तुमच्या लहानग्याला सातत्याने अ‍ॅलर्जीचा त्रास होतो का? तुमच्या कुटुंबात कफाच्या तक्रारी असतात का? अस्थमा, ब्राँकायटिस असे प्रश्न देशातील अनेक बालकांमध्ये व प्रौढांमध्ये सर्रास आढळतात. यासाठी प्रदूषण व हवामानाला निव्वळ दोष देणे योग्य नाही, तर या आजारांना कारणीभूत आहे तुमच्या स्वत:च्या घरातील गळती व दमटपणा.
वरच्या टाकीतील लहानशी गळती दुरुस्त करण्यासाठी किंवा तुमच्या बाथरूममधील जुन्या पाइपची दुरुस्ती करण्यासाठी विलंब केल्यास तुमच्या कुटुंबासाठी अनेक प्रकारचे आरोग्याचे
प्रश्न निर्माण होऊ  शकतात. पाण्याच्या गळतीने ओलावा व बुरशीशी संबंध आल्यामुळे नाक चोंदणे, घशाला खवखव, डोळ्यांना त्रास, त्वचेवरील पुरळ असे त्रास होऊ शकतात. कालांतराने बुरशीमुळे अस्थमा, फुप्फुसाला संसर्ग अशा प्रकारे त्रास होऊ  शकतात.
आरोग्याला धोका
भिंतींवरील ओलावा व बुरशी यांचा संबंध निरोगी व्यक्तींमध्ये  कफ, श्वसनास त्रास यांच्याशी संबंध असल्याचे संशोधन सांगते. अस्थमा असलेल्या लोकांतील अस्थमाची लक्षणे यामुळे अधिक तीव्र होऊ  शकतात. बुरशीशी संपर्क आल्यामुळे निरोगी बालकांमध्ये श्वसनविषयक आजार होऊ  शकतात किंवा श्वास घ्यायला त्रास होऊ  शकतो.
बुरशीमुळे अ‍ॅलर्जन्स व इरिटंट्स निर्माण होतात. त्याचा स्पर्श वा श्वसनावाटे शरीरात गेल्याने अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ  शकतो, जसे की शिंका, नाक गळणे, अस्थम्याचा झटका, डोळे लाल होणे, पुरळ येणे इत्यादी.
त्यामुळेच तुमच्या घरातील ओलाव्याच्या किंवा गळतीच्या खुणा शोधायला हव्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्यापूर्वीच त्याची दुरुस्ती करायला हवी.
बुरशी बाथरूम, सीलिंगचे कोपरे, भिंतींवरील ओले भाग, सीलिंग टाइल्स, गळती असलेले किचन कॅबिनेट, पाणी गळत असलेल्या भिंतीवरील वॉलपेपर आदी ठिकाणी वाढू शकते.
भिंतींवर ओलावा असण्याची कारणे
भिंतींवरील ओलावा स्वच्छ करणे किंवा ओले डाग पुसून टाकणे, हे या प्रश्नावरील उत्तर होऊ  शकत नाही. अतिरिक्त ओलाव्यामुळे निर्माण झालेली बुरशी पुन्हा पुन्हा येऊ  शकते. त्यासाठी बुरशीच्या स्रोतावर उपाय करायला हवा. इमारतीत ओलावा प्रामुख्याने गळक्या पाइपमुळे, बेसमेंट किंवा तळमजल्यावरील ओलावा वाढल्याने, इमारत जुनी झाल्याने किंवा बिघाड असलेल्या छतातून, खिडक्यांच्या चौकटीतून पाणी झिरपल्याने निर्माण होतो. नव्याने बांधलेल्या इमारतीत बांधकामाच्या वेळी वापरलेले पाणी योग्य प्रकारे न सुकल्याने ओलावा येऊ  शकतो.

तुमच्या घरात बुरशी वाढत असेल तर बुरशी काढून टाकण्याची गरज आहे आणि ओलाव्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायला हवा. ते कसे करायचे ते पुढे दिले आहे
०    तुमच्या घरातील आद्र्रतेचे प्रमाण कमी ठेवावे. एअरकंडिशनर किंवा डीहीम्युलायझरमुळे हे करण्यास मदत होईल. दिवसभरात आद्र्रतेची पातळी बदलत राहते. त्यामुळे त्याचा मागोवा घ्यायला हवा.
०    घरात हवा पुरेशी खेळती राहील याची काळजी घ्यावी. पाती बाहेर असतील अशा एक्झॉस्ट फॅनचा वापर स्वयंपाकघरात व बाथरूममध्ये करावा.
०    टेरेसची बारकाईने तपासणी करावी. पावसाळ्यात पाइप जाम नाही ना, याची पाहणी करावी. टेरेसवर पावसाचे पाणी साचल्यास इमारतीत पाणी झिरपू शकते. किरकोळ भेगा असल्या तरी चांगल्या वॉटरप्रूफिंग पर्यायांचा वापर करावा.
०    बाथरूममध्ये गळती असल्यास त्यावर उपाय करावा. बाथरूमच्या लाद्यांमधील फटींमुळे पाणी झिरपू शकते किंवा ओलावा राहू शकतो. ओलावा रोखण्यासाठी टाइल्ससाठी रॉफसारखे चांगले पर्याय वापरावेत.  
०    रंगकाम करण्यापूर्वी मोल्ड इनहिबिटर्सचा वापर करावा आणि बाथरूममध्ये बुरशीनाशक उत्पादने वापरावीत.
०    ओलसर खोलीतील कारपेट काढून टाकावे. कारण त्यामुळे आद्र्रता पसरू शकते.