vr03पर्यावरणाशी पूरक असे वातावरण आपल्या सभोवती निर्माण करावे, असे कोणत्याही सुजाण नागरिकाला वाटत असते. पण म्हणजे नेमके काय करावयाचे, ह्याची माहिती नक्की कुठे मिळेल, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. खरं तर आजच्या माहिती युगात ही गोष्ट अवघड नक्कीच नाही. पण केवळ माहितीचा खजिना आसपास असूनदेखील त्या माहितीचे योग्य आकलन होईलच याची खात्री देता येत नाही. आपण पिण्याच्या पाण्याचे उदाहरण घेऊ. माणसाला दिवसाला किती पाणी लागते? साधारणपणे पिण्यासाठी ३ लिटर, अंघोळीसाठी १५ ते २० लिटर व इतर कामांसाठी १०० लिटर पाणी आपल्याला लागते. म्हणजेच सरासरी १२५ ते १५० लिटर पाणी ही आपल्या प्रत्येकाची गरज असते. त्यातील स्वयंपाकासाठी व पिण्यासाठी लागणारे पाणी र्निजतुक व रासायनिकदृष्टय़ा शुद्ध असले पाहिजे यात काही दुमत असण्याचे कारण नाही. अंघोळीसाठीदेखील पाणी चांगले असणे आवश्यक आहे. नलिकाकूप विहिरींचे पाणी काही ठिकाणी वापरले जाते. त्यात क्षारांचे प्रमाण अधिक असेल व ते पाणी रोजच्या वापरात आले तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. कपडे नीट धुतले न जाणे, भांडय़ांवर डाग पडणे व अशा पाण्याचा वापर अंघोळीसाठी केला तर केस राठ व चरबट होणे आणि कातडीवरील अनिष्ट परिणामही आपल्याला अनुभवयास मिळतात.

आपल्याला पिण्यासाठी फक्त ३ ते ४ लिटर पाणी पुरेसे असले, तरी आपण शौचालयाच्या टाकीतदेखील पिण्याच्याच पाण्याच्या नळाची जोडणी करीत असतो व दरवेळी ही टाकी खाली करीत असतो. साधारण १० ते १५ लिटर क्षमतेची ही टाकी घरातील प्रत्येक व्यक्ती तीन ते चारदा तरी वापरते. म्हणजेच पिण्याचे ५० ते ६० लिटर पाणी आपण शौचालयामध्ये सहजपणे टाकतो व त्याचे आपल्याला काही वाटतही नाही!
५ माणसांच्या घरात आपण जवळजवळ ३०० लिटर पिण्याचे पाणी आपण वाया घालवीत असतो, असे म्हणावयास हरकत नाही. देशातील ३० ते ४० टक्के जनतेला शुद्ध पाणी अभावानेच मिळते व २० ते ३० टक्के लोकांना त्यासाठी झगडावे लागते. या पाश्र्वभूमीवर हे चित्र फारच विदारक आहे, ह्यात शंकाच नाही. पाण्याच्या बाटल्या १५ ते २० रुपये देऊन खरेदी करावयाच्या व त्यातील अध्र्याहून अधिक पाणी बाटलीतच सोडून द्यायचे हे आपल्याला शोभत नाही. मुळात आपली संस्कृती बाटलीच्या पाण्याची नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तांब्याच्या भांडय़ात ठेवलेले पाणी शुद्ध व र्निजतुक असते, हे आपण विसरून गेलेलो आहोत.
आम्ही शाळेत असताना गणिते सोडविण्यासाठी दिली जायची. त्यातील एक गणित होते की गळक्या हौदात जर ठरावीक गतीने पाणी भरले तर तो हौद भरायला किती वेळ लागेल? त्यावेळी आम्हाला प्रश्न पडे की जर हौद गळका असेल तर दुरुस्त करण्याच्या आधी तो भरायचाच कशाला? पण आता असे लक्षात येते, की आपला सारा देशच हे गळक्या हौदात पाणी भरण्याचे काम इमाने इतबारे करीत आहे! पिण्याचे पाणी शौचालयाच्या टाकीत वापरणे म्हणजे ते गळक्या हौदात भरण्यासारखेच आहे. कोणत्याही प्रगत देशात असे होत नाही. आमच्या शाळांमध्ये व महाविद्यालयांमध्ये नैसर्गिक स्रोताचा योग्य वापर कसा करावा हे शिकविलेच जात नसेल, तर त्यात आमच्या विद्यर्थ्यांचा काय दोष? खरं तर आतापर्यंत आपण स्वयंपाक घर व बाथरूमच्या पाण्याचे पुनर्चक्रांकण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करायला हवे होते. आमच्याकडे आय. आय. टी. व नीरीसारख्या प्रगल्भ संस्था असूनदेखील आपण या क्षेत्रात काही प्रगती केली नाही, ही खेदाचीच बाब आहे.
घरे बांधताना हा विचार होणे अतिशय आवश्यक आहे. हल्ली मोठमोठय़ा योजनांमधून हजारो घरे बांधली जात आहेत. या इमारती बांधतानाच जर आपण स्वयंपाक घरातील व बाथरूममधील सांडपाणी एकत्रितपणे गोळा करून ते जर ऑक्सिजन (हवेच्या) साहाय्याने शुद्ध करून शौचालयासाठी वापरायचे ठरविले, तर पिण्याच्या पाण्याची केवढी तरी बचत होईल. १०० सदनिकांची इमारत असेल तर त्यासाठी १०००० लिटर क्षमतेच्या ४ ते ५ भूमिगत टाक्यांची सोय त्यासाठी करावी लागेल व त्यातून कॉम्प्रेसर वापरून दिवसभर हवा खेळविली तर त्या पाण्यातील सेंद्रीय कार्बनचे प्रमाण कमी होऊन त्याचा वास जाईल व शौचालयाच्या टाकीसाठी ते वापरता येईल. सांडपाण्याचा टाक्यांमध्ये राहण्याचा काल ४ दिवसांचा असतो, म्हणून चार टाक्या बांधायच्या आहेत. गरज वाटेल तेव्हा थोडे पोटाशियम परमॅग्नेट वापरावे, म्हणजे पाणी र्निजतूक होण्यास मदत होईल. अनेक गृह निर्माण संस्थांमध्ये परस्पर सामंजस्याने हे करता येण्यासारखे आहे. मात्र यासाठी स्वत:च्या घराच्या चौकटीच्या बाहेर येऊन थोडा विचार करावा लागेल. हल्ली प्रत्येक घरात वाहन आले आहे. दुचाकी किंवा चार चाकी वाहनांसाठी पाण्याची सोय करावी लागते. वाहने धुण्यासाठी अनेक ठिकाणी मुक्तहस्ताने पिण्याचेच पाणी वापरले जाते व जर कुणी त्याला हरकत घेतली, तर अरेरावीची उत्तरेदेखील दिली जातात. पैसा असेल तर आम्ही काहीही करू शकतो, या भ्रमात राहणारी ही माणसे नैसर्गिक स्रोतांचा केवढा अपमान करीत असतात हे त्यांच्या लक्षातदेखील येत नाही. वास्तविक वाहन धुताना पाणी कमी वापरणे, ओल्या फडक्याने वाहन पुसणे, शिळे पाणी ओतून देण्याऐवजी त्याचा वापर करणे, पावसाळ्यात छतावरून वाहणाऱ्या पाण्याचा वापर त्यासाठी करणे, यासारख्या उपायांमुळे आपण पिण्याच्या पाण्याची बचत मोठय़ा प्रमाणावर करू शकतो. पावसाळ्यात छतांवर जमा होणारे पाणी जमिनीत मुरवून नलिकाकूप विहिरीच्या माध्यमातून वर्षभर वापरता येते, पण त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. आजकाल रेन वॉटर हार्वेस्टिंग हा परवलीचा शब्द झाला असला, तरी यशस्वीपणे केलेल्या योजनांची संख्या मात्र हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखी नाही ही वस्तुस्थिती आहे. असे किती पाणी आपण पावसाच्या माध्यमातून जमिनीत मुरवू शकतो, हे पाहिले तर आपण किती पाणी वाया घालवीत आहोत हे लक्षात येईल. समजा एखाद्या इमारतीची गच्ची ३० मीटर बाय ३० मीटर असेल ते क्षेत्रफळ ९०० चौरस मीटर एव्हढे असते, मुंबईत साधारणपणे २००० मिलीमीटर म्हणजे २ मीटर पाऊस पडतो असे मानले, तर पावसाळ्यात एकूण १८०० घनमीटर म्हणजे १८ लाख लिटर पाणी त्या गच्चीवरून वाहत असते. जर हे पाणी आपल्याला मोठय़ा नळावाटे जमिनीत मुरवून मग नलिकाकूप विहिरीच्या माध्यमातून कितीतरी महिने वापरता येईल. आम्ही नगरला राहात असताना सतत दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात जेव्हा केव्हा पाऊस पडे, तेव्हा आम्ही पन्हाळ्यातून पडणाऱ्या पाण्याने घरातील सारी भांडीकुंडी भरून ठेवायचो व दोन-तीन दिवस तरी पाणी भरण्याचा त्रास वाचायचा! हा प्रकार पावसाळ्यात किमान ४-५वेळा तरी चालायचा व १० ते १५ दिवसांचे पाणी साऱ्या नगरवासीयांना या माध्यमातून मिळायचे. मुंबईत नगरच्या तुलनेने १० पट तरी पाऊस पडतो. म्हणजेच अध्र्या वर्षांचे पाणी आपण पावसाचे साठवून वापरू शकतो.
आपल्या सर्वाच्या आवडीचे लेखक पु. ल. म्हणतात, ‘तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी’ हे किती खरे आहे नाही? गृह निर्माण संस्थांमधील हेवेदावे कमी करून जर आपण आपली सारी शक्ती व उपलब्ध वेळ योग्य रीतीने अशा विधायक कामासाठी वापरला, तर ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही उक्ती आपल्याला सार्थ करून दाखविता येईल ह्याची
खात्री वाटते.
डॉ. शरद काळे  (सह संचालक, जैवविज्ञान वर्ग, भाभा अणुशक्ती केंद्र)