घर म्हणजे केवळ चार भिंतींचा आडोसा नाही, असं नेहमी म्हटलं जातं. घराला घरपण देणाऱ्या या भिंती घरातल्या इतर कोणत्याही गोष्टी इतक्याच महत्त्वाच्या असतात. सुंदर रीतीनं सजवलेली भिंत ही घराच्या सौंदर्यात भर टाकत असते, पण हीच भिंत डागाळलेली, अनाकर्षक असेल तर घर कितीही सजवलं तरीही अजागळ वाटेल.
मागील भागात आपण एकूणच घराच्या संपूर्ण फ्लोरिंगबद्दल जाणून घेतलं. घराला नवा लुक देताना फक्त रंगरंगोटी करून भागत नाही. तर घराला शोभून दिसतील अशा टाइल्स बसविणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. फ्लोअरिंगनंतर घराच्या सुशोभीकरणासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती आहे, घराच्या भिंती. कारण कुठल्याही प्रकारच्या फर्निचरसाठी अथवा सजावटीसाठी सर्वात महत्त्वाची असते ती त्यांची बॅकग्राउंड. जर तीच सुंदर असेल तर त्याच्यासमोर ठेवलेली कुठलीही वस्तू सुंदर दिसते. अन्यथा कितीही किमती आणि सुंदर फर्निचर असेल; पण त्याच्या मागची भिंत जर चांगल्या रीतीने सजवली नसेल तर त्या फर्निचरचं सगळं सौंदर्य व्यर्थच. सर्वसाधारण जमिनी आणि भिंतीवर टाइल्स बसविल्या जातात. हल्ली विविध रंगात तऱ्हतऱ्हेच्या डिझाइन्समध्ये टाइल्स उपलब्ध होत असल्यामुळे घराला एक ‘ग्रँड लूक’ आपण देऊ  शकतो. टाइल्स सुंदर दिसण्याबरोबर ws06रफ-टफदेखील असाव्यात अशी प्रत्येक ग्राहकाची मागणी असते. अर्थात, हा थोडा खर्चीक भाग असला तरी या टाइल्स बसविताना योग्य आणि आवश्यक ती खबरदारी घेतल्यास या टाइल्स वर्षांनुवर्षे सहज टिकू शकतील. या लेखात टाइल्स संदर्भातील विविध पर्यायांबद्दल अधिक जाणून घेऊया.
साधारणत: भिंतीवरील टाइल्सला डॉडो टाइल्स असे म्हणतात. मग त्या किचन, बाथरूम, टॉयलेटच्या असोत किंवा अगदी घराबाहेरील भिंतीवर लावल्या जाणाऱ्या असोत. टाइल्स या मुख्यत: ज्या ठिकाणी सतत पाण्याचा मारा होत असेल अशा ठिकाणी अथवा अशी भिंत जिथे वारंवार ओल, बुरशी, वेगवेगळ्या प्रकारचे डाग येत असतील अशा ठिकाणी लावण्याचा सल्ला आम्ही ग्राहकांना देतो.

कुठल्याही प्रकारच्या फर्निचरसाठी अथवा सजावटीसाठी सर्वात महत्त्वाची असते ती त्यांची बॅकग्राउंड. जर तीच सुंदर असेल तर त्याच्यासमोर ठेवलेली कुठलीही वस्तू सुंदर दिसते. अन्यथा कितीही किमती आणि सुंदर फर्निचर असेल; पण त्याच्या मागची भिंत जर चांगल्या रीतीने सजवली नसेल तर त्या फर्निचरचं सगळं सौंदर्य व्यर्थच.

पूर्वीच्या काळी टाइल्स या लहान आकारात मिळत असत, ज्याची जाडी ही ४ मिमी एवढी असायची. परंतु आता मिळणाऱ्या टाइल्स या मोठय़ा आकारात मिळत असल्यामुळे त्याची जाडी ६ ते ८ मिमी एवढी असते. आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या आकारात टाइल्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये ग्लॉसी किंवा मॅट अशा टाइल्स जास्त प्रमाणात दिसून येतात. सध्या आपल्या गरजेनुसार अथवा आवडीनुसार रंगसंगतीत टाइल्स दिसून येतात. यामध्ये विविध प्रकारही उपलब्ध आहेत. उदा. सिरॅमिक, जॉइंट फ्री टाइल्स, ग्लास टाइल्स, डिजिटल टाइल्स इत्यादी. यातील बहुतेक टाइल्स या भारतात बाहेरून मागविल्या जातात.
या सर्वच टाइल्समध्ये काही टाइल्स या भितींवर तसेच जमिनीवरही लावता येतात. या प्रकारच्या टाइल्स जास्त करून बाथरूममध्ये वापरल्या जातात. वर म्हटल्याप्रमाणे टाइल्सचा उपयोग हा पाण्याचा मारा होत असणाऱ्या ठिकाणी तसेच मेंटेनन्स फ्री, घरातील सिपेज असणाऱ्या जागी केला जातो. त्यामुळे आजकाल टाइल्समध्येही हायलायटर टाइल्स वापरण्याचा नवा ट्रेंड रुजू झाला आहे. हे हायलायटर वेगवेगळ्या प्रकारात येतात. काही बारीक पट्टय़ांमध्ये उपलब्ध असतात. काही टाइल्स स्वरूपात येतात. काही एखाद्या जाळीवर चिकटवलेले असतात, पेन्सिलसारखे दिसणारे असतात.. एकूणच आजकाल घरात शो येण्यासाठीही टाइल्स वापरल्या जाऊ  लागल्या आहेत.
टाइल्स लावण्याचा महत्त्वाचा फायदा म्हाणजे घरातल्या एखाद्या भिंतीवर वारंवार ओल येत असेल तर सारखं रंग लावण्याच्या त्रासापासून सुटका. पण याचा अर्थ असा नाही की भिंतीवरचा ओलसरपणा झाकला जाईल. काही वेळा जास्त ओलसरपणा असल्यास या टाइल्स सुटून बाहेर येऊ  शकतात. अशा वेळी तेथे बाहेरून ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे. खरं तर या सर्वच गोष्टी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी जाणून घेणे हे फारच महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणी आपल्याला फसवणार नाही. आपलं स्वप्न, आपलं घर बनताना त्याचा दर्जा राखता येतो. पुढील लेखात आपण पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
– केतन निमकर
इंटेरियर डिझायनर
शब्दांकन :  मानसी आकेरकर