आमच्या घराजवळ नव्यानेच उभ्या राहिलेल्या टॉवर्सकडे बघितले की प्रकर्षांने नजरेत भरते सोलर सिस्टीमने व्यापलेली तिथली गच्ची. माणसांची वर्दळ मात्र तिथे अजिबात दिसलेली नाही. साहजिकच आहे म्हणा.. सुशोभित बाग, जॉगर्स ट्रॅक आणि कम्युनिटी सेंटरनी सज्ज असलेल्या त्या ४-५ टॉवर्सच्या संकुलातील रहिवाशांना गच्चीवर जाण्याची गरजच काय? मात्र आता ज्येष्ठत्वाकडे झुकलेली आमची पिढी, ज्यांचे बालपण लांबलचक चाळीत किंवा इमारतीत गेले आहे, जिथे या संकुलासारख्या सुविधा नव्हत्या त्यांच्या आठवणींच्या कप्प्यात गच्चीचे स्थान अढळ आहे.
इमारत भले तो प्रासाद, बंगला अथवा चाळी असोत, जिथे कौलारू किवा उतरंडीचे छप्पर नाही तिथे गच्ची त्या इमारतीचा अविभाज्य भाग असते. स्वतंत्र बंगले किवा घरांच्या गच्चीची ऐट निराळीच. तिथे मोजक्याच माणसांचा वावर, सुंदरशी बाग फुलवलेली एखादा झोपाळा झुलत असेल किंवा तळमजल्यावरच्या खिडकीतून जाई-जुईचा वेल गच्चीपर्यंत येऊन बाग सुगंधित करत असेल वगैरे वगैरे.. परंतु टॉवर्सच्या गच्चीकडे पाहताना मन मागे जाऊन पूर्वीच्या इमारतींच्या गच्चीशी तुलना करत होते.
टॉवर संस्कृती अस्तित्वात येण्यापूर्वी ज्या इमारतींना पुढे चौक किंवा पटांगण नव्हते, तिथल्या रहिवाशांच्या वाढीव जागेचे अनेक प्रश्न गच्चीनेच तर सोडवले होते. एक-दोन मजल्यांपासून चार मजली इमारतींत जिथे कौलारू छप्पर नसेल तिथे सर्वात वरच्या मजल्यावरच्यांच्या डोक्यावर किमान कमरेएवढय़ा उंचीच्या सिमेंटच्या भक्कम कठडय़ाने बंदिस्त असलेली लांबच लांब कधी सिमेंटच्या तर कधी मोझॅक टाइल्सच्या तुकडय़ांच्या जमिनीची मोकळी जागा म्हणजे गच्ची. तिचा सर्वात महत्त्वाचा उपयोग इमारतींना पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या ठेवण्यासाठी होता. त्या टाक्यासुद्धा थेट जमिनीवर नाही तर ४ फुटी सिमेंटच्याच चौथऱ्यावर विराजमान असत. त्या साफ करण्यासाठी किंवा त्यातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी थोडक्यात टाकीवर चढण्यासाठी छोटय़ा लोखंडी शिडीची सोय असे. मुलांना त्या टाकीवर चढण्याचे मोठे अप्रूप, पण तसे केल्यास मोठय़ा मंडळींचा ओरडा ठरलेला असे. प्रत्येक इमारतीवर अशा १-२ तरी लोखंडी (त्याकाळी प्लॅस्टिकचा वापर नव्हता) टाक्यांनी व्यापलेली जागा सोडल्यास गच्चीचा उर्वरित भाग हा प्रत्येक बिऱ्हाडकरूला आपल्या हक्काचाच किंवा सार्वजनिक वाटे.
वर्षांनुवर्षे खालच्या बिऱ्हाडकरूंकडे काम करणाऱ्या रामागडय़ाचे चंबूगवाळे पाण्याच्या टाकीच्या आडोशाने सहीसलामत असे. त्याची स्वारी सकाळी घरकामांसाठी निघाली तरी पावसाळा सोडल्यास गच्चीवर वर्दळ मात्र चालूच असे. हो, महत्त्वाचे म्हणजे त्याकाळी लिफ्ट हा प्रकार फारसा कुणाच्या परिचयाचा नव्हता. म्हणूनच काही तुरळक अपवाद सोडल्यास ४-४ मजले चढून आबालवृद्धांपासून सर्वाची गच्चीवर ये-जा चाले. किमान ५-६ माणसे दोन किंवा तीन खोल्यांत राहण्याच्या त्या काळात व्यायाम, मेडिटेशनसाठी स्वतंत्र जागा आणि हवी तशी शांतता कुठे मिळणार?.. अशांना पहाटे सूर्यनमस्कार घालायला, योगासने करायला किंवा इतरांना शिकवायला गच्चीइतकी योग्य जागा नव्हती. वर्षभराच्या वाळवणांसाठी किंवा इतर धान्याला उन्हे दाखवण्यासाठी अधूनमधून महिलावर्गाची दुपारी गच्चीवर ये-जा चाले. संध्याकाळच्या वेळी
गच्ची बच्चेकंपनीच्या खेळांनी गजबजलेली आणि आवाजी बनून जाई. अंधारल्यावर गच्चीतल्या जिन्याशी लावलेल्या दिव्यात कुणाची शतपावली चाले, तर काही ठिकाणी खास दिवे लावून पत्ते
किंवा कॅरमसारख्या खेळांनी गच्चीला स्पोर्ट्सरूमचा रंग चढे.
तुरळक वर्दळ हेरून ‘तुझे चाँदके बहाने देखू, तू छतपर आ जा गोरीए..’ या चाळकरी दिलीपकुमारांच्या लाडीक आवाहनाला साद देत चाळकरी वैजयंतीमाला जेव्हा गुपचूप गच्चीवर भेटायला जात तेव्हा गच्ची अशा चोरटय़ा प्रेमप्रकरणांची साक्षीदार बने. मकरसंक्रांतीच्या आसपास रंगीबेरंगी मांज्याच्या असंख्य फिरक्या अंगावर खेळवत पतंग बदवण्याच्या ईर्षेने झपाटलेल्या आणि अटीतटीने काटाछाटी करणाऱ्या पोरातरुणांनी गच्चीला रणभूमीचे स्वरूप येई. कालांतराने दूरदर्शनचा प्रसार झाल्यावर एंटिनानामक काठय़ांनी पतंग उडवण्याच्या खेळात व्यत्यय येऊ लागला आणि त्यात मांजा वगैरे अडकला की टीव्ही बघणारे विरुद्ध पतंग उडवणारे यांच्यात चकमकी झडू लागल्या. मात्र सर्व बिऱ्हाडकरू कोजागिरीच्या निमित्ताने एकत्र जमले की तीच गच्ची पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या प्रकाशात धवल तेजाने उजळून जाई. पहिल्या पावसात थेट आकाशातून आलेल्या सरीमध्ये भिजण्यासाठी पोराबाळांची गच्चीवर जायला धांदल उडे. ग्रहणाच्या (त्याकाळच्या समजुतीनुसार बघण्यायोग्य असले तरच) वेळी डोळ्याला गॉगल लावून ते बघण्यासाठी गच्चीशिवाय योग्य जागा कुठे मिळणार? अशा वेळी गच्ची नसलेल्या मित्रमंडळींना खास बोलावून गच्चीची ऐट दाखवण्याची संधी मुलांना हमखास मिळे. काही कारणाने प्रोजेक्टरवर एखादा सिनेमा दाखवला जाई किंवा गणपती वगैरे सणानिमित्ताने स्थानिक कलाकारांचे नृत्य, नाटय़ किंवा संगीताचे कार्यक्रम होत तेव्हा गच्चीचे रूपांतर एखाद्या नाटय़/ चित्रपटगृहात होई. एखाद्याच्या घरी अचानक काही कार्य निघाले तर मांडव वगैरे घालून गच्चीचे छोटेसे कार्यालय बने.
ए. सी.चा जमाना नसलेल्या त्या काळात छोटय़ा जागेत मे महिन्यातील उकाडय़ाने कासावीस झालेल्या बिऱ्हाडकरूंना गच्चीवर झोपणे म्हणजे आनंदाचे निधान होते. घरातील पै-पाहुण्यांसह अनेकजण गच्चीवर झोपण्यासाठी जात. अंथरुणावर उताणे पडून आकाशातील चांदण्या मोजत झोपण्याची मज्जा ज्यांनी अनुभवली आहे त्यांनाच त्यातली खरी गंमत कळेल. आजकाल रहिवाशांच्या अनेक गरजा लक्षात घेऊन अनेक सुखसोयींनी सज्ज अशी गृहसंकुले बांधली जात आहेत. परंतु एकेकाळी उभ्या राहिलेल्या या इमारती बांधताना कदाचित असा कुठलाच दृष्टिकोन बांधणाऱ्यांच्या मनात नसेल, तसेच घर घेणाऱ्यांनीसुद्धा  असल्या सुविधांचा विचार केला नसेल. तरीही कम्युनिटी सेंटर, हेल्थ क्लब, स्पोर्ट्स रूम सारख्या अत्यंत प्राथमिक स्वरूपातील सोयी त्याही विनामूल्य या सर्वसमावेशक गच्चीने  पुरवल्या हे मान्य करायलाच हवे.