‘बाल्कनी’ म्हणजे घराच्या बंदिस्त खोल्यांपेक्षा वेगळा, थोडा बाहेर आलेला, अध्र्या भिंतीने मर्यादित करून त्या अध्र्या भिंतीवर कठडा असलेला भाग. आकाश पांघरून निसर्गाशी थेट जवळीक साधत अगदी मोकळं मोकळं वाटायला लावणारा, एका अद्भुत विश्वाचा साक्षीदार. घराचा आराखडा बघतानाच लक्ष असते ते बीएचकेतून बाहेर आलेल्या बाल्कनीकडे.

‘आजकाल आकाशात चांदणं पडतच नाही,’ जुनं घर पाडून बाल्कनी नसलेल्या नवीन घरात राहायला आल्यावर आकाशदर्शन दुर्मीळ झाल्यामुळे सहस्रचंद्रदर्शन झालेल्या सुरकुत्यांनी अभावितपणे व्यक्त केलेली ही एक भाबडी प्रतिक्रिया. बाल्कनी किंवा गॅलरी या घरातल्या सुंदर भागाच्या अनुपस्थितीची दखल घेणारी. तिचे आकाशाशी जडलेले नाते स्पष्ट करणारी.
‘बाल्कनी’ म्हणजे घराच्या बंदिस्त खोल्यांपेक्षा वेगळा, थोडा बाहेर आलेला, अध्र्या भिंतीने मर्यादित करून त्या अध्र्या भिंतीवर कठडा असलेला भाग. आकाश पांघरून निसर्गाशी थेट जवळीक साधत अगदी मोकळं मोकळं वाटायला लावणारा, एका अद्भुत विश्वाचा साक्षीदार. घराचा आराखडा बघतानाच लक्ष असते ते बीएचकेतून बाहेर आलेल्या बाल्कनीकडे. घरापेक्षा बाल्कनीतच मुक्काम ठोकावा, ही लहानथोर आबालवृद्धांची सुप्त इच्छा असते. घरामध्ये अगदी रेड कार्पेट अंथरलेलं असलं तरी जेव्हा आपण कंटाळलेले असतो, त्रासलेले असतो, चिंतेत असतो, दमलेलो असतो किंवा असं कोणतंही कारण नसेल तरीसुद्धा बाल्कनीमधील कठडय़ावर हात ठेवून जरा झुकून उभं राहिलं की अगदी सगळ्याचा विसर पडून आत्ममग्न होऊन जातो. कारणाशिवाय घरात असं कुठे उभे राहिलात तर वेडय़ात काढतील. बाल्कनीतील उभ्या उभ्या घेतलेली ही क्षणभर विश्रांती मनाला प्रसन्नता, तजेला देते आणि याचा किमयागार असतो आपला हितचिंतक निसर्ग, सभोवतालचा भवताल.
मंगलप्रभात झाली की उठल्या उठल्या बाल्कनीत डोकावलं की कसं ‘फ्रेश’ वाटतं. जरा गारसर ताजी झुळुक स्पर्शाचे मोरपिस फिरवते. पुन्हा झुळुक येते, नवी झुळुक येते. एसीसाठी बंद खोलीत झोपल्यामुळे गुदमरलेला श्वास मोकळा होतो. गरम वाफाळणाऱ्या चहाचा घोट-घोट घेत नजरेचा कॅमेरा आजूबाजूच्या घरातल्या दिव्यांची आवर्जून नोंद घेतो. तिथे झोपाळा अडकवलेला असेल तर दुधात साखरच. सकाळी कामावर जाणाऱ्यांच्या भाऊगर्दीत आपली लुडबुड नको, असे सामंजस्य दाखविणाऱ्या ज्येष्ठांसाठी ही निवांत जागा. तोंडी लावायला लवकर उठून बसलेल्या नातवंडाचे बोबडे बोल असतातच. थंडीच्या दिवसांत कोवळं ऊन खाण्याची मजा कुणीही लुटावी ती बाल्कनीत बसूनच. ताज्या वर्तमानपत्राचा खुराक मिळाला तर सोन्याहून पिवळं. न पेक्षा ज्याच्या हातात असेल त्यात सारखं डोकवावं, प्रश्नांची सरबत्ती करावी म्हणजे चिडून वर्तमानपत्रच हातात येते. घराबाहेर न पडता उन्हाचा उबदार शेक मिळतोच, शिवाय आयुष्यभर ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता जाणवत नाही. अंघोळ झाल्यावर डालडय़ाच्या डब्यात बसलेल्या तुळसीमातेला हात जोडण्याच्या निमित्ताने, त्याचबरोबर सूर्यालाही वंदन करण्यासाठी बाल्कनीत येणे होतेच. शाळा, कॉलेज, ऑफीसचे डबे गेले की कपडे वाळत घालण्यासाठी गृहिणी बाल्कनीच्या आश्रयाला येते. कपडा झटकताना आपल्या घरातले विचार झटकून ती आजूबाजूच्या बाल्कनींशी शिळोप्याच्या गप्पा मारते. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांची विचारपूस, त्यांच्या कालच्या दौऱ्याचा वृत्तान्त, आजचा पोटपूजेचा मेनू असे सगळे विषय ‘रॅपिड राऊंड’चा नियम पाळतात.
उन्हं चढली की छोटी छोटी वाळवणं बाल्कनीत ऊन खात बसतात. निवडटिपण करताना, खडे मारायला, नव्हे फेकायला बाल्कनी हा फ्री अ‍ॅक्सेस. टळटळीत दुपारी बाल्कनीतून एक नजर ठेवावी लागते ती बोहारणीवर. पुरुषवर्गाच्या अनुपस्थितीत कपडे देण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे सौदा मनासारखा होतो. शिवाय संक्रांतीला लुगडं, दिवाळीला साफसफाईसाठी लंबा झाडू, कल्हईवाला, कुल्फीवाला, बर्फाचे गोळेवाला अशा प्रासंगिक विक्रेत्यांची प्रतीक्षा बाल्कनीत येरझारा घालूनच करावी लागते.
‘सायंकाळी जाऊ दे मला, पटांगणावर खेळायला, तिथे सोबती वाट पाहती, दे ना लवकर भूक लागली’ असं बालनाटय़ सादर व्हायला बाल्कनी हवीच. पाय उंच करून कठडय़ावरून किंवा छोटय़ाशा भोकातून ‘आपले सवगंडी जमले का?’ याची खात्री करून अभ्यासाच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी छोटय़ांना बाल्कनी म्हणजे सर्वस्वच वाटते. संध्याकाळी आठवडय़ाच्या भाजीची उस्तवार करण्यासाठी बाल्कनी ही आवडीची जागा. डोळे पाहण्याच्या कामात इतके रंगून जातात की हातातलं काम केव्हा फत्ते होतं, याचा थांगपत्ता लागत नाही. काळोखाच्या सावल्या गडद झाल्या की ‘घरधनी याल कधी हो घरी परतुनी’ असं प्रतीक्षालय तिथे थाटलं जातं. कोणाला निरोप देणं असो वा वाट पाहणं असो, बाल्कनी हवीच. कितीही पोटभर गप्पा झाल्या असल्या तरी मागे वळून बघणाऱ्याला तो दिसेनासा होईलपर्यंत हात हलवून, निरोप देण्याची गोडी ज्याची त्यानेच अनुभवावी. ‘थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता’ ही हुरहूर आणि दुरूनच येणाऱ्याची चाहूल लागली की आनंदाने उजळलेला चेहरा हे भावनाटय़ घडायला आणि तिसऱ्याच कुठल्या तरी बाल्कनीतल्या त्रयस्थाने पाहायला बाल्कनी हवीच नाही का!
रात्रीच्या जेवणानंतर मोकळ्या हवेतील लुटुपुटुची शतपावली घालायला बाल्कनी हा एकच पर्याय. दिवसभरातलं ‘वर्क टू रूल’ शेवटाला आल्यावर सगळीकडे निजानिज झाल्यावर अंथरुणाला पाठ टेकण्यापूर्वी ‘तू तिथे मी’ असे खास चारदोन क्षण अनुभवण्यासाठी वयाचं बंधन नको, पण बाल्कनीचं बंधन पाहिजेच. कधी कधी बिजली पोबारा करते. सगळे व्यवहार ठप्प होतात. अशा वेळी ‘मौखिक’ परंपरेलाच जवळ करावे लागते. मग कोणी ‘सा’ लावतो तर कोणी बासरीचे सूर छेडतो. नीरव शांततेमुळे ‘संगीतरजनी’चा आनंद सगळ्यांनाच अनुभवता येतो. दुसऱ्या दिवशी त्याविषयीच्या सुखद प्रतिक्रियांचे आनंदतरंग उमटतात.
कुत्रा, मांजर अशा पाळीव प्राण्यांचा बाल्कनी हा हक्काचा निवारा. उन्हाच्या तुकडय़ात मार्जारासन करीत अंग शेकून घ्यायला आणि हवं तेव्हा पाय पोटाशी घेऊन ताणून द्यायला ही आवडती जागा. बाल्कनीत बसून मालकाच्या येण्याचा हळूच कानोसा घ्यायचा आणि दार उघडताक्षणी त्याच्याकडे धावत झेप घ्यायची, अशी मस्ती. कोण येतंय, कोण जातंय, कोण दगड मारून कैऱ्या, जांभळं पाडतंय अशांवर लक्ष ठेवणारे निरुद्योगी टेहळणी बुरूजही काही बाल्कनीत हातावर हात किंवा हाताची घडी घालून बसलेले असतात.
घरातील सभासदांना ‘बाल्कनी’स्थानी आणून घडणाऱ्या या घडामोडींबरोबरच पर्यावरणाला हातभार लावीत हरितसृष्टीची जपणूक बाल्कनीत होत असते. झाडाचं संगोपन, त्याची वाढ, फुटलेलं पान, कळी, नकळत होणारे फुलात रूपांतर आणि मग ते फूल कौतुकाने डोक्यात मिरवणं हा हरितप्रवास आपल्या डोळ्यांदेखत घडतो. या ‘आपल्या झाडांना’ घरचा ताजा खाऊ (साली वगैरे) आठवणीने भरविला जातो. साहजकिच ती निरोगी, बहरलेली दिसतात. या ‘आपल्या झाडां’बरोबरच दृष्टिक्षेपातल्या झाडांचं असणं, ऋतुमानानुसार त्यातले बदल टिपणं, किंबहुना त्या बदलांमुळे ऋतूंची ओळख जाणवणं, म्हणजे निसर्ग उत्सवाला दाद देणंच होय. बाल्कनीतलं उभं राहणं म्हणजे जणू निसर्गपरिचय केंद्रच. ऋतुबदलानुसार झाडांच्या भेटीला येणारे कावळे, साळुंक्या, कोतवाल, बुलबुल, चिमण्या, शिंपी, त्यांनी पाळलेला क्रम, त्यांची घरटी याची घराबाहेर येऊन दखल घेण्याचं एक सहजसोपं माध्यम म्हणजे बाल्कनी.
बाल्कनीतून मिळणारा आणखीन एक आनंद म्हणजे खाली बघण्यातून दिसणारा एरियल व्ह्यू. जसजसं वरच्या मजल्यावर जाऊ तसतसं विस्तारणारं क्षितिज. जणू एखाद्या भागाचं तयार केलेलं मॉडेलच; विमानातून खाली बघताना वाटावं तसं. खालून झाड बघणं वेगळं आणि वरून त्याचा पूर्ण आकृतिबंध नजरेच्या टप्प्यात सामावून घेणं वेगळं. झाडांच्या रंगीत फुलं खोचलेल्या हिरव्या पालथ्या टोपल्या प्रेक्षणीयच. याशिवाय काही सार्वजनिक सणांची सुंदर चौकट बघायला बाल्कनीच हवी. होळीचं विहंगम दृश्य तर डोळ्यात मावत नाही. खाली मधोमध पेटलेली लसलसत्या ज्वाळांची होळी. आकाशात चमचमणाऱ्या चांदण्यांमध्ये विहरणारा चंदेरी चांदोबा. होळीतून बाहेर उडत या चांदण्यांच्या दिशेने झेपावणारा केशरी ठिणग्यांचा नाचरा प्रवास. होळीला नैवेद्य दाखवून प्रदक्षिणा घालणाऱ्या सालंकृत सुवासिनी, बोंब मारणारा पुरुषवर्ग. अग्निप्रदक्षिणेचं एक रंगीत प्रकाशझोतातलं रिंगण. वर-खाली वर-खाली बघताना भान हरपून टाकायला लावणारं. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी. बेसावधक्षणी रंग उडवणारे, रंगात भिजणारे, धमालमस्ती करणारे, सगळा नवरंगी माहोल दुरून नेत्रसुख देणारा. जुन्या नादमधुर होळीगीतांना कानांत रुंजी घालायला लावणारा. रिमझिमणाऱ्या सरींवर सरीमधली दहीहंडीची गंमत तर न्यारीच. काळ्या डोक्यांची लहान-लहान होत जाणारी वर्तुळं, सुळकन घसरणाऱ्या गोविंदांमुळे कोलमडणारा जिवंत मनोरा, हास्याच्या खसखशीत पुन्हा प्रारंभ. अशा कितीतरी देखण्या चित्रांची ‘आर्ट गॅलरी’च बाल्कनीतून दर्शन देते.
घरातील इतर खोल्यांच्या सौंदर्याला बाधा आणणारी कोणतीही अडगळ स्वत:त सामावून घेत, खाली डोकावून बघण्याचा आनंद देणारी ही बाल्कनी म्हणजे जणू घरातील अंगणच. चाळसंस्कृतीच्या काळात सगळ्या घरांच्या दारासमोर एक सामायिक व्हरांडा किंवा गॅलरी असायची. ब्लॉक सिस्टीम अस्तित्वात आल्यावर तिचे तुकडे होऊन ती प्रत्येक घराला स्वतंत्रपणे चिकटली. सुरक्षिततेसाठी तिला ग्रीलचे वेसण घातले गेले. एखादीच्या नशिबात कायमस्वरूपी, तर एखादीच्या तात्पुरते उघडमीट होणारे. पुढे काचेच्या तावदानांनी तिचे तोंड बंद झाले. काळाच्या फेऱ्यात तिला घरात ओढून घेतले गेले. तिचे स्वतंत्र अस्तित्वच हरपले. तिचे आकाश बाहेरच राहिले आणि एका जिवंत, आनंददायी, नैसर्गिक अनुभूतीला सर्व पारखे झाले.
पूर्वी घराचा आराखडा तिच्याशिवाय पूर्ण होत नसे. आता काळ बदलला. बाल्कनी असली काय किंवा नसली काय, त्याची कोणाला फिकीर नाही; परंतु तिचे सगळे विभ्रम डोळ्यांसमोर तरळतात आणि मन खंतावत राहते- ‘मला तुझ्याबिगर करमेना’.
सुचित्रा साठे