गृहनिर्माण सोसायटी थकबाकी : समस्या व उपाय हा ‘वास्तुरंग’(२२ नोव्हेंबर) मध्ये प्रसिद्ध झालेला सतीश ओक यांचा लेख वाचला. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीच्या ताळेबंदात कोणत्या सभासदाकडून संस्थेला किती येणे बाकी आहे याचा लेखा परीक्षणाचा आढावा घेतला जातो. प्रत्येक वर्षांची मार्च अखेरची थकबाकी निर्देशित केली जाते हे लेखकाचे म्हणणे मान्य आहे, परंतु समितीने जाहीर केलेली थकबाकी खरी की खोटी हे कोणी ठरवायचे? काही वेळा समितीचे पदाधिकारी व सदस्य आपली मनमानी करून सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता काही खर्चाच्या बाबी सभासदांवर लादून मासिकबिलामध्ये त्यांचा समावेश करतात. सभासदांनी त्या रकमा भरल्या नाहीत तर त्यावर विलंब शुल्कसुद्धा आकारले जाते. अशा या थकबाकीच्या रकमा सभासद जाणीवपूर्वक भरत नाहीत. अशी थकबाकी ताळेबंदात निर्देशित केली म्हणून खरेच का ती थकबाकी होऊ शकते? समजा त्या थकबाकीसंबंधात पुढल्या आर्थिक वर्षांत काही तडजोड होऊन थकबाकी माफ केली तर आदल्या वर्षांच्या ताळेबंदास काही अर्थ राहात नाही. ताळेबंदात मालमत्तेच्या बाजूकडे थकबाकी दाखवली जात असल्यामुळे मालमत्तेचा आकडा फुगलेला दिसतो. तथापि, पुढल्या वर्षांत तडजोडीने किंवा अन्य काही कारणाने थकबाकी कमी केल्यास मालमत्ता (Assets) कमी होऊन देणे (Liability) वाढण्याची शक्यता जास्त असते. काही गृहनिर्माण संस्था संस्थेची आर्थिक बाजू भक्कम आहे हे दाखवण्यासाठी ताळेबंदातील मालमत्तेची बाजू वाढवून दाखवण्याच्या हेतूने सभासदांची थकबाकी वाढवून दाखवतात. वास्तवात त्यातल्या काही संस्था डबघाईला आलेल्या असतात. तुम्ही म्हणाल, हे सर्व वैधानिक लेखा परीक्षकाने तपासून पाहिले पाहिजे. असे लक्षात येते की, वैधानिक लेखा परीक्षकांना या कामात स्वारस्य नसते. कामाच्या मानाने मोबदला कमी मिळत असल्यामुळे लेखा परीक्षकसुद्धा सोसायटय़ांचे लेखा परीक्षण बारकाईने करीत नाहीत. काही संस्था आपली खाते पुस्तके मनमानी पद्धतीने लिहीत असतात. त्याच्यात शास्त्रोक्त पद्धत काहीच नसते. मी राहतो त्या संस्थेचे सव्वाशेपेक्षा जास्त सभासद आहेत. आमच्या संस्थेच्या विद्यमान समितीची खाते पुस्तके बघायला गेले तर खुद्द ब्रह्मदेव आला तरी त्याला कळणार नाहीत अशी खाते पुस्तके लेखा परीक्षक तरी काय तपासणार. तोदेखील माणूसच आहे ना?
येथे प्रश्न आहे खोटय़ा थकबाकीचा व मंजूर ताळेबंदाचा समतोल बिघडण्याचा. त्यामुळे मला असे सुचवावेसे वाटते की, सर्व गृहनिर्माण संस्थांनी तीन महिन्यांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या आपल्या सर्व सभासदांना प्रत्येक वर्षांच्या जानेवारी महिन्यात थकबाकी भरण्यासंबंधात सूचना (Notice) पाठवावी. सभासदांनी जर संस्थेच्या थकबाकी नोटिशीला आव्हान दिले असल्यास त्यांचे म्हणणे काय आहे हे समजून घेण्यासाठी फेब्रुवारी महिना अखेरीस विशेष सर्वसाधारणचे आयोजन करावे. सोसायटीच्या सर्वसधारण सभेत संशयित थकबाकीत काही सुधारणा होते का हे प्रथम पाहावे व त्यानुसार थकबाकी यादीला अंतिम स्वरूप सभेतच द्यावे. जर सभासद संस्थेच्या थकबाकीत नोटिशीविरोधात सहकार निबंधकाकडे किंवा न्यायालयात गेला असेल व तशी सूचना त्याने समितीला मार्च अखेपर्यंत दिली असेल तर त्या सभासदाची थकबाकी ताळेबंदातील मालमत्तेच्या बाजूकडे दाखवू नये. सदर थकबाकी प्रकरणाचा निकाल संस्थेच्या बाजूने आल्यास संस्था थकबाकीची वसुली सव्याज करू शकते. त्यामुळे खोटय़ा थकबाकीचा व मंजूर ताळेबंदाचा समतोल बिघडण्याची शक्यता कमी होतील. थकबाकीचा समावेश ताळेबंदात करण्यापूर्वी सभासदांना नोटीस दिलेली असावी व संस्थेच्या सर्वसाधारण सभेने थकबाकीला मंजुरी दिलेली असावी हे कायदेशीर बंधन गृहनिर्माण संस्थांवर असावे. गृहनिर्माण संस्थांच्या अभ्यासकांनी यावर विचार करावा.