रावबहाद्दूर एस. एस. तालमाकी
१९९४ साली मुंबईच्या गावदेवी भागात स्थापन झालेल्या सारस्वत को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीचा शताब्दी समारंभ येत्या २१ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने या संस्थेचे संस्थापक आणि भारतात सहकारी गृहनिर्माण चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या रावबहादूर एस. एस. तालमाकी यांच्याविषयी..
आ ज एकटय़ा महाराष्ट्र राज्यात सर्व प्रकारच्या मिळून सुमारे सव्वादोन लाख सोसायटय़ा आहेत. त्यापकी सर्वात जास्त म्हणजे एक लाखाच्या घरांमध्ये हौसिंग सोसायटय़ा आहेत आणि त्यामधून महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपकी एक तृतीयांश लोकसंख्या राहात आहे.
हौसिंग सोसायटीची आणि त्यात वास्तव्य करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढते आहे. परंपरागत स्वरूपाच्या हौसिंग सोसायटय़ा (म्हणजे कमीतकमी दहा व्यक्तींनी एकत्र येऊन भूखंड विकत घेणे आणि त्यांनी सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे सोसायटी स्थापन करणे.) केव्हाच इतिहासजमा होऊन आता सर्वत्र अगदी ज्या खेडय़ापाडय़ांची नावेसुद्धा कोणी ऐकली नव्हती, त्या ठिकाणीसुद्धा अत्यंत आधुनिक सुखसोयी असलेले टॉवर्स उभे राहात आहेत. या टॉवर्समधील गाळे सामान्यांना परवडणारे आहेत किंवा ws06नाहीत हा प्रश्न अलाहिदा. परंतु अशा टॉवर्सचे बांधकाम प्रचंड प्रमाणात चालू आहे, ही बाब आपण वृत्तपत्रांतील पानभरच्या जाहिरातीतून पाहतोच. सांगण्याचा मुद्दा असा, की ही सहकारी हौसिंग चळवळीची मुहूर्तमेढ रावबहादूर एस. एस. तालमाकी यांनी रोवली. त्याचे दृश्यफळ म्हणजे १९१३ साली त्यांच्या आणि अन्य सात सहकाऱ्यांच्या पुढाकाराने १९१४ साली मुंबईच्या गावदेवी येथे उभी राहिलेली सारस्वत को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी २१ डिसेंबर, २०१४ रोजी मोठय़ा थाटात शताब्दी साजरी करत आहे.
आठ शिलेदार
रावबहादूर तालमाकी यांच्या व्यतिरिक्त या सोसायटीचे अन्य सात संस्थापक असे होते- अ‍ॅड. गणेश पी. मुर्डेश्वर, (पुढे त्यांनी बॉम्बे को-ऑपरेटिव्ह हौसिंग असोसिएशन स्थापन केली. ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. १९४८ साली मुंबईत स्थापन झालेल्या आजच्या मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनचा जन्म याच असोसिएशनमधून झाला.) एन. एस. कौशिक, एच्. शंकरराव, एस. एस. बलसेकर, एस. एन. कलबाग, एम. एम. मुंडकर व विठ्ठलराव.
दोन शयनगृहे, हॉल, स्वयंपाकगृह यांचा समावेश असणारे एक घर अशा एकूण १८ इमारती बांधण्याचे ठरले. विशेष म्हणजे प्रत्येक गाळ्याला स्नानगृह आणि शौचकुपाची जोड देण्यात आली. आíकटेक्ट एस. के. तलगेरी व डी. व्ही. नाडकर्णी यांनी इमारतीच्या बांधकामावर देखरेख केली.
गावदेवी येथील सोसायटीने सांताक्रूझ येथे सारस्वत उपनगर सहकारी सोसायटी (१९८१) आणि आनंदाश्रम सहकारी सोसायटी (१९३७) उभी राहिली. वर्षभरात ताडदेव येथे तालमाकी सोसायटी साकारली. या सोसायटीला रावबहादूर तालमाकी यांचे नाव देण्यात आले. ताडदेव येथे जी. पी. मुर्डेश्वर यांचे नाव देण्यात आलेली गणेश प्रसाद सहकारी सोसायटी उभी राहिली.
सहकारी चळवळीचे प्रणेते
आज महाराष्ट्रातील सहकारी चळवळ म्हटली म्हणजे वैकुंठभाई मेहता, धनंजयरराव गाडगीळ यांची प्रामुख्याने नावे डोळ्यासमोर उभी राहतात आणि त्यात वावगे असे काही नाही. कारण या दोघाविभूतीचे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला फार मोठे योगदान आहे.
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या भगीरथ प्रयत्नांतून उभा राहिला. त्यासाठी वैकुंठभाई आणि धनंजयराव यांचे फार मोठे योगदान होते. या दोन्ही विभूती सहकारी चळवळीशी एकरूप झाल्या होत्या. परंतु हे दोघे सहकारी चळवळीत येण्यापूर्वी रावबहादूर तालमाकी यांनी सहकारी चळवळीला वाहून घेतले होते हे वास्तव आहे.
तालमाकी यांचे योगदान
तालमाकी यांनी प्रथम सहकारी पतपुरवठा सोसायटी स्थापन केली. या पतपुरवठा सोसायटीचे नाव ‘शामराव विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.’ ती १९०६ मध्ये म्हणजे पहिला सहकारी कायदा अस्तित्वात आल्यावर दोन वर्षांनी स्थापन झाली. ही पतपुरवठा सोसायटी स्थापन केल्यानंतर तालमाकी
यांनी १९०९ मध्ये ग्राहक सहकारी भांडार सुरू केले. त्यानंतर शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँकेने अर्थपुरवठा केलेली तालमाकी
यांनी सारस्वत एज्युकेशन आणि प्रॉव्हिडंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली.
हौसिंग सोसायटीची मुहूर्तमेढ
१९१४ मध्ये मुंबईच्या गावदेवी भागात त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून सारस्वत को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी साकारली. त्यानंतर त्यांनी आणखीही काही हौसिंग सोसायटय़ा मुंबईच्या उपनगरांत आणि बंगलोर (आताचे बंगळुरू), धारवाड या ठिकाणी स्थापन केल्या.
सहकारी चळवळीचे आणि विशेष करून सहकारी गृहनिर्माण चळवळीचे आद्य प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालमाकी यांचे संपूर्ण नाव श्रीपाद सुबराव तालमाकी यांचा जन्म कर्नाटकमधील उत्तर कन्नडामधील होनावर या लहानशा खेडय़ात १८६८ च्या नाताळच्या दिवशी झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सहकारी चळवळीचा वसा घेणे म्हणजे एक आव्हानच होते. कारण त्या वेळी सर्वच वस्तूंची मक्तेदारी एक तर खाजगी क्षेत्राची किंवा सरकारची होती. त्या वेळी बुद्दिमान लोक कमी होते अशातला प्रश्न नाही. परंतु सामान्य माणसे परस्परांच्या फायद्यासाठी एकमेकांशी हात देऊ शकतील, ही संकल्पना कोणालाच सुचली नाही, ती रावबहादूर तालमाकी यांना सुचली. आणि ती त्यांनी सहकारी चळवळीच्या माध्यमातून केवळ भारतात नव्हे
तर संपूर्ण आशिया खंडात प्रथम साकारली.
भविष्याचा वेध घेणारे तालमाकी
मोठय़ा प्रमाणावर असलेल्या घरटंचाईवर उतारा म्हणून तालमाकी यांनी सहकारी गृहनिर्माण चळवळीला चालना दिली नाही. परस्परांमध्ये एकीची, सामंजस्याची, परस्परांना मदत करण्याची वृत्ती वृद्धिगंत व्हावी या हेतूने त्यांनी सहकारी गृहनिर्माण चळवळीचा पुरस्कार केला. मुंबईत घरटंचाई जाणवू लागली ती देशाचे विभाजन झाल्यावर मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या लोंढय़ामुळे. परंतु तालमाकी यांनी १९१४ साली जेव्हा मुंबईत घरे बांधण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध होती, तेव्हा त्यांनी गावदेवी येथे पहिली सहकारी गृहनिर्माण स्थापन केली हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.
स्वातंत्र्यकाळात चालना
स्वातंत्र्यपूर्व काळात गृहनिर्माण सोसायटय़ा स्थापन होत असल्या तरी त्यांना खरी चालना मिळाली स्वातंत्र्योत्तर काळात. स्वातंत्र्यानंतर मुंबईत निर्वासितांचा प्रचंड लोंढा आल्यामुळे पहिल्या प्रथम डिपॉझिटवर आणि नंतर पागडी पद्धतीवर मिळू शकणारा निवारा मुंबईत दुर्मीळ
झाला. एके काळी मुंबईच्या अनेक इमारतींवर जागा भाडय़ाने देणे आहे असे फलक लागलेले असायचे,
यावर आज कोणी विश्वास ठेवणार नाही. परंतु ही वस्तुस्थिती होती. परंतु १९४८ मध्ये मुंबई सरकारने जो भाडे नियंत्रण कायदा केला त्यामुळे परिस्थिती बदलली. कारण भाडेकरूंना संरक्षण देण्यासाठी १९४८ च्या कायद्यात १९४० चे भाडे मुक्रर केले होते. त्यामुळे चाळी बांधणारे लोक बिथरले आणि त्यांनी चाळी बांधण्याचे बंद केले. या काळात बाबुराव परांजपे यांसारख्या मराठी मंडळींनी मुंबईच्या पश्चिम उपनगरात सहकारी तत्त्वावर घरबांधणी सुरू केली. त्यामुळे उत्तेजन मिळून अनेक गरजू एकत्र येऊन सहकारी हौसिंग सोसायटय़ा स्थापन करू लागले. परंतु अल्पावधीतच बिल्डर लोकांनी इमारत बांधकामात मोठय़ा प्रमाणावर प्रवेश केला आणि
हा हा म्हणता, मुंबई शहर आणि
उपनगरे यांमधील भूखंड मिळेल त्या किमतीला विकत घेऊन त्यावर इमारती उभ्या करू लागले; आणि आज
तर सर्वत्र बिल्डरांचेच राज्य आहे. ते इतके मुर्दाड झाले आहेत की ते सोसायटीच्या नावे कन्व्हेअन्स, डीम्ड कन्व्हेअन्स करू देत नाहीत, की शासनाच्या कायद्यांना भीक घालीत नाहीत. त्यामुळे बिल्डरांना चाप लावण्याचे शासनाचे स्वप्न आज तरी स्वप्नच राहणार आहे. आणि ज्या सामान्य जणांना परवडणारा निवारा हवा आहे, असे लोक झोपडपट्टय़ांमधूनच राहणार आहेत. झोपडपट्टय़ांतून राहणाऱ्यांची संख्या मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के असल्याचे नुकतेच एका एन.जी.ओ.ने सर्वेक्षणाअन्ती प्रसिद्ध केले आहे.
अशा या काळात रावबहादूर एस. एस. तालमाकी यांचे नाव विस्मरणात गेले तर आश्चर्य वाटावयास नको.

NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा