nakota-logoसन फ्रान्सिस्को शहरात फिरत असताना आणि त्या शहराची भव्यता व सौंदर्याने मोहीत झालेल्या पुलंना कुसुमाग्रजांची कोणती कविता आठवली होती माहीत आहे का?
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक व्याकूळ करते केंव्हा
ती माजघरातील मंद दिव्याची वात ।।
वाऱ्यावर येथील रातराणी ही धुंद
टाकता उसासे चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकूळ तेंव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध ।।
ही कविता आठवली की आपले बालपण आठवल्याशिवाय राहात नाही व त्या शब्दांमधील ओलावा डोळ्यांच्या कडा नकळत ओलावून कधी जातो ते लक्षातही येत नाही. पण हा ओलावा अनुभवण्यासाठी घराचे घरपण ज्यांच्या वाटय़ाला आले, हे भाग्य सर्वानाच लाभते असे नाही. घरात सारे काही आहे पण त्यात माया नाही असे घर कुणालाच नको असते आणि घराचा स्वर्ग बनविणे आपल्याच हातात असते. या अशा घरासाठी पैसेच हवे असतात, असे मात्र नाही. पैसे असले तर त्याचा विनियोग करून आपण नक्कीच चांगले व समाधानात राहू शकतो यात शंकाच नाही. पण आहे त्या परिस्थितीत आनंद मानता येणे व आलेल्या क्षणांचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी मात्र जी मानसिकता लागते ती विकसित होण्यामध्ये घराचा वाटा फार मोठा असतो.
माणसे चिडचिडी असली किंवा क्षुल्लक कारणांवरून डोक्यात घालून घेणारी असतील तर त्याचा त्रास सगळ्या घरालाच भोगावा लागतो. त्याची कारणे फक्त स्वभावदोष याच सदरात बसणारी असतील असे नाही. आजूबाजूचे वातावरण, खाण्यापिण्याच्या सवयी, सभोवतीच्या माणसांच्या चित्तवृत्ती व जीवनाकडे बघण्याची दृष्टी या सर्व घटकांवर बरेच काही अवलंबून असते. शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभावदेखील घराच्या अशांतीसाठी कारण बनू शकतो. हा शास्त्रीय दृष्टिकोन शाळेत किंवा महाविद्यालयातच शिकविला जातो असे मात्र नाही. एखाद्या अशिक्षित माणसाकडेदेखील तो असेल, पण उच्चशिक्षाविभूषित पंडिताकडे तो असेलच असे नाही! दिवसभर चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा ठेवून संध्याकाळी ज्यांना पैसे देऊन हास्य क्लबात जावेसे वाटते त्यांना शास्त्रीय दृष्टिकोन आहे हे म्हणणे धाडसाचेच ठरेल, नाही का? पण हीच प्रवृत्ती समाजात वाढत चालली आहे. कारण आता घरे फक्त भिंतींचीच बनू लागली आहेत! भिंतींना एकाहून एक सुंदर असे रंग लागतात, पण जीवन बेरंग असेल तर त्या रंगांचा आस्वाद न घेण्याचे करंटेपण नशिबी येणे साहजिकच म्हणावे लागेल.
आपण काय खातो, कसे खातो आणि कोणत्या भावनेने खातो यावर नुसते शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यदेखील अवलंबून असते. अतिशय चांगल्या प्रतीचे अन्न जर आपण अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ात शिजवून खात राहिलो तर त्याचे दुष्परिणाम शरीराला दीर्घकाळ भोगावे लागण्याची शक्यता असते. अ‍ॅल्युमिनियम हा धातू मोठय़ा प्रमाणावर सर्वत्र आढळून येत असल्यामुळे त्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर होणे अपरिहार्य आहे. पण हा वापर औद्योगिक क्षेत्रातून आपल्या स्वयंपाकघरात शिरला तर मात्र आपल्याला सावध राहावे लागेल. अ‍ॅल्युमिनियमच्या भांडय़ांमध्ये पिण्याचे पाणी साठविणेदेखील घातक ठरू शकते. या भांडय़ांचा वापर फक्त कोरडे पदार्थ साठविण्यासाठी केला तर ते एकवेळ चालू शकेल. धान्य साठवून ठेवताना अ‍ॅल्युमिनियमच्या पिंपाचा वापर करावयाचा असेल तर त्याला आतून कागदाचे आवरण लावणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. अ‍ॅल्युमिनियमची सांडशी (चिमटा), चाळणी, भांडी साठविण्याच्या मांडण्या किंवा ताटाळी वगैरे वस्तू वापरात असल्या तर ते चालू शकते, पण फोडणीसाठी आणि भाज्या किंवा आमटी, कढी, रस्सा करण्यासाठी किंवा कोणतेच अन्न शिजविण्यासाठी या भांडय़ांचा वापर कटाक्षाने टाळावा. चिंच, लिंबू किंवा आमसूल वापरून आपण जे पदार्थ तयार करतो ते तर अजिबात या भांडय़ांमध्ये करू नयेत. दही लावताना ते अ‍ॅल्युमिनियमच्या किंवा पितळेच्या भांडय़ांमध्ये न लावता स्टीलच्या किंवा उपलब्ध असेल तर मातीच्या भांडय़ांमध्ये लावावे म्हणजे पूर्णपणे निर्धोक असे दही आपल्याला खायला मिळेल. मातीच्या गाडग्यात लावलेल्या दह्य़ाची चव काही औरच असते!
जेव्हा सातत्याने अ‍ॅल्युमिनियमची भांडी रोजच्या वापरात असतात त्यावेळी या धातूचे दृश्य परिणाम शरीरावर होण्याची शक्यता निर्माण होते. जमिनीमध्ये सर्वात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असलेला हा धातू स्वयंपाकघरासाठी मात्र तेवढा इष्ट नाही हे आवर्जून सांगावयाचे आहे. ज्या व्यक्ती अ‍ॅल्युमिनियमच्या कारखान्यात कामे करतात किंवा त्याची धूळ ज्यांच्या श्वासावाटे फुप्फुसांपर्यंत पोहोचते किंवा ज्यांची मूत्रपिंडे कमकुवत आहेत, ज्यांना रक्त शुद्धीकरणासाठी डायलिसीसवर अवलंबून राहावे लागते किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे अशा व्यक्तींना अ‍ॅल्युमिनियमची विषबाधा लवकर होऊ शकते. अ‍ॅल्युमिनियममुळे नेमकी काय इजा होऊ शकते? तर मानसिक गोंधळ, स्नायूंची शिथिलता, हाडे दुखणे, बोलण्यात तोतरेपणा येणे व मुलाची वाढ मंदावणे यासारखी लक्षणे या धातूच्या विषारीपणामुळे दिसू शकतात. याचे पर्यवसान फुप्फुसांच्या व हाडांच्या गंभीर आजारात किंवा मेंदूला इजा होण्यात होऊ शकते यावरून या विषयाचे गांभीर्य वाचकांनी लक्षात घ्यावयाचे आहे.
साधे, पण रुचकर व समतोल आहार आपण योग्य त्या धातूच्या भांडय़ांमधून सेवन केले तर ते अंगी लागेल हे नक्कीच; शिवाय शरीरावर त्या अन्नपदार्थाचे चांगले संस्कार होत राहातील हेही तेवढेच खरे आहे. कोणत्याही महाराष्ट्रीय पंगतीत साधं वरण, तूप, भात, लिंबू आणि मीठ यांपासून पारंपरिक जेवणाची सुरुवात होत असे. आजही अनेक घरांमधून जेवणाच्या या मेनूचे आकर्षण कमी झालेले नाही. माणसाने अमुक एक गोष्ट का खावी, कशी खावी किंवा का खाऊ नये याचे काही ठोकताळे असतात. सर्वच गोष्टी पुस्तकात लिहिलेल्या असतात असे नाही. हे ठोकताळे अनेक पातळ्यांवर सिद्ध झाल्यानंतर मग त्यांचे रूपांतर पुस्तकांमधून होते व नवीन पिढय़ांना हे ज्ञान मार्गदर्शक ठरते. गृहिणी ही खरी वैज्ञानिक असते. तिचे निरीक्षण व तिची आकलनशक्ती किती अचूक आहे यावर घराचे आरोग्य अवलंबून असते. बदलत्या काळानुसार घरातील पुरुषांनीदेखील आपले पाककौशल्य आवश्यकतेनुसार विकसित केले पाहिजे. घरातील सर्वाना नुसतेच काय आवडते याचा फारसा विचार न करता गृहिणी त्यांच्या शरीराला काय नेमके हवे आहे याचाही विचार सातत्याने करीत असते. त्यानुसार ते आवश्यक घटक आवडीच्या पदार्थामधून कसे देता येतील यासाठी तिचे विविध प्रयोग चालू असतात. त्यातूनच नवनवीन पदार्थ आपल्या स्वयंपाकघराची रुची वाढवीत असतात. घरी जर स्वादिष्ट पदार्थ मिळत असतील तर मुद्दाम बाहेर खाणाऱ्यांची संख्या आपोआप कमी होते. अर्थात, नव्या युगात घरी करून खाणे त्याज्य असेल किंवा कमी प्रतीचे वाटत असेल तर मात्र त्याला काही उपाय नाही!
नुसता वरणभात खाल्ला तर पित्त होईल असे वडीलधारी माणसे व विशेषत: आजी किंवा आई सांगत असत. साध्या वरणात तूरडाळ वापरलेली असेल व लिंबू आणि साजूक तूप त्याबरोबर घेतले नाही तर हमखास पित्त होते देखील! याचे मुख्य कारण म्हणजे तुरीच्या डाळीत एक घटक असा असतो की त्याने जठरातील विकारांच्या कार्यात अडथळा येतो. याला शास्त्रीय परिभाषेत ट्रिप्सीन रोधक असे म्हणतात. त्यामुळे प्रथिनांचे पचन नीट होत नाही. या अर्धवट पचलेल्या प्रथिनांचे पित्तरस पचन करू शकत नाही व त्यामुळे पित्तरस वापरलाच जात नाही आणि त्याचे प्रमाण वाढते. त्यालाच आपण पित्त झाले असे म्हणतो. जर लिंबाचा समावेश वरण भातासोबत असेल तर मग या ट्रिप्सीन रोधकाची शक्ती क्षीण होते. कारण आम्लीय द्रावणात त्याचे काही चालत नाही व अन्न पचन सुरळीतपणे होते. साजूक तुपामुळे जेवणाची लज्जत वाढते तो बोनस समजायला हवा. तुपाचे मुख्य काम म्हणजे डाळीत असलेल्या फायटेट नावाच्या आणखी एका रोधकाला नामोहरम करणे. या रोधकाचे काम म्हणजे शरीराला आवश्यक असणारे खनिज पदार्थ मिळू न देणे. त्यामुळे तुपाचे महत्त्व लक्षात येईल. शिवाय शरीराला आवश्यक असलेल्या कॅलरीज पुरविणे हेही तुपाचे काम असते. साधे वरण करताना त्यात थोडी हळदीची पूड व चिमूटभर हिंग टाकला तर त्या वरणाची चव तर सुंदर लागतेच, शिवाय त्यामुळे पचनाला मदत होते ती वेगळीच. अशा तऱ्हेने केलेली जेवणाची सुरुवात ही नंतर येणाऱ्या पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरी व जिलेबी मठ्ठा किंवा मोतीचूर लाडवांची लज्जत वाढविते व त्यांच्या पचनासाठी योग्य वातावरण निर्मितीदेखील करीत असते.
पुरणपोळी साजूक तुपाबरोबर खाताना असाच समतोल राखला जातो व त्याचा योग्य उपयोग शरीराला होत असतो. पुरण करीत असताना हरभरा डाळ वापरतात व त्यात सढळ हाताने गुळाचा वापर केला जातो. डाळ शिजत आली की त्यात गूळ घालणे ही खरी पुरण शिजविण्याची योग्य पद्धत असते, पण प्रेशर कुकरची सोय म्हणून ते मिश्रण आधी करून मग शिजविले जाते. त्यात गुळाच्या गोडीत बरीच घट होण्याची शक्यता असते. कुकरमध्ये निर्माण होणाऱ्या वाफेच्या दाबामुळे गूळ संपूर्ण विरघळतो व त्याची गोडी कमी होते. या उलट जर तो दाबविरहित शिजविला तर तो कणांच्या स्वरूपात राहतो व त्याची गोडी वाढते. योग्य पद्धतीने शिजविलेले पुरण पाटा-वरवंटा घेऊन वाटले की ते एकजीव होते. मिक्सरमधून काढल्यावर ते एकजीव झाल्यासारखे वाटले तरी ते झालेले नसते. दोन्हीच्या चवीत खूप फरक असतो हे सुगरण गृहिणींना वेगळे पटवून द्यायला नको. अशा तऱ्हेने केलेले पुरण सैल भिजविलेल्या कणकेच्या उंडय़ात भरून केलेली व खमंग भाजलेली पुरणपोळी तुपाबरोबर जेव्हा आपण खातो; तेव्हा आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रथिने, मेद, कर्ब, शर्करा, जीवनसत्त्वे व खनिजे यासारखे सर्व पोषक घटक तर मिळतातच, शिवाय योग्य प्रमाणात या आहारात ऑक्सिडेशन रोखणाऱ्या घटकांचा त्यात समावेश नैसर्गिकपणेच होतो.
आपल्या समतोल आहारासाठी एवढा खोलवर विचार झालेला आहे. बाहेर खाणे आता इतके नित्याचे होऊ लागले आहे की आम्ही फक्त विकएंडला घरी जेवतो हे सांगायची वेळ येईल! बदलत्या खाद्यसंस्कृतीत जे झटपट पदार्थ आपल्या ताटात शिरले आहेत त्यांच्या ठायी आपल्या जिव्हेचे चोचले पुरविले जातात. मात्र शरीराच्या गरजा भागविल्या जातील याची शाश्वती नसते. आपल्या शरीराची गरज ओळखून जिभेचे फारसे लाड न करता आपण आपला आहार ठरविणे म्हणूनच आवश्यक आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते. घरी जेवताना जिभेचे चोचले पुरविले जातात व शरीराचेदेखील! म्हणूनच घरांना भिंती असाव्यात व त्या भिंतीना मायेच्या ओलाव्याबरोबर आरोग्याची पाखरही घालता यावी, हेही महत्त्वाचे!

अ‍ॅल्युमिनियममुळे नेमकी काय इजा होऊ शकते? तर मानसिक गोंधळ, स्नायूंची शिथिलता, हाडे दुखणे, बोलण्यात तोतरेपणा येणे व मुलाची वाढ मंदावणे यासारखी लक्षणे या धातूच्या विषारीपणामुळे दिसू शकतात. याचे पर्यवसान फुप्फुसांच्या व हाडांच्या गंभीर आजारात किंवा मेंदूला इजा होण्यात होऊ शकते.

old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

डॉ. शरद काळे – sharadkale@gmail.com
सह संचालक, जैवविज्ञान वर्ग, भाभा अणुशक्ती केंद्र