आपल्यापैकी प्रत्येकाने एखादा बंगला किंवा सेकंड होम खरेदी करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले असते. सेकंड होमची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे व त्यासाठी आज अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. शहरानजीक एखादे सेकंड होम असणे ही कल्पना फारच चांगली आहे; कारण त्यामुळे सुट्टीचे वार किंवा महिना अखेर आनंदात तर जातोच, पण गुंतवणूक म्हणूनही त्याचा फायदा होतो. भारताची वाढती आर्थिक परिस्थिती व चांगल्या उत्पन्नामुळे खर्च होऊ नही शिल्लक राहणारी रक्कम यामुळे जास्तीत जास्त लोकांना सेकंड होम खरेदी करायची इच्छा आहे. केवळ मुंबई आणि पुण्यामध्ये जवळजवळ ३ लाख सेकंड होमची मागणी आहे. सबंध भारत देशात हीच मागणी १० लाखपर्यंत आहे व कालांतराने याची संख्या वाढतच जाणार आहे. या लेखातून सेकंड होम खरेदी करताना नेमक्या कोणत्या बाबी पडताळून पाहाव्यात हे पाहू. यातून फसगत होण्याची शक्यता कमी होऊन स्वप्नातील सेकंड होम खरेदीसाठी योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.  
सेकंड होम खरेदी करण्याची कारणे स्पष्ट करा : सेकंड होम खरेदी करण्याची अनेक कारणे असू शकतात. कोणासाठी ही अभिमानाची व यशस्वीतेची बाब असेल. सुट्टीच्या वारी किंवा महिन्यातून एकदा कुटुंबासोबत राहू शकता व वेळ घालवू शकता, शिवाय बागकाम, ट्रेकिंग, फिशिंग, लागवड करणे असे तुमचे छंद जोपासू शकता. गुंतवणुकीसाठी हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. निवृत्तीनंतर शहराच्या धावपळीच्या व गर्दीच्या वातावरणात राहायचे नसेल तर निसर्गाच्या सान्निध्यात या सेकंड होममध्ये राहू शकता. सेकंड होम खरेदीची कारणे पडताळून पाहणे, हे सेकंड होम खरेदी करण्यापूर्वीचे पहिले पाऊ ल असेल.     
उपलब्ध रक्कम ठरवणे : सेकंड होम खरेदी करण्यासाठी आपल्याकडे किती रक्कम उपलब्ध होऊ  शकते हे ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. वार्षिक उत्पन्नाच्या ४ ते ५ टक्के अधिक रक्कम सेकंड होममध्ये गुंतवता येऊ  शकते. अधिकची जमा रक्कम असल्यास सेकंड होमसाठी अधिक रक्कम उपलब्ध होऊ  शकते. होम लोनसुद्धा मिळते. त्यामुळे करबचत करण्यासाठीही सेकंड होमची खरेदी करता येते.      
सेकंड होमचे प्रकार : सेकंड होमचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत जसे, बिनशेती जमीन, शेतजमीन, लक्झरी अपार्टमेंट, रो हाउस, बंगला किंवा विला. सेकंड होमचे कारण आणि उपलब्ध असेलली रक्कम यावरून कोणत्या प्रकारचे सेकंड होम खरेदी करायचे हे ठरवू शकता. सेकंड होम तातडीने वापरायचे असेल तर तयार असणारे प्रकार म्हणजे लक्झरी अपार्टमेंट, बंगला किंवा विला खरेदी करू शकता. पण काही वर्षांनी सेकंड होमची गरज असेल किंवा खाजगी स्वरुपात तयार करायचे असेल तर शेतजमीन किंवा बिनशेती जमीन हा योग्य पर्याय असू शकतो.  
ठिकाण : वरील सर्व गोष्टी ठरल्यानंतर सेकंड होमचे ठिकाण निश्चित करावे. इथेही निवड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसे, खंडाळा, लोणावळा, अलिबाग, कोलाड, तळेगाव, कामशेत हे सर्वाना माहीत असलेले असे पर्याय आहेत; तर शहापूर, वाडा, रोहा, मुरबाड ही ठिकाणे सेकंड होम तयार होत आहेत. सेकंड होम कधीही २ ते ३ तासांच्या अंतरावर असावे. कारण हे घर जेव्हा हवे तेव्हा वापरता येण्यासारखे असावे. शिवाय निसर्ग, हिरवाई, परिसर आणि पाण्याची सोय पाहूनच निर्णय घ्यावा.   
सोयीसुविधा : सेकंड होमसाठी जे ठिकाण निवडाल त्यावेळी त्याच्याजवळ निदान मूलभूत सोयीसुविधा जरूर पाहा. तिथे पक्के रस्ते, पाण्याची सोय, वीज अशा सुविधा असाव्यात. बाजार, हॉस्पिटल व इतर आवश्यक सुविधा सहज उपलब्ध होऊ  शकतील.
डेव्हलपरची प्रत पाहा : जो डेव्हलपर किंवा कंपनी त्या जागेचे बांधकाम किंवा विकास करणार आहे, त्याचे व त्याने याधी केलेल्या कामाची माहिती मिळवा. शक्य असल्यास त्याच्या ग्राहकांशी संवाद साधा.  
कायदेशीर बाबी पडताळून पाहा : सेकंड होम खरेदी करण्याचा निर्णय घेताना ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. त्या प्रकल्पाला सर्व कायदेशीर मान्यता व परवाने आहेत याची खात्री करून घ्या.
मनोरंजनाच्या सोयीसुविधा : असा प्रकल्प निवडण्याचा प्रयत्न करा, जिथे मनोरंजनाच्या सोयीसुविधाही असतील; जिथे कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवता येईल.  
वरील सर्व बाबी एकदा पडताळून पहिल्यात की सेकंड होम खरेदी करण्यासाठी केलेली निवड अचूक असेल याबद्दल खात्री बाळगा.