गृहिणीसाठी अत्यंत जिव्हाळ्याची जागा म्हणजे तिचं स्वयंपाकघर. दिवसभरात असंख्य वेळा याच ठिकाणी काही ना काहीतरी कामाच्या निमित्ताने तिला यावं लागतं आणि थांबून काम करावं लागतं. दिवसातल्या चोवीस तासांतील एकूण किमान आठ ते दहा तास याच ठिकाणी तिला व्यतीत करावे लागत असतात. ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असल्यामुळे अगदी सकाळचा चहा बनवण्यापासून ते रात्रीचे दूध तापवून ठेवेपर्यंत अनेकदा याच ठिकाणी तिला कार्यमग्न व्हावं लागत असतं. त्यामुळेच आपल्या घरातल्या सर्व दालनात अत्यंत महत्वाचं दालन म्हणजे स्वयंपाकघर. अर्थात, या ठिकाणी सलग काम करणं जरी जरुरीचं नसलं तरीही अनेक वेळा निरनिराळ्या कामांसाठी या ठिकाणी येऊन काम करावंच लागतं. अंतर्गत संरचनेच्या दृष्टिकोनातून या जागेचा प्रत्येक कानाकोपरा उपयोगात आणावा लागतो. शिवाय अत्यंत कमी शारीरिक हालचालीत अधिकाधिक काम करता येणं गरजेचं असतं. जेणेकरून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत नाही आणि क्रयशक्ती वाढते.
स्वयंपाकघर असावे स्वयंपूर्ण
आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत आपण चहा-कॉफी, नाश्ता, जेवण देऊन करत असतो. अगदी आल्याआल्या सर्वप्रथम आपण त्यांना पिण्याचं पाणी देतो. या सर्वासाठी आपल्याला स्वयंपाकघराची गरज भासतेच. याच ठिकाणी कुटुंबीयांसाठीदेखील सकाळचा चहा- नाश्ता बनवण्यासाठी किंवा दोन्ही वेळच्या जेवणासाठी कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकासाठी पुरेसा वेळ देऊन अनेक प्रकारची कामे करावी लागत असतात. अनेकदा घरातल्या प्रत्येकाची नोकरी- व्यवसायाच्या कामाची वेळ निरनिराळी असते. त्यामुळे साहजिकच चहा-नाश्त्याची तसेच जेवणाची वेळदेखील वेगळी असू शकते. काही ठिकाणी आवडीनिवडीप्रमाणे अथवा पथ्यपाण्याप्रमाणे ते बनवलं जाण्याची जरुरी असते. प्रत्येक कुटुंबाची एक निराळी जीवनशैली असते. ती त्यांच्या संस्कृतीशी निगडित असते. यात काही वेळा रूढी-परंपरादेखील महत्त्वाच्या असू शकतात. प्रत्येक कुटुंबात स्वयंपाक करण्याची पद्धतदेखील त्यामुळेच निराळी असते. अर्थातच कमीअधिक प्रमाणात त्यांच्या गरजादेखील भिन्न असू शकतात. स्वयंपाकघरातील कामाचं स्वरूप निराळं असलं तर निश्चितच अंतर्गत संरचनादेखील निराळी असावी लागते.     
स्वयंपाकघरातील संरचनेचे विविध प्रकार
येथील संरचनेत कामाच्या स्वरूपावरून या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावरून, जागेच्या उपलब्धतेवरून, कुटुंबाच्या आकारावरून एकूणच संस्कृती आणि रूढी-परंपरेवरून संरचनेचे प्रकार ठरवावे लागतात. अनेकदा कुटुंब मोठे असले तरीही त्यांच्या घराचे स्वयंपाकघर मोठे असेलच असं नाही. हल्लीच्या घरांच्या एकूणच रचनेत स्वयंपाकघराचा आकार आणि आकारमान इतर प्रत्येक खोलीपेक्षा लहानच असतं. या ठिकाणच्या संरचनेत प्रामुख्याने स्वयंपाकाचा ओटा महत्त्वाचा असतो. या ओटय़ाची संरचना निरनिराळ्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकते. उपलब्ध जागेनुसार तो इंग्रजी ‘L’, ‘व’  तसेच समांतर रेषेत समोरासमोर बनवून घेता येऊ शकतो. या संरचनेत स्वयंपाकघरातल्या फ्रिज, सिंक, शेगडी यांमधील अंतर प्रमाणबद्ध असल्याची खात्री करून संरचना निश्चित करावी लागते.
स्वयंपाकाच्या व्यवस्थेसोबतचे फर्निचर
या ठिकाणी केवळ स्वयंपाकासाठी उपलब्ध केला जाणारा ओटा पुरेसा नसतो. त्यासोबत अनेक वस्तूंसाठी, स्वयंपाकाची भांडी, ताट, वाटय़ा, पेले तसेच धान्याचे डबे, काही बरण्या, लहान-मोठय़ा असंख्य वस्तू ठेवण्याची व्यवस्था करावी लागत असते. काही वेळा या जागेचं आकारमान मोठं असेल, तर एखादं छोटं नाश्त्याचे टेबलदेखील उपलब्ध करून देता येऊ शकतं. या ठिकाणी अत्यंत छोटय़ा जागेत अनेक वस्तूंची मांडणी करावी लागत असते. यामध्ये अगदी तिळापासून ते तेलापर्यंत प्रत्येक वस्तू ठेवण्याची व्यवस्था करावी लागत असते. अन्न-धान्याच्या वस्तूंमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारांचा विचार करावा लागतो. एक म्हणजे दीर्घकाळ टिकणारे आणि दुसरे अल्पकाळ टिकणारे. यांतही अत्यल्प काळ टिकणाऱ्या वस्तू अथवा पदार्थ ठेवण्याची विशिष्ट प्रकारे सुविधा करावी लागते. दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंमध्ये सर्व प्रकारची धान्य, अल्पकाळ टिकणाऱ्या वस्तूंमध्ये धान्याचं पीठ, तेल, मीठ, मसाल्याच्या वस्तू आणि अत्यल्पकाळ टिकणाऱ्या वस्तूंमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, फळे इत्यादी विचारात घेऊन त्या ठेवण्यासाठी व्यवस्था करावी लागते. याशिवाय स्वयंपाकाची भांडी, जेवणाचं ताट, वाटी, पेले, तांब्या आणि इतर लहानसहान वस्तू अशा अनेक बाबींचा विचार करून फर्निचरची संरचना करावी लागते.
स्वयंपाकाच्या वस्तूंचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि मांडणी
या जागेत काम अधिक परंतु शारीरिक हालचाली मर्यादित या प्रकारे वस्तूंचं व्यवस्थापन आणि त्यांची मांडणी करावी लागते. यामुळे काम करणाऱ्या व्यक्तीची क्रयशक्ती वाया जात नाही आणि कामही झटपट होतं. प्रत्येक व्यक्तीच्या सवयी आणि आवडीनुसार या ठिकाणच्या वस्तूंचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि मांडणी करण्याची गरज लक्षात घेऊन अंतर्गत संरचना साकारावी लागत असते. या ठिकाणी ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची निश्चित अशी एक जागा असावी लागते. विविध वस्तू ठेवण्याच्या या जागेची निवड दिवसभरात होत असलेल्या चहा, नाश्ता, स्वयंपाक बनवण्यासाठी होणाऱ्या कामांवर, त्याच्या कार्यकृतीच्या क्रमवार आधारित केलेली असणे हितावह ठरते.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वयंपाकघराची संरचना
सद्य:स्थितीतील धकाधकीच्या जीवनात अनेकदा मानसिक स्वास्थ्य सांभाळलं जात नाही. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य लाभणं अत्यंत जरुरीचं असतं हे माहिती असूनही अनेकदा आपल्यापकी अनेकांचं त्याकडे दुर्लक्ष होतं. अशी मानसिक अस्वस्थता निर्माण झालेल्या व्यक्तीच्या अंतर्मनात बदल घडवून आणण्याचं काम स्वयंपाकघराच्या अंतर्गत रचनेतून साध्य होणं गरजेचं असतं. मानसिक स्वास्थ्य अबाधित राखणारी व्यक्तीच उत्कृष्ट स्वयंपाक बनवू शकते. अशा व्यक्तीने केलेल्या स्वयंपाकात अंतर्मनातला आनंद उतरतो असं म्हटलं जातं आणि तसं ते घडतंदेखील. या स्वयंपाकाला एक निराळीच चव येते, वेगळीच गोडी असते. यासाठी या ठिकाणी पुरेसा नसíगक प्रकाश, हवा खेळती राहील अशा सुविधा, मानसिक परिवर्तन घडवून सतत आत्मिक आनंद देणारी रंगसंगती, कृत्रिम स्वरूपाची योग्य आणि पुरेशी प्रकाशयोजना, नेहमीच ताजेतवाने वाटावे अशा सजावटीच्या वस्तूंचा केलेला वापर; अशा अनेक बाबींचा आपल्या अंतर्मनावर सकारात्मक परिणाम होत असतो.
विविध वस्तूंची निवड आणि वापर
स्वयंपाकघराच्या संरचनेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्वयंपाकाचा ओटा. या ओटय़ासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूत आपल्या सौंदर्यदृष्टीला काय चांगलं वाटेल; त्याची निवड करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. स्वयंपाक घरातील स्वच्छता अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे या ठिकाणी निवडल्या आणि वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची स्वच्छता सहज करता येण्याजोगी असेल तर ते अधिक योग्य ठरू शकतं. या ठिकाणच्या वस्तूंची निवड करताना स्वयंपाकाच्या वेळी होणाऱ्या तळणे, भाजणे, शिजवणे, परतवणे, उकडणे अशा विविध कामांमुळे वापरल्या जाणाऱ्या वस्तू केवळ दिखाऊ नव्हे तर टिकाऊ असणं जरुरीचं असतं. यामध्ये ओटय़ासाठी वापरला जाणारा गॅ्रनाइट असेल अथवा ट्रॉलीची तावदाने आणि इतर फíनचरमधील काही वस्तू असतील.
या ठिकाणी काय निवडलं म्हणजे ते योग्य ठरेल, निवडलेलं नेमकं कशाबरोबर चांगलं दिसेल, कशासाठी काय निवडायचं, आणि तेच का निवडायचं अशा अनेक बाबींचा विचार आपल्या मनात येणं अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. कारण या प्रश्नांच्या उत्तरातून साकारली जाणारी संरचनाच जरा हटके असणार आहे. त्याच वेळी ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ ची प्रचीती येऊ शकणार आहे.            
अत्यंत छोटय़ा जागेत अनेक वस्तूंची मांडणी करावी लागत असते. यामध्ये अगदी तिळापासून ते तेलापर्यंत प्रत्येक वस्तू ठेवण्याची व्यवस्था करावी लागत असते. अन्न-धान्याच्या वस्तूंमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारांचा विचार करावा लागतो. एक म्हणजे दीर्घकाळ टिकणारे आणि दुसरे अल्पकाळ टिकणारे. यांतही अत्यल्प काळ टिकणाऱ्या वस्तू अथवा पदार्थ ठेवण्याची विशिष्ट प्रकारे सुविधा करावी लागते.

शैलेश कुलकर्णी -sfoursolutions1985@gmail.com इंटिरीअर डिझायनर