vr12‘।। विश्वभरे बोलविले।।’ या वसंत नरहर फेणे लिखित कादंबरीतील विश्वंभर भटाच्या घराविषयी…

पेशवेकालीन राधाकृष्ण मंदिर; त्याचं विशाल मैदानासारखं पसरलेलं प्राकार. गाभाऱ्यात राधाकृष्णाची मूर्ती. निर्माल्य वेळोवेळी काढून, ताज्या अन् टवटवीत फुलांनी सजवलेला स्वच्छ प्रसन्न गाभारा. तीर्थाची चकचकीत झारी, तबक, दोन बाजूला दोन उंच झळाळत्या समया, धूप-उदबत्त्यांनी वातावरण मंगल. गाभाऱ्याच्या दाराला पितळी गज. आरती झाल्यावर त्या दाराला जुनं-पुराणं, पण भक्कम कुलूप. पुढे एक दानपेटी. गाभाऱ्याभोवती तिन्ही बाजूंनी पूर्ण उंचीच्या भिंती! गाभाऱ्याची मागची भिंत आणि बाहेरची भिंत म्हणजे प्रदक्षिणेच्या मार्गात वरती एक पोटमाळा बांधलाय. आणि त्यात मंदिराचं कारणपरत्वे लागणारं सामान ठेवलं आहे. बाकीच्या प्रशस्त सभागृहाच्या भिंती अध्र्याच उंचीच्या, त्यामुळे अर्थातच प्रवेशद्वार नाही. त्या जागी दोन मोठे उंच गोल खांब. त्यांना एका कमानीनं जोडलं होतं आणि ‘श्री राधाकृष्ण मंदिर संस्थान, तोरणे, तालुका चांदवड, जि. नाशिक’ अशी सगळा ठाव-ठिकाणा देणारी लालचुटूक कोरीव अक्षरं कमानीवर रेखली होती. मंदिराच्या भिंतींना बाहेरच्या बाजूने कट्टा होता. दर्शन घेऊन झालं की भाविक थोडा वेळ तिथे टेकत. मंदिराच्या मागेच एक डोह होता. नंतर गायरान लागायचं. त्यानंतर माळ आणि मग गाव लागायचं. गावापासून दूर असलेल्या या मंदिराच्या एका बाजूला होतं विश्वंभर भटाचं टुमदार घर. वंशपरंपरागत पेशव्यांपासून चालत आलेली वृत्ती होती. आवारात आपल्या पानांचा पिसारा मोरासारखा झुलवणारे मोठमोठे वृक्ष होते. तर घराच्या अंगणात देवपूजेला पुरून उरतील अशी फुलझाडं. एका बाजूला मुद्दाम राखलेला दुर्वाचा हिरवागार तुकडा. आणि अशा पाश्र्वभूमीवर दाराच्या चौकटीत उभी राहिलेली देखणी अंबा-विश्वंभर भटजींची बायको. कोंदणातल्या हिऱ्यासारखी चमचमत होती. ते लांबवर गावात पूजेला जाणार त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तिने विश्वंभर भटाला भिजवलेला पंचाचा पिळा दिला. आणि या दृष्याकडे मंदिराच्या कट्टय़ावरून अनिमिष नेत्रांनी पाहात होता विष्णू- ज्याला गाव लफंग्या म्हणून ओळखत होतं. घराच्या दाराच्या चौकटीतून अंबूनेही विष्णूला पाहिले. अलीकडे हा सकाळ-संध्याकाळ आरतीला का येतोय? कसली अडचण असेल त्याला? आपण त्याला काही मदत करू शकतो का? त्याने पाणी मागितलं. तिने गूळपाणी दिलं. त्याची विचारपूस केली. त्याला दिलासा दिला. हळूहळू ओसरीची ही हद्द ओलांडली गेली आणि माजघरात पाऊल पडलं. आणि मग जे माजघर विश्वंभराचे प्रेमाचे बोल ऐकत होतं त्याच माजघराने विष्णू आणि अंबेचा उधाणलेला प्रणय पाहिला. रितीबाह्य़ परंपरेला सोडून. मात्र विष्णूच्या मनात उद्भवलेल्या या भावना प्रमाथी असल्या तरी खऱ्या होत्या.
एकदा अकस्मात आलेल्या विश्वंभराने परकोटावरून नजर टाकली तर माजघराच्या खिडकीने त्याला विष्णू दाखवला. बाहेरचे दार बंद! पण मागले दारही आतून बंद! मनात आलेल्या पापशंकेने विश्वंभर पेटून उठला आणि त्याने सर्वशक्तीनिशी दारावर लाथ मारली. माजघरातलं दृश्य त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. आपली शालीन पतिव्रता बायको विष्णूच्या मिठीत? माजघर हे त्यांचं विश्व होतं आणि आता तेच डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत होतं. त्या माजघराने मग विश्वंभराने दोघांना केलेली मारहाण पाहिली, ‘विष्णूबरोबरच चालती हो’ हा आदेश ऐकला आणि त्या गृहस्वामीनीचं उंबरठा ओलांडून जाणं, तिच्या लहानग्या सुरेशचं रडणंही पाहिलं. ही अशी मसालेदार बातमी कळल्यावर गावातल्या लोकांची हळहळ व्यक्त करत पण आपलं कुतूहल शमवून घेणारी गर्दीही ओसरीनं पाहिली.

पिढय़ान्पिढय़ाचं ते देऊळ, घर. ज्यात सगळं बालपण गेलं, मुलाचं बालपण कौतुकानं पाहिलं ते घर सोडून जाताना विश्वंभरने मागे वळूनही पाहिलं नाही. एखाद्या योग्याच्या तटस्थतेने त्याने घराचे सारेच मायापाश सहज तोडले. ज्या क्षूद्रांनी हा कट रचला ते खजील झाले. घर गहिवरलं, लोक गहिवरले.

आता चुलीला पुरुषी हात लागू लागले. कधी विश्वंभर, कधी सुरेश तर कधी २-४ दिवसांचे पाहुणे म्हणून आलेले बिडयेशास्त्रीसुद्धा चहाच्या निमित्ताने चूलबाईंची सेवा करत. त्यांना अगदी सुरुवातीला मदतीला आत्या आली होती. पारंपरिक विचारांच्या विश्वंभरला मुळापासून हलवायला सुरुवात केली ती सत्तर वर्षांच्या आत्याने. ‘तुझी बायको दुसऱ्या पुरुषाबरोबर पळून गेली, तिचं भलं होणार नाही असं लोक म्हणतात. मग माझा लेक मोठ्ठय़ा पदावर आहे तो बाहेर शेण खातो त्याचं भलं होईल? की त्याला मात्र पुरुषार्थ म्हणायचा? नवरा मेला तर बायकोचं मुंडण करायचं आणि बायको मेली की नवऱ्याच्या डोक्याला मुंडावळ्या बांधायच्या?’ त्या चुलीनं धगधगत्या अंत:करणानं हे वेगळे विचार ऐकले. त्यातच विश्वंभरला शास्त्रीबुवांनी प्रवचनाचे धडे दिले. आपल्या काही वह्य़ा-पोथ्या आणि उत्तेजनही दिलं. माजघरानं पाहिला त्यांचा वाढता स्नेह, ऐकल्या त्यांच्या हृदयाच्या कप्प्यातल्या सुखदु:खाच्या गोष्टी. उत्तम प्रवचनकार म्हणून घडतानाचा त्यांचा चढता आलेखही पाहिला.
पण काही काळानंतर विष्णू आपली सधनता मिरवायला मुंबईहून गावात आला तेव्हा विश्वंभरला लाजिरवाणेपणापासून लपण्याकरिता सुरक्षित आश्रय याच घराने धडधडत्या काळजाने दिला. स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला आलेल्या सुरेशचं आख्ख्या गावानं केलेलं कौतुक जसं घरानं सुखानं झेललं तसंच पारंपरिक शिक्षण-संध्या वगैरेऐवजी मॅट्रिक होण्यासाठी तो पळून गेला तेव्हा विश्वंभरची उद्ध्वस्त अवस्थाही घरानं कळवळून पाहिली. ‘आपण एकटे पडलो म्हणून’, ‘पारंपरिक वृत्ती चालू राहाणार नाही म्हणून’, ‘त्याने आपली फसवणूक केली म्हणून’, ‘आपल्या सगळ्याच सुखांवर विरजण पडतंय म्हणून’. ‘आपलं आयुष्य म्हणजे चिघळलेली जखम आहे, सदैव लसलसणारी’, या कशा कशामुळे आपण रडायचं हेही त्याला कळत नव्हतं. त्यातच काळोखाची सरसरून उद्भवलेली भीती! गावाबाहेरचं हे घर! हाक मारली तरी ‘ओ’ द्यायलाही कुणी नाही. मग घराची दारं, खिडक्या बंद करून अंधाराला बाहेरच कोंडणं, त्या कंदिलाच्या फिकट पिवळ्या प्रकाशालाच आधार समजून बसणं. हे सर्व सर्व घरानं घायाळ अंत:करणानं पाहिलं होतं. त्यात मोठय़ा शहरात एकाकी सुरेशचं कसं होत असेल ही व्याकूळ जाणीव होतीच.
या पराकोटीच्या वेदनेतून बाहेर काढायला शास्त्रीबुवांचे मैत्र मदतीला आले. घराच्या त्या माजघरातल्या काळोखातच त्यांनी आपल्या आयुष्यातली शल्यं सांगितली. आणि मग तोच काळोख पण या अगदी जीवालगतच्या गोष्टी बोलताना उबदार वाटू लागला. एक निरामय, निरपेक्ष सख्ख्याचं नातं त्यांच्यात उमललं.
अंबू आणि विष्णू मुंबईत सुरुवातीला तरी मजेत होते. गिरगावच्या आडरस्त्यावरील चाळीतल्या दोन खोल्यांत त्यांनी आपल्या जगावेगळ्या संसाराला सुरुवात केली. खोल्या लहान, कोंदटलेल्या. भिंती अंगावर येताहेत की काय असं वाटणाऱ्या. गावच्या प्रसन्न निसर्गाला फक्त डालडाच्या डब्यातल्या तुळशीतच पाहायचं. नाना अडचणी. भांडी घासायची मातीदेखील विकत मिळे. बाहेरचं जग मात्र झगमगाटी होतं. आपल्याला हातपाय हलवायला पाहिजेत हे दोघांना कळत होतं. त्या दोन खोल्यांतच तिने एक मेंबर घेऊन खानावळ सुरू केली. पुढे मेंबर वाढले तशी तिने आणखी गाळा घेतला.

आता चुलीला पुरुषी हात लागू लागले. कधी विश्वंभर, कधी सुरेश तर कधी २-४ दिवसांचे पाहुणे म्हणून आलेले बिडयेशास्त्रीसुद्धा चहाच्या निमित्ताने चूलबाईंची सेवा करत. त्यांना अगदी सुरुवातीला मदतीला आत्या आली होती. पारंपरिक विचारांच्या विश्वंभरला मुळापासून हलवायला सुरुवात केली ती सत्तर वर्षांच्या आत्याने. ‘तुझी बायको दुसऱ्या पुरुषाबरोबर पळून गेली, तिचं भलं होणार नाही असं लोक म्हणतात. मग माझा लेक मोठ्ठय़ा पदावर आहे तो बाहेर शेण खातो त्याचं भलं होईल? की त्याला मात्र पुरुषार्थ म्हणायचा? नवरा मेला तर बायकोचं मुंडण करायचं आणि बायको मेली की नवऱ्याच्या डोक्याला मुंडावळ्या बांधायच्या?’ त्या चुलीनं धगधगत्या अंत:करणानं हे वेगळे विचार ऐकले.

नव्या युगाची चाहूल घेऊन टेबल-खुच्र्याही बनवल्या. एक विश्रांतीची, एक कोठीची खोली. पलंग, कपाट असा थाट केला. कोठीची खोली कांदे-बटाटय़ाची पोती, भाज्यांच्या पाटय़ा, कडधान्याच्या डब्यांनी भरलेली राहू लागली.
विष्णू तर महायुद्धाला ‘मोका’ समजून तंबाखू-रॉकेलच्या व्यापारात नफा कमवत होता. चाळ विकत घेत होता. त्याचा विष्णुशेठ झाला होता. त्या दोघांना देखणी मुलगी झाली. हौसेने नवीन फॅशनचं ‘हेमलता’ हे नाव ठेवलं. पण ती मुकी होती म्हणून तिचं नाव ‘मोनी’ पडलं. पण नंतर दुसरा धडधाकट मुलगा होताच ते सर्व गावाला आले. लोकांना आपलं उतू जाणारं वैभव दाखवलं आणि ५ वर्षांच्या त्या मुक्या मुलीला मंदिराच्या पायरीवर ठेवून कठोरपणे निघून गेले. आणि मंदिरातल्या मूर्ती स्तब्धपणे पाहात राहिल्या.
असा विष्णू पुढे अंबूलाही सोडतो, जातीतल्या तरुण मुलीशी लग्न करून ती मेल्यावर पुन्हा अंबूकडे येतो. पण अंबू आता शहाणी आणि स्वावलंबी झाली आहे. ती अगदी गलिच्छ शब्दांत त्याचा पाणउतारा करतेच, पण हातात चप्पल घेऊन त्याच्यावर उगारतेही. आणि हे सर्व पाहात असते खानावळीची खोली विस्फारीत डोळ्यांनी.
स्वातंत्र्यपूर्व काळात जी सर्वत्र धामधूम चालू होती तिचा ना अंबूवर परिणाम झाला ना विश्वंभरवर. पण सुरेशवर खूप खोलवर परिणाम झाला. त्याने वेगवेगळे वैचारिक प्रवाह पाहिले. स्वातंत्र्य चळवळीत सामील होऊन अनेक गुप्त कामंही केली. जेवणाची आबाळ, हाल-अपेष्टा हसत मुखानं झेलल्या; इतकंच नाही तर ज्या शिक्षणासाठी घर सोडलं ते शिक्षणही सोडलं. आणि पकडलं जाताच छळामुळे आपल्याकडून कोणाची नावं कळू नयेत म्हणून निर्धाराने त्या सतरा वर्षांच्या कोवळ्या सुरेशने चाकूचं धारदार पातं गळ्यावरून सर्रकन फिरवलं तेव्हा तुरुंगाची ती कोठडी भयचकित नजरेने केवळ पाहात राहिली ते भळभळा वाहणारं रक्त! त्याच्या मृत्यूने विश्वंभर तळापासून ढवळला तरीही आपण अशा ‘शहीद’ मुलाचे बाप आहोत याचा त्याला अभिमानच वाटला.
शांतू आणि बाबू न्हावी यांना पोलिसांच्या तावडीतून वाचवायला विश्वंभर धोका पत्करून थेट गाभाऱ्यात त्यांच्या वहाणांसकट लपवतो ‘राधा-कृष्ण’ पाहात असताना! तर अनैतिक संबंधांतून झालेल्या अंबूच्या मुक्या मुलीला माणुसकीच्या नात्याने सांभाळतो. जिव्हाळा लावतो.
एकीकडे देवावर विश्वास नसणारा विष्णू ‘मुकी मुलगी’, तिला टाकून देणं’ ‘अंबूनं त्याला सोडणं’ ‘दुसऱ्या बायकोचा मृत्यू’ यामुळे अधिकाधिक श्रद्धाळू बनत जातो. तर मुळचाच सोलीव सज्जन विश्वंभर डोंगराएवढा बनत जातो. अंबू-विष्णू यांना खूप धन मिळवूनही आपल्या खुजेपणाची जाणीव सलत राहते. आपण पोटची पोर निर्दयपणे टाकून आलो आणि आत्यंतिक भलेपणानं वागून विश्वंभर आपला सूड उगवतोय. त्यामुळे त्यांना पराभूत झाल्यासारखं वाटतं.
समाजाचा, परंपरांचा विचार करणारा, मनात दुविधा असणारा विश्वंभर बदलून ठाम विचारांचा देवाबद्दल निश्चित पण परंपरेविरुद्ध ठोस विचारांची मांडणी अत्यंत शांत संयतपणे करणारा, निश्िंचत, स्वत:वर पूर्ण विश्वास असणारा कणखर मनाचा बनतो. घर कौतुकांनं पाहात असतं. साध्या भाबडय़ा विश्वंभरचं उन्नयन.
‘मोनी अक्कर्माशी असून तिला देवळात आश्रय दिला’ या देवस्थान मंडळाने लावलेल्या आरोपावरून तो आपली पुजारीपणाची वृत्ती, घरदार सहज सोडून देतो.
पिढय़ान्पिढय़ाचं ते देऊळ, घर. ज्यात सगळं बालपण गेलं, मुलाचं बालपण कौतुकानं पाहिलं ते घर सोडून जाताना विश्वंभरने मागे वळूनही पाहिलं नाही. एखाद्या योग्याच्या तटस्थतेने त्याने घराचे सारेच मायापाश सहज तोडले. ज्या क्षूद्रांनी हा कट रचला ते खजील झाले. घर गहिवरलं, लोक गहिवरले. पण तो निश्चल होता. शिगोशिग संतुष्ट, आनंदी आणि भोवताली पसरलेला अलौकिक मृद्गंध!
मीना गुर्जर