‘रोममध्ये रसपुरी आणि पॅरिसमध्ये पास्ता’ जेवायला देऊ अशी घोषणा करणारी एक गुजराती प्रवासी कंपनी मुंबईत होती. परदेशात लोकप्रिय जेवण दिल्यानं तिचा व्यवसाय जोरात चालला. हजारो गुजराती युरोपला जाऊन आले. पुढे ती शैली अनेकांनी अंगीकारली. समृद्धीप्राप्त समाजाला खाण्यापिण्याची आबाळ झालेली आवडत नाही, हे त्यांनी हेरलं होतं.
तशी गुरगावनं हाक दिली की जगातल्या उत्तम सोयी आम्ही देऊ. सर्वानी या आणि उद्योग स्थापा आणि स्वत:चा विकास करा. त्याची पाश्र्वभूमी अशी की ‘डीएलएफ’ दिल्ली लँड अ‍ॅण्ड फायनान्स कंपनी जी दिल्लीत जमिनींची उलाढाल आणि गृह निर्मिती करत होती, ती कंपनी पुढे दिल्ली डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी निर्माण झाल्यानं जमिनींचा खासगी विकास थांबवला गेला. त्यामुळे डीएलएफनं आपला मोर्चा दिल्लीच्या हद्दीबाहेर हलवला. दिल्लीत फक्त ‘दिल्ली डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ घरं बांधते. इतरांनी बांधायला जागा नसते. त्यामुळे दिल्लीकर गुरगावात पसे गुंतवण्यासाठी घर घेतात.
तेवढय़ात सरकारनं मारुती उद्योग गुरगावजवळ स्थापला आणि गावाचं नशीब उजळलं. नंतर मुक्त जागतिक बाजारपेठेला चालना मिळाल्यावर अनेक अमेरिकन कंपन्या गुरगावात उतरल्या. जवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यानं ते सोयीचं झालं. एकेक करत परदेशी कंपन्यांनी आपलं बस्तान बसवलं. त्यामुळे गुरगाव एक औद्योगिक आणि आयटी क्षेत्रातलं केंद्र झालं. इतके उद्योग स्थापले गेल्यावर तिथे काम करणाऱ्यांना राहण्यासाठी सोयी निर्माण झाल्या. गमतीचा भाग असा की, गुरगावानं शेजारच्या दिल्लीची शैली न अंगीकारता गृहनिर्मितीच्या बाबतीत मुंबईची शैली उचलली. तर कॉर्पोरेट ऑफिसांसाठी युरोप अमेरिकेतील शैली अंगीकारली. परदेशी प्रतिमा चिकटवून तयार झालेल्या नव्याच शैलीला पोस्ट मॉडर्न असं गोंडस नाव दिलं.
गुरगाव हे उंच घरं, मॉल आणि मोठय़ा कंपन्यांची कार्यालयं यांनी बनलं आहे. मॉल मल्टिप्लेक्स अमेरिकेच्या धाटणीवर बांधलीत. युरोप-अमेरिकेसारख्या इमारती आणि वातावरण निर्माण झाल्यानं स्वत:ला नवी म्हणवणारी दिल्लीसुद्धा जुनी वाटायला लागली. पाहावं तिकडे काचेच्या इमारती झाल्या. तसं पाहता आता मुंबई-पुण्याचे लोक काचेच्या इमारती पाहून दचकेनासे झालेत. पुण्यात मगरपट्टा काचेच्या आयटी इमारतींनी भरलं आहे, तर मुंबईला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स.
बरेच लोक अमुक ब्रँडचे शर्ट, बूट, शेिव्हग क्रीम किंवा बॅग विकत घेतात. त्यांना त्याहून खालच्या दर्जाची वस्तू विकत घेणं मनात येत नाही. ते भारी घडय़ाळं आणि फ्रेंच कंपनीचा परफ्यूम वापरतात. मल्टीनॅशनल कंपनीत काम करत असल्यानं वरचेवर परदेशात जातात. तिथलं दृश्यचित्र त्यांच्या मनावर कोरलेलं असतं. त्यांना देशी वस्तू रुचत नाहीत. त्यांच्या आई-वडिलांचीही परदेश वारी झालेली असते. सगळ्यांवर ‘इंपोर्टेड’ची मोहिनी असते. हल्ली लोकांचा जास्तीचा पसा स्थावर मिळकतीत गुंतवण्याचा कल वाढला आहे.
इथे फ्लॅट घ्यायचा असेल तर ‘व्हीनस रिजन्सी’ किंवा ‘मोनालिसा हाइटस्’ हे नाव जवळचं वाटतं. कारण त्यानं त्या दोघींना पॅरिसच्या लुब्र म्युझियममध्ये पाहिलेलं असतं. कोणी बास्रेलोनाला जाऊन आलेला असतो, त्याला हाउसिंग कॉम्प्लेक्सचं नाव ‘कासा व्हिग्नेट’ असलेलं आवडतं. यात ‘कासा’ म्हणजे घर आणि व्हिग्नेट म्हणजे अलंकारिक डिझाइन. बिल्डर्स तर सर्वाच्या आधीच युरोप-अमेरिका फिरून आलेले असतात. त्यामुळे ते त्यांच्या कॉम्प्लेक्सचं नाव ‘शकुंतला गृहसंकुल’ ठेवूच शकत नाहीत. कारण जो वर्ग त्यांचे अपार्टमेंटस् घेणार असतो तो त्याला चालणार नाही, हे माहीत असतं. पुणे- बंगलोर किंवा सायबराबादला तसंच असतं. त्यामुळे बिल्डर लोक परदेशी आकार आणि रचनेच्या लकबी दर्शनी भागांना चिकटवून देतात ते त्यावर्गाच्या पसंतीला उतरतात. कॉर्पोरेट ऑफिस काचांनी मढवतात. नाहीतर आयटीवाल्या तरुणांना आपण कारकुनांपेक्षा वेगळ्या वातावरणात काम करतो आहोत असं वाटणार नाही. त्यांना घर घ्यायचं असेल तर ते अक्काबाईसारखं नको असतं. त्यांना सगळं हटके हवं असतं. पूर्वी गुरगावला जाणं दगदगीचं होतं. आता हुडासिटीपर्यंत मेट्रो जाते. आम्ही जाताना जनकपुरीतल्या मित्राकडे जायचं असल्यानं बसनं गेलो. हरियाणाच्या छोटय़ा बसनं गुरगावात गेलो. खडकाळ रस्त्यांमुळे बस िहदकळत होती. तशा बसेस पूर्वी दिल्लीत होत्या. त्या बसला कंडक्टर दाराला लटकून उभा असतो. प्रवासी दिसला की ‘रूको’ असं ओरडून बस गचकन थांबवतो. त्या माणसाला आत ढकलतो आणि पुन्हा बस चालू होते. आधीच हरियाणवी म्हणजे जरा दांडगटच. त्यातही त्यांची तरुण पोरं बस कंडक्टर आणि ड्रायव्हर मग बघायला नको. कॉर्पोरेट ऑफिसं आणि हाउसिंगच्या विस्तारात पोचेपर्यंत तो धसमुसळा प्रवास लक्षात राहतो.
एकदा का रिक्षेनं गेटेड कम्युनिटींमध्ये पोहोचलं की हिरव्यागार बगीच्याभोवती वीस मजली उंच इमारतींचा घोळका उभा असतो. तिथे गेल्यावर टॉवर नंबर घर नंबर माहिती असणं अनिवार्य असतं. लिफ्टनं अठराव्या मजल्यावर मित्राकडे पोचलो आणि आमचा दिल्ली ते गुरगाव प्रवास पार पडला.  दिल्लीच्या परिसरात कौरव-पांडवांपासूनचा इतिहास आहे. मग त्यात पानिपतही येतं आणि कौरव-पांडवांचे गुरू द्रोणाचार्याना दिलेलं गाव ‘गुरू गाव’ ही येतं, म्हणून ते गुरगाव. या गावाजवळ मानेसरला मारुती मोटारीचा कारखाना स्थापन झाला आणि गुरगाव एकदम जगाच्या नकाशावर पोहोचलं. तेव्हा मारुतीचं कोण कौतुक होतं! आता बीएमडब्ल्य, ऑडी किंवा फेरारी शेजारून गेली तरी कोणी पाहात नाही. हे मात्र मुंबई आणि दिल्लीत दिसतं. या दोन महानगरांतला मध्यम वर्गापाशी इतकी अवांतर माहिती असते की, जी भारतातल्या कोणत्याही नगरातल्या लोकांकडे नसते. गुरगावात अमेरिकेची जनरल इलेक्ट्रिक कंपनी आली. गुरगावचा चेहरा बदलून गेला. मित्राचा मुलगा फिलिप्समध्ये आहे. विशाल ऑफिस आहे. पाच-सहाशे शिक्षित कर्मचारी तिथे काम करतात. फिलिप्स कंपनीचे एकशे साठ देशांत उद्योग आहेत. ती कंपनी हॉस्पिटलांना लागणारी साधनं बनवते. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असल्यानं सगळं कसं पाश्चात्त्य देशात असावं असं आहे. उच्चशिक्षित तरुणांना चांगले पगार आहेत. आॉफ्टवेअर कंपन्यांना दिल्लीत जागा घेण्यापेक्षा गुरगावात घेणं सोयीचं वाटतं. त्यामुळे जे जे नवं ते गुरगावात आलं. पुण्याचं मगरपट्टा आणि हिंजेवाडी, मुंबईचं बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि पवई, कोलकात्याचं सॉल्टलेक ही सगळी चित्रं एकत्र डोळ्यांसमोर आणली ते जे मिश्रण तयार होईल ते म्हणजे गुरगाव. त्यामुळे गुरगावची एकसंध नवीच दृष्यभाषा झालीय. त्यामुळे ते भारतातल्या कोणत्याही महानगराच्या उपनगरापेक्षा वेगळं आहे. रस्त्यानं फिरताना अनेक कंपन्यांची कार्यालयं दिसतात. आपण आपल्या गरीब देशात आहोत असं वाटत नाही. पाहून पाहून डोळे गरगरून जातील असे प्रचंड मॉल आहेत. गुरगाव आंतरराष्ट्रीय स्तरावरचं महत्त्वाचं बिझनेस प्रोसेसिंग केंद्र झालं आहे. सगळ्या प्रांतांतले तरुण इथं जमलेत. त्यांनी नवे संसार थाटलेत. ते इथे किती विरघळतील ते काळ ठरवेल. गुरगावात घर विकत घेणं आणि अंधेरीला फ्लॅट विकत घेणं सारखंच पडतं, इतकं ते महाग असतं. तिथे अडीच बीएचकेचे पावणेदोन कोटी रुपये पडतात आणि महिन्याचं भाडं वीस हजार रुपये भरावं लागतं. विजेचं बिल वेगळं द्यावं लागतं. त्याचे सहा ते  आठ रुपये युनिट पडतात. हरियाणात विजेची टंचाई आहे. त्यामुळे सर्वत्र जनरेटर बसवलेले असतात. मुंबईच्या मानानं गुरगावात भाजीपाला रिक्षा फार महाग असतो. हे सगळं आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेलं दिसत असलं तरी युरोपातली सुसंस्कृत संस्कृती मात्र गायब असते. युरोपात कोणी रस्ता पार करू इच्छित असेल तर सिग्नल नसूनही सगळ्या मोटारी थांबतात. पायी चालणाऱ्यानं रस्ता पार केला की गाडय़ा सुरू करतात. उचलेगिरी करून विकास करणाऱ्या आपल्या देशात सांस्कृतिक परिपक्वता किंवा प्रौढत्व येण्याची अपेक्षा करणं म्हणजे गाढवाला शिंग फुटण्याची वाट पाहण्यासारखं आहे. परत फिरताना आम्ही हुडासिटी मेट्रो स्टेशन गाठलं आणि दिल्लीला वेळेत पोचलो. मेट्रोमुळे अस्ताव्यस्त दिल्ली छान बांधली गेली आहे. दिल्लीहून गुरगाव तीस-बत्तीस किलोमीटर दूर आहे.
दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारतात तिसरा नंबर लागतो, हे सगळं घडू शकलं ते दिल्ली जवळ असल्यानं. अनेक ठिकाणी तसं घडलंय. पुण्यामुळे िपपरी-चिंचवड, हैदराबादमुळे सायबराबाद, चंदिगडमुळे मोहाली आणि पंचकुला जुन्या रायपूरमुळे नवं रायपूर. गुरगाव तिशीतल्या तरुण- तरुणींसारखं आहे. तिथे जुनं कळकट काही नाही. या नव्या नगरात कमावणं, खाणं-पिणं, खरेदी आणि करमणूक अशा मर्यादित गोष्टी दिसतात. सुट्टीच्या दिवशी लोक सनेमा पाहतात किंवा मॉलमध्ये खरेदी करायला जातात. तिथे पब कल्चर आहे. कोणत्याही निमित्ताने ओल्या पाटर्य़ा होत असतात. गुरगावात सगळे मोटारीनं फिरतात. टू व्हिलर फारशा आढळत नाहीत. काही लोक गुरगावला ‘सिंगापूर ऑफ इंडिया’ म्हणतात. तिथे बागबगीचे आहेत. शिवाय कॉम्प्लेक्समध्ये बगीचा असतो. जसं ज्येष्ठ नागरिकांना अमेरिकेचा लगेच कंटाळा येतो तसं इथंही होऊ शकतं. विचार वगरे करायला वेळ मिळत नाही. कारण आपल्या येथील कंपन्या अमेरिकेसारख्या कामाच्या वेळा पाळत नाहीत. सकाळी जाण्याची वेळ ठरलेली असते, पण येण्याची नसते. तरुणांना उसासारखं पिरगळून घेतात. ती पिढी लवकर वयस्कर होईल ही मोठी भीती आहे.