्या घरावरून फिरली. अभिजीतने एवढा मोठ्ठा फ्लॅट घेतला तेव्हा त्यांना केवढे कौतुक वाटले होते. तीन बेडरूम हॉल किचनचा सुमारे १२०० स्क्वे. फुटांचा ऐसपैस फ्लॅट १०-१२ पाहुण्यांना एका रात्रीच्या निवाऱ्यासाठी अपुरा कसा पडू शकतो, याचे कोडे त्यांना उलगडत नव्हते. विचार करताना त्यांच्या आठवणीची माळ थेट अभिजीतच्या मुंजीपर्यंत गेली. त्या वेळचे त्यांचे घर म्हणजे सर्व बिऱ्हाडांना कॉमन गॅलरी असलेले तीन खोल्यांचे होते. खरे तर दोनच खोल्या, पण बाहेरच्या मोठय़ा खोलीला लाकडी पार्टिशन घातल्याने तीन खोल्यांचे म्हणायचे. त्यांचा सगळा संसाररूपी प्रवास त्या आगगाडीच्या डब्यासारख्या घरातच पण सुखासमाधानाचा झाला होता. त्या गाडीच्या डब्यातच अनेक पाहुण्यारावळ्यांची चढउतार ये-जा चालायची. पण आजच्यासारखे जागेच्या प्रश्नाने भेडसावले नव्हते. कारण ती जागा मुळात कुणाला अपुरी वाटायचीच नाही. ना यजमानांना ना पाहुण्यांना.
अभिजीतच्या मुंजीला इथूनतिथून थोडी न थोडकी २०-२५ मंडळी हौसेने येणार होती.. कुणी वडीलधारी मदतीसाठी ८-१० दिवस आधीपासून तर कुणी मुंज आटोपल्यावर मुंबई फिरण्यासाठी २-४ दिवसांसाठी तर कुणी धावतपळत जेमतेम १-२ दिवसाला. या सर्वाना प्रेमाने आग्रहाचे आमंत्रण करताना येणाऱ्या पाहुण्यांच्या सामानाची जेवणा-झोपण्याची सोय कशी करायची, हा प्रश्न त्या दोघांना पडलाच नाही आणि कौतुकाने आलेल्या पाहुण्यांनाही आपण तिथे कसे राहणार आहोत याची चिंता नव्हती. जिन्याजवळच्या काकूंनी कोकणात जाताना आपल्या सिंगलरूमची चावी रेखाताईंच्या हवाली करून त्यांच्या पाहुण्यांसाठी खुशाल वापरायला सांगितली होती. होमहवनासाठी खोल्या मोकळ्या करायच्या म्हणून घरातले किती तरी सामान २-४ दिवस गॅलरीत बिनदिक्कतपणे ठेवले होते. जिथून शेजाऱ्यांचा राबता असे. मुंजीच्या आदल्या दिवशी केळवणाला ४०-५० जण जेवायला होते, अगदी शेजाऱ्यांच्याही घरी पंगत बसवली होती. इतक्या माणसांची झोपण्याची सोयही अगदी तशीच स्वयंपाकघरापासून पार गॅलरीत आणि काका-काकूंच्या खोलीत केली होती. आजूबाजूच्या अशाच दीडखणी खोलीतल्या शेजाऱ्यांनी अभिजीतची मुंज म्हणजे घरचे कार्य समजून यथाशक्ती मदत केली होती. शेजाऱ्याच्या आठवणीसरशी त्यांना सध्याचे मजल्यावरचे एकमेव शेजारी डोळ्यासमोर आले. जेमतेम अडीच माणसांच्या त्या अवाढव्य घराला दिवसाचे १०-१२ तास कुलूपच दिसायचे. आठवडय़ात केव्हा तरी दर्शन झाले की काय म्हणताय. तब्बेत बरीय ना? यापलीकडे संभाषण जात नसे.
परवा मुंजीनिमित्त जमणारी ही भावंड कायमच सुट्टीत एकत्र जमायची. खोली लहान असली तरी दाटीवाटीने एकत्र झोपायचा हट्ट असायचा मध्यारात्रीपर्यंत गप्पागोष्टींना खंड नसे. एकाच दिशेने इंग्रजी ‘सी’च्या आकारात पाय पोटाशी घेऊन झोपलेल्या त्या पोरांकडे पाहून सासूबाई त्यांना केळ्याचा घड म्हणायच्या, त्या आठवणीने हसू आले. मोठय़ा एकलकोंडय़ा बंगल्यात नाही तर सामान्य घरात ज्याने भावंडांबरोबर एकेकाळी ही धमाल अनुभवली त्यालाच आज त्याच भावंडांची ऐसपैस घरात सरबराई करताना भांबावलेले पाहून त्या चकीत झाल्या. त्यांना वाटले कधीपासून बदलली बर या नव्या पिढीची मानसिकता? उच्चशिक्षण आणि आर्थिक स्तर उंचावला म्हणावे तर आपणही शिक्षित होतोच की आणि आर्थिक परिस्थितीही अगदी हलाखीची वगैरे बिल्कुल नव्हती. हा.. आजच्यासारखे येताजाता शॉपिंग आणि हॉटेलिंग नव्हते, पण खाऊनपिऊन सुखीच होती आधीची पिढी.
जागतिकीकरणानंतर एकूणच घराकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलला की काय? बांधकाम व्यावसायिकांनी अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त घरांच्या आकर्षक जाहिरातींचा भडिमार करताना परदेशासारखी व्यक्तिकेंद्रित जीवनशैलीपण आपल्यात रुजवली का? स्वत:साठी स्पेस शोधायची सुरुवात या घरांपासूनच झाली का? पूर्वीच्या घरात कुणाची अशी विशिष्ट खोली नव्हती. सगळ्या खोल्या तिथले सामान पुस्तके कपडे सगळे कॉमन कपाटात सामावलेले होते. या नव्या घरासारखी मास्टर बेडरूम, मुलांची रूम, गेस्टरूम वगैरे प्रकारच नव्हते. घरातील आहे त्या जागेचा अगदी पुरेपूर वापर करण्यात कुणालाच गैर वाटत नसे. म्हणूनच तर अभिजीतच्या हॉलमधले फर्निचर सरकवून मुंजीसाठी आलेल्यांची झोपायची व्यवस्था करता येईल, अशी रेखाताईंची अटकळ होती. इतकेच काय हॉलसकट प्रत्येकाच्या बेडरूममध्ये खाली अंथरुणे पसरली तर १५-२० जणांना आरामात झोपता आले असते.. पण हॉलमध्ये झोपायचे नाही. किचनमध्ये तर नाहीच नाही. जमिनीवर झोपायचे नाही नव्या जीवनशैलीमधे हे सर्व माणसा-माणसात अदृश्य भिंती उभारणारे नियम कुणी केले? कधी केले? अगदी गरज पडल्यावरही ते मोडायचे नाहीत हा नियमसुद्धा कुणी केला? या आजकालच्या मजबूत पॅकेज आणि सुलभ गृहकर्जामुळे नव्या पिढीला आधुनिक घरांचे आकर्षण वाटणे स्वाभाविकच होते. पण घरे बदलली, विस्तारली तरी तिथल्या माणसांची मानसिकता का बदलावी? त्यांच्या विचारांचा संकोच का व्हावा? जर माणसे एकमेकांपासून दुरावताहेत तर जग जवळ आलेय कसे म्हणायचे?
आजकाल वास्तुशास्त्रज्ञांच्या सल्ल्याने नवी घरे बांधली जातात जेणेकरून तिथे सुखसमृद्धी नांदते, असे रेखाताईंनी ऐकल्यावर त्यांना पूर्वीची त्यांची तसेच आसपासच्या कुठल्याही दिशेने वसलेल्या अनेक वाडय़ा व चाळी आठवल्या त्यांच्या बांधकामाच्या वेळी कुणी वास्तुशास्त्राचा विचार केला असेल का? पण रेखाताईंसकट तिथल्या प्रत्येक रहिवाशाने आपल्या जीवनात सुखदु:खाचा लपंडाव अनुभवला होता, जो कालचक्राला अनुसरूनच होता. असंख्य विचारांनी रेखाताईंना अगदी भंडावून सोडले. मोठ्ठी जागा आणि मोजकी माणसे असे व्यस्त प्रमाण असणाऱ्या त्या आधुनिक गृहसंकुलाकडे बघताना रेखाताईंना वाटायला लागले की, इथला प्रत्येक माणूस स्वत:ची स्पेस जपत एकेकटा हस्तिदंती मनोऱ्यात राहतोय आणि अशा अनेक मनोऱ्यांना इथल्या प्रत्येक गगनचुंबी टॉवरने आपल्यात सामावून घेतलेय.
alaknanda263@yahoo.com