सोसायटी ही लोकशाही पद्धतीने चालत असते. याचा अर्थ असा नव्हे, की सदस्याने मनाला येईल तसे वागणे. शेवटी प्रत्येकाला शिस्त ही पाळावीच लागते. सोसायटीत एकोपा राहण्यासाठी वार्षिक कार्यक्रमात सर्वाचा सहभाग असणे गरजेचे असते. महिनोन्महिने एकमेकांची भेट होत नाही ती अशा कार्यक्रमाने साध्य होते. मिळून मिसळून राहणे हेच सुदृढ सोसायटीचे द्योतक ठरेल.
सायटीच्या वार्षिक सभेमध्ये दर वर्षांप्रमाणे जे अनेक मुद्दे मांडण्यात येतात त्यापैकी एक- झाड लावणे. सोसायटीच्या परिसरात भरपूर मोकळी जागा असल्यामुळे झाडे लावण्यास वाव. नवीन कार्यकारिणीचा प्रस्ताव, जुन्या कमिटीचे असणारे वर्चस्व, फार कमी सभासद नवीन कार्यकारिणीवर येण्यास उत्सुक, जबाबदारी टाळणारे, त्यामुळे काही सभासद जाणूनबुजून गैरहजर राहणे, होला हो करणारे किंवा फक्त माना डोलावणारे, फक्त तोंड दाखवण्यापुरते येणारे असे विविध प्रकार आपणास बघावयास मिळतात.
कामे करणारे, यांना फक्त नावे ठेवण्यात येणारी मंडळी, कधी तरी भांडणापर्यंत त्यांची मजल जाते. ‘अहो, तुम्ही एवढं बोलता ना? मग तुम्हीच हे पद का नाही सांभाळत? बोलणं सोपं असतं, काम करणं कठीण’ असे प्रसंगपण उद्भवतात. त्यांना शांत करण्यास पुन्हा वेळ वाया जातो. मूळ मुद्दा राहतो बाजूलाच, अशा अनेक गोष्टी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत आपल्याला अनुभवयास मिळतात. प्रसंगी हमरीतुमरीवर येणारी मंडळी, वेळप्रसंगी त्यांना आवरणे कठीण होते.
एका सर्वसाधारण सभेत झाडे लावण्याचा विषय जेव्हा ऐरणीवर आली तेव्हा अनेकांकडून त्याविषयी मते मांडण्यात आली. झाडे न लावण्याच्या बाजूलापण मतप्रवाह होता. झाडे लावल्यामुळे होणारा त्रास यावर त्या मंडळींचा जोर होता. काही जणांची त्याला ‘हा’ होती, तर काहींचा त्याला ‘ना’ होता.
कंपाऊंड गेटच्या परिसरात उंच झाडे लावण्यास दुकानदारांचा मज्जाव. त्यांचं म्हणणं की, आमचा व्ह्यू जाणार, दुकान न दिसल्यामुळे आमच्या गिऱ्हाईकांवर त्याचा परिणाम होईल. उंच झाडे लावली तर त्याची मुळे बििल्डगच्या फाऊंडेशनमध्ये जाऊन बििल्डग कमजोर होईल, असं काहींचं मत होतं. कार पार्किंगच्या ठिकाणी उंच झाडे लावली, तर पावसात झाडे कोलमडून आपल्या गाडय़ांचे नुकसान होईल, पालापाचोळा पडून कचरा होईल. झाडांमुळे डासांचाही उपद्रव होण्याची शक्यता होती. अशा सर्व शक्यता पाहून पर्यावरणप्रेमी, जी झाडे लावण्याच्या बाजूला सरसावलेली मंडळी त्यांचा जरा भ्रमनिरास झाला.
एका सभासदाने असे सुचविले की, अशी झाडे लावण्यात यावीत, जेणेकरून व्ह्य़ूववरही परिणाम होणार नाही. किंवा त्यांच्या मुळांमुळे बिल्डिंगलापण धोका पोहोचणार नाही. सर्व जण त्या सभासदाचं कान लावून ऐकत होते. ते ‘काय’ बोलतात त्यावर लक्ष देत ते झाड कुठले असेल? यावर त्यांचे भाष्य चालू होते. अशोकाचं झाड लावणे सर्वात उत्तम. ते का? काही सभासदांनी त्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, एक तर हे झाड टॉवरसारखं उंच वाढतं. आजूबाजूला त्यांच्या फांद्या पसरत नाहीत. पूर्ण झाड हे १२ ही महिने हिरवेगार असतं. कंपाऊंड वॉलच्या जवळ लावल्यामुळे परिसरही सुंदर, दिमाखदार दिसेल. त्यांची मुळे जास्त न पसरल्यामुळे बिल्डिंगलाही धोका नाही आणि हे झाड सहसा पडत नाही. त्यामुळे नुकसानीचा प्रश्न उद्भवत नाही. पालापाचोळाही फारसा होत नाही. एका सभासदाने विरोधात जाण्याचा प्रयत्न केला, की म्हणे ही झाडे जास्त प्रमाणात पाणी खेचतात. त्यावर ते म्हणाले, ‘आपल्याकडे पाण्याची काय कमतरता आहे का? जमिनीत पाणी मुबलक आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. त्या झाडांना पाणीही नैसर्गिकरीत्या मिळते. त्यांना स्वत: पाणी घालण्याचीही आवश्यकता नाही.’ पुढे ते हेही म्हणाले की, पण एक लक्षात ठेवा, अशोकाचं झाड हे फक्त पुरुष (मेल) असावे. झाड लावताना याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. स्त्री (फीमेल) अशोकाचं झाड असेल तर त्याच्या फांद्या आडव्या पसरतात, तर पुरुष अशोकाच्या झाडाबद्दल तसं होत नाही. त्याच्या फांद्या जास्त पसरत नाहीत.
अशा संवादामुळे आपल्या ज्ञानात भरच पडत असते. अशोक हे झाड स्त्री-पुरुष असते हे कळले. पर्यावरणप्रेमी आणि बिनपर्यावरणप्रेमी यांच्यामध्ये एकमत होण्याचा मार्ग खुला झाला. पुरुष अशोकाची झाडे लावावीत असे सर्वानुमते ठरवण्यात आले. पर्यावरणप्रेमींचा एक गट निर्माण करून त्यांना ती जबाबदारी देण्यात आली.
काहींनी नारळाचे झाड लावण्यास किंवा आंब्याची, फणसाची झाडे लावण्यास आपली मते मांडली. त्यावर काही मंडळींनी आक्षेप घेतला. पुढे ती झाडे फळं देणारी झाली तर बाहेरून येणाऱ्या मुलांकडून दगडांचा मारा सहन करणार का? त्यावर सर्व शांत झाले किंवा येणाऱ्या फळांचे वाटे करण्यासाठी वेगळी समिती नेमणार का? वगैरे, वगैरे..
यावरून एक प्रसंग आठवला. एका सोसायटीमध्ये एकाने नारळाचे झाड लावले होते. गृहस्थ स्वत: ग्राऊंडच्या फ्लॅटमध्ये राहत असत. काही वर्षांनी त्या झाडाला फळं येण्यास सुरुवात झाली. सोसायटीच्या सर्वाचे लक्ष त्या आलेल्या भरगच्च नारळांवर! त्या नारळावर अधिकार गाजवण्यास प्रत्येक जण सरसावल्यावर ज्यांनी ते झाड लावले, ज्यांनी त्याला खतपाणी घातले, त्याची योग्य तऱ्हेने देखभाल केली, त्याचे श्रेय इतर जण कसे काय घेऊ शकतात? मुद्दा राहिला जागेचा- ते झाड ज्या ठिकाणी होतं ती जागा सोसायटीची, त्याचे काय? तेथील रहिवाशी जरा समजूतदार असल्यामुळे हा प्रश्न जास्त चिघळला नाही. ज्यांनी ते झाड लावले त्यांनाच त्याचा उपभोग घेऊ देत, असे ठरले. माणुसकी दाखवत ते गृहस्थ आलेल्या नारळाचे वर्षांतून एकदा गोडपदार्थ करून सर्व सभासदांना देत असत. हा त्यांचा चांगुलपणा होता. असो!
महानगरपालिकेने ठराव केल्याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सोसायटय़ांनी आपली बिल्डिंगची रंगरंगोटी करावी. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास पालिकेला मदत करावी. नसेल तर पालिका स्वखर्चाने ते करील आणि झालेला खर्च सोसायटीकडून वसूल करण्यात येईल, असा तो ठराव होता. त्याप्रमाणे तसं करणं सोसायटय़ांना भाग होते.
सभासदांनी आपल्या ग्रिलमधील सर्व कुंडय़ा, इतर अडगळ काढून टाकावी, असं सर्वानुमते मत झालं नसेल तर त्यांना दंड लावण्यात येईल. त्याला सर्वानी सहकार्य केले. काहींचा त्याला काही प्रमाणात विरोधही झाला. त्यांचे म्हणणे असे होते की, आपण सर्व हिंदू, आपल्या घरात एक तुळस तरी असावी, असं शास्त्र सांगते. सूर्याला अध्र्य देण्यासाठी, पण अध्र्य देताना खोलगट भांडय़ामध्ये तुळशीची कुंडी ठेवून पाणी खाली सांडणार नाही, याची काळजी त्या-त्या सभासदांनी घ्यावी असं ठरलं.
मुंबईत उंच उंच टॉवर तर झाले; पण कपडे वाळवण्याची सोय बाहेरच्या ग्रिलमध्ये होत असल्यामुळे ते टॉवर अगदी विद्रूप दिसायला लागले. ग्रिल म्हणजे अडगळीची जागा जणू. पूर्वी मुंबईत सर्वाकडे चाळी होत्या. कपडे व्हरांडय़ात सुकण्यासाठी ठेवत असत; पण ते दिसण्यात येत नसे. पण आता चाळींचे टॉवर झाले; पण प्रवृत्ती बदलली नाही. आता ही लक्तरे दुरूनही दिसावयास लागल्यामुळे टॉवरची शोभा निघून जाते. काही उच्चभ्रू वस्त्यांमध्ये असे चित्र दिसत नाही, कारण त्यांना ड्राइंग स्पेसची सोय असते. टॉवरची शोभा राखणे आपल्याच हाती आहे.
खिडक्यांची ग्रिल म्हणजे विविधोपयोगी अशी ही जागा असते. अडगळीचं सामान ठेवण्यासाठी ही हमखास जागा असते. नको असलेल्या सामानांसाठी ही जागा आहे असे वाटते. कपडे सुकवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच चिमुकल्यांसाठी ती बैठकीची जागा असते. काऊचिऊच्या गोष्टी सांगत आजी नातवंडांना भात भरवत असते. काही जण छान झाडं लावून सुशोभित करतात. पुन्हा ती राखणं, हे आलेच. झाडांना पाणी घालताना अतिरिक्त पाणी बाहेर सांडल्यामुळे बाहेरील भिंती मातीच्या डागांमुळे खराब होतात. पाणी बाहेर सांडू नये म्हणून उपाययोजना, ट्रेमधील पाण्याचा निचरा होत नसल्याने त्यात डासांच्या अळ्यांची पैदास होऊ नये यासाठी तो ट्रे वेळोवेळी साफ करणे गरजेचे असते. वेळेच्या अभावामुळे ते राहून जाते आणि आपण आजारांना निमंत्रण देत असतो. ग्रिलमध्ये पसरट कुंडय़ांमधून भाज्या उगवण्याचा मोह काही गृहिणींना आवरत नसतो. शेती करण्याची काहींना आवड असल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न असतो.
किचनच्या खिडकीमधील ग्रिल, हॉलमधील फ्रेंच विंडोतील ग्रिल, बेडरूममधील ग्रिल यांचा उपयोग वेगवेगळ्या तऱ्हेने होत असतो. किचनच्या ग्रिलमध्ये कावळ्यांच्या नजरा घरातील गृहिणी काय अन्न शिजवते त्यावर असते. छोटय़ाशा ट्रेमध्ये अन्न ठेवून ते कावळे फस्त करताना बघून त्यात त्यांना आनंद मिळतो. पक्ष्यांना ती सवय होते आणि ते पुन:पुन्हा येतात. कावळे हे (स्केवेंजर) पक्षी असतात. ते एक प्रकारे शहराची सफाई करणारे पक्षी आहेत. आपण शिजवलेले अन्न पुरवून त्यांना एक प्रकारे आळशीच करत असतो. त्यात चिमण्याही असतात. अनेक वेळा इतर पक्ष्यांची ये-जा असते. मैना, डोक्यावर तुरा असणारे रॉबिन पक्षी यांचेही दर्शन होते. उन्हाळ्यात अशा पक्ष्यांना कटोरीमध्ये पाणी ठेवण्यात यावे, असे पक्षिप्रेमी सुचवतात. त्यामुळे पक्ष्यांची तहान भागते. सिमेंट काँक्रीटच्या वस्त्यांमध्ये पक्ष्यांना भूतदया दाखवण्यासाठीही असेल. बेडच्या ग्रिलमध्ये लहानग्यासाठी भातुकलीचा खेळ खेळण्याची ती जागा असते. हॉलच्या ग्रिलमध्ये शोभेची झाडे लावण्याची जागा असते.
सोसायटी म्हटले तर सर्वाचे सहकार्य असावे लागते. सर्वानुमते जो निर्णय होतो त्याचा आदर राखणे हे सर्वाचे कर्त्यव्य असते. काही मुद्दय़ांवर असहमती असू शकते; पण ते सामंजस्याने सोडवणे. आपण अनेक सोसायटय़ांमध्ये कार पार्किंगच्या मुद्दय़ांवरून भांडणे होत असताना बघतो. सोसायटीचा परिसर साफ ठेवणे, जसं आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसं सोसायटीही स्वच्छ असावी यासाठीही प्रत्येक सभासदाने प्रयत्नशील असावे. फ्लॅटची अंतर्गत सजावट करताना बििल्डगला धोका पोहोचणार नाही याची काळजी प्रत्येक सभासदाने घ्यावी, जेणेकरून बोरिवलीतील लक्ष्मी बििल्डग कोसळण्यासारखी घटना घडू शकते. शेअर सर्टिफिकेटवर वारसदार नेमणे ह्या अशा गोष्टी योग्य वेळी केल्यानंतर सोसायटी चालवणाऱ्यांसाठी ते त्रासदायक ठरत नाही.
सोसायटी ही लोकशाही पद्धतीने चालत असते. याचा अर्थ असा नव्हे, मनाला येईल तसे वागणे. शेवटी प्रत्येकाला शिस्त ही पाळावीच लागते. सोसायटीत एकोपा राहण्यासाठी वार्षिक कार्यक्रमात सर्वाचा सहभाग असणे गरजेचे असते. महिनोन्महिने एकमेकांची भेट होत नाही ती अशा कार्यक्रमाने साध्य होते. मिळून मिसळून राहणे हेच सुदृढ सोसायटीचे द्योतक ठरेल.