मि त्रहो, सर्व विद्युत संचमांडणी करीत असताना त्याचा पायाभूत घटक जी व्यक्ती असते, त्यासंबंधी आपण आता चर्चा करणार आहोत. त्याला वायरमन असे म्हणतात. यालाच काही लोक तारतंत्री किंवा इंग्रजीमध्ये इलेक्ट्रिशिअन म्हणतात.
वायरमन
सुरक्षित विद्युत संचमांडणी उभारणीमध्ये वायरमनचा अत्यंत मोलाचा वाटा असतो. कामाच्या ठिकाणी विद्युतीकरणासाठी जे सामान उपलब्ध असते त्याचा उत्तम प्रकारे उपयोग करून घेऊन कुठल्याही प्रकारची वायरिंग सुरक्षित प्रकारे करण्याची जबाबदारी ही वायरमनवर असते. मग ती केसिंग कॅपिंग असो, की केनलिंग अथवा कन्सिल्ड असो, वायरमनच्या वर्कमनशिपला फार महत्त्व आहे. इथे मी एक दुसऱ्या क्षेत्रातील उदाहरण देऊ इच्छितो. वायरमनच्या कामाची जर आपण सिव्हिल इंजिनीअरिंगमधील मेसन (गवंडी) अथवा प्लंबर तसेच मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील मेकॅनिकशी तुलना केली तर यात एक मोठा फरक आहे. गवंडी, मेकॅनिक ह्या लोकांनी कामात काही चूक केली असेल, तर ती त्वरित पर्यवेक्षक अथवा मॅनेजरला डोळ्याने दिसते. तसे वायरमनच्या बाबतीत होत नाही. त्याने केलेले काम वरकरणी चांगले वाटते, परंतु त्याने जर अनइन्सुलेटेड जॉइंट्स किंवा ढिले जोड (loose contacts) ठेवले तर ज्यावेळी त्या वायरिंगमधून विद्युतप्रवाह जातो त्यानंतर काही दिवसांनंतर स्पार्किंग होऊन नुकसान होते. त्यावेळी लक्षात येते की वायरमनच्या चुकीमुळे हे घडले. म्हणूनच इलेक्ट्रिसिटीला ‘Unseen Hazard’ म्हटले जाते.
विद्युत पर्यवेक्षक- वायरमननंतर विद्युत पर्यवेक्षक Electrical Supervisor) यांची श्रेणी (care) ही सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. सिव्हिल, मेकॅनिकल क्षेत्रात ह्या श्रेणीला अनुक्रमे ओवरसिअर (शाखा अभियंता) आणि फोरमन म्हटले जाते. कुठल्याही कामासाठी लागणारे सामान याची निवड व सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यातील बारकावे लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्लॅनिंग करण्याचे यांचे मुख्य काम. विद्युत क्षेत्रात काम करणाऱ्या सुपरवायझरने विद्युत सामग्रीमध्ये फक्त ISI ब्रँडचाच वापर करावा. ग्राहकाचे बजेट व त्याची सुरक्षा लक्षात घेऊन योग्य त्या मटेरिअलचाच उपयोग करावा. संपूर्ण वीजसंच मांडणीचा एक एस. एल. डी (सिंगल लाइन डायग्राम) तयार करावा. त्यावर ग्राहकाच्या उपकरणाच्या लोडप्रमाणे त्याच्या केबलची व एम. सी. बी. ची क्षमता असावी. उदाहरणदाखल सांगायचे झाल्यास ए.सी.साठी कमीत कमी चार स्क्वेअर मि.मि. जाडीची केबल जोडणे आवश्यक आहे. अशा रीतीने संपूर्ण संच मांडणीमधील उपकरणे, सर्किटस व त्यावरील भार याचा आढावा घेऊन त्यानुसार वीजवाहक तारा/ केबल, मेन डीबीमधील एम.सी.बी व इ. एल.सी.बी. (अर्थ लिकेज सíकट ब्रेकर) योग्य क्षमतेचे बसवल्यानंतर संचमांडणीस सुरक्षा प्राप्त होते. संचमांडणीस योग्य आर्थिग करणेही आवश्यक आहे. हे सर्व केल्यानंतर वीजप्रवाह घेण्यासाठी वीज कंपनीला टेस्ट रिपोर्ट (चाचणी अहवाल) द्यावा लागतो. त्यावेळी मेगरने इन्सुलेशन रेझिस्टेन्स व अर्थ टेस्टरने अर्थ रेझिस्टेन्स मोजून कंपनीला टेस्ट रिपोर्टच्या स्वरूपात द्यावा लागतो. ह्या गोष्टी कॉलेजमधून डिग्री अथवा डिप्लोमा घेतलेल्यांना जमणे शक्य नाही, त्यासाठी कमीत कमी एक वर्षांचा अनुभव असणे जरुरी आहे व त्यानंरच विद्युत पर्यवेक्षकाचा परवाना देण्यात येतो.
विद्युत पर्यवेक्षक अर्थात इलेक्ट्रिकल सुपरवायझरचा परवाना मिळणे हा विद्युत सुरक्षा प्रस्थापित करण्यामधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो. कारण पुढे त्या परवान्याच्या मदतीने त्याला विद्युत कंत्राटदाराचे लायसेन्स घेता येते. हे कंत्राटदार लायसेन्स मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात वीज संच मांडणीची कामे करू शकतात.
वायरमन, विद्युत पर्यवेक्षक आणि विद्युत कंत्राटदार ह्यांचे परवाने देण्याचे काम खालील मंडळातर्फे करण्यात येते. सचिव, अनुज्ञापक मंडळ, उद्योग, ऊर्जा व कामगार खाते , चेंबूर, मुंबई.
अशा प्रकारची अनुज्ञापक मंडळे भारतातील प्रत्येक राज्यात सी. ई. ए २०१० च्या कलम २९ प्रमाणे कार्यरत आहेत. विद्युत कंत्राटदार त्याला त्या त्या राज्यापुरताच परवाना दिला जातो, त्याला दुसऱ्या राज्यात काम करायचे असल्यास त्या राज्याची मान्यता मिळवावी लागते. सुपरवायझर मात्र कुठेही संबंधित चाचण्या घेऊन वीज संच मांडणी प्रमाणित (certify) करू शकतो. म्हणून सर्वानी हे लक्षात घेणे जरुरी आहे की पर्यवेक्षकाचा परवाना देण्यापूर्वी एक वर्षांचा अनुभव असणे किती आवश्यक आहे. काही लोकांकडून/संस्थांकडून ही अट काढून टाकावी अशी मागणी सध्या जोर धरताना दिसत आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना (सिव्हिल इंजिनीअरिंग) शासनातर्फे डायरेक्ट कामे देण्याची योजना सुरू आहे. विद्युत क्षेत्रात ही अशी कामे देता येतील का हा विचार सुरू आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे नुकतीच पदवी अथवा पदविका घेऊन बाहेर पडलेल्या अभियंत्यांना विद्युत संचमांडणीवरील चांचण्यांचा अनुभव नसल्यामुळे टेस्ट रिपोर्ट बिनचूक न जाऊन संचमांडणीस धोका होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ‘‘Rules and conditions for issuing certificates of competency under Regulation 29 of CEA Regulation 2010’’ या अंतर्गत सुपरवायझरसाठी एक वर्षांचा अुभव असणे अगदी योग्य आहे. स्थापत्य अभियांत्रिकीचा नियम विद्युत संचमांडणीसाठी लावता येणार नाही, अन्यथा विद्युत सुरक्षा धोक्यात येऊ शकते याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
विद्युत कंत्राटदार- वरीलप्रमाणे विद्युत पर्यवेक्षकाचा परवाना मिळाल्यानंतर एक मेगर व अर्थटेस्टरचे चाचणी अहवाल व इतर काही कागदपत्रे सादर केल्यानंतर, सचिव, अनुज्ञापक मंडळाकडून विद्युत कंत्राटदाराचा परवाना दिला जातो, ज्याला म. ठे.. असा नंबर दिला जातो, ज्यायोगे तो कंत्राटदार राज्यात कुठेही काम करू शकतो. दर तीन वर्षांनी हा परवाना नूतनीकरणासाठी मंडळास सादर करावा लागतो. विद्युत सुरक्षा या अभियानात विद्युत कंत्राटदार (Electrical Contractor) ही अत्यंत महत्त्वाची कडी आहे, त्यांची कर्तव्ये duties) खालीलप्रमाणे.
विद्युत निरीक्षणालय
विद्युत निरीक्षणालय (Electrical Inspectorate) हे प्रत्येक राज्याच्या ऊर्जा विभागात कार्यरत असते आणि विद्युतसुरक्षेबाबतही बरीचशी जबाबदारी आणि अधिकार या विभागाकडे असतात. विद्युत अधिनियम २००३ (Electricity Act 2003) च्या कलम क्र.१६२ प्रमाणे विद्युत निरीक्षक आणि मुख्य विद्युत निरीक्षक या पदांची नेमणूक केंद्र सरकार व त्या त्या राज्य सरकारांकडून होत असते. या पदांना कायद्याची झालर असते. या दोन पदांच्या अखत्यारीत बरेच अभियंते कार्यरत असतात. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक विद्युत निरीक्षक आहे. प्रत्येक राज्यातील विद्युत निरीक्षणालय हे भारतीय विद्युत नियमांचे कस्टेडिअन समजले जातात. विद्युत नियमांचे योग्य अनुपालन व त्यांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई असे त्यांचे मुख्य काम आहे.
विद्युत अपघात झाल्यास विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १६१ प्रमाणे विद्युत निरीक्षकास अपघाताची चौकशी करण्यासाठी सिव्हिल कोर्टाचे अधिकार देण्यात आले आहेत. मी विद्युत निरीक्षक असताना याच अधिकाराचा योग्य वापर करून गुन्हेगारास शिक्षा कशी झाली हे आपण मागील लेखांमध्ये पाहिले असेलच. विद्युत निरीक्षकाने संच मांडणीमधील दोषांचे विवरण ग्राहकास दिल्यानंतर त्यांची पूर्तता ठरावीक मुदतीत झाली नाही तर त्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्याचे अधिकार या पदाला आहेत, पण ते पूर्णपणे नि:स्वार्थी वृत्तीने आणि विद्युतसुरक्षा प्राप्त करण्यासाठीच वापरले जावेत ही अपेक्षा.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणातर्फे (CEA) नुकतेच एक सुधारणा बिल (Amendment to Regulations) जारी केले आहे. त्यामध्ये विद्युत निरीक्षकाने ठरावीक व्होल्टेज (Notified voltage) च्या वरच निरीक्षणे करावीत असे दिले आहे. त्याखालील निरीक्षणे चार्टर्ड सेफ्टी इंजिनीअरकडून करून घ्यावीत असे लिहिले आहे. नोटिफाईड व्होल्टेज ठरविण्याची जिम्मेदारी प्रत्येक राज्य सरकारवर आहे. महाराष्ट्र राज्यात काय करायचे याबाबतीत विचार चालू आहे.

विद्युत अपघातांचे विवरण पाहिले असता जास्त अपघात हे लो आणि मीडियम प्रेशरवर (६५० Voltage पर्यंत) झाल्याचे दिसते. त्यामुळे चार्टर्ड सेफ्टी इंजिनीअरची कार्यप्रणाली सुरू होईपर्यंत विद्युत निरीक्षणाची सद्य:स्थिती सुरू ठेवावी असे मला वाटते.
वीजपुरवठा कंपनी- विविध वीज कंपन्यांतील अभियंते व कर्मचारी वर्ग ह्यांचे विद्युत सुरक्षेमध्ये मोलाचे योगदान असते. वीजनिर्मितीमधील गुणवत्ता व सातत्य (continuity) राखणे, त्या विजेचे उपरी तारमार्गाने योग्य रीतीने (Transmission) पारेषण आणि विविध शहरे आणि खेडोपाडी त्याच विजेचे अनेक रोहित्रांमार्फत (Transformers) वितरण करीत असताना विद्युत नियमांचे पालन करून सुरक्षा प्राप्त करणे ही वीज कंपनीच्या अभियंत्यांवर मोठी जबाबदारी असते. सध्या महाराष्ट्रात टाटा पॉवर, बी. ई. एस. टी, रिलायन्स एनर्जी व महावितरण ह्या वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. शेतातून जाणारे ओव्हरहेड कंडक्टर्स बऱ्याच ठिकाणी खाली आलेले दिसतात. त्यांचे जमिनीपासूनचे अंतर नियमाप्रमाणे ठेवणे अन्यथा अपघातास आमंत्रण तसेच रोहित्रे सबस्टेशनमधील उघडे बॉक्सेस, कुंपण नसणे इ. बऱ्याच त्रुटी आढळतात. संबंधित विभागाच्या विद्युत निरीक्षकाने अशा धोकादायक स्थितीला जबाबदार असणाऱ्या कंपनी व अभियंत्यावर कायदेशीर कारवाई केली तरच विद्युत अपघात कमी होऊन सुरक्षा मिळेल. वीज कंपनीच्या अभियंत्यांनी त्यांची देखभाल व्यवस्थित ठेऊन, प्री मान्सून मेन्टेनन्स परमिट सिस्टीम व अन्य कामांमध्ये नियमांप्रमाणे अनुपालन घेतल्यास विद्युतसुरक्षा दूर नाही. ग्राहकांचे विद्युत सुरक्षेबाबतीत अधिकार व कर्तव्ये पुढील लेखात पाहू.

पर्यवेक्षकाचा परवाना देण्यापूर्वी एक वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. काही लोकांकडून/संस्थांकडून ही अट काढून टाकावी अशी मागणी सध्या जोर धरताना दिसत आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना (सिव्हिल इंजिनीअरिंग) शासनातर्फे डायरेक्ट कामे देण्याची योजना सुरू आहे. विद्युत क्षेत्रात ही अशी कामे देता येतील का हा विचार सुरू आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे नुकतीच पदवी अथवा पदविका घेऊन बाहेर पडलेल्या अभियंत्यांना विद्युत संचमांडणीवरील चांचण्यांचा अनुभव नसल्यामुळे टेस्ट रिपोर्ट बिनचूक न जाऊन संचमांडणीस धोका होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ‘‘Rules and conditions for issuing certificates of competency under Regulation 29 of CEA Regulation 2010’’ या अंतर्गत सुपरवायझरसाठी एक वर्षांचा अुभव असणे अगदी योग्य आहे.
विद्युत सुरक्षा अभियानात विद्युत कंत्राटदाराची कर्तव्ये
* प्रत्येक कंत्राटदाराने त्याच्याकडे असलेल्या सुपरवायझर, वायरमन आणि अ‍ॅप्रेंटिसची नोंदवही (रजिस्टर) अद्ययावत ठेवणे. फॉर्म ‘1’ प्रमाणे ते असावे.
* त्यांच्याकडे असलेली उपकरणे जसे मेगर, अर्थटेस्टर इ. सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे.
* कंत्राटदाराकडे काम करीत असलेल्या सुपरवायझरने जॉब सोडला तर कंत्राटदाराचे लायसेन्स रद्द होऊ शकते, म्हणून अन्य पर्यवेक्षकाची नेमणूक करून अनुज्ञापक मंडळास कळविणे सी.ई.ए रेग्युलेशन २०१० च्या कलम २९ प्रमाणे बंधनकारक आहे.
* कुठल्याही वीज संचमांडणीचे काम केल्यानंतर संचमांडणीचा चाचणी अहवाल (टेस्ट रिपोर्ट) परवानाधारक सुपरवायझरने सही करून त्यावर कंत्राटदाराने काऊंटर साइन करून वीज कंपनीत सबमिट करावा.
* आपण केलेल्या कामाचाच टेस्ट रिपोर्ट सादर करावा.
* काही कारणांमुळे दुसऱ्यांनी केलेल्या संच मांडणीचा अहवाल द्यायची वेळ आली तर स्वत:कडील उपकरणे वापरून सखोल चाचण्या घेऊन मगच टेस्ट रिपोर्ट द्यावा.
* संच मांडणीच्या साइटवर न जाता व चाचण्या न घेता जो टेस्ट रिपोर्ट सादर केला जातो त्याला बोगस टेस्ट रिपोर्ट समजून मंडळाकडून कायदेशीर कारवाई होऊ शकते.
* संच मांडणीस आग लागल्यास किंवा शॉर्ट सर्किट झाल्यास टेस्ट रिपोर्ट देणाऱ्या विद्युत ठेकेदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई होते, याचे भान ठेवणे आवश्यक आहे.
* एखाद्या बिल्डरकडे हाऊसिंग स्कीमचे काम, कारखाने, कापरेरेट्स, अथवा शॉपिंग मॉल इ. च्या वीज संचमांडणीची कामे करताना विद्युत कंत्राटदाराने भारतीय विद्युत नियमांना कुठल्याही प्रकारे बाधा न येता काम करणे.
* बिल्डर, विकासक अथवा ग्राहकांच्या प्रेशरमध्ये न येता विद्युतसुरक्षा प्राप्त करणे हे ध्येय विद्युत कंत्राटदाराने ठेवणे अनिवार्य आहे.

प्रकाश कुलकर्णी
विद्युत सल्लागार आणि सदस्य,
राष्ट्रीय सुरक्षा परिषद,
plkul@rediffmail.com

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..

wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?