सौंदर्याचा शोध प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने सदोदित घेतच असते. सौंदर्याची प्रचीती जेव्हा आपल्याच घरात दडलेली असल्याचं कळतं तेव्हा मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती ही अविस्मरणीय असते.  सुंदर असणं आणि सुंदर दिसणं या दोन्हीही बाबी आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाच्या वाटत असतात. मुळातच सुंदर असणं हे जरी आपल्या प्रत्येकाच्या हातात नसलं तरीही सुंदर दिसण्यामागे आपली प्रत्येकाची धडपड चालू असते. अर्थातच सुंदर दिसणं म्हणजे काय; तर नीटनेटके राहणं, आपलं व्यक्तिमत्त्वं आकर्षक दिसेल असा पेहराव आणि सौंदर्याचा साज शरीरावर चढवणं.
सौंदर्याची व्याख्या व्यक्तीनिरूप ठरत असते. अनेकदा ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला?’ असं म्हणतानासुद्धा आपल्या सौंदर्याचा साज पाहण्यासाठी आपल्याला आरसा हवाच असतो. गृहसजावटीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा आरसा शयनगृहातील ड्रेसिंग टेबलमधील एक महत्त्वाचं अंगं असतं. आरसा म्हणजे दुसरं काही नसून हे खरं तर वास्तवाचं प्रतिबिंब असतं. पण असं जरी असलं तरी आपलं आभासी रूप यामध्ये बघण्याची आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाची ओळख म्हणजे त्या व्यक्तीचा चेहरा आणि या चेहऱ्याचे प्रतिबिंब म्हणजेच आरसा; की ज्यात खोटं काही लपत नाही आणि खरं दिसल्याशिवाय राहत नाही. असा हा आभास दूर करणारा आरसा शयनगृहात मात्र मनाचं स्थान समजला जातो आणि त्यामुळे त्याचं स्थान आढळ आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
खरं सौंदर्य आपल्या चेहऱ्यावरच्या भावभावनांमध्ये दडलेलं असतं आणि ते तेव्हाच खुलतं जेव्हा आपलं अंतर्मन आनंदी असतं. मनामध्ये जोपर्यंत आपल्याला आनंद प्राप्त झालेला नसतो, तोपर्यंत आपण चेहऱ्याद्वारे प्रकट होणारे भाव सौंदर्याची अनुभूती देत नाहीत. हा आनंद प्राप्त करण्यासाठी आपले आंतरिक विचार आणि तद्नंतरचा आचार कारणीभूत ठरत असतात. आनंद प्राप्त करण्याची कृती ही आपापल्या प्रकृतीवर अवलंबून असते; म्हणूनच ती व्यक्तिगत स्वरूपाची असते. व्यक्ती जितकी आनंदी राहू शकते तितकीच ती सुंदर दिसू शकते.
शयनगृहातला ड्रेसिंग टेबलमधील आरसा हा केवळ आपल्या बाह्य सौंदर्याचे रूप पाहण्यासाठी आपण लावतो आणि वापरतो; पण त्याची खरी गरज अंतर्मनाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी करायची असते आणि म्हणूनच हा केवळ ड्रेसिंग टेबलचा आरसा नसून, आपल्या अंतर्मनाचा आरसा असतो. अनेकदा आपण रूपाचा संबंध काही वेळा रंगाशी लावतो तर काही वेळा अंगाशी लावतो, पण खरं तर तो संगाशी  लावायचा असतो; हे ज्यावेळेला आपणाला उमगतं त्याच वेळेला आपण सुंदर आहोतच याची खात्री पटते.
या ड्रेसिंग टेबलच्या आरशाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, यात प्रतिबिंबित झालेल्या व्यक्ती आणि वस्तू या सर्वाचे रंग, रूप, आकार हे आभासी असतात. प्रतिबिंबित हे जितकं जवळून न्याहाळलं जातं तितकी वस्तू मोठी; याउलट ती जितकं लांबून न्याहाळत जातो तितकी वस्तू छोटी दिसल्याचं आपण अनुभवतो. शयनगृहातील ड्रेसिंग टेबल आणि आरसा यांचा केवळ पेहरावापुरताच माफक विचार आणि अल्प वापर न करता अंतर्मनाच्या सौंदर्याची प्रचीती अनुभवण्यासाठी त्याचा वापर करण्यामध्ये आपलं कसब दिसून येतं.
बदलत जाणारं राहणीमान, वाढत जाणाऱ्या गरजा आणि अपेक्षा, यामुळे सौंदर्याची व्याख्याच बदलली आहे. अनेकदा साधेपणा म्हणजे गबाळेपणा असं म्हटलं जातं. या समजल्या जाणाऱ्या गबाळेपणात, पेहरावात आणि एकूणच राहणीमानात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सौंदर्यालंकार वापरले जातात. आपल्याकडे असणाऱ्या यातील विविध वस्तू ठेवण्यासाठी तसेच त्यांचा वापर करत असताना आपलं रूप न्याहाळण्यासाठी ड्रेसिंग टेबल आणि सोबतचं कॉस्मेटिक्स स्टोरेज गरजेचं असतं. उपलब्ध असणाऱ्या अशा विविध वस्तूंचे आकार, आकारमान, त्या वस्तू वापरण्याची पद्धत, त्या वस्तू ठेवण्याची  पद्धत, त्या वस्तूची ठेवावी लागणारी निगा; अशा अनेक बाबींचा विचार करून संरचना साकारावी लागते.
काही वेळा काळाची गरज म्हणून, तर कधी आवड म्हणून सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जात असतो. अर्थातच अशा सौंदर्य प्रसाधनांचा वापर प्रत्येकाला घरी करणं शक्य होतोच असं नाही. अथवा जरी शक्य असेल तरीही नेहमी ते घरी जमेलच असं नाही. आपले केवळ नीटनेटके राहणे हे पुरेसे नसून आपण चारचौघांमध्ये वेगळे आणि आकर्षक दिसणे आवश्यक झालं आहे. मुळातच सुंदर असणं आणि आकर्षक दिसणं या दोन्ही गोष्टी जरी सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या असल्या तरीही केवळ सुंदर असणंसुद्धा पुरेसे नसून, आकर्षक दिसणं आणि त्यासाठी नीटनेटके राहणं आवश्यकच असतं. यामुळेच सुंदर असण्यापेक्षाही सुंदर दिसण्यासाठी काहीजणांचा कल असतो.
बाजारात दररोज नव्याने उपलब्ध होणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंचा वापर करण्याचा मानस आपल्यापैकी अनेकांचा असतो. त्या वस्तू नेमक्या कुठे आणि कशा ठेवाव्यात हेही ड्रेसिंग टेबलची संरचना करताना विचारात घ्याव्या लागतात. ड्रेसिंग टेबल ठेवण्याची जागा निवडताना अनेकदा एखादा कोपरा निवडला जातो; पण असं जरी असलं तरीही त्या जागेवर पेहराव करत असताना, तसेच सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असताना जागेअभावी गैरसोय होणार नाही याची दाखल घ्यावी लागते. ड्रेसिंग टेबलचे ठिकाण निवडताना प्रामुख्याने आसपास खिडक्या अथवा दरवाजे असणं टाळणे अभिप्रेत असतं. शक्यतो टेबलची जागा खिडकीच्या विरुद्ध दिशेला असू नये. जेणेकरून खिडकी दरवाज्याद्वारे आत प्रवेश करणारा नैसर्गिक प्रकाश आरशावर पडून तो परावर्तित होण्याची शक्यता निर्माण होत नाही. याउलट खिडक्यांच्या दिशेला आरसा बसवला गेला तर उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग पेहराव करत असताना आपल्याला निश्चितच होतो. शिवाय प्रकाशाचे परिवर्तन देखील त्यामुळे होऊ शकत नाही.
अंतर्गत संरचना करत असताना विचारात घ्यायच्या बाबींमध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा प्राधान्याने अभ्यासपूर्वक विचार करावा लागतो. सौंदर्य प्रसाधनांचा वापर करण्यासाठी तयार केलं जाणारं फर्निचर तर अर्थात ड्रेसिंगरूममधील आरसा लावलेलं कपाट सौंदर्याचा साक्षात्कार घडवणारे असलं पाहिजे. त्याचा आकार, मोजमाप, आकारमान, रंग, संरचना, सजावट, त्यासाठी वापरला जाणारा माल, सजावटीच्या वस्तू या सर्वच बाबींचा विचार सौंदर्याच्या दृष्टिकोनातून सखोलपणे करावा लागतो.
शयनगृहाच्या सजावटीमध्ये ड्रेसिंग टेबल हा एक अविभाज्य घटक समजला जातो. आपल्या सुंदर व्यक्तिमत्त्वाला अधिक आकर्षक बनवण्याचं काम ड्रेसिंग टेबल करत असतं. ज्याप्रमाणे याचं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं जातं, तसंच त्याला कपडय़ाच्या कपाटांमध्येदेखील समाविष्ट केलं जाऊ  शकतं.
sfoursolutions1985@gmail.com