आपल्या स्वप्नातील घराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एक न दोन अनेक पर्याय उपलब्ध असतात. गेल्या काही लेखांतून आपण अशाच काही पर्यायांबद्दल जाणून घेत आहोत. मागील लेखात आपण पीओपीबद्दल सविस्तरपणे समजून घेतले.
आजच्या लेखात आपण एका वेगळ्याच प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत. हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. घरातील प्रत्येक खोलीत अगदी रस्त्यावरही ही गोष्ट आवश्यकच असते. यावरून तुम्हाला हे काय आहे ते कळलंच असेल ना? आज आपण लाइट्स, लाइट फिटिंग्ज्स याबद्दल जाणून घेऊ या.   

आजपासून सुमारे १५-२० वर्षांपूर्वी घराघरांत बल्ब वापरले जायचे. हे बल्ब ० ते अगदी २०० व्हॉल्टस्पर्यंत वापरले जायचे. त्यानंतर टय़ूब्ज् अस्तित्वात आल्या. या टय़ूब्ज् अंदाजे ४० व्होल्टस्च्या असायच्या. या ओपन टय़ूब फिटिंग असल्यामुळे संपूर्ण खोलीत त्याचा उजेड पडायचा. पण वाचन करण्यायोग्य प्रकाश काही मर्यादित जागेतच मिळायचा. जरा मोठी खोली असली की त्यात दोन टय़ूब वापरल्या जायच्या.
काळानुरूप जसा सगळ्या गोष्टींत बदल होऊ  लागला, तसाच या लाइट्सच्या प्रकारातही बदल होऊ  लागला. मग CFL टय़ूबचा शोध लागला. CFL म्हणजे Compact Fluorescent Lamp. त्यालाच पॉवर सेव्हर असे म्हणतात, CFL मध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या ३,८,१२,१५,२२,२५,३६ व्होल्टस्च्या टय़ूब उपलब्ध आहेत. म्हणजे ज्या घराच्या हॉलमध्ये पूर्वी ४० व्होल्टस्च्या दोन टय़ूब वापरल्या जायच्या (४० ७ २ = ८०), त्या ठिकाणी CFL च्या १८ व्हॉल्टस् ४ टय़ूब (१८ ७ ४=७२) घरातील ४ वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जाऊ  लागल्या. साध्या टय़ूबच्या तुलनेत याचे व्हॉल्टस् कमी असल्यामुळे विजेची बचत होऊ  लागली. त्यामुळे बिल कमी होऊ  लागले. यामध्येच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात पांढरा, पिवळा आणि हलकासा पिवळा अशा तीन छटा प्रकाशातून दिसू लागल्या. या वेगवेगळ्या रंगाच्या लाइट्स फिटिंगमुळे घरातील रंगसंगतीमध्ये आकर्षक बदल करणे सहजसोपे झाले.
ws09यानंतर आता नव्याने शोध लागलेला प्रकार म्हणजे LED  लाइट्स म्हणजेच Light Emitting Diode. या LED  लाइट्समध्ये पुष्कळ प्रकार आहेत. हे लाइट्स १ व्होल्टपासून ते ३६ व्होल्टस्पर्यंत उपलब्ध आहेत. त्यापेक्षा जास्त व्हॉल्टसचे दिवे हे रस्त्यावरील दिव्यांसाठी वापरले जातात. LED  लाइट्समध्ये लाल, निळा, हिरवा, पिवळा, पांढरा हे पाच रंग सहज उपलब्ध असतात व त्याच्या कमी-जास्त प्रमाणाच्या फरकामुळे इतर काही रंगही यातून बनतात. जसे नारंगी, जांभळा, आकाशी अथवा मोरपिशी. हे LED  लाइट्स CFL प्रमाणे टय़ूबमध्ये बनत नसून मिरची बल्ब अथवा बटण असल्याप्रमाणे लहान डॉट्समध्ये येतात. काही  LED  लाइट्सना पुढे लेन्स असतात. यामुळे त्याचा प्रकाश खोलीत सर्वत्र पसरतो.
हे LED  लाइट्स वेगवेगळ्या प्रकारात मिळतात. यात स्पॉट लाइट १,३,६,९ व्होल्ट मध्ये व टय़ूब ३६ व्होल्टमध्ये १ ते ४ फुटांत मिळतात. LED  लाइट्स हे अतिशय कमी जाडीचे म्हणजे १/२ इंच जाडीपर्यंत उपलब्ध असल्यामुळे पी.ओ.पी.च्या सिलिंगची उंची कमी करणे शक्य झाले आहे. या LED  लाइट्सना पॅनल लाइट्स असेही म्हणतात. हे पॅनल लाइट्स १२,१५,१८,२२,२६,३२,३६ व्होल्टस्पर्यंत मिळतात.
या LED  लाइट्समध्ये LED  पट्टय़ा (Strips) सुद्धा मिळतात. ती LED  पट्टी आपल्या सेलोटेप एवढय़ा जाडीची असते. ही मीटरप्रमाणे मिळते व यातही सगळे रंग मिळतात. यातील RGB (रेड, ग्रीन, ब्लू) पट्टय़ांमध्ये कोणताही रंग ठेवता येऊ  शकतो. फक्त त्याला त्या प्रकारचा डायव्हर्टर लावावा लागतो.
LED  लाइट्स ही आजच्या काळाची गरज आहे. याची सुरुवातीची किंमत जरी जरा जास्तच असली तरी दीर्घकाळ वापरल्यामुळे या फिटिंगची किंमत वसूल होते. तसेच यांचे व्होल्टस् कमी असले तरी प्रकाशाची प्रखरता जास्त असते.
केतन निमकर – knassociates9@gmail.com
(इंटीरिअर डिझायनर)
शब्दांकन : मानसी आकेरकर