एक सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. भविष्यात होऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांमुळे विकासक आणि ग्राहकांनी नवी मुंबईला पसंती देत आहेत.
पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी होत असताना तेथील राहणीमान, पर्यटन, सुखसोयी व दळणवळणाची साधने यांतही मोठय़ा प्रमाणात बदल होत आहेत. परिणामी पनवेलचा चेहरामोहरा आंतरबाह्य बदलत आहे. पनवेलमध्ये होऊ घातलेल्या विमानतळामुळे बडय़ा विकासकांनी पनवेलवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.  विकासकांमध्ये येथे स्मार्ट मिनी शहरे उभारण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा व त्यामधील उंचच उंच इमारतींमध्ये अद्ययावत सोयीसुविधा यावर भर दिला जात आहे. गुंतवणूकदारांनीही पनवेलमधील पळस्पे व परिसरात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करणे पसंत केले आहे.
३०० वर्षांपूर्वी पनवेल गावाची ओळख सांगणारे दाखले आजही प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. मोघलांपासून ते पेशवे, मराठा अशा राजवटी पनवेल ग्रामस्थांनी पाहिल्या. १८५२ साली पनवेलमध्ये प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी पनवेल गण परिषदेची स्थापना झाली. तालुक्यामध्ये येऊ घातलेल्या विमानतळाच्या प्रकल्पाने पनवेलच्या जमिनीच्या किमती वाढल्या. सध्या सात ते दहा लाख रुपये गुंठा अशी इथल्या जागेची विक्री होत आहे.
सिडकोच्या नैना प्रकल्पामुळे भविष्यात पनवेलचा विकास नियोजनबद्ध होणार, हे निश्चित झाले आहे. पनवेलमध्ये सध्या पळस्पे गावाजवळील साई वर्ल्डसिटी, नेक्सस झोन, कल्पतरू आणि कोन गावातील इंडियाबुल हे गृहनिर्माण प्रकल्प आकारास येत आहेत. या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे येत्या पाच वर्षांत येथील लोकसंख्या सुमारे ५० हजारांहून अधिक होणार आहे. शिरढोण गावात दिल्ली पब्लिक स्कूलसारख्या मोठय़ा शैक्षणिक संस्था सुरू झाल्या. भविष्यातील पनवेल नगर परिषदेचा बस डेपो हा वडघर येथे होत आहे. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय करंजाडे येथे होत आहे. पनवेलमध्ये पळस्पे येथे महामार्ग जोडले जात असल्याने विकासकांनी मोठय़ा प्रमाणात पळस्पेला पसंती दिली आहे. विशेष म्हणजे पळस्पे येथून पंधरा मिनिटांत आंतरराष्ट्रीय विमानतळाला पोहोचण्यासाठी मार्गाची सोय आहे. या सोसायटय़ांमध्ये घरे खरेदी करणाऱ्यांना विकासकांना चौरस फुटामागे ६ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. पनवेल रेल्वे स्थानकातून पनवेलकरांना जलद व सुरक्षितपणे मुंबईपर्यंत दीड तासामध्ये जाता येते. नुकत्याच जाहीर झालेल्या जलद रेल्वेमुळे हाच प्रवास ४० मिनिटांचा होणार आहे. पनवेलमधील सिडको वसाहतींमध्ये सिडकोची मेट्रो २०१७ पूर्वी धावेल अशी घोषणा सिडकोने केल्याने भविष्यातील पनवेलकरांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. आणि याच मेट्रो प्रकल्पामुळे पनवेलकरांना मुंबईचे राहणीमान अनुभवायला मिळणार आहे. मुंबईतील सराफ बाजाराचे पुनर्वसन पनवेलमध्ये करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे पनवेलच्या महसुलात वाढ होणार आहे. मुंबई-दिल्ली कॉरिडोर या रेल्वे प्रकल्पामुळे कोकण रेल्वेच्या रुळांवरून मालवाहतुकीचा ताण कमी होणार असल्याने थेट पनवेल ते दिवा आणि पनवेल ते कर्जत या लोकल सुरू करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे नावडे, तळोजा तसेच दिवा मार्गाला चालना मिळणार आहे. सध्या पनवेल तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न जटिल असला तरीही सिडकोने पेण येथील बाणगंगा धरणाच्या उभारणीतून साडेतीनशे
दशलक्ष लिटर पाण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे पनवेलचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.
पनवेल फक्त दळणवळणासाठी प्रसिद्ध नाही तर या तालुक्याला पर्यटन स्थळांची देणगीही लाभली आहे. पनवेलमध्ये  दीड कोटी ते ८० लाख रुपयांची घरे घेणारे ग्राहक आहेत. आठवडय़ातील दोन दिवस विकेन्ड साजरा करणाऱ्यांची संख्या मुंबईपेक्षा जास्त नवी मुंबईत आहे. खारघर येथील पांडवकडा, कर्नाळा किल्ला, कर्नाळा पक्षी अभयारण्य, गाढेश्वर धरण, माथेरान तसेच पाली येथील बल्लाळेश्वर आणि महडचा वरदविनायक ही धार्मिक स्थळे पनवेलपासून ३० मिनिटांच्या अंतरावर आहेत.

Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी