सध्याच्या स्पर्धात्मक युगात व ताणतणावाच्या जीवनशैलीत नराश्य व आजाराला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामध्ये गच्चीतून उडी मारून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला गच्ची हे सर्वात जवळचे व त्याचा हेतू सहजपणे साध्य करणारे ठिकाण आहे. इमारतींची गच्ची उघडी ठेवल्याने घडणाऱ्या अप्रिय घटना व संभाव्य धोके तसेच गच्चीची वारंवार करावी लागणारी दुरुस्ती व वॉटर प्रूिफगवर होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तसेच खाजगी व कार्यालयीन इमारतींची गच्ची सर्वकाळ कुलूपबंद ठेवणे हितावह आहे.
इमारतींची गच्ची उघडी ठेवल्याने उद्भवणाऱ्या समस्या खालीलप्रमाणे :-
(१)  मानसिक संतुलन बिघडल्यामुळे किंवा आजारपणाला कंटाळून अनेक जण गच्चीतून उडी मारून आत्महत्या करतात. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीचा त्रास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सहन करावा लागतो.
(२) गच्चीत पतंग उडवताना किंवा तुटलेली पतंग पकडण्याच्या नादात तोल जाऊन मुले गच्चीतून पडून जबर जखमी / मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना दरवर्षी घडतात.
(३)  संस्थेतील मुले व त्यांचे मित्र जमून गच्चीत क्रिकेटचा खेळ खेळतात. क्रिकेटचा खेळ  खेळताना बॅट सतत गच्चीच्या पृष्ठभागावर आपटल्याने गच्चीतील सिमेंट कोब्याला तडे जाऊन खड्डे पडतात व पावसाळ्यात गच्चीखालील सदनिकेत पाण्याची गळती होण्याची अधिक शक्यता आहे. तसेच काही वर्षांपूर्वी ठाणे येथे गच्चीत मुले क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणात रागाच्या भरात एका मुलाने दुसऱ्या मुलास गच्चीवरून ढकलून दिल्याने सदरहू मुलगा जागीच मृत्युमुखी पडला.
(४)  अभ्यासाच्या नावाखाली संस्थेतील तरुण मुले-मुली गच्चीत जाऊन प्रेमप्रकरण तसेच विनयभंग व अत्याचारासारख्या अप्रिय घटना घडल्या आहेत.
(५)  पालकांच्या नजरा चुकवून संस्थेतील तरुण मुलांना दारू / बीयर पिण्यास तसेच सिगारेटस् व अन्य अंमली पदार्थाच्या सेवनास आणि क्वचित प्रसंगी पत्ते / जुगार खेळण्यास गच्ची हे एकमेव सुरक्षित, हवेशीर व बिनखर्चाचे ठिकाण आहे.
(६)  संस्थेतील काही अतिउत्साही मुलांना रंगपंचमी व गोकुळ अष्टमी या सणाच्या काही दिवस आधीपासूनच रस्त्यावरून / इमारतीजवळून जाणाऱ्या नागरिकांवर व विशेषत: तरुण मुलींवर गच्चीवरून रंगाने किंवा पाण्याने भरलेले फुगे / प्लास्टिकच्या पिशव्या भरून त्रास देण्यासाठी व लपण्यासाठी गच्ची हे एकमेव सुरक्षित ठिकाण आहे.(७)  संस्थेतील लहान मुलांनी गच्चीत स्कूटर्स, सायकल्स व मोटारी चालविल्याने तसेच स्केटिंग केल्याने गच्चीतील सिमेंट कोब्याला खड्डे पडतात / तडे जातात.  त्याचप्रमाणे संस्थेच्या सभासदांचे कुटुंबीय मंडळी गच्चीत पापड, कुरडया, सांडगे इत्यादी पदार्थ उन्हात चादर किंवा प्लास्टिकच्या कागदावर वाळत घालतात. वाऱ्याने चादर / प्लास्टिक उडू नये म्हणून चारही कोपऱ्यांवर दगड, लादीचे तुकडे किंवा विटा ठेवतात. संस्थेतील लहान मुले गच्चीच्या सिमेंट कोब्यावर दगडांनी विटांच्या बारीक चुरा करणे, ठोकणे व दगड / लादीचे तुकडे पायाने गच्चीत इकडून-तिकडे उडविणे असा खेळ खेळतात.  वरील दोन्ही गोष्टींमुळे गच्चीतील सिमेंट कोब्याला तडे जाऊन पावसाळ्यात गच्चीखालील सदनिकेत पाणी गळती होण्याची शक्यता वाढते.
(८)  संस्थेचे पदाधिकारी व सभासद गच्चीत रोजचे कपडे वाळत घालण्यासाठी तसेच गाद्या, चादरी व अन्य प्रावरणे आणि गहू, तांदूळ, वाल, मिरच्या व मसाल्याच्या अन्य पदार्थाना ऊन देण्यासाठी सर्रास गच्चीचा वापर करतात.
(९)  संस्थेचे पदाधिकारी व क्वचित प्रसंगी सभासददेखील घरातील नको असलेले अवजड सामान / फíनचर व भंगार ठेवण्यासाठी गच्चीचा वापर करतात.
(१०)  गच्चीवरून आजूबाजूच्या इमारतीत टेहाळणी करून वृद्ध व्यक्ती राहात असलेल्या किंवा बंद असलेल्या सदनिका हेरून घरफोडी किंवा अत्याचार करणाऱ्या समाजकंटकांना त्यामुळे अप्रत्यक्षपणे मदत होते. तसेच गच्चीतून गच्चीखालील मजल्यावरील सदनिकेत उघडय़ा बाल्कनीतून किंवा ग्रिलच्या साहायाने उतरून व ग्रिल / गज वाकवून किंवा कापून सहजपणे प्रवेश करणे शक्य होते. तसेच गच्चीवर लावलेल्या टय़ुब-लाइटस् फिटिंग्ज, बल्ब, अँटिना / डिश-अँटिना, मोबाइल सिग्नल टॉवर यंत्र-साहित्याचे सुटे भाग, पाण्याच्या टाकीची लोखंडी झाकणे, गेट व्हॉल्व व पाण्याचे नळ इत्यादी गोष्टींची चोरी झाल्याच्या घटना वरचेवर घडत असतात.
(११)  मध्यरात्रीनंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना एखाद्याची हत्या करून त्याचा मृतदेह गच्चीवरील पाण्याच्या टाकीत टाकून पुरावा नष्ट करण्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत.
(१२)  संस्थेचे काही पदाधिकारी / सभासद व त्यांचे कुटुंबीय अपुऱ्या जागेमुळे किंवा काही समारंभानिमित्त नातेवाईक / पाहुणे आल्याचे कारण पुढे करून प्रथम गरज म्हणून व कालांतराने आपला हक्क म्हणून झोपण्यासाठी गच्चीचा वापर करतात. तसेच काही सभासद घरात उकडत असल्याचे निमित्त पुढे करून गच्चीत झोपण्याचा आपला हक्क प्रस्थापित करतात. अशा वेळी गच्चीत झोपणाऱ्यांपकी कोणास झोपेत चालण्याची सवय असल्यास गच्चीतून पडून दुखापत होण्याची / जीव गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे दारूच्या नशेत गच्चीतून पडून आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
(१३)  दूरदर्शनवरील देशी / विदेशी चॅनेलवरून दाखविण्यात येणारे साहसदृश्याविषयक रियालिटी शोज् पाहून तसेच शीत-पेय पिऊन शॉर्ट-कट मार्गाने दोन मिनिटांत इच्छित स्थळी जाण्यासाठी इमारतीच्या गच्चीवरून वेडय़ावाकडय़ा उडय़ा मारून पोहोचता येणाऱ्या जाहिरात पाहून भविष्यात कोणीतरी तसा वेडेपणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील सर्व अप्रिय घटना व संभाव्य धोके टाळण्यासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व अन्य सर्व प्रकारच्या इमारतींच्या गच्चीची वारंवार करावी लागणारी दुरुस्ती आणि वॉटर प्रूिफगवर होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था व अन्य सर्व प्रकारच्या इमारतींची गच्ची सर्वकाळ कुलूपबंद ठेवणे हितकारक आहे. संस्थेच्या सभासदांची, त्यांच्या कुटुंबीयांची व विशेष करून मुलांची होणारी कुचंबणा व नाराजी दूर करण्यासाठी केवळ अपवाद म्हणून वर्षांतून काही दिवस ठराविक वेळेत गच्ची उघडी ठेवता येईल. त्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी नवीन नमुनेदार उपविधी नियम क्रमांक १७१च्या आधीन राहून प्रथम संस्थेच्या कार्यकारी समिती सभेत व त्यानंतर सर्वसाधारण सभेत बहुमताने खालीलप्रमाणे ठराव मंजूर करून घेणे व त्याची एक प्रत माननीय उप-निबंधक, सहकारी संस्था, यांच्या मंजूरीसाठी व दप्तरी ठेवण्यासाठी पाठविणे आवश्यक आहे. अशा ठरावास नोंदणी अधिकाऱ्याची मान्यता मिळाल्यावरच संस्थेच्या कार्यकारी समितीने त्याची कठोरपणे अंमलबजावणी करणे संस्थेच्या दृष्टीने हितावह आहे.
( ठरावाचा नमुना-   प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेने परिस्थितीनुसार त्यामध्ये योग्य तो बदल करावा व शुल्क आकारणी करावी. )
ठराव क्रमांक १  :  संस्थेच्या इमारतीची गच्ची उघडी ठेवण्यामुळे घडणाऱ्या अप्रिय घटना व संभाव्य धोके टाळण्यासाठी तसेच गच्चीची वारंवार करावी लागणारी दुरुस्ती व वॉटर प्रूिफगवर होणारा खर्च टाळण्यासाठी आपल्या संस्थेची गच्ची सर्वकाळ ‘कुलूपबंद’ ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. गच्चीची साफसफाई तसेच गच्चीच्या कुलपाची देखभाल करण्याची जबाबदारी कार्यकारी समितीची राहील. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ठरल्याप्रमाणे फक्त खालील प्रसंगी गच्ची काही मर्यादित वेळेतच सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपलब्ध करण्यात येईल :-
(अ) संस्थेच्या सभासदांच्या पितरांना ‘वाडी’ ठेवण्यासाठी पितृ-पक्षातील १५ दिवस व अन्य तशाच प्रसंगी आवश्यकतेनुसार काही तास गच्ची उघडी ठेवण्यात येईल. संस्थेस शक्य असल्यास काही तासांसाठी सुरक्षा रक्षक तनात करण्यात येईल अन्यथा संबंधित सभासदाने सुरक्षिततेची हमी घेणे आवश्यक आहे.
(ब)  दिवाळीत संस्थेतील मुलांसाठी आवश्यकतेनुसार सकाळी व रात्री शोभेचे व आवाजविरहित फटाके उडविण्यासाठी तसेच कोजागिरी पौर्णिमा व ३१ डिसेंबर रोजी काही मर्यादित वेळेसाठी गच्ची उघडी ठेवण्यात येईल. संस्थेला शक्य असल्यास देखरेखीसाठी व मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक तनात करण्यात येईल. अन्यथा संस्थेचे पदाधिकारी / संबंधित सभासद / संस्थेतील ज्येष्ठ नागरिकांनी मुलांच्या सुरक्षिततेची आणि कार्यकारी समितीने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करण्याची हमी दिल्यावरच संस्थेची गच्ची उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात येईल.
ठराव क्रमांक २  :  संस्थेची  कार्यकारी समिती संस्थेच्या अधिकृत सभासदाने विहितनमून्यात लेखी अर्ज केल्यास संस्थेच्या इमारतीवरील गच्ची संस्थेच्या अधिकृत सभासदास खालील नमूद केलेल्या घरगुती समारंभासाठी तात्पुरती वापरण्यासाठी परवानगी देण्यात येईल :–
(१) वाढदिवस   — शुल्क रुपये/-  — अनामत रक्कम रुपये/-
(२) साखरपुडा   — शुल्क रुपये/-  — अनामत रक्कम रुपये/-
(३) नामकरण विधी — शुल्क रुपये/- –अनामत रक्कम रुपये/-

(४) संबंधित सभासदाने समारंभासाठी ध्वनिवर्धक व्यवस्था व तत्सम व्यवस्थेसाठी स्थानिक पोलीस यंत्रणा / अन्य प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच आवाजाची विशिष्ट पातळी व वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे, जेणेकरून संस्थेतील ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींना त्रास होणार नाही आणि शालेय विध्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही. समारंभासाठी विजेची व्यवस्था सभासदाने करावयाची आहे. समारंभ झाल्यावर गच्चीवरील कचरा काढून साफसफाई करून घेणे तसेच समारंभाच्या कालावधीत काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित सभासदाची राहील. याबाबत सर्वसाधारण सभेने घालून दिलेले नियम / र्निबध न पाळल्यास दंड आकारण्यात येईल व त्याची वसुली अनामत रकमेतून करण्यात येईल.
खाजगी / कार्यालयीन इमारतींच्या मालकांनी इमारतीची गच्ची सर्वकाळ ‘कुलूपबंद’ ठेवण्याबाबत प्रत्येक गाळेधारकास त्याबाबत लेखी माहिती द्यावी. त्याबरोबरच आणीबाणीच्या प्रसंगी व आग लागण्याची दुर्घटना घडल्यास गच्चीची चावी कुठे उपलब्ध असेल याबाबत सर्व गाळेधारकास माहिती द्यावी. त्यामुळे कार्यालयीन वेळेआधी व नंतर तसेच सुट्टीच्या दिवशी गच्चीवरील पाणी साठविण्याच्या टाकीतून होणाऱ्या पाणी चोरीला व अन्य अवैध गोष्टींना आळा बसेल. जबाबदार व्यक्तीच्या देखरेखीखाली आठवडय़ातून एकदा गच्चीची व पाणी साठविण्याच्या टाकीची तपासणी करावी व गच्चीची चावी कुलपास लागत असल्याची खात्री करावी.