त्याचप्रमाणे, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नवीन नमुनेदार उपविधी क्र. १६१ मध्येही आपत्कालीन व्यवस्थेची तरतूद करण्यात आली.आपत्ती, मग ती दैवी असो वा नैसर्गिक, कधीच सांगून येत नाही. परंतु टाळता येण्यासारख्या आपत्तींसाठी आधीपासूनच प्रयत्नपूर्वक तयारी करणे, योग्य ती सर्व काळजी घेणे, संकटांची पुरेशी आधी सूचना देणे इत्यादी सर्व गोष्टी आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित आहेत. त्यासाठी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु याबाबत लोकांमध्ये त्याची जाणीव व पुरेशी जागृती झाली नसल्याचे दिसून येते. सभासदांनी सुरक्षिततेबाबत दाखविलेल्या अनास्थेमुळे संपूर्ण सोसायटीला त्याचे परिणाम भोगावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सभासदांमध्ये याची जाणीव निर्माण करण्याचे व त्यांची मानसिकता तयार करण्याचे अत्यंत कठीण काम कार्यकारी समितीला करावयाचे आहे. त्यासाठी आपण नवीन नमुनेदार उपविधीमधील नियम क्र. १६१ ची माहिती घेऊ :-
नियम क्र. १६१ (अ) : संस्थेने इमारतीचे / इमारतींचे विशेष करून आगीपासून/ पूरस्थितीपासून आणि भूकंपापासून नुकसान होण्याच्या धोक्याबद्दल विमा उतरविला पाहिजे.
(ब) आपत्कालीन व्यवस्था : प्रत्येक गृहनिर्माण संस्थेची व्यवस्थापकीय समिती त्या संस्थेचा आपत्कालीन नियोजन आराखडा तयार करील. सदर आराखडय़ामध्ये संस्थेसंबंधीच्या तसेच सभोवतालच्या परिस्थितीच्या खालील मूलभूत माहितीचा समावेश असेल :-
(१) धोक्याची संभाव्यता व त्याबद्दलचे विश्लेषण.
(२) संभाव्य धोक्याच्या अनुषंगाने जोखमीचे मूल्यमापन.
(३) प्रतिसादासंबंधीची यंत्रणा.
(४) महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक
(i) प्रत्येक सभासदाचा तातडीचा दूरध्वनी क्रमांक.
(ii) आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय यंत्रणेमधील अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक.
वरीलप्रमाणे तयार केलेल्या आराखडय़ाबाबत व्यवस्थापकीय समिती सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या सर्व सभासदांशी चर्चा करेल व याबाबत सभासदांना अवगत करेल. अशा प्रकारे तयार केलेला आराखडा संस्थेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार तो वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.
टाळता येण्यासारखी संकटे/ आपत्ती टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या माध्यमातून नियोजनपूर्वक
पूर्वतयारी करण्यासाठी सोसायटीच्या कार्यकारी समितीने पावले उचलून संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत :
(१) सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार सुस्थितीत असावे. सुरक्षा रक्षक असल्यास उत्तम. नसल्यास मुख्य प्रवेशद्वार बंद राहील याची काळजी घ्यावी. वाढती गुन्हेगारी व सुरक्षा रक्षकच भक्षक होण्याच्या पाश्र्वभूमीवर शक्य असल्यास सोसायटीच्या अर्थसंकल्पात सी.सी.टी.व्ही.  बसविण्याच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
(२) सोसायटीच्या तळमजल्यावरील जिन्याखालील सर्व मीटर्स, मेन स्विच व अन्य विजेची उपकरणे इ. सुरक्षित स्थळी हलवावीत. कारण पावसाळ्यात अशा भागात पाणी भरल्यास शॉक लागण्याची भीती असते. तसेच शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी आग लागल्यास धुरामुळे वरच्या मजल्यावरील सभासद व त्यांच्या कुटुंबीयांना जिन्यातून इमारतीबाहेर पडणे मुश्कील होते. अशा प्रकारच्या घटनेत आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे जिन्याखालील सर्व मीटर्स, मेन स्विच, विजेची उपकरणे, लेटर-बॉक्स इत्यादी सुरक्षित स्थळी हलवावीत. (महानगरपालिकेने यापुढे नवीन इमारतींचे बांधकाम करताना आगीपासून सुरक्षितपणे इमारतीमधून बाहेर पडण्यासाठी दोन स्वतंत्र जिने ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.)
(३) सोसायटीचे उपलब्ध आवार जास्तीतजास्त मोकळे राहील याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पार्किंगचे नियम व नियोजन करणे व सभासदांना मोकळ्या आवाराचा गैरवापर करण्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत आगीचे बंब व रुग्णवाहिकांना सोसायटीच्या आवारात प्रवेश करणे सोपे जाईल. (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अग्निशमन दलासाठी इमारतीच्या एका बाजूला सहा मीटर मोकळी जागा ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.)
(४) सोसायटीच्या पाणी साठविण्याच्या जमिनीखालील, जमिनीवरील व टेरेसमधील टाक्यांची झाकणे कुलूपबंद ठेवावीत. अन्यथा एखादी दुर्घटना किंवा पाणी दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाणी साठविण्याच्या टाक्या आवश्यकतेनुसार वर्षांतून २ ते ३ वेळा आधुनिक तंत्रज्ञान व सुरक्षित रसायनाचा वापर करून स्वच्छ कराव्यात. तसेच पाण्याच्या टाकीतील पाण्याचे नमुने अधिकृत व मान्यताप्राप्त शासकीय प्रयोगशाळेत पाठवून पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे.
(५) सोसायटीची टेरेस सर्वकाळ कुलूपबंद ठेवावी. सर्व सभासदांच्या संमतीने वर्षांतील काही दिवस सुरक्षा रक्षक, पदाधिकारी व काही सेवाभावी वरिष्ठ नागरिकांच्या देखरेखीखाली उघडी ठेवण्यास हरकत नाही.
(६) पावसाळ्यात सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे सोसायटीच्या आवारातील झाडे उन्मळून किंवा तुटून पाडण्याचा धोका असतो. असे झाड इमारतीवर किंवा एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पडल्यास गंभीर स्वरूपाची दुर्घटना व नुकसान होण्याचा संभव असतो. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सोसायटीच्या आवारातील झाडांची तपासणी करून वाढलेल्या फांद्या व धोकादायक झाडांची महानगरपालिकेच्या संबंधित विभागाची लेखी परवानगी घेऊन मगच छाटणी/ पुढील कार्यवाही करावी. सोसायटीच्या आवारात नवीन झाडे लावताना इमारतीपासून दूर लावावीत.
(अ) एनर्जी ऑडिट :-
एनर्जी ऑडिट म्हणजे सदनिकेतील/ इमारतीमधील विजेची सर्व उपकरणे व संपूर्ण वायरिंग विविध उपकरणांच्या माध्यमातून तपासणे व विजेची गळती कोठे होते आहे ते शोधून काढणे व त्यावर उपाययोजना सुचविणे. हे काम एनर्जी ब्युरोच्या माध्यमातून केले जाते. सोसायटीच्या पाणी खेचण्याच्या पंपाची कार्यक्षमता व लिफ्टचा वापर व त्यामुळे लिफ्टच्या मोटरवर पडणारा अतिरिक्त ताण आदी गोष्टी तपासून त्यावर उपाययोजना सुचविली जाते. त्यामुळे शॉर्टसर्किटसारख्या घटना टाळण्यास मदत होते, तसेच विजेचे मासिक बिल कमी होण्यास मदत होते.
(ब) वॉटर ऑडिट :-
सोसायटीत दररोज विविध कारणांसाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यासाठी आपण किती पाणी वापरतो व सबंध दिवसभरात आपण किती पाणी वाया घालवतो तसेच इमारतीला नुकसानकारक पाणीगळती/ पाणी झिरपणे या सर्व गोष्टींचे परीक्षण करून पाण्याचा होणारा अपव्यय टाळणे हा वॉटर ऑडिट करून घेण्याचा प्रमुख फायदा आहे.
(क) फायर ऑडिट : –
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या अधीन राहून राज्य सरकारच्या उपरोक्त अधिनियमानुसार घरमालकांना आपले घर आगीच्या धोक्यापासून सुरक्षित आहे याची तपासणी करून घेणे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वर्षांतून दोन वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये ही प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. आगीपासून जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी सोसायटीच्या इमारतीचे फायर ऑडिट करून घेणे फायदेशीर ठरेल.
(ड) स्ट्रक्चरल ऑडिट :-
स्थापत्यविषयक पाहणी अहवाल किंवा संरचनात्मक तज्ज्ञांचा अहवाल सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नवीन नमुनेदार उपविधी नियम क्रमांक ७७ नुसार सोसायटीच्या इमारतीसाठी बंधनकारक आहे. कोणतीही इमारत कधीही अचानक कोसळत नाही. पाण्याची गळती, बेकायदेशीर नूतनीकरण इत्यादी कारणामुळे सुरवातीला इमारत कमकुवत होण्याची प्रक्रिया सुरू होते व कालांतराने इमारत कोसळण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे स्थापत्यविषयक पाहणी अहवाल विहीत कालावधीनंतर करणे अनिवार्य आहे.
(इ) सेफ्टी ऑडिट :-
इमारत हळूहळू कमकुवत होऊन कोसळण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नवीन नमुनेदार उपविधी नियम क्रमांक १५६, १५७ नुसार कार्यकारी समितीने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच नियम क्रमांक १४२ (६) प्रमाणे मालमत्ता नोंद पुस्तकात संपूर्ण इमारतीचे निरीक्षण करून तारीख व तपशील नोंद करणे व कार्यवाही करणे बंधनकारक आहे.
संस्थेने स्वखर्चाने पार पाडावयाची दुरुस्ती व देखभाल करावयाच्या विविध कामांची यादी उपविधी नियम क्रमांक १६० (अ) मध्ये उपलब्ध आहे.

what is nato and its purpose
नाटोची ७५ वर्ष; ही संघटना का स्थापन करण्यात आली? तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय?
Amit Kalyani Reappointed as Vice Chairman and MD of Bharat Forge
भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर
An appeal to complain to district administration if If not given leave for voting
मतदानाला सुट्टी न देणे महागात पडणार