सौरऊर्जेपासून मिळणारी वीज ही घर, इमारतींमधील दिवे, बाहेरील दिवे इत्यादींसाठी  वापर करता येऊ शकते. याशिवाय या विजेवर कॉम्प्युटर्स, टेलिव्हिजन, 20 पंखेदेखील चालवता येतात..
मामा गील लेखामध्ये आपण पाण्याची बचत व त्याचे संवर्धन, त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंगची माहिती घेतली. या लेखामध्ये आपण सौर ऊर्जेपासून मिळणाऱ्या विजेच्या  वापराबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.
सौरऊर्जा ही एक स्वच्छ, अमर्यादित, नूतनशील व अ-प्रदूषणकारी ऊर्जा आहे. जगभरामध्ये,  विशेषत: पाश्चिमात्य देशांमध्ये सौर ऊर्जेचा वापर अतिशय मोठय़ा प्रमाणात होतो व दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. तेथील तंत्रज्ञानदेखील या क्षेत्रात अत्यंत पुढारलेले आहे.
आपल्या सबंध देशात व त्यातूनही महाराष्ट्रात स्वच्छ सूर्यप्रकाश वर्षांकाठी साधारणपणे १० ते ११ महिने उपलब्ध असतो. मात्र म्हणावे तेवढय़ा प्रमाणात आपल्याकडे सौरऊर्जेचा वापर विशेषत: वीज निर्मितीसाठी होत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये राज्य व केंद्र सरकारने अंगीकारलेल्या धोरणांमुळे सौरऊर्जेचा वापर हा बऱ्यापकी वाढला आहे. त्यामुळे सौर पटल / पॅनेलच्या उत्पादन वाढीमुळे त्याची किंमतदेखील बरीचशी कमी झाली आहे.
सौरऊर्जा वापरताना येणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिची ‘साधनप्रणाली किंमत’ अथवा ‘सिस्टिम कॉस्ट.’ सर्वाचाच तिच्या किमतीबद्दल आक्षेप असतो. या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत काम करताना हे लक्षात आले की नसíगक ऊर्जा, जशी सौर ऊर्जा ही मोफत व मुबलक असते तशीच तिची साधनप्रणालीदेखील जवळजवळ  मोफत अथवा अगदी स्वस्त हवी, अशी बऱ्याच जणांची अपेक्षा असते!
खरे तर सौरऊर्जा वापरण्यासाठी आपण नेहमीच तिची तुलना ही M.S.E.B. च्या वीज आकाराशी करतो. पण इथे आपण एक गोष्ट विसरतो की आपल्याला ४ ते ७ रुपये प्रति युनिट वीज मिळण्यासाठी सरकारने करोडो रुपये खर्च करून पॉवर स्टेशन्सची उभारणी केलेली असते. पण इथे काही हजार अथवा लाख रुपये गुंतवून तुम्ही तुमचे स्वत:चे पॉवर स्टेशन उभे करता- ज्यातून मिळणारी वीज ही जवळजवळ मोफत असते!
सौरऊर्जेपासून मिळणारी वीज ही वेगवेगळ्या कारणांसाठी व अनेक ठिकाणी वापरता येते. घरे, बंगले, फार्म हाउसेस, इमारती, सोसायटी, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, हॉस्टेल्स, आश्रम, देवस्थाने,  दुकाने, मोठी व्यापारी संकुले / मॉल्स, सिनेमागृहे, कारखाने, इ. सर्वच ठिकाणी सौर विजेचा वापर करणे शक्य आहे. इतकेच नाही तर ग्रामीण भागात शेतीचे पंप चालवण्यासाठी, दूध डेअरी, पोल्ट्री फार्म या व अशा कित्येक ठिकाणी सौर वीज वापरता येते.
सौरऊर्जेपासून मिळणारी वीज ही वेगवेगळ्या कारणांसाठी वापरता येते. पण मुख्यत्वे तिचा उपयोग हा घर / इमारतींमधील दिवे, बाहेरील दिवे उदा. बागेमध्ये, पथदीप, आवारातील दिवे, पाìकगमधील दिवे (indoor & outdoor lighting)  इ. साठी करण्यात येतो. याशिवाय या विजेवर कॉम्प्युटर्स, टेलिव्हिजन, पंखेदेखील चालवता येतात. अर्थात, सौर विजेची ही प्रणाली बसवताना काही गोष्टी लक्षात घेणे, त्यांचा अभ्यास करून मग त्याप्रमाणे प्रणाली डिझाइन करून बसविणे महत्त्वाचे असते. उदा. जिथे ही प्रणाली बसवायची आहे ती जागा, कोणकोणत्या साधनांसाठी वीज लागणार आहे याचे गणित, किती वेळ (रोज) वीज लागणार आहे, त्या इमारतीच्या गच्चीवर सौर पॅनेल्स ठेवण्यासाठी पुरेशी ‘सावलीविरहित जागा’ (shadow free area), प्रणालीसाठी लागणारी इतर साधने ठेवण्यासाठी लागणारी बंदिस्त जागा किंवा खोली इ. अनेक गोष्टींचा अभ्यास करूनच प्रणाली बसविता येते.
वर नमूद केलेली उपकरणे सौर विजेवर वापरणे सोयीचे पडते; परंतु मिक्सर, फ्रीज, ओव्हन, इ. व अन्य उपकरणे या विजेवर चालविणे सामान्यत: शक्य नसते. तसेच वेगवेगळ्या क्षमतेचे ‘सोलर पॉवर पॅक्स’, जसे १ किलो वॅट, २ किलो व्ॉट, ५ किलो वॅट,  इ. वापरून त्यापासून सौर वीज मिळवणे सोपे व तुलनात्मकरीत्या  स्वस्त पडते. अशा पॉवर पॅकव्यतिरिक्त पथदिवे, घरगुती दिवे प्रणाली, सौर कंदील अशी
सौरऊर्जेची तयार साधने उपलब्ध असतात. ही साधने सामान्यत: ३ ते ५ तास रोज अशी वापरता येतात तर पथदिवे हे ‘स्वयंचलित- संध्या ते पहाट’ तत्त्वावर (Automatic- Dusk to Dawn operation)  चालतात.
शहरी भागामध्ये उंच / बहुमजली इमारतींमुळे सौरऊर्जेचा वापर घरामध्ये करणे काहीसे कठीण / अवघड होऊन बसते. अशा ठिकाणी कॉमन जागा जसे जिने, पाìकग, रस्ते, बाग, आवार, इ. ठिकाणी तिचा वापर करणे शक्य आहे. अशा भागांमध्ये इमारती बांधतानाच जर आवश्यक ते  डिझाइन केले तर तेथे सौरऊर्जेचा वापर करणे सोपे जाते. निमशहरी व ग्रामीण भागात मात्र सौर विजेचा वापर करणे हे जास्त सोपे आणि सोयीस्कर जाते.
सौर विजेच्या प्रणालीची योग्य ती काळजी घेतल्यास व अगदी जरुरी असा नाममात्र देखभालीचा खर्च केल्यास वर्षांनुवष्रे तिला काहीही होत नाही व आपण ‘एन्व्हायरो फ्रेंडली लो कॉस्ट’ वीज वापरल्याचा आनंद घेऊ शकतो! सौर विजेच्या प्रणालीची किंमत कमी करण्यासाठी शक्यतो एल. ई. डी. दिवे वापरल्यास त्याचा खूपच फायदा होतो.
काही ठराविक हवामानामध्ये, उदा. पावसाळ्यात किंवा ढगाळ वातावरणामध्ये सौर वीज मिळू शकत नाही. तेव्हा आपण नेहमीची वीज वापरू शकतो. इथे प्रणाली तयार करतानाच अशी केली जाते की
सौरऊर्जा उपलब्ध नसेल तर आपोआप ती नेहमीच्या (पारंपरिक) विजेवर चालेल.
सौर विजेचा वापर करणे हा सध्याच्या भारनियमन परिस्थितीवर एक हमखास तोडगा तर आहेच, त्याचबरोबर वाढत जाणारे लाइट बिल कमी करण्याचा नामी उपायदेखील आहे!