स्वयंपाकघरात कराव्या लागणाऱ्या कामाच्या अनुषंगाने जसा हवा तसा वापर करता यावा असं अपेक्षित असतं. यामध्ये तिच्या दृष्टीने दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे स्वयंपाक करण्यासंबंधित काम आणि दुसरे ते करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी करावी लागणारी सोय. या दोन्ही बाबींमध्ये अधिक महत्त्वाचं असतं ते म्हणजे तेथील जागेचं आणि सबंधित वस्तूंचं शास्त्रीय व्यवस्थापन.
आपल्या घरातील इतर जागांच्या तुलनेनं स्वयंपाकघरात अंतर्गत संरचनेच्या दृष्टिकोनातून करावा लागणारा विचार निश्चितच निराळा असतो. या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपातील काही कामे आणि तीदेखील संपूर्ण कुटुंबासाठी केली जात असतात. अनेक कारणाने या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीच्या होणाऱ्या हालचाली, त्यासाठी करावा लागणारा वावर आणि प्रत्येक वस्तूचा वापर अशा अनेक बाबींचा अभ्यासपूर्ण विचार करावा लागत असतो. त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा, शारीरिक आकार, आकारमान, हालचाली, लकब, सवयी, आवडी-निवडी, व्यवसाय, शिक्षण, कौटुंबिक पूर्वपीठीका आणि परंपरा अशा अनेकविध बाबींचा विचार करून स्वयंपाकघरात संरचना साकारावी लागत असते.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ त्यामुळे ज्या व्यक्तीसाठी स्वयंपाकघरात संरचना साकारायची आहे त्या व्यक्तीच्या दैनंदिन कामाच्या सवयी, कामातील सुलभता, सुटसुटीतपणा, नेमकेपणा, साधेपणा, पण तरीही कामात जलद गती आणण्यासाठी अंतर्गत संरचनाकार आपलं कौशल्य वापरत असतो. या ठिकाणी काम करण्याऱ्या व्यक्तीच्या हालचाली कमीत कमी होऊन काम जितकं जलद गतीनं होईल तितकंच तेथील अंतर्गत संरचनेचं काम योग्य झालं आहे, असं म्हणता येऊ शकतं.
सर्वसाधारणपणे आपल्या कुटुंबीयांच्या परिचयाच्या परंतु तरीही फारसे जवळचे संबंध नसलेल्या व्यक्ती जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा त्यांना आपल्या स्वयंपाकघरात प्रवेश असत नाही. कारण ही जागा त्या घरातील गृहिणीसाठी हक्काची असते. त्यामुळे केवळ घरातील अथवा अगदी जवळच्या नाते संबंधांतील व्यक्तीच या ठिकाणी आल्या तरी त्या गृहिणीची हरकत नसते. कदाचित स्वयंपाक करण्यासाठी कोणी आचारी येत असेल तेव्हढी एखादी व्यक्ती बाहेरची असू शकते. आपल्या घरी येणारी प्रत्येक व्यक्ती अगदी नेहमी पूर्वपरिचित आणि पूर्णपरिचित असेलच असं नाही. अशा वेळी आपण अशा व्यक्तीला निश्चितच पाहुणचारासाठी अर्थात पिण्यासाठी पाणी, चहा, कॉफी, नाश्ता देतो.
आपल्या घरातील अगदी तिळापासून स्वयंपाकघरातल्या स्वयंपाकाच्या तेलापर्यंत अनेक लहान-मोठय़ा वस्तू साठवून ठेवण्यासाठी सोई-सुविधा कराव्या लागत असतात. या वस्तूंची संख्यात्मक आणि आकारात्मक दोन्हीही प्रकारे मोजमापं तसेच त्या त्या वस्तू ठेवण्याची पद्धत लक्षात घेणं जरुरीचं असतं. तुलनेनं इतर दालनांमध्ये इतक्या विविध प्रकारच्या आणि निरनिराळ्या वस्तू ठेवण्याची गरज क्वचितच असते. अन्नधान्याच्या वस्तूंमध्ये तर काही वस्तूंचा वापर सातत्यानं न केला गेल्यास त्या टिकवून ठेवण्यासाठी अधूनमधून त्यांची काळजी घ्यावी लागते. अशी फारशी गरज इतर वस्तूंच्या बाबतीत आपल्याला कधी पडत नाही.
आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत हे जर निराळ्या पद्धतीनं अर्थात थोडंसं हटके झालं तर ते निश्चितच अविस्मरणीय ठरू शकतं. ‘अतिथि देवो भवं’ या उक्तीप्रमाणे घरी येणाऱ्या प्रत्येकाचं केवळ स्वागतच नाही तर सन्मानपूर्वक आदरातिथ्य करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघराच्या संरचनेचा तसेच त्या ठिकाणी बनवलेल्या अन्न पदार्थाचा मोलाचा वाटा असू शकतो, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा स्वयंपाकघरात बनवलेला केवळ कपभर चहासुद्धा अमृततुल्य वाटू शकतो; इतर स्वयंपाकाची गोडी तर न्हारी असू शकते.
 जागेचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीने आणि लहान जागेतसुद्धा अधिकाधिक वस्तूंची सोय आणि सुविधा करण्याच्या दृष्टीने संरचना करावी लागत असते. यामध्ये स्वयंपाकाचा ओटा सर्वात महत्त्वाचा असतो. या ओटय़ाची संरचना साकारण्याच्या विविध पद्धती आहेत. यांपकी कोणती पद्धत आपल्या स्वयंपाकाच्या दृष्टीने योग्य आहे ते पाहून एकूणच संरचना ठरवावी लागते. मुळातच इतर दालनांच्या तुलनेनं स्वयंपाकघराचं आकार आणि आकारमान लहान असतं. पण गरजेच्या वस्तू मात्र असंख्य असतात की ज्या याच ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने ठेवाव्या लागतात.
 या ठिकाणी करावं लागणारं फíनचर शक्यतो कायमस्वरूपी असणं योग्य ठरतं. तात्पुरती सोय या ठिकाणी उपयोगाची नसते. कामात शक्य तितका लाकडाचा वापर टाळावा. आपल्या घरात फíनचर बनवण्यासाठी अनकेदा वापरलेल्या लाकडाला ढेकूण, झुरळ, पाली, वाळवी यांचा त्रास होऊ शकतो. विशेषत: स्वयंपाकघरात तेथील वातावरणामुळे आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या हवामानामुळे कीटकनाशकांचा प्रादुर्भाव अधिक असण्याची शक्यता असते. स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेल्या किचन ट्रॉलीचा वापर करणं अधिक संयुक्तिक ठरू शकतं. शक्य झाल्यास त्यावरील आच्छादन पीव्हीसीचा वापर करून बनवता येऊ शकतं. धान्याच्या डब्यांसाठी एकतर कडप्पा अथवा संगमरवर वापरून मांडणी करता येऊ शकते. अथवा स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंपासून ती बनवली जाऊ शकते.
 अंतर्गत संरचना म्हणजे आपल्या जागेचं आणि मालमत्तेचं शास्त्रीय व्यवस्थापन असतं हे आपल्याला ज्ञात आहेच. या संकल्पनेचा आणि एकूणच या शास्त्राचा आपण कशा प्रकारे वापर आपल्या गृहसजावटीच्या कामात करतो यावरून आपल्या वैचारिक प्रगल्भतेची कल्पना आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला आल्याशिवाय राहात नाही. याच दृष्टिकोनातून विशेषत: स्वयंपाकघराची संरचना आणि एकूणच मांडणी करावी लागते. अंतर्गत सजावट ही कला असूनही अंतर्गत संरचना करताना तीच शास्त्र म्हणून कशी वापरली गेली पाहिजे हे जाणून घेणं जरुरीचं आहे. यामध्ये घरातल्या स्वयंपाकाच्या दलनातील एकूणच सर्व व्यवस्थेची आणि प्रत्येक वस्तूच्या जागेची निश्चिती करणं तसेच त्या एका निश्चित जागेवर ठेवण्यासाठी तशी सोय करणं महत्त्वाचं असतं.
 प्रत्येक व्यक्ती सदोदित अनेकविध मानसिक अवस्थेतून जात असते. या मानसिक अवस्थेची सतत स्थित्यंतरे आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळत असतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वयंपाकघराची संरचना करावी लागत असते. आपल्या घरातल्या सुखावह ठरणाऱ्या संरचनेमुळे तसेच एकूणच व्यवस्थेमुळे स्वयंपाकघरात काम करणाऱ्या व्यक्तीचे मानसिक परिवर्तन होण्यास मदत होते. यासाठी त्या काम करणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरून केलेली संरचना उपयुक्त ठरू शकते.
स्वयंपाकघराच्या अंतर्गत सजावटीच्या कामात विविध वस्तूंच्या निवडीमध्ये आपला कस लागत असतो. या ठिकाणी होत असणाऱ्या कामांमुळे, स्वयंपाकामुळे, तळणीच्या कामामुळे, स्वयंपाकाच्या भाजणं तस्ांच उकडणं अशा स्वरूपातील कामांमुळे वापरलेल्या वस्तू, फíनचर, इतर सजावट हे सर्वकाही दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी त्या सर्वाची निवडदेखील तशीच केली पाहिजे. या वस्तूंचा टिकाऊपणा, सौंदर्य, साफसफाईच्या दृष्टीने करावी लागणारी देखभाल, तसेच त्याच्या मूळ संरचनेतील वेगळेपण, आíथक बाब, वस्तूचं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्व अशा अनेक बाबतींतून अभ्यासपूर्वक विचार करावा लागतो.
आपल्या घरातील प्रत्येक दालन महत्त्वाचंच असतं. पण त्यातही स्वयंपाकाचं दालन हे अधिक महत्त्वाचं समजलं जातं. कारण अन्नपूर्णेची सेवा ही साक्षात गृहलक्ष्मीच्या हातून होत असते. गृहलक्ष्मी समाधानी राहून त्या अन्नपूर्णेची अंत:करणाने सेवा करण्यासाठी या दालनाची अंतर्गत संरचना आणि सजावट करणं अत्यंत जरुरीचं असतं. तिच्या समाधानातूनच संपूर्ण कुटुंबाला सुख, समाधान आणि शांती मिळणार आहे.  
शैलेश कुलकर्णी
इंटिरीअर डिझायनर
sfoursolutions1985@gmail.com

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती