आमच्या घराला पुढे व मागच्या बाजूला प्रशस्त ओटे होते. त्यावर अनेक कार्यक्रम होत. उन्हाळ्यात आईस्क्रीम पॉटमधून घरी बनवलेले व्हॅनिला, मँगो आईस्क्रीम खाणे हा आवडता कार्यक्रम!
कुणाचे घर समुद्रकाठी तर कुणाचे नदीकिनारी! कुणाचे डोंगरमाथ्यावर तर कुणाचे डोंगर पायथ्याशी! पण आमचे घर चक्क रेल्वे रुळांच्या शेजारी होते.
माझे मामा पश्चिम रेल्वेच्या सेवेत होते. सांताक्रुझ स्टेशनच्या पश्चिमेला खारच्या दिशेचे टोक आहे त्याला लागूनच रेल्वे लेव्हल क्रॉसिंगचे गेट होते. त्याला लागूनच माझ्या मामांना ६९/ई क्रमांकाचा छोटेखानी ५ खोल्यांचा अवतीभवती मोकळी जागा असलेला बंगला मिळाला होता. बंगल्याचे गेट चक्क रेल्वे रुळांच्या दिशेलाच होते. घराच्या मागे मच्छी मार्केट व खाटिकखाना! त्यामुळे कावळे आणि त्यांची कावकाव यांची अजिबात कमतरता नव्हती. घराच्या तिसऱ्या बाजूला पारशी बाईचे जोरात चालणारे हॉटेल होते. त्याचा आम्हाला कपबश्यांच्या खणखणाटाशिवाय काहीच त्रास नव्हता. उलट तिच्या आवारातले शेवग्याच्या शेंगांचे झाड असे काही वाकले होते की, शेंगा आमच्या बाजूला लटकत असत. भरपूर शेंगा असलेले झाड सत्यभामेच्या पारिजातकाची आठवण करून देत असे. शेंगा तोडण्यासाठी पारशिणीची फूल-टू-परमिशन होती. प्रत्यक्ष घरात शिरण्याचा जो दरवाजा होता त्याच्या समोरून लेव्हल क्रॉसिंग गेटमधून पूर्व-पश्चिम भाग जोडणारा रस्ता जात असे. या रस्त्याचे वैशिष्टय़ म्हणजे पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी माणसांना व वाहनांना हा सोईचा एकमेव मार्ग होता. रेल्वे रुळांच्या चार मार्गिका त्यावेळी होत्या. सध्या जो पूल आहे तो तेव्हा बांधला नव्हता. आमच्या घरासमोरून चर्चगेट-विरार स्लो गाडय़ा, नंतरच्या मार्गिकेवरून विरार-चर्चगेट स्लो गाडय़ा, नंबर तीन वरून फास्ट गाडय़ा, लांब पल्ल्याच्या व मालगाडय़ा मुंबईहून येणाऱ्या व शेवटच्या चार नंबरवरून मुंबईकडे येणाऱ्या फास्ट, लांबपल्ल्याच्या व मालगाडय़ा जात असत.
ज्यावेळी गाडय़ा धावत असत तेव्हा विशिष्ट घंटी वाजत असे ती आमच्या घराच्या कोपऱ्यावरच एका लोखंडी पेटीत बसविली होती. गाडी येण्याअगोदर गेट बंद होण्याची वेगळी घंटी संगीत इशारे देत असे. गेट बंद झाले असले, गाडी येताना दिसत असली तरी काही बहाद्दर रूळ ओलांडत असत. बरेचदा प्राणघातक अपघात होत. गेटमन बिचारा शिट्टी फुंकून फुंकून बेजार होई. शेवटी स्ट्रेचर, पांढरे कापड आणणे भाग पडे.
गणपतीच्या दिवसात तर पूर्वेकडून जुहू चौपाटीला जाणाऱ्या विसर्जनाच्या मिरवणुका, बँडवरची छान गाणी यामुळे विशेष करून गौरी-गणपती व अनंत चतुर्दशीला वातावरण भारलेले असे. नवरात्रात देवीच्या मिरवणुका-विशेषकरून बंगाल्यांची भव्य कालिमाता बघण्यासारखी असे. कोजागिरीला तर भेळेच्या पिशव्या भरभरून घेऊन जुहूला जाणाऱ्यांची कमतरता नसे. आमचाही त्यात सहभाग असेच. जुहू चौपाटी अक्षरश: फुलून जात असे. त्याशिवाय लग्नाच्या वराती वाजतगाजत जात. इंग्लंडची राणी घोडबंदर रस्त्याने गेली होती तिला बघायला अक्षरश: झुंबड उडाली होती पूर्वेकडून येणाऱ्यांची! अशा तऱ्हेने घरापुढे जो ओटा होता त्यावर कितीही वेळ बसले तरी वरील अनुभव थोडय़ाफार फरकाने येई. रात्री १२ ते ४ काय ती थोडी शांतता लाभे. पण रात्री उशिरा मद्यपान करून झिंगून बरळणारे व पहाटे दूधवाले ह्य़ांची हजेरी असे.
घराच्या ओटय़ाला लागून लोखंडाचे भक्कम व उंच फेन्सिंग होते. त्यामुळे रस्त्यावरची वर्दळ अगदी जवळून पाहता येई. या फेन्सिंगला लागून कंगवे-फण्या-पिना विकणारा जसला, ताडगोळे, केळी, काजू विकणारी बुवाजी, तिची शाळेत जाणारी भाची शशी, पेपरवाला किसन व लॉटरीवाला गोविंद असे सगळे बसत. रस्ता सतत वाहता असल्याने त्यांची विक्री बऱ्यापैकी होत असे. तरी हातावरचेच पोट असे. या सगळ्या मंडळीना रोज माठातले थंड पाणी, अधूनमधून लोणचे-भाजी, सणावाराला गोडधोड आमची आजी प्रेमाने देई. ही सर्व मंडळी पण आमच्याशी तितक्याच आपुलकीने वागत. पेपरवाला किसन सर्व मराठी वर्तमानपत्रे ताजी ताजी आणून देई. केळी, ताडगोळे आणल्या आणल्या बुवाजीने आणली नाही तर नवल! त्यांची पैशाची अपेक्षा नसे. पण त्यांच्या मनाचा मोठेपणा जाणून आम्ही पैसे घ्यायला लावत असू. बाजारातून पटकन् काही हवे असल्यास जसलाला सांगायचा अवकाश तो धावत जाऊन आणून देई. त्यामुळे आम्हाला शेजार नव्हता तरी प्रत्यक्षात त्याची कधीच कमतरता भासली नाही. हीच मंडळी आमचे शेजारी होते. कोपऱ्यावर फुलवाल्याचे दुकान होते. आमच्या बागेतच इतकी फुलझाडे होती की आम्हाला फुलांची आवश्यकता नसे. पण गौरी-गणपती, नवरात्र, दत्तजयंतीला मात्र भरघोस हार, कंठी, वेण्यांची ऑर्डर त्यांनाच! मुंबईसारख्या वेण्या कुठेच मिळत नसत. त्यामुळे पाहुणे आले की वेण्यांची ऑर्डर. एका बाजूला गाडय़ांचा धडधडाट-खडखडाट व गर्दीचा कोलाहल ह्य़ांनी आमचे घर वेढलेले होते. या ध्वनिप्रदूषणामुळे आम्हाला सर्वानाच थोडे मोठय़ाने बोलण्याची सवय झाली.
आमच्या मामासाठी सिधये म्हणून गृहस्थ स्थळ घेऊन आले. त्यांच्यासोबत अगदी सेनापती बापट यांच्यासारखी व्यक्ती होती. पण सेनापती बापट कशाला येतील आपल्याघरी असे सर्वाच्याच मनात आले, पण तरीही खात्री करावी म्हणून सिधये यांना हळूच विचारले तर त्यांनी ‘हो! तेच आहेत’ असे सांगितल्यावर आमच्या आश्चर्याला व आनंदाला सीमा राहिली नाही. साहजिकच सर्वजण नतमस्तक झालो. सच्चा स्वातंत्र्यसैनिक! आमची वास्तु खरोखर सेनापती बापटांच्या आगमनाचे पावन झाली होती.
आमच्या कुटुंबात आजी-आजोबा, दोन मामा-मामी, त्यांची बच्चे कंपनी, आम्ही तिघी बहिणी, दिवसभर कामाला असलेली सोमी, मंगल नामक भूभू आणि एक मनीमाऊ असे सर्वजण होतो. माझ्या वडिलांची बदली राजस्थानमध्ये झाल्याने शिक्षण, नोकरी व लग्न या कारणांनी आम्ही मामाकडेच होतो. त्यामुळे हे घर ही आमचेच होते. या व्यतिरिक्त आमच्याकडे सतत पाहुणे असत. ‘अतिथी देवो भव!’ हे घराचे ब्रीदवाक्य होते म्हणा ना! आमच्या घराचा केंद्रिबदु आमची आजी होती. तिला आम्ही ‘जिजी’ म्हणत असू.
वर-वधु संशोधन, नोकरीसाठी मुलाखत, ऑफिसचे काम, वैद्यकीय उपचार आणि महत्त्वाचे म्हणजे मुंबई दर्शन अशा विविध कारणांनी दूरदूरहून घरी पाहुणे येत. गाडय़ांच्या खडखडाटाने पहिल्या दिवशी सर्वाची प्रतिक्रिया एकच! ‘कसे काय तुम्ही रहाता या आवाजांमध्ये?’ पण सगळ्यांना सराव होई. त्यामुळे पाहुणे येण्याचे कधीच थांबले नाही. सांताक्रुझसारखे मध्यवर्ती ठिकाण, स्टेशनजवळ, भरपूर जागा, पाण्याचा त्रास नाही आणि आमच्या जिजीने केलेले सर्वाचे मनापासूनचे आदरातिथ्य यामुळे येणारे भारावूनच जात. बहुतेक सर्व उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजराथ, मध्यप्रदेशातून येत. त्यांनी डबल डेकर बस, लोकल गाडय़ा, समुद्र आणि एव्हढी गर्दी पाहिलेली नसे. त्यामुळे डबलडेकर बस धावताना पाहिली की ‘देखो! दो मंझिला मकान कैसे दौड रहा है!’ किंवा धावून राह्यलं आहे’ असे उद्गार निघत. समुद्राचा क्षितीजापर्यंतचा विस्तार बघून सर्वाचे डोळे अक्षरश: विस्फारत. हे पाणी येते कुठून? जाते कुठे? लाटा आणखी पुढे का येत नाहीत असे अनेक प्रश्न त्यांना पडत. गेटवे ऑफ इंडियाला तर बोटीत बसायची इच्छा सर्वाना असे, पण हिंमत होत नसे. आपण ही दूर वाहून जाण्याची भीती असे. समुद्राचे पाणी खारट असते हे बघण्यासाठी चूळ भरत.
आमच्या घराला पुढे व मागच्या बाजूला प्रशस्त ओटे होते. त्यावर अनेक कार्यक्रम होत. उन्हाळ्यात आईस्क्रीम पॉटमधून घरी बनवलेले व्हॅनिला, मँगो आईस्क्रीम खाणे हा आवडता कार्यक्रम!
बागेत आंबा, जांभूळ, कडुनिंब, पेरू, सीताफळ अशी झाडे होतीच. पांढऱ्या व लाल डाळिंबांचे झाड होते. फुलझाडांमध्ये दारावरच मधुमालतीचा वेल, जाई-जुई-चमेली-मोगरा सदैव फुललेला, गुलाबाच्या अनेक रंगी अनेक जाती होत्या. झेंडु, आफ्रिकन लिली, पिवळी गुलाबी लिली, शेवंती, गुलबाक्षी अशी त्या त्या मोसमातली झाडे होती. केळी व अळुला तोटाच नव्हता. केळीची पाने आम्हाला कधीच विकत आणावी लागत नसत. आमचे नातेवाईक, मैत्रिणी या सर्वाना केव्हाही हक्काने वडीचे, भाजीचे अळु, कढीपत्ता व केळीची पाने नेता येत.
पेरूच्या झाडाखाली चारजण सहज बसतील एव्हढा झोपाळा होता. कोणी आलं की प्रथम बागेचे कौतुक व झोपाळ्याचा आनंद घेऊनच मंडळी घरात शिरत.
या घराने काही दु:खद प्रसंग अनुभवले, पण कितीतरी लग्नकार्ये अगदी ठरण्यापासून इथे पार पडली. डोहाळे जेवण, बारसे, मुंजी, गंगापूजन, उद्यापने अशी अनेक मंगलकार्ये आनंदोत्सव इथे साजरे झाले. या घराने भरभरून संस्कार दिले. येणाऱ्या जाणाऱ्याचे मनमोकळेपणे स्वागत केले. कोणीही आले तरी खारकडून गाडी येत नाही हे बघण्याकडे आमच्या आजोबांचे लक्ष असे. जाणाऱ्याला स्टेशनवर सोडायचे काम आमचे असे. गाडी येण्याच्या २-३ मिनिटेच आधी निघून आम्हाला गाडी पकडता येत असे. दमूनभागून गाडीतून उतरलो की दुसऱ्या मिनिटाला घरात! मुंबईला केव्हढे मोठे सुख होते! पोस्टल पत्ता सांताक्रुझ पूर्व, पण रेल्वे क्वार्टर पश्चिमेला! त्यामुळे नवख्या माणसाला शोधत फिरावे लागे. गाडीत पाकिटमार करून पास पैसे काढलेली रिकामी पाकिटे आमच्या आवारात सापडत, असा अनोखा अनुभव मिळेल का?
१९५७ ते १९८४ पर्यंत आमच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेली ही वास्तु खरोखर आम्हाला लाभली होती. त्यानंतर रेल्वेतर्फे सहापदरीकरण झाल्याने ही वास्तु होत्याची नव्हती झाली, पण तिथल्या स्मृति मात्र आमच्या मनात जशाच्या तशाच आहेत!